fbpx
विशेष

युवल हरारी

माहिती-तंत्रज्ञान आणि जीवशास्त्र यांच्या समुच्चयातून चौथी औद्योगिक क्रांती, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), स्मार्टफोन, गूगल मॅप्स, ड्रायव्हरलेस वाहने, किमान समान उत्पन्न (universal basic income), फेसबुक, whatsapp इ. सोशल मिडियाचा विस्फोट (त्यातून अरब क्रांतीचा वसंत आणि नंतर इस्लामिक राष्ट्रवादाचा/ लष्करी हुकुमशाहीचे अंधारयुग, सोशल मिडियाचा अति-उजव्या राजकारणाने केलेला वादग्रस्त वापर) नव-राष्ट्रवाद, ब्रेक्झिट- ट्रम्प, उत्पन्न आणि संपत्ती यांच्या वितरणातील वाढती विषमता, पर्यावरणीय संकट इ. इ. हे गेल्या काही काळातले जागतिक चर्चाविश्वातले प्रमुख विषय. प्रत्येक क्षेत्रातली अतिविशिष्ट किचकट तांत्रिकता समजून घेत त्याचा समग्र अवकाशात अर्थ लावणे हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने मोठेच जिकीरीचे काम. आता मुळात असे तज्ञ लोक हे ‘हस्तिदंती मनोऱ्यात’ बसून बदनाम झालेले. त्याहून पुढे म्हणजे ‘असा समग्र अवकाशात अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा खटाटोप करायचा कशासाठी?’ हाही सर्वसामान्य मनाचा प्रातिनिधिक प्रश्न. गुगल आणि विकिपीडिया कसाही आणि कितीही पालथा घातला तरी त्याचे उत्तर मिळणे मुश्कील. हा, पण समजा कुणी हे २१ व्या शतकाचे सगळे प्रश्न २१ धडे देऊन सोडवणार असेल, आणि जर ओबामा- मार्क झकरबर्ग त्याला गौरवत असतील तर किती भारी! तेही जर चमकदार शैलीत पण सोप्या भाषेत- अगदी ‘अच्युत आठवले आणि आठवण’ या मकरंद साठे यांच्या कादंबरीत म्हटल्याप्रमाणे ‘वाक्ये छोटी छोटी करावीत’ इ. नियमांना अनुसरून असेल तर बहारच! तेव्हा ‘युवल नोह हरारी’ ह्या इस्रायली इतिहासकाराचे ‘21 Lessons for the 21st Century’ हे पुस्तक बेस्टसेलर ठरते यात नवल नाही. खरे तर आजच्या काळात धर्म- राष्ट्र- अस्मिता यांची धीट चिकित्सा (मग ती ग्रीक सोफिस्ट शैलीत का असेना) करणे आणि ती बाजारात खपवणे ह्या एका गोष्टीसाठी खरे तर हरारीचे कौतुकच केले पाहिजे. पण मामला तितका सरळ नाही. तेव्हा ‘मानवी समाजाची सगळी वाटचाल आणि संस्था, उत्पादनपद्धती ह्यांच्या मुळाशी आहेत त्या सगळ्या कहाण्या, मिथ्स. माणसाची कहाणीप्रियता ही मूलभूत आहे. आणि ह्या सगळ्या कहाण्यांचे deconstruction झाले पाहिजे’ असे उत्तर-आधुनिक प्रतिपादन करणाऱ्या हरारीने स्वतः जी साठाउत्तरांची कहाणी उभी केली आहे तिचीच जरा झडती झाली पाहिजे.
