Tag

will-the-progressives-ever-comprehend

Browsing

‘बिगर काँग्रेसवादा’पायी लोहिया यांनी संघाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळवून दिली आणि मग संघानं याच ‘बिगर काँग्रेसवादा’चा कौशल्यानं वापर करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन करून अखेर स्वबळावर केंद्रातील सत्ता हाती घेतलीच. पण हे घडून येण्यास जसे समाजवादी कारणीभूत होते, तशीच इंदिरा गांधीच्या काळातील काँग्रेसही तेवढीच जबाबदार होती. काँग्रेस ही एक विविध समाजघटकांची आघाडी होती. हा पक्ष आपला आहे, अशी भावना देशातील बहुतेक समाजघटकांना वाटत असे. हे काँग्रेसचं सर्वसमावेशक स्वरूप इंदिरा गांधी यांनी बदलत नेलं आणि त्याला व्यक्तिवादी राजकारणाचं स्वरूप येत गेलं. त्यातूनच आणीबाणी आणली गेली. जयप्रकाश नारायण यांनी संघाला प्रशस्तीपत्र दिलं, हे खर आणि ते गैरच होतं. पण इंदिरा गांधी काँग्रेस पक्षात व्यक्तिवादी राजकारणाची घडी बसवत होत्या, तेव्हा त्यांच्या पाठीशी कम्युनिस्टच उभे राहिले होते ना? काँग्रेसमध्ये जाऊन त्या पक्षाला ‘डावं’ वळण देण्याचा उद्योग कोणी केला? कम्युनिस्टांनीच ना? लोहिया जेवढे रामॅन्टिक होते, त्यांच्या या रोमॅन्टिकपणापायी ‘बिगर काग्रेसवाद’ मांडून त्यांनी जी घोडचूक केली, तशीच ती काँग्रेसला ‘डावं’ वळण देण्याच्या कम्युनिस्टाच्या प्रयत्नानं झाली नाही काय?

–प्रकाश बाळ

भारतातील समाजवाद्यांनी फॅसिझमची माती कशी खाल्ली, यासंबंधीचं श्री. नचिकेत कुलकर्णी यांचं निरूपण वाचून आठवण झाली, ती हो—चि—मिन्ह या व्हिएतनामच्या कम्युनिस्ट नेत्याची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमडळाशी झालेल्या भेटीची. तो काळ पन्नासच्या दशकातील होता. दिएन बिएन फू येथे झालेल्या लढाईत फ्रेंचांचा निर्णायक पराभव करून व्हिएतनामध्ये हो-चि–मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सत्तेवर आले होते. त्यामुळं भारतीय कम्युनिस्टांचं एक शिष्टमंडळ श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली व्हिएतनामच्या ‘पॅटर्नल’ भेटीवर गेलं होतं. या शिष्टमंडळाशी हो-चि–मिन्ह यांची जी चर्चा झाली, त्यात एक मुद्दा असा आला की, ‘भारतही शेतीप्रधान देश आहे; तेथेही गरिबी, विषमता, शोषण आहे; मग व्हिएतनाममध्ये जशी क्रांती झली, तशी भारतात का होऊ शकली नाही’. त्यावर हो-चि-मिन्ह यांनी उत्तर दिलं की, ‘तुमच्या देशात गांधी नेते होते आणि येथे माझ्या हाती नेतृत्व होतं’.