fbpx
राजकारण

होय हे शक्य आहे

विल्यम शेनस्टोन नावाचा ब्रिटीश कवी म्हणायचा कि “ वेडे लोक हे एकामेकांना घट्ट पकडून असतात अन हुशार लोकांत सतत काहीना काही मतभेद असतात” काँग्रेस पुरेशी पुरोगामी नाही म्हणुन आधी कम्युनिस्ट बाहेर पडले मग समाजवादी, त्याचवेळी काँग्रेस पुरेशी उजवी नाही म्हणुन धर्मकेंद्रित राजकारण करू पाहणारे काही लोकही तिथून बाहेर पडले. हेडगेवार, मालवीय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे एकेकाळी काँग्रेस मध्ये होते. डाव्यांच्या संघटनेची पुढे असंख्य शकले झाली. हिंदुत्ववादी मात्र एकचालकानूवर्तीत्व मानत थोडे फार अपवाद वगळता एकत्रच राहिले. त्याला बराच काळ उलटून गेल्यावर आता निवडणुकीच्या राजकारणात या फरकामुळे कसा परिणाम जाणवला हे बघणे रंजक ठरेल.

— डॉ अमर जाधव

मागच्या सात वर्षांची तुलना केली तर २०१६-१७ हे आर्थिक वर्ष “बेरोजगारीचे वर्ष” म्हणुन जाहीर व्हायला हरकत नसावी, कारण केंद्र शासनाच्याच लेबर मिनिस्ट्रीने दिलेल्या आकडेवारी नुसार यावर्षी देशात सर्वात कमी रोजगार निर्माण झालेले आहेत. मोदींनी २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारात तरुणांना दरवर्षी तब्बल दोन कोटी नोकऱ्या मिळतील अशी आशा दाखवली होती, प्रत्यक्षात देशात त्या आश्वासनाच्या फक्त वीस टक्केच नोकऱ्या कशाबशा नवीन तयार झालेल्या आहेत. मोठमोठ्याने देशप्रेमाच्या घोषणा देत अन जो भाजपचा विरोधी तो देशद्रोही असलं बीभत्स समीकरण पुढे आणत संघपरिवार या देशावर राज्य करतो आहे, अन निवडणुकीतलं यश हे आम्हीच बरोबर असल्याची पावती म्हणुन सादर करत आहे. पण देशातली जनता नेमकी यांनाच निवडून देत आहे, कि समाजवादी, घटनाप्रेमी वर्गाचा घात पुरोगामी विचारांच्या आपसातल्या गटबाजीने होतोय हे समजून घेतले पाहिजे.

विल्यम शेनस्टोन नावाची ब्रिटीश कवी म्हणायचा कि “ वेडे लोक हे एकामेकांना घट्ट पकडून असतात अन हुशार लोकांत सतत काहीना काही मतभेद असतात” काँग्रेस पुरेशी पुरोगामी नाही म्हणुन आधी कम्युनिस्ट बाहेर पडले मग समाजवादी, त्याचवेळी काँग्रेस पुरेशी उजवी नाही म्हणुन धर्मकेंद्रित राजकारण करू पाहणारे काही लोकही तिथून बाहेर पडले. हेडगेवार, मालवीय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे एकेकाळी काँग्रेस मध्ये होते. डाव्यांच्या संघटनेची पुढे असंख्य शकले झाली. हिंदुत्ववादी मात्र एकचालकानूवर्तीत्व मानत थोडे फार अपवाद वगळता एकत्रच राहिले. त्याला बराच काळ उलटून गेल्यावर आता निवडणुकीच्या राजकारणात या फरकामुळे कसा परिणाम जाणवला हे बघणे रंजक ठरेल. बिहार व उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचे परिणाम यासाठी एक उदाहरण ठरू शकतात.

बिहार मध्ये महागठबंधनला मिळालेलं यश आणि उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेस जोडीची हार यानंतर आता देशात समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकांनी एकत्र येऊन विचार करण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांनी केलेला विकास, यादव मुस्लीम मतांचं समीकरण आणि काँग्रेसला असलेला सवर्ण व काही दलित मतदारवर्गाचा पाठींबा हे सगळे सकारात्मक घटक असतानाही सपा-काँग्रेस युती हरली, आणि बिहार मध्ये संघाने भरपूर ग्राउंडवर्क केलेलं असूनही भाजपाचा लाजीरवाणा पराभव होतो यामागे काही संख्याशास्त्रीय व काही सामाजिक कारणे आहेत.

सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कित्येक विनंत्या करूनही मायावती या महाआघाडीत सामील झाल्या नाहीत, जाटव दलितांचा वर्ग अजूनही एकगठ्ठा मतदान मायावतींनाच करतो, व सपा-काँग्रेस आघाडीला या मतांचा फायदा होऊन त्यांच्या जागा लक्षणीय प्रमाणात वाढल्या असत्या (बसपाला या निवडणुकीत २२% मते मिळालीत, काँग्रेस, सपा व बसपा या तिघांचे २०१७ चे एकत्रित मतदान तब्बल ५०.३% (६.३+२१.८+२२.२) आहे याउलट भाजप व अपना दल युतीचे मतदान एकूण मतदानाच्या फक्त ३८% आहे). जर का मतदान करणाऱ्या पन्नास टक्के लोकांना धर्मनिरपेक्ष व घटनेचा आदर करणारी मंडळी सत्तेवर यावीत असे वाटत असेल तर फक्त नेत्यांचे आपसात असलेले वाद त्यांना निराश करतात असे म्हणावे लागेल.

शिवाय भाजपाच्या विरोधात झालेल्या आघाडीचं टायमिंग सुद्धा महत्वाचं आहे, बिहारमध्ये आरजेडी, जनता दल युनायटेड व काँग्रेस ने आघाडी होणार हे फार आधी निश्चित झालेलं होतं. जागावाटप व किमान समान कार्यक्रम ठरलेला होता, नितीश कुमार या आघाडीचं नेतृत्व करणार यावरही एकमत झालेलं होतं, याउलट उत्तरप्रदेशात पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ आलेलं असतानाही आघाडीबद्दल अनिश्चितता होती. जर का फॅसिस्ट शक्तींना सामोरं जायचं असेल आणि त्यांना पराभूत करायचं असेल तर असला ढिसाळपणा आत्मघातकी ठरत असतो. बिहारमध्ये आधी मुख्यमंत्री असताना केलेली कामं, सत्तेत असूनही नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे ठाकण्याची हिम्मत आणि बिहार सारख्या राज्यात दारूबंदीसारख्या निर्णयाची अंमलबजावणी होणार हे ठासून सांगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असे गुण नितीश कुमारांच्या अंगी आहेत. आजही देशातले सर्व समाजवादी व कम्युनिस्ट एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसचा पाठींबा घेऊन निवडणूक लढायची तयारी केली तर नितीश कुमार हे या आघाडीचं नेतृत्व करू शकतात, आणि परस्परांमधला अविश्वास अन हेवेदावे जर बाजूला ठेवले गेले तर ते या देशाचे पंतप्रधानही होऊ शकतात.

नितीशकुमारांच्या विजयाचं सर्वात मोठं रहस्य हेही होतं कि निवडणुकीत जाती पातींच्या टक्केवारीची गणितं मांडण्यापेक्षा त्यांनी सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा दिला, याउलट उत्तर प्रदेशात काँग्रेस-सपा गठबंधन हे फक्त मुस्लीम अधिक यादव समीकरण आहे असं भाजपने ठासवून सांगितलं, भाजपच्या विरोधात हे दोघे एकत्र येतात हे बघितल्यावर नेतृत्व नसलेला ओबीसीवर्ग सहज भाजपच्या जाळ्यात अडकला. शिवाय अल्पसंख्यांक समुदायाच्या हक्काचं रक्षण करण्याची भाषाच पुन्हा पुन्हा वापरली गेल्याने रिव्हर्स पोलरायझेशन झालं (एका वर्गाचं एकगठ्ठा मतदान तिकडे पडायची भीती असल्याने, दुसऱ्या वर्गाने एकगठ्ठा मतदान भाजपच्या पारड्यात टाकलं). अल्पसंख्यांक एकगठ्ठा मतदान करून काँग्रेसला निवडून आणतात ही जी थाप संघपरीवारातले लोक सतत मारत असतात तिचा उपयोग या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाला, (खरेतर काँग्रेस, समाजवादी किंवा कम्युनिस्ट चळवळी ह्या मोठ्या प्रमाणात सवर्ण हिंदूंनी उभारल्या व चालवल्या व त्यांना धर्माने बहुसंख्य असलेल्या वर्गाचाच पाठींबा सतत राहिला आहे, खऱ्या अर्थाने जे कम्यूनल मुस्लीम होते त्यांना ४७ साली निघून जाण्याची संधी मिळाली.)