हरारी आपल्या पुस्तकाच्या पहिल्या भागात मानवजातीच्या समोर असलेल्या आव्हानांची मांडणी थोडक्या शब्दांत पण सुस्पष्टपणे करतो. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स- माहिती-तंत्रज्ञान आणि जीवशास्त्र यांच्या समुच्चयातून चौथी औद्योगिक क्रांती आणि पर्यावरणीय संकट ह्यांचे आव्हान देश-काल-पिढ्यांच्या हिशोबाला जुमानणारे नाही. प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शक्यता इतक्या अफाट आहेत की कामगारांचे शोषण वगैरे मुद्दे असंगत ठरत जातील आणि मानवी श्रमाची गरज उरणार नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योगांची मालकी असलेले मूठभर लोक जगावर अधिराज्य गाजवतील. सेल्फ-ड्रायव्हिंग मोटारी, मानवी डॉक्टर्सना पर्याय म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा अधिक अचूक निदान आणि उपचार, मशीन लर्निंगमधून असंख्य शक्यतांचा तपास करत निर्णय घेण्याची विकसित होणारी कॉम्पुटरची क्षमता- ह्या सगळ्यातून केवळ ड्रायव्हर, डॉक्टरच नव्हे तर शेयर मार्केट ते पत्रकारिता आणि खाणी, रासायनिक उद्योग इ. धोक्याची ठिकाणे इथे काम करणारे कामगार, असे सगळेच रोजगार धोक्यात येणार आहेत. त्यावर उपाय म्हणून दोन पर्याय हरारी मांडतो. एकतर ‘सार्वत्रिक किमान उत्पन्न’ सरकारांनी सर्व लोकांना द्यावे (थेट पैसे देण्याऐवजी ‘मोफत शिक्षण, आरोग्य, मनोरंजन’ असा कार्यक्रमही आहे- हरारीच्या मते हा नव-कम्युनिझमच असेल आणि तो सगळ्यांना पटूही शकेल!) नाही तर ‘श्रम/ रोजगार’ ह्याची पुनर्व्याख्या करायला लागेल- कारण नर्सिंग, मुलांची देखरेख, स्वयंपाक इ. घरगुती/ सेवाप्रधान कामे करण्यास मानवी श्रमांना प्राध्यान्य राहणे साहजिक आहे. हरारीच्या मते हा नव-फेमिनिस्ट अजेंडा ठरू शकतो.
हरारीच्या ह्या मांडणीमधला ‘माणूस विरुद्ध AI असा खरा झगडा असणार नसून माणूस अधिक AI आणि त्यातून मानवी श्रमांचे उत्तरोत्तर विस्थापन’ हा भाग महत्वाचा आहे. ‘AI म्हणजे यंत्रामध्ये जाणीव विकसित होईल आणि यंत्रे माणसावर हल्ला करतील’ ही सायन्स फिक्शन चित्रपटानी लोकप्रिय केलेली पण चुकीची समजूत आहे हे त्याचे प्रतिपादन योग्य आहे. मात्र अल्गोरिदमच्या आधारे मानवी निवडी आणि त्यांचे अचूक भाकीत, त्याहीपुढे जात नियंत्रण हे आजच कसे शक्य झाले आहे हे फेसबुक, गुगल यांच्यावरून स्पष्ट आहे. तेव्हा २४ तास सर्व मानवी कृती आणि निद्रा, यांचे मापन आणि त्यातून ओर्वेलच्या ‘१९८४’ या कादंबरीत रंगवल्याप्रमाणे भयकारी असे सर्वव्यापी पाळत ठेवणारे असे हुकूमशाही राज्य, हे तितकेसे खरे ठरणार नाही. तर बिग डेटाला २४ तास सर्व मानवी कृती आणि निद्रा, यांचे मापन हे लोकच राजीखुशीने करू देतील आणि त्यातून साकार होईल ते हक्सलेचे ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’. ह्या सगळ्यात