fbpx
राजकारण

न्यायमूर्ती गोखले आणि सर परेश रावल नवहिंदुत्ववादी भारतवर्षाचे लक्ष्मीकांत प्यारेलाल

गोखले आणि रावल यांनी स्पष्ट शब्दांत न सांगितलेली गोष्ट हि आहे कि सर्वच काही सरकार करेल या आशेवर राहू नका. सरकारला कायद्याची चौकट पाळावी लागते. काही कामे जनतेनेच पुढाकार घेऊन केली पाहिजेत. जसे गोरक्षणा चे कार्य आता जनतेने पुढाकार घेऊन चालविले आहे. तेवढेच महत्वाचे अरुंधती रॉय ची धिंड काढणे आणि कन्हय्या कुमारला ठार मारणे हे देखील आहे. गोखले आणि रावल हे गेली साठ वर्षे काँग्रेस च्या कार्यकाळात मुर्दाड झालेल्या भारतीयांच्या मनात जाज्वल्य देशभक्तीचा अंगार फुलवू पाहात आहेत. नवहिंदुत्ववादी भारतीयांच्या देशप्रेमाचे मंगल स्त्रोत्र नव्याने रचू पाहणारे हे लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत.

आपण दोन गोष्टी तात्काळ करायला हव्यात. आपण म्हणजे आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी. त्यांनी तात्काळ अरुंधती रॉय या विदुषीस मिळेल तिथून पकडून आणावे आणि तिला जीपच्या पुढच्या भागावर बांधून काश्मीर खोऱ्यातील वस्त्या वस्त्यांमधून फिरवावे. दुसरे म्हणजे कन्हैया कुमार नावाच्या जेएनयुमधील विद्यार्थ्यास तात्काळ सजा ए मौत म्हणजे मारून टाकावे. या दोन्ही गोष्टी तातडीने करण्याची गरज आहे कारण तसे सर परेश रावल (त्यांच्या ट्वीटर हँडलवर त्यांनी स्वतःचे नाव तसेच लिहिले आहे.) आणि माहात्मा विक्रम गोखले (यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर स्वतःचे नाव तसे लिहिलेले नाही) असे म्हटले आहे. आता या दोन गोष्टी केल्याने जगभरात भारताची प्रतिमा अत्यंत बलशाली म्हणून जाण्यास सुरुवात होईल. खरंतर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर ती झालेलीच आहे. परेश रावल हे भाजपचे खासदार आहेत, विक्रम गोखले नक्की कुठल्या पक्ष संघटनेशी संबंधित आहेत किंवा कसे माहित नाही, मात्र त्यांचा सावरकर आणि संघाच्या विचारांना पाठिंबा असल्याचे नाट्य व सिनेसृष्टीतील अनेकांचे म्हणणे आहे.
आजमितीला भारतात असलेले संविधान, आणि कायदे पाहता भारताची सध्याची न्यायव्यवस्था गोखले आणि रावल सांगत असलेला न्याय करण्यास असमर्थ आहेत हे पाचवीतील पोर सुद्धा सांगेल. मग गोखले आणि रावल काय फालतू बकवास करत आहेत का ? नाही. अर्थातच नाही. काही गोष्टी सार्वजनिक व्यासपीठावर स्पष्ट सांगता येत नाहीत. त्यामुळे हिंसेस चिथावणी दिल्याची फौजदारी केसचे लचांड तुमचे देशद्रोही हितशत्रू मागे लावू शकतात.
गोखले आणि रावल यांनी स्पष्ट शब्दांत न सांगितलेली गोष्ट हि आहे कि सर्वच काही सरकार करेल या आशेवर राहू नका. सरकारला कायद्याची चौकट पाळावी लागते. काही कामे जनतेनेच पुढाकार घेऊन केली पाहिजेत. जसे गोरक्षणा चे कार्य आता जनतेने पुढाकार घेऊन चालविले आहे तेवढेच महत्वाचे अरुंधती रॉय ची धिंड काढणे आणि कन्हय्या कुमारला ठार मारणे हे देखील आहे. गोखले आणि रावल हे गेली साठ वर्षे काँग्रेस च्या कार्यकाळात मुर्दाड झालेल्या भारतीयांच्या मनात जाज्वल्य देशभक्तीचा अंगार फुलवू पाहात आहेत. नवहिंदुत्ववादी भारतीयांच्या देशप्रेमाचे मंगल स्त्रोत्र नव्याने रचू पाहणारे हे लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत.