सोशल मीडियाचा प्रभावी वापर ही भाजपची जमेची बाजू आहे. सोशल मिडीयासारख्या नव्या माध्यमातून तरुण पिढीच्या मनात धार्मिक विद्वेष पेरला जातो अन त्या विद्वेशाला मग निवडणुकीच्या यशाचं फळ लागतं, हे भाजप आता चांगल्या प्रकारे समजून आहे, कम्युनिस्ट किंवा समाजवादी आजच्या सोशल मीडियावर कुठे आहेत ? भिंग घेऊन शोधलं तरी समाजवादाची पाठराखण करणारा कुणी सोशल मीडियावर सापडणार नाही, कम्युनिस्टांचे हाल तर त्याहून वाईट आहेत, कम्युनिस्ट म्हणजे देशद्रोही असाच आजचा तरुणवर्ग विचार करतो. कारण नव्या पिढीला साम्यवाद समजावून सांगायला कुणी सोशल मीडियावर अस्तित्वातच नाहीये. निवडणुका असताना व नसतानाही या समांतर विश्वात सामाजिक, राजकीय विषयांवर कित्येक छोट्यामोठ्या चर्चा झाडत असतात व भाजपची पेड-ट्रोल आर्मी या व्यासपीठांवर आपली मते आवेशात येऊन मांडत असते, तिथे समाजवादी किंवा साम्यवादी सूर हा फारच दुबळा आहे. याच महिन्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी खा. दानवेच्या विरोधात जे एक छोटं आंदोलन उभं केलं होतं त्याला मात्र सोशल मीडियातून भरपूर प्रतिसाद मिळाला, भाजपचा समर्थक असलेला ऑनलाईन वर्ग या आंदोलनाने मुळापासून हलवला, पण या तुटक प्रयत्नांना एकत्र आणून एक समर्थ पर्याय उभा करणे हे या पक्षांचं काम आहे.

तात्विक बैठक भक्कम असली तरी निवडणुका जिंकायचं एक कौशल्य असतं ते आजच्या बुद्धीवादी किंवा घटनाप्रेमी वर्गात नक्कीच नाही, तर दुसरीकडे काँग्रेस ज्या सेक्युलर विचारधारेच्या आधारावर उभी राहिली व जनामनात रुजली, त्या विचारधारेची मांडणी करण्यासाठी सेक्युलर बुद्धीवादी वर्गाची त्यांनाही गरज आहे. देशापुढील फॅसिजमचे आव्हान किती मोठे आहे व भविष्यात सर्वांपुढे त्या आव्हानाने कोणत्या प्रकारची हिंसा वाढून ठेवली आहे, याचा अंदाज घेऊन या दोन्ही शक्तींनी देशभरात छोट्यात छोट्या गोष्टींपासून एकत्र येण्याची गरज आहे. प्रश्न केवळ निवडणुका जिंकण्याचाही नाही, ते महत्त्वाचेच आहे. पण जनआंदोलन उभे करण्याचा त्यासाठी नवनव्या कल्पना समोर आणण्याचाही आहे. त्यासाठी काँग्रेस सारख्या देशपातळीवर जनाधार असलेल्या पक्षाला सोबत घेण्याची गरज आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला ही या डावीकडे झुकणाऱ्या छोट्या मोठ्या पक्ष-संघटनांची तितकीच गरज आहे, याची जाण ठेवली तरच फॅसिजमपुढे आव्हान उभे राहू शकेल.

या सगळ्यांचा अन्वयार्थ असा कि, भाजपाला हरवणं हे काहीसं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही, काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, छोटे-मोठे सेक्युलर पक्ष, संघटना एकत्र आले, सगळ्या सामाजिक चळवळीतून नवीन नेतृत्व उभं राहीलं, वेळेवर योग्य रणनीती आखून आपसातले हेवेदावे बाजूला ठेवून जर निवडणुका लढल्या तर फॅसिस्ट शक्तींपासून भारत मुक्त होण्यात कोणतीही अडचण असेल, असे वाटत नाही. ऑस्कर वाईल्ड ने म्हटलेलंच आहे की,The world is simply divided into two classes – those who believe the incredible, like the public – and those who do the improbable

पुणे येथे वास्तव्य. पुना हॉस्पिटल येथे कार्यरत.

Write A Comment