संपत्ती आणि सत्ता ह्यांचे केंद्रीकरण अधिक प्रखर होत जाईल आणि त्यात स्वातंत्र्य, समानता यांचे काय होईल याबद्दलची हरारी याची चिंता रास्तच आहे. पण मानवी श्रम गरजेचे उरणार नाहीत असे म्हणण्यात मोठीच गफलत तो करतो आहे आणि ती केवळ त्याची चूक नाही. टेक्नोक्रॅटीक आणि अवास्तव कल्पनांचा त्यात वाटा आहेच. पण त्याहीपेक्षा मूलभूत प्रश्न आहे तो हरारीच्या शोषण आणि वर्ग ह्याबद्दलच्या समजुतीबद्दल. AI मुळे जर मानवी श्रम गैरलागू ठरत जाणार असतील तर साहजिकच क्रयशक्तीही घटत जाणार आणि त्यातून मार्क्सचा मंदी आणि भांडवली अरिष्टाचा सिद्धांत पुन्हा सिद्ध होणार. त्यातून मार्ग काढायला म्हणून ‘सार्वत्रिक किमान उत्पन्नाचा’ पर्याय. पण ती तात्कालिक मलमपट्टी झाली. भांडवली व्यवस्थेत सरकारची आर्थिक तुटीला तयारी असते ती मर्यादित पातळी-काळापुरती हे सर्वविदित आहे. त्याहीपुढे जात जर सरकार सार्वत्रिक उत्पन्न कार्यक्रम चालू ठेवू इच्छित असेल तर करवसुलीचे प्रमाण वाढले पाहिजे. आता कर- आकारणी करायची ते उद्योग असणार जागतिक- मग त्यांचे कर भरणे, चुकवणे इ. हिशोब होणार ते वेगळे. पण जर इतके सर्वव्यापी आणि खर्चिक असे तंत्रज्ञान विकसित करायचे, त्यासाठीचा अस्थापन खर्च, कर, अति-कुशल कामगार वेतन हे सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला किमान उत्पन्नावर अवलंबून क्रयशक्ती हे गणित काही जुळणारे नाही. जर मधल्या वर्गातले रोजगार कालबाह्य होत असतील तर सेल्फ-ड्रायव्हिंग मोटारी कोण विकत घेईल हा त्याचा एक अगदी ढोबळ भाग आहे. ‘श्रम/ रोजगार’ ह्याची पुनर्व्याख्या हा हरारी याचा दुसरा उपाय आहे. पण त्यातही प्रश्न तोच राहणार- हे घरगुती/सेवाप्रधान श्रम आणि त्यांना वेतन देणे हे एकतर सरकारचे कर्तव्य ठरणार- मग ते किमान उत्पन्नाचाच भाग होणार- किंवा जर पुरुषसत्ताक व्यवस्थेला शह म्हणून जर त्याची जबाबदारी जर कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाच्याकडे आली तर पुन्हा आपण पहिल्या प्रश्नाकडेच परत येतो. जर ‘उत्पादक’ मानवी श्रमच कालबाह्य झाले तर क्रयशक्तीचे संकुचन आणि त्यातून अनुत्पादक श्रमांचे मोल कसे चुकवणार हे एक आणि ह्या असल्या कागदी उपायांनी पुरुषसत्ता मोडून काढता येत असती तर आणखी काय हवे होते?
तेव्हा केवळ ‘माणूस हा माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी कच्चा माल म्हणून उरला आहे’ अशी चमकदार विधाने काही आर्थिक सिद्धांताला पर्याय होऊ शकत नाहीत. (आणि ही गफलत केवळ हरारीच नव्हे तर अनेक विचारवंत, अगदी डावीकडचेही करत आहेत). वरकड मूल्य (surplus value) आणि मानवी श्रम यांचा भांडवलशाहीतला अन्योन्य संबंध उत्पादक- आणि उपभोक्ता ह्या दुहेरी पातळीवर कसा आहे याचे भान न ठेवल्याने हरारीने जे प्रश्न विचारले आहेत ते अपूर्ण राहिले आहेत.