आता मूळ मुद्द्याकडे येऊ, अरुंधती रॉय आणि कन्हैयाकुमार यांचे लिखाण, त्यांची मते या गोष्टी बाजूला ठेवुयात. आता या गोष्टी बाजूला ठेवुयात म्हटल्याने अनेक छप्पन इंची छातीसमर्थकांना त्रास होईल. बघा कसे लबाडी करताहेत असे ते म्हणतील, पण लबाडी नाही मी देशद्रोह करत नाहीये, देशप्रेमींच्याच बाजूने बोलतो. थोडी कळ सोसा, थोडसं पुढे वाचा. तुमचं समाधान होईल बघा नक्की. हे बाजूला ठेवू असं म्हटलं कारण, त्यांनी अगदी देशद्रोही वक्तव्य किंवा कृती केली असेल, असे गृहीत धरू. गृहित काय केलाच आहे देशद्रोह त्यांनी. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींनी पण केला होता. तेव्हा जाज्ज्वल्य देशप्राने ओतप्रोत भरलेले नथुरामजी समोर आले नव्हते का. तर त्यामुळेच समजा असा काही देशद्रोह केला असेल, तर देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या नागरिकांना यावर काही तरी करण्याचा अधिकार आहे की नाही, तर तो नक्कीच आहे. कायद्याच्या चौकटीत अशा अनेक अधिकरांबाबत स्वच्छ लिहिलेले आहे. कायद्याच्या पुस्तकातून न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया मात्र फारच किचकट आणि वेळकाढू असते.देशद्रोहींना इतका वेळ मोकळा देणे म्हणजे एक प्रकारे आणखी एक देशद्रोह करणे. म्हणजे देशद्रोहाची एक नवी मालिकाच तयार होऊ शकते. त्यामुळे देशद्रोही व्यक्तींबाबत तिथल्या तिथे झटपट न्याय व्हायला हवा.
आता हेच पाहाना आपल्या महान देशप्रेमी लष्कराने ज्या काश्मीरी तरुणाला जीपच्या बोनेटवर बांधून फिरवलं तो काही दगडफेकीत सामील झालेला तरुण नव्हता. तो एका निवडणुकीत मतदान करायला गेला होता. मतदान करून परतयेत असताना आपल्या देशप्रेमी लष्करी अधिकाऱ्यांना तो देशद्रोही असल्याची शंका आली आणि त्याची अशी धिंड काढली. आता त्यातून झालं काय की, त्या माणसाने आपण पुन्हा कधीच मतदानात सहभागी होणार नाही असं सांगितलं. हे कित्ती चांगलं झालं पहा. काश्मिरातील एकाने मतदानात सहभागी होणार नाही, असं सांगितल्याने एक देशद्रोही मतदानातून कायमचा बाद झाला. देशप्रेम असं कणा कणाने थेंबा थेबानेच साचत जायला हवं. बरं दुसरं असं की, समजा तो दगडफेकीत सामील जरी असला तरी त्याची अशी धिंड काढणं अयोग्य आहे. कोठल्याही सभ्य संस्कृती मध्ये गुन्हेगाराची धिंड काढणे बसत नाही. भारतीय कायद्यात तर धिंड काढायची तरतूद नक्कीच नाही. , आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ते अमानवी आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय कायदा आमच्या राष्ट्रात आम्हाला शिकवण्याची हिंमत दाखवणारे कोण? आम्ही कुलभुषण जाधवच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच न्याय मागतोय ते पाकिस्तानसारख्या देशाच्या विरोधात हे कायम लक्षात ठेवायला हवं. आम्हाला तो कायदा शिकवणारे देशद्रोहीच आहेत. आमचे लष्कर जे अहोरात्र आमच्या देशाची सेवा करतं त्या लष्करातील काही शूर अधिकाऱ्यांनी एका काश्मीरी तरुणाचा स्वतःच्या बचावासाठी मानवी ढालीसारखा वापर करण्याचा जो जबरदस्त शोध लावला त्या शोधामुळे अत्यानंदित होऊन युरेका युरेका म्हणत आता त्या संशोधक मेजर गोगोईला प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे. असो तर त्यामुळे अरुंधती, कन्हैया यांच्यासारख्यांना शिक्षा व्हायलाच हवी आणि त्या शिक्षादेखील अभिनव असायला हव्यात. ज्या शिक्षांची संपूर्ण महान भारतवर्षात चर्चा होईल. पुढे हजारो वर्षे त्या दिवशी देशप्रेमी सण वगैरे साजरे करतील अशी कल्पकता त्या शिक्षांमध्ये असायलाच हवी. त्यासाठीच तर नव्या देशप्रेमी सरकार व पक्ष-संघटनांनी प्रशस्तीपत्रकांचे गठ्ठे छापून घेतले आहेत. त्यामुळेच मग गाडीच्या पुढच्या भागावर बांधून फिरवणे वगैरे, असायलाच हवं. म्हणजे कसं आहे, गाढवावरून पूर्वी धिंड काढायचे. परंतु आपल्या महान पूर्वजांनी लावलेल्या अनेक शोधांपैकी मोटार गाडी या शोधाचेही पेटंट आता राष्ट्रभक्तीच्या काळात भारताला मिळणार असल्यामुळे रॉय यांना २१व्या शतकातील भारतात गाडीच्या बॉनेटवरच बांधून फिरवणे संयुक्तिक ठरेल नाही का? एकदा का तसे फिरवले की देश खूप मोठ्ठा होणार आहे. कन्हैया कुमार याला सजा ए मौत कशा पद्धतीने द्यायची ते महात्मा गोखले यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही (त्यांनी हे बोलल्यानंतर त्यांच्या बॉलपॉइंट पेनचा पॉइंट मोडण्याचा प्रयत्न केल्याचे काहींनी पाहिले आहे. मात्र ते अद्याप स्पष्ट झालेले नाही). सौदी अरेबियात करतात तसा कन्हैयाचा शिरच्छेद करायचा की फासावर लटकवायचे यावर अद्याप उत्तन येथे बौद्धिक शिबीर सुरू असावे बहुदा. कन्हैयाला सजा ए मौत दिल्याने आणि अरुंधती यांना गाडीवर बसवून फिरवल्याने संपूर्ण जगात भारत हा शक्तीहीन नसून शक्तीमान असल्याचा संदेश थेट पोहोचणार आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, चीन, सगळ्या राष्ट्रांमधील माणून आणि माणूस भारताच्या या शक्तीच्या जाणीवेने नखशिखांत थरथरणार आहे. चीन तात्काळ भारतभरातील चायनीजच्या अनधिकृत रस्त्यांवरील गाड्या काढून घेण्याचे मान्य करणार आहे, भारतविरोधात एखादी कृतीच काय तोंडातून शब्दही काढला जाणार नाही. देशातील समाजकंटक, लोकशाहीच्या नावाने बोंबा मारणारे तात्काळ आपल्या औकातीत येणार आहेत. ट्रम्प भाऊ एचवन व्हीसा वगैरे थांबवून भारताला छळायला पाहात आहेत, ते गयावया करत कोथरूड ते वॉशिंग्टन लाल गालीचा वगैरे अंथरणार आहेत. पाकिस्तानचे तर नावही घेताना जिव्हा कडू होते. पण एकदा का हे झाले की, पाकिस्तानी लष्करी अधिकारी, आयएसआय, मूर्ख नवाझ वगैरे वाघा बॉर्डरवरून सरपटत येऊन साष्टांग नमस्काराच्या मुद्रेत शरण येणार आहेत (त्यांना तेव्हा काय शिक्षा करायच्या यासाठी सर परेश रावल, महात्मा विक्रम गोखले, यांच्यासोबत महामहोपाध्याय अनुपम खेर यांचे तीन सदस्यीय मंडळ बनवले जाणार आहे). त्यामुळे या दोन गोष्टी तात्काळच करायला हव्यात.

