fbpx
विशेष

भोंदूवाद्यांचा गांधी

संधीसाधूपणा हा ज्यांचा राजकारणाचा स्थायिभाव असतो त्यांच्यासाठी गांधींची १५० वी जयंती ही एक मोठी पर्वणीच ठरली आहे. हिंदुत्वाच्या नावे भोंदूत्वाचे राजकारण करणारा भाजप अशा संधीसाधू राजकारणात तरबेज आहे. या भाजपचा जनक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या विषारी प्रचाराची परिणीती महात्माजींच्या खुनात झाली. संघाचा बौद्धिक प्रचार प्रमुख असलेल्या नथुराम गोडसेने निःशस्त्र महात्मा गांधींवर गोळ्या घालून संघाचा विषारी कावा प्रत्यक्षात आणला. याच संघाने “गांधी वधाचा” आनंद पेढे वाटून साजरा केला अशा आठवणी जुन्या लोकांच्या तोंडून कितीएक लोकांनी ऐकल्या आहेत. आणि हेच विचार अंगी भिनवलेले तथाकथित हिंदुत्ववादी नथुरामाचे गौरवीकरण करत होते आणि आजही करतात. अशा संघाचा भाजपा हा राजकीय अवतार आता गांधीजींवर आपलाही अधिकार आहे असे म्हणत जेव्हा “गांधी १५०” साजरे करायला उठावे होतो तेव्हा त्यांना गांधींची जयंती हा सुद्धा एक मार्केटिंग इव्हेंट बनवायचा असून त्यांच्या मूळ विचारांना हात लावायचा नाहीये हे वारंवार दिसून येतं.

स्वामी विवेकानंद पासून भगतसिंग पर्यंत सारीच माणसे आमची असे म्हणत त्यांच्या लोकमान्यतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न या मंडळीनी वेगवेगळ्या प्रकारे अनेकदा करण्याचा केला आहे. परंतु विवेकानंदांचे मुसलमानसंबंधी, गोमांसाबद्दलचे विचार समोर आणल्यानंतर या मंडळींनी त्याबाबत मौन स्वीकारून हळूच ते पान बंद केले. भगतसिंगासारखा क्रांतीकारी कधी त्यांना पचणारच नव्हता. त्यांचे सगळेच दात गळून पडले असते म्हणून तोही प्रयत्न काही महिन्यांत गुंडाळून टाकला.

परंतु गांधींना आपल्याच गटाचा दाखवण्याचा प्रयत्न संघ, भाजपवाले चिकाटीने करताना दिसतात. या प्रयत्नांची सुरुवात १९६९ पासून म्हणजे “गांधी वधाला” दोन दशके उलटल्यावर. संघ आजही वध शब्द वापरतो जणूकाही गांधी या राक्षसाला नरसिंहाचा पुढील अवतार नथुरामजी गोडसे याने संपवले या थाटात.  संघाच्या शाखांना गांधीजींनी भेट दिली आणि कशी स्तुती केली ही गोष्ट संघवाले दर गांधी जयंती आवर्जून सांगतात. नरहर कुरुंदकरांनी संघाची ही धडपड आणि अचूकतेने पुढील शब्दात मांडली आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना गांधीजींनी भेट दिली, संघकार्याला गांधींनी आशीर्वाद कसा दिला, संघाच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्योदय पर्वात म्हणजे १९४६-४७ मध्ये काँग्रेस नेत्यांचे कसे संरक्षण केले याचीही माहिती आता नव्याने दिली जात आहे. किंबहुना गुंडगिरी व अत्याचार हे मुस्लिम समाजाला अंगभूत असा ध्वनी असणारी गांधीजींचीच काही वाक्ये या नियतकालिकांना नव्यानेच उपलब्ध होत आहेत. अॉर्गनायझरने तर गांधीजींचेच कार्य आता संघ चालवत असून सध्या गांधींचा आत्मा गोळवलकरांच्या शरिरातून बोलत आहे!” (शिवरात्र, नरहर कुरुंदकर, पान ४)

आता हा उद्योग गेली ५० वर्षे संघाने सातत्याने का चालविला आहे त्याची कारणमीमांसाही कुरुंदकरांच्या शब्दांतच पाहूया.
“गांधींना देव बनवण्याचा उद्योग आणि शासनाने कसोशीने चालवला आहे. …..