fbpx
विशेष

काय म्हणताहेत गांधीबाबा

गांधीबाबा आलेत. आपल्या १५० व्या जयंतीवर्षाचा प्रारंभ सोहळा पाहत सगळीकडे झाडू मारत फिरत आहेत. महात्माच ते. त्यांना स्वच्छतेची केवळ आवडच नाही तर स्वच्छतेचं तत्त्वज्ञानच त्यांनी तयार केललं, त्यामुळे नव्याने हाती आलेला झाडू आवडला त्यांना. झाडायला घेतलाय त्यांनी एकेक रस्ता.

२०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर भाजपा आघाडीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘मित्रों’ अशी साद घालत देशभर स्वच्छता अभियानाचा आरंभ केला, महात्मा गांधींची हातात झाडू घेतलेली छबी देशभर झळकू लागली. कॅंग्रेसने गांधीबाबांना ‘आदरणीय राष्ट्रपिता’ म्हणत शासकीय कार्यालयांच्या भिंतीवरील फोटोफ्रेममध्ये लटकवून ठेवलं होतं. गांधीबाबा तसे कंटाळलेच होते. सतत देशभर पदयात्रा काढत, नाना सत्याग्रह करत भटकणारा माणूस तो. शासकीय भिंतींवर बंदिस्त होणं त्यांना तसं न रुचणारंच होतं. त्यामुळे नव्याने हाती आलेला झाडू त्यांनी मिश्किलपणे हसत हातात घेतलाय. त्यांच्याच १५० व्या जयंतीचं वर्ष आहे, त्यामुळे साफसफाईही जरा नीटच व्हायला हवी. आपला १५० वा हॅप्पी बर्थडे केक कापून साजरा करण्यापेक्षा देशभरात जागोजाग जमलेली अविचारांची जळमटं, द्वेषाच्या दुर्गंधीचे ढीग, वैमनस्याचा विषारी कचरा, वापरुन झालेल्या काडतूसांच्या रिकाम्या पुंगळ्या, एकट्या दुकट्याला जमावाने ठेचून मारल्यावर रस्त्यांवर सुकलेले रक्ताचे डाग, दगडफेकीनंतर शिल्लक राहिलेली माती हे सारं साफ करत देशभर स्वच्छतेची ही पदयात्रा काढणं हेच त्या महात्म्याला अधिक रुचणारं आहे.

‘हे राम’ म्हणत नथुरामाच्या गोळ्या झेलणारा निर्भय महात्मा आहे तो. तो मूकपणे ही सारी घाण कशी साफ करेल? झाडू मारता मारता गांधीबाबा काहीतरी बोलत आहेत. अर्थात नवीन काय बोलणार? बोलायचं ते सारं त्यांनी बोलून तर ठेवलंच आहे. पण देशातल्या स्वच्छताप्रेमी नवीन पिढीला ते कुठून माहित असणार? शिवाय या स्वच्छताप्रेमी अनेकांची हयात गांधीबाबाचा द्वेष करण्यातच गेलेली आहे. पण गांधीबाबाचा बदलावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी सगळी या भारतभूमीचीच लेकरं आहेत. तेव्हा आपणच जे बोललो १९२० मध्ये, ३० मध्ये, ४०   मध्ये तेच बोलताहेत गांधाबाबा आजही. झाडूच्या फराट्यांसोबत बोलण्याचा आवाजही येतोय. नीट कान देऊन हा आवाज ऐकायला हवा.

१७ नोव्हेंबर १९२० –

‘वेगवेगळ्या संस्कृती या भारतभूमीत आल्या आणि इथल्याच झाल्या. या वेगवेगळ्या संस्कृतींनी एकमेकींना प्रभावित केलं. या मातीतल्या गुणवैशिष्ट्यांनी त्या स्वतः प्रभावित झाल्या. विविध संस्कृतींचा एक आगळा समन्वय या भूमीत साधला गेला. या समन्वयाला खास या मातीचा स्वदेशी स्पर्श होता, जिथे प्रत्येक संस्कृतीला आपलं स्वतःचं यथायोग्य स्थान आहे. हा समन्वय अमेरिकन पद्धतीचा नाही, जिथे एका संस्कृतीचं प्रभुत्व इतर संस्कृतींना गिळंकृत करतं, ज्यांचं ध्येय सुसंवादी सहजीवन हे नसून लादलेलं, कृत्रिम ऐक्य एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. या मातीतला हा समन्वय तसा नाही…’ (यंग इंडिया)