पुन्हा त्यात ‘फासिझम, कम्युनिझम आणि लिबरलिझम ह्या कहाण्या २० व्या शतकातल्या औद्योगिक भांडवलशाहीने निर्माण केलेल्या इतर सगळ्याच संरचनांप्रमाणे आता निरुपयोगी ठरल्या आहेत. आताची कहाणी आहे ती डोनाल्ड ट्रम्प आणि आक्रमक राष्ट्रवादाची हे खरे- पण हा राष्ट्रवाद अधिक निहिलिस्ट आहे- त्यात जगाला निराळे वळण देण्याची २० व्या शतकाच्या विचारसरण्याप्रमाणे महत्त्वाकांक्षा नाही’ असा उपक्रम हरारी याने राबवला आहे. त्यातून एकीकडे उदारमतवाद, दुसरीकडे त्रिकाळज्ञानी आणि मानवी/ सेपियन्सच्या इतिहासाचा ५०० पानांत वेध घेऊ शकणारी सिनिकल शेरेबाजी (जी कधी कधी कोसलामधील पांडुरंग सांगवीकरच्या इतिहासअध्ययनाची आठवण करून देते!), तिसरीकडे भविष्यवाणी, आणि ह्या सगळ्यातून २१ धड्यांची ही रंगीबेरंगी गोधडी उत्तरोत्तर विधूळ होत गेली आहे. पुन्हा त्यात हे पुस्तक एकसंध नसून वेगवेगळ्या मासिके-वृत्तपत्रांसाठी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे याचीही भर पडली आहे. ‘हरारी महाराजांची प्रवचने’ असेही सुटसुटीत नाव ह्या उपक्रमाला देता आले असते.

‘राजकीय आव्हान’ ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात हरारी याने आपला सिनिकल इतिहासदृष्टीयुक्त उदारमतवाद हा राष्ट्रवाद- धर्म यांची चिकित्सा करण्यासाठी वापरला आहे. त्याचे प्रतिपादन थोडक्यात असे आहे: ‘२१ व्या शतकात ‘संस्कृती-संघर्ष’ म्हणून कितीही कोलाहल सुरु असला तरी भांडवली आधुनिकतेने एक समान जागतिक संस्कृती उभी केली आहे. अर्थव्यवस्था, ऑलिम्पिक आदि खेळ, राष्ट्रगीत- राष्ट्रध्वज इ. मधील ‘आपण काहीतरी महान आहोत’ हा सगळ्याच देशांचा समान भाव, धर्म हा राष्ट्रवादाचे अंकित होणे हे समान आहे (त्यातून सध्याचे दक्षिण अमेरिकन पोप निर्वासित, पर्यावरणीय संकटाबाबत संवेदनशील असतात कारण त्यांचा ख्रिश्चन धर्म लिबरेशन थियोलॉजी दक्षिण अमेरिकन विकसनशील राष्ट्रवादाचा आहे. या उलट अमेरिकन इव्हानजेलीकल ह्या सगळ्याला विरोध करतात कारण त्यांचा ख्रिश्चन धर्म अमेरिकन साम्राज्यवाद, वंशवाद यांचा आहे). तसेच ‘अण्वस्त्रे, पर्यावरण, तंत्रज्ञान’ हे आजचे महत्वाचे तीन प्रश्न हे संपूर्ण जगाला वेढणारे आहेत आणि त्यामुळे त्यांची उत्तरे ही आक्रमक राष्ट्रवादातून मिळणारी नाहीत’. एकंदरीत प्रस्थापित, जागतिकीकरणाच्या समर्थक लिबरल विचाराची हे परिचित मांडणी आहे. मात्र निर्वासित/ स्थलांतरित प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. आणि एकुणात सगळ्याच लिबरल विचाराची