हे करताना या पवित्र कार्यात सहभागी देशप्रेमींना तर खूप मजा येईलच. पण हा सोहोळा याची देहा याची डोळा सर्व चॅनेल्सवरून लाईव्ह पाहाताना देशातील सगळ्या देशप्रेमी जनतेलाही खूप मजा येईल. अरुंधती रॉय रडतील, भेकतील, हातपाय झाडतील, ती गंमत काही औरच असेल. कन्हैया मरताना तडफडेल, ते पाहाताना प्रत्येक देशप्रेम्याचा उर देशाभीमानाने भरून येईल. असो फक्त ही सगळी मज्जाच मज्जा करताना एक वैधानिक इशारा द्यायलाच हवा. सिगरेट आणि दारूच्याबाबतीत सरकार वैधानिक इशारा देतं तर या प्रकरणात द्यायला काय हरकत आहे. काय आहे, आज देशप्रेमाची व्याख्या काही जणांनी ठरवून टाकली आहे. सरकारं बनतात आणि सरकारं जातात. देशप्रेमाच्या व्याख्या आणि त्या व्याख्यांमध्ये न बसणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षा या त्या त्या वेळच्या सरकारांनी आणि ते सत्तेवर आणलेल्या पक्ष-संघटनांनी ठरवायाच्या असं एकदा मान्य केलं की सरकार बदलल्यावर बदललेल्या व्याख्यांनुसार जीपच्या पुढच्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या व्यक्तीचं नाव बदललेलं असेल, सजा ए मौत दुसऱ्या कुणाच्या तरी नावाने सुनावली जाईल. त्यात मग तेव्हाच्या सरकार आणि संबंधित पक्षांच्या मनाजोगती नावं असतील, हे इतकं फक्त लक्षात असूद्यात.