१ जून १९२१ –

‘माझ्या घराभोवती चारी बाजूंनी भिंती उभारल्या जाव्यात आणि माझ्या घराच्या खिडक्याही बंदिस्तच असाव्यात असं मला वाटत नाही. सर्व भूमींवरच्या संस्कृती मोकळेपणाने माझ्या घरात याव्यात. अर्थात या संस्कृतींच्या माऱ्याने कोलमडून जाणंही मला मान्य नाही. माझे पाय माझ्या मातीत घट्ट रोवलेले हवेत. या देशातल्या तरुणांनी, स्त्रियांनी इंग्रजी भाषा शिकावी, जगभरचं ज्ञान मिळवावं पण त्याचवेळी आपल्या मातृभाषेची लाज बाळगू नये…’

९ मे १९३६ –

‘इतरांना वगळून कोणतीच संस्कृती जिवंत राहू शकत नाही. आजच्या भारतात निखळ आर्य संस्कृती अशी कोणतीच गोष्ट अस्तित्त्वात नाही. आर्य हे या भारतभूमीतील मूळ निवासी होते का नकोसे आक्रमक होते या वादात मला रस नाही. माझ्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की माझे प्राचीन पूर्वज एकमेकांत मिसळून गेले होते आणि माझी आजची पिढी हा त्याच सरमिसळीचा परिपाक आहे…’ (हरिजन)

डिसेंबर १९०९ –

‘तसे पाहता जितकी माणसे तितके धर्म आहेत. परंतु ज्यांना राष्ट्रीयत्वाच्या भावनेची जाण आहे, ते एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ करत नाहीत. जर त्यांनी तसे केले तर मग ते एक राष्ट्र म्हणवून घेण्यास लायक राहणार नाहीत. जर हिंदूंना वाटत असेल की, हिंदुस्थानात फक्त हिंदूंच राहिले पाहिजेत, तर मग ते स्वप्नसष्टित वावरताहेत. हिंदू, मुसलमान, पारशी आणि ख्रिस्ती, ज्यांनी ज्यांनी हिंदुस्थान हा आपला देश मानला आहे ते देशबांधवच आहेत. आणि निदान आपापल्या हितासाठी का होईना त्यांनी ऐक्यभावनेने राहिले पाहिजे. जगाच्या इतर कोणत्याही भागात एक धर्म आणि एक देश हे  समानार्थी शब्द नाहीत, हिंदुस्थानातही कधी असे नव्हते…अनेक हिंदू आणि मुसलमान यांचे पूर्वज एकच आहेत आणि त्यांच्या रक्तवाहिन्यांत एकच रक्त वाहत आहे हे आपण लक्षात ठेवायला नको का? निव्वळ धर्म बदलल्याने कोणी एकमेकांचे शत्रू होतात का?…” (हिंद स्वराज)

डिसेंबर १९०९ –

‘मी स्वतः गायीला मानतो ते या अर्थाने की, मला गाईबद्दल प्रेमपूर्वक आदर आहे. गाय ही देशाला तारक आहे कारण हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश असल्यामुळे तो गाईच्या संततीवर अवलंबून आहे. गाय हा शेकडो बाबतीत उपयोग प्राणी आहे. आपले मुसलमान बांधवही हे कबूल करतील. परंतु मी जसा गाईला मान देतो, तसाच माझ्या बांधवांचाही आदर करतो. गाईइतकाच माणूसही उपयोगी आहे, मग तो मुसलमान असो की हिंदू. तर मग मी गाईला वाचवण्यासाठी मुसलमानाबरोबर भांडण काढायचे किंवा त्याला मारायचे का? त्यामुळे गाईला वाचवण्याचा मला एकच मार्ग दिसतो. देशहितासाठी गाईला वाचवण्याकरता माझ्या मुसलमान बांधवाला माझ्यासोबत येण्याची गळ घालायची. त्याने माझे ऐकले नाही तर आत्ता ही बाब माझ्या शक्तीबाहेरची आहे असे समजून मी गाय जाऊ द्यावी. मला जर त्या गायीबद्दल प्रचंड कणव वाटत असेल तर मी तिला वाचवण्यासाठी माझे प्राण द्यायला हवेत, पण माझ्या बंधूचे प्राण काही घेऊ नयेत…ज्यावेळी हिंदू लोक गाईला क्रूरतेने वागवून तिचा नाश करतात, तेव्हा तिचे रक्षण कोण करते? ज्यावेळी गाईच्या वासराला हिंदू लोक निर्दयपणे काठ्यांनी बदडतात, तेव्हा त्यांची समजूत कोण घालतो?…’ (हिंद स्वराज)