ही निसरडी जागा आहे. तेव्हा हरारी त्यात घसरला आहे त्याचे नवल नाही. त्यात गंभीर आहे ते त्याचे ‘आजचा अति-उजवा आक्रमक राष्ट्रवाद हा वांशिक नसून सांस्कृतिक आहे, not biological but cultural’ हे प्रतिपादन. आता एकदा आधुनिकता आणि सहिष्णुता यांच्या आधारे युरोपीय- पश्चिमी सांस्कृतिक ‘श्रेष्ठत्व’ मान्य केले, तर स्थलांतरितांना त्यात सामावून जाण्यासाठी अधिक दडपण येते हे तो मान्य करतो. पण तरीही ‘सर्व स्थलांतर-विरोधी हे फासिस्ट नाहीत आणि सर्व स्थलांतर-समर्थक हे सांस्कृतिक आत्महत्या करू पाहणारे नाहीत’ अशी त्याची मध्यममार्गी मखलाशी आहे. मुळात ‘वांशिक की सांस्कृतिक’ हा कृतक विरोध आहे. ‘वंश’ ही देखील एक विशिष्ट सांस्कृतिक संकल्पना आहे. वंश-श्रेष्ठत्व ही तर आहेच आहे. तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादी हेदेखील सदोदित ‘दृश्य शारीरिक फरक’ हाच स्थलांतरितांना लक्ष्य करण्यासाठी वापरत आले आहेत. हिजाब, पगडी, दाढी, चेहरेपट्टी, पेहराव- हे सगळे एका अर्थी ‘ontological’च आहे. कुठले स्थलांतरित कुठले युरोपीय मापदंड किती प्रमाणात आत्मसात करतात याची सांस्कृतिक फुटपट्टी अशी काही नाही. कितीही भाषा आत्मसात केली, पेहराव बदलला आणि खेळ- मनोरंजन- आहार- विहार हे सगळे अगदी पश्चिमी धाटणीचे केले तरी त्याने काही फरक पडत नाही.

पुस्तकातले यापुढे भाग उत्तरोत्तर छद्म-वैचारिक होत जातात- ‘दहशतवाद हा सैनिक वृत्तीचा नाही तर नाट्यमय परिणाम घडवू पाहणाऱ्या वृत्तीचा भाग आहे, युद्ध हा मानवी निर्णयप्रक्रियेच्या गोंधळाचा परिणाम आहे. सर्व धर्म- राष्ट्रावादानी विनयशीलता बाळगली पाहिजे. आपला धर्म- राष्ट्र हे काही जग/ विश्वाचा मध्यबिंदू नाही, धार्मिक ज्ञान हे काही विज्ञान- आणि वैज्ञानिक चिकित्सेला पर्याय नाही- पण धर्मामुळे मूल्यव्यवस्था, वैश्विकता अशा अनेक चांगल्या गोष्टीही झाल्या आहेत’ वगैरे वगैरे. ह्याच ओघात हरारी धर्मनिरपेक्षतेची चर्चा करतो- ईश्वरविरहीत नैतिकता शक्य आहे का हा त्याचा विषय आहे आणि त्यातून धर्मनिरपेक्ष आदर्श म्हणजे ‘सत्य, करुणा, समता, स्वातंत्र्य, धैर्य, जबाबदार वृत्ती वगैरे’ हे त्याचे गुळमुळीत उत्तर आहे. त्याच ओघात ‘स्टालिनची कट्टर नास्तिकता ही पोथीनिष्ठ होती आणि ती खरी धर्मनिरपेक्षता नव्हे. असा कट्टरपणा भांडवलदारी साम्राज्यवाद समर्थकही करतात, सर्व धार्मिक, वैज्ञनिक लोकांतही तो सापडतो. प्रत्येक तत्वज्ञानाची ही काळी बाजू आहे. त्याबाबत त्या त्या समर्थकांनी जागरूक असले पाहिजे’.