टीप- भारतातील या अशा प्रकारच्या अशांत वातावरणामुळे विशेषतः काश्मीर प्रश्न चिघळल्यामुळे या देशात येणारी थेट परकीय गुंतवणूक घटली आहे. आता ही माहिती म्हणजे बंडलबाजी, पुरोगामी डाव वगैरे काहीजणांना वाटेल. पण जगभरात सुमारे १.७ ट्रीलीयन डॉलर्स (गुणाकार वगैरे करून रुपयांत किंमत ज्याची त्याने काढावी) इतक्या अवाढव्य रकमेची गुंतवणूक वगैरे करणारी जेपी मॉर्गनसारख्या कंपनीने काश्मीरमधील परिस्थितीचा हवाला देत भारताच्या नकाशावर गुंतवणुकीच्या दृष्टीने जगभरातील गुंतवणूकदारांना लाल कंदील दाखवला आहे (हवाला-बिजनेस स्टँडर्ड या वर्तमानपत्राच्या २२ मे २०१७च्या अंकात याबाबतची आलेली बातमी )

देशप्रेमाच्या धुंदीत, आपल्या विरोधी मत मांडणारांस  अशा अभिनव सजा फर्मावणाऱ्या उत्साही कलाकारांचा जो ट्रेंड येऊ घातला आहे त्या विषयी आपली प्रतिक्रिया या ब्लॉग वर  जरूर कळवा

राईट अँगल्स Editorial Board

4 Comments

  1. Dr V D Patil Reply

    अत्यंत अस्वस्थ करणारा लेख , भारताने स्वातंत्र्य मिळवून जे आजपर्यंत कमावले ते गमावण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झाली आहे !

  2. this article made me to think diply about future of our great nation. someones are doing this intentionally. this is our youth brigades resonsibilty to save our nation from such fake nationalists

  3. राजू Reply

    मुळात सिलेब्रेटी मंडळींची मानसिकता हि दहावीच्या विद्यार्थ्येवढी आहे….हे दूर्दैव आहे..

    दुसरी चूक हि मेडिया वाल्यांची आहे.अशी बेताल वक्तव्ये प्रसारित न करता डिलीट करून टाकावीत

Write A Comment