२९ जानेवारी १९२५ –

‘आध्यात्मिकदृष्ट्या गोरक्षण म्हणजे या जगातील, निसर्गातील प्रत्येक प्राणीमात्राचे रक्षण करणे होय. गोरक्षणातून मोक्ष मिळतो असे मानले जाते. पण केवळ गाईच्या रक्षणातून मोक्ष मिळतो असे मला आता वाटत नाही. मोक्ष मिळवण्यासाठी प्रत्येकाला आपल्या मनातील राग, तिरस्कार, द्वेष, मत्सर या हीन भावनांपासून सुटका मिळवायला हवी. अहिंसेपासून घेतलेली छोटीशी फारकत, एखाद्याला शब्दानेही दुखावणं आपल्याला मोक्षापासून दूर नेत असतं.’ (यंग इंडिया)

झाडूच्या फराट्यासोबत हे असे काही शब्दही ऐकू येत आहेत. गांधीबाबांची साफसफाई ही अशी आहे. त्यांना फक्त जमिनीवरची घाण दिसत नाही तर डोक्यातील पण दिसते आणि जिथे जिथे घाण दिसते तिथे तिथे ते आपला झाडू चालवतात. आताही त्यांचा झाडू असाच फिरतोय उभाआडवा. तो फिरवताना गांधीबाबा आश्चर्यचकीतही झाले आहेत. त्यांना आश्चर्य वाटतंय की मी जे १९०९, १९२६, १९३५ मध्ये बोललो त्याचं काय झालं? माझ्या १५० व्या जयंतीवर्षाला सुरुवात होतेय पण तरी वातारवणात हे १९०९, १९२०, १९२६ सालच कसं भरुन आहे? आणि सगळीकडे ही एवढी घाण का आहे? अगदी भौतिक स्वच्छतेबाबतही १९४५ मध्ये मी सांगितलंच होतं की, खाणं जितकं महत्त्वाचं तितकंच मैला साफ करणंही महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने आपला मैला आपणच साफ व्हायला हवा, प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबाच्या मैल्याची सफाई आपणच करायला हवी. मैला साफ करण्यात कोणतंही हीनत्व नाही मात्र त्यासाठी समाजात मैला काढणारा एक वेगळा समुदाय तयार करणं, त्याच्यावर ती जबाबदारी सोपवणं, त्याला कमी लेखणं हे हीनत्व आहे. सफाईसाठी एक वेगळा समुदाय, वेगळी जात तयार करणं यातंच मुलभूत चूक आहे. पण आजही हा समुदाय आहे, गटारांच्या घाणीत उतरुन मैला साफ करतोय, त्यातल्या विषारी वायूने गुदमरुन मरतोय. ही हिंसा आहे स्वच्छतेच्या नावाने होणारी…

गांधीबाबांचा सुरुवातीचा झाडू मारण्याचा उत्साह आता थोडा मंदावलाय. कुठे पेहलू खानंचं सुकलेलं रक्त आहे, कुठे गटारात गुदमरुन मेलेल्या सफाई कामगारांची शवं आहेत, कुठे लहान बालिकांचे बलात्काराने छिन्नविछिन्न झालेले देह आहेत. विलक्षण थकवा वाटतोय त्यांना आता.

माझ्या स्वप्नातलं रामराज्य येण्याची शक्यता दूरदूरवर दिसत नाहिए…गांधीबाबा एकटक आपल्या हातातल्या झाडूकडे बघत आहेत.

वरिष्ठ पत्रकार, लेखिकाअसून सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत.

Write A Comment