हरारीच्या ह्या जागरूकतेचा लिबरल आग्रह ‘सत्य, आणि सत्योत्तर जग’ (post truth world) ह्या भागात खास उत्तर-आधुनिक, अध्यात्मिक, अनैतिहासिक अशी सगळी रूपे धारण करतो: ‘विवेकनिष्ठ विचार करणारी व्यक्ती’ हे आधुनिक लिबरल समाजाने जोपासलेले मिथच आहे इथवर ठीक आहे. पण ‘माणूस हा स्वभावतः टोळीप्रधान आहे, तेव्हा त्याचा विचार स्वतंत्र नसून तो समूहत:च घेतलेला निर्णय असतो’ वगैरे जे त्याचे प्रतिपादन आहे ते ‘प्रगत समाजातील शारीरिक- बौद्धिक श्रम-विभाजन आणि त्यातून शोषकांनी प्रस्थापित केलेली सहमती’ ह्या ग्राम्शी- मार्क्स यांच्या भौतिकवादी विचारापासून पूर्णतः फटकून एक अनैतिहासिक समज दृढ करण्याच्या खटपटीत आहे. त्याचीच परिणती ‘न्याय’ या विषयावरील लेखात ‘माणूस १००-१५० लोकांच्या टोळीत तयार झालेली न्यायकल्पना तेवढी समजू शकतो; शिकार करण्याच्या अवस्थेत माणूस केवळ तात्कालिक आणि दृश्य न्याय-अन्याय समजू शकला पण त्याची न्याय-कल्पना ही अमूर्त संरचनांत (structures) मध्ये अनुस्यूत अन्याय समजू शकण्यापर्यंत उत्क्रांत झाली नाही’ वगैरे शेरेबाजीमध्ये झाली आहे. जोडीला ‘न व्यक्ती न समूह खऱ्या अर्थाने सत्य समजू शकते, सत्योत्तर जग हे तर आधीच आणि नेहमीच अस्तित्वात आहे कारण धर्म हेच एक मोठे उत्तर-सत्य/ मिथ आहे, केवळ धर्मच नव्हे तर पैसा, राष्ट्र ही सगळीच मानवी समाजाने तयार केलेली उत्तर-सत्ये, मिथके आहेत. त्यांचावर विश्वास ठेवल्याने आयुष्य सुकर होते हे खरे, पण अगदी ‘खोलवर’ विचार केला तर ती सगळीच मानलेली मिथके आहेत’- अशी खास ‘ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या’ छाप आदर्शवादी, चिद्वादी भ्रमंती आहेच.
ह्या सगळ्या प्रवचनातून जे व्यावहारिक तोडगे हरारीने सुचवले आहेत ते मजेशीर आहेतच, पण त्याला डोक्यावर घेणाऱ्या बुद्धीजीवी वर्गाच्या एकूण दिवाळखोरीचे द्योतक आहेत. post-truth वर, सत्याचा अपलाप करणाऱ्या सध्याच्या अनेक उजव्या कुजबूज प्रचारावर उपाय काय, तर ‘विश्वासार्ह माहितीसाठी पैसे मोजायची तयारी ठेवा, वैज्ञानिक निबंध, साहित्य वाचून अभ्यास करा, सोबत आजवरचे सर्व धर्म- राजकीय विचारसरणी ह्या कहाण्या आहेत तेव्हा आयुष्याला अर्थ येण्यासाठी त्यांचा वापर करताना सतर्क राहा, त्यासाठी विपश्यना- ध्यान ह्याचा मला खूप उपयोग झाला’ इ.इ. म्हणजे ‘बरे सत्य बोला’ वगैरे सुभाषितमय धडे पूर्वी सानुनासिक असत त्याचाच हा अवतार वाटावा अशी अवस्था. ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने ह्याच बुवाबाजीचा चांगला समाचार घेतला आहे- ‘जुनी मिथके कोसळून पडली आहेत आणि नवे काही जन्म घेत नाही अश्या ह्या गोंधळाच्या काळात विश्वास ठेवावा कुणावर? असा हरारीचा प्रश्न आहे. त्याचे एक उत्तर ‘गुरु’ असे आहे आणि जागतिकीकरणाच्या काळात ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तऱ्हेतऱ्हेचे गुरु बाजारात आहेत. मध्यमवयीन स्त्रियांसाठी Gwyneth Paltrow आहे; संतप्त तरुणांसाठी जुंग-प्रणीत मानसशास्त्र विकणारा आणि राजकीय काटेकोरपण (political correctness) याला विरोध करणारा जोर्डन पीटरसन आहे, आणि हुशार असलेल्या पण समाधानी नसलेल्या लोकांसाठी हरारी आहे- उत्क्रांतीचे मानसशास्त्र आणि आधुनिक जग विरुद्ध शिकारीच राहिलेले मानवी मन यांच्यातला विरोध निरखायला आणि ध्यान करत आयुष्याला अर्थ देता येईल असे सांगणारा हरारी हा गुरूच बनला आहे’
ह्या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? एकीकडे ‘doubt everything’ इतकी विवेकशील भूमिका घ्यायची तयारी आणि दुसरीकडे अशी गुळमुळीत गुरुबाजी? त्याचे उत्तर खरे तर हरारीच्या ‘सेपियन्स’ ह्या समग्र मानवी इतिहासावरील पुस्तकातच दडले आहे. सेपियन्स विरुद्ध निअँडरथल हा झगडा आणि त्यात सेपियन्सचा विजय ह्या प्रवासात त्याला केवळ मिथक तयार करणारी ‘बौद्धिक क्रांती’ हीच निर्णायक वाटते. ही क्रांती का झाली याचे उत्तर त्याच्याकडे नाही. इतकेच काय तर, त्याचा वंशवाद किंवा पुरुषसत्ताक समाजनिर्मितीचा आढावा बाळबोध थाटाचा आहे- शारीरिक शक्ती, जनुके, अशी सगळी कारणे नाकारत ‘काही गोष्टी योगायोगाने घडल्या आणि त्यातून पुरुष/ गौरवर्णी वर्चस्व उदयाला आले, त्याची समाजावर पकड बसली’ अशी सगळी कहाणी त्याने रंगवली आहे. ह्या कशातही ‘वर्ग’ औषधालासुद्धा नाही. श्रमविभाजन येते ते मिथकांची गरज म्हणून. म्हणजे आधी मिथके आली आणि त्याने श्रमविभाजन शक्य झाले असा उफराटा प्रकार आहे. आणखी एक गंमत आहे-मानवी स्थलांतर, शेती आणि शेतकी क्रांतीविरुद्ध हरारी पोटतिडीकीने लिहितो: ज्या ज्या भागांत मानवी टोळ्या पोचल्या, तिथे तिथे असलेल्या प्राणी प्रजाती नष्ट होत गेल्या. शेतीच्या शोधानंतर तर अनेक वनस्पती, आणि जंगलाना धोका निर्माण होत गेला. तेव्हा माणूस हा अगदी आधीपासून पर्यावरणीय संकट म्हणूनच पृथ्वीवर वावरत आहे. इथे ‘वेगान’ म्हणून असलेली हरारी याची अस्मिता उफाळून येते- पशुसंवर्धन उद्योग हा कसा प्राण्यांना वाईट प्रकारे वागवतो हे सगळे आहेच. त्यावर कहर म्हणजे शेतकी समाज हळूहळू आपला नैसर्गिक आहार विहार ‘सुरक्षित’ आणि लोकसंख्यावाढीच्या मोहात गमावून बसला आणि त्यातून माणसाच्या शारीरिक- बौद्धिक क्षमता खुरटत गेल्या आणि पूर्वी नसलेली रोगराई पसरत गेली. आयुष्य हे केवळ अस्तित्व म्हणून उरले. पूर्वी भटक्या समाजाला अधिक स्वातंत्र्य होते. एखाद्या भागात काही आपत्ती आली, दुसरी टोळी आली तर भटके शिकारी समाज दुसरीकडे सहज जाऊ शकत. शेतकी समाज जमिनीचा गुलाम झाला’. असे हे हरारीचे प्राथमिक भटक्या समाजाबद्दलचे स्वप्नरंजन आहे. आणि जणू काही ही शिकारी, भटकी ‘मुक्त’ समज मानवी अबोध भावनेचा अविभाज्ज्य भाग आहे असा त्याचा एकूण प्रपंच आहे.
अखेर अश्या भटक्या वृत्तीने आधुनिक समाजाला सिनिकल नजरेने पाहणे हे खूप काही क्रांतिकारी आहे असा आव आणणे लेखक, प्रकाशक आणि वाचक ह्या सगळ्यांना सोयीचेच आहे. कारण त्यात परिवर्तनाचा कुठलाच धोका नाही. गमतीची गोष्ट अशी आहे की ‘न्यूयॉर्क टाइम्स’ च्या लेखात हरारी ह्या वास्तवाची कबुली देतो ‘माझ्या लेखनातून सिलिकॉन व्हॅलीमधल्या बड्या तंत्रज्ञान उद्योगांना धोका दिसत नाही, उलट ते या लेखनाला डोक्यावर घेत आहेत याचा अर्थ माझ्या लिखाणात काहीतरी चुकते आहे, काही तरी उणीव राहते आहे’. लोकशाहीचा क्षय, रोजगारांची असंगतता, किमान उत्पन्न- आणि नव-कम्युनिझम, तोही कुणाची खासगी मालकी न दुखावता- हे सगळे ह्या उद्योगांचे लाडके स्वप्न आहे. मानवी सामाजिक उतरंडीत सर्वात वरच्या थरात हरारी त्यांना स्थान देतो हे त्यांना सुखावणारे आहेच, शिवाय वेगानिझम, विपश्यना, हरारी याची पुरोगामी समलिंगी इस्र्यायली ज्यू, म्हणून असलेली ओळख हे सगळे सिलिकॉन व्हॅलीचे आवडते ‘identity matrix’ पूर्ण करणारे आहे. त्यात गैर काहीच नाही. मानवजातीचा इतिहास, वर्तमान, आणि भविष्य मांडल्याचा दावा करणाऱ्या ह्या मंडळीना स्वतःचा वर्ग-वर्ण-सांस्कृतिक भांडवलाचा चष्मा आणि शोषक वर्गाची कळत-नकळत घडणारी चाकरी काही दिसत नाही हेच खरे दुखणे आहे.

 

 


‘1 https://www.theguardian.com/books/2018/aug/15/21-lessons-for-the-21st-century-by-yuval-noah-harari-review

‘2 ‘ब्लॅक मिरर’ ह्या गाजलेल्या मालिकेतील ‘Fifteen Million Merits’ हा भाग इथे उद्बोधक ठरेल- रोजगारविहीन भविष्यातील अर्थशून्य अशी स्थायी सायकलवरून ‘क्रेडिट्स’ कमावण्याची कसरत, प्रत्येकाला अनुरूप अश्या जाहिराती, मनोरंजक कार्यक्रम यांचा भडीमार, अश्या सदैव आनंदी स्थितीत समाज असताना एक असंतुष्ट माणूस ‘टॅलेंट हंट’ मध्ये भाग घेऊन ह्या सगळ्याचा बुरखा फाडत आपला संताप व्यक्त करतो. हे ‘संताप व्यक्त करणे’, हीच एक कलाकृती म्हणून परीक्षक त्याला नावाजतात आणि त्याचे हे ‘संतप्त युवक’ स्वगत हिट होते. तो हतबुद्ध होतो, पण खूषही होतो. आणि त्या स्वगताचे कार्यक्रम होत राहतात. वस्तूकरण, आणि त्याच्या आंधळ्या विरोधाचेच अखेर वस्तूकरण करण्याची भांडवली समाजाची शक्ती पुन्हा एकदा सिद्ध होते. निराळ्या तऱ्हेने हरारीची भटकी सिनिकल वृत्ती आणि तिची गुरुबाजी ह्याच शक्तीचा परिपाक आहे

लेखक दिल्लीस्थित अभ्यासक संशोधक आहेत.

Write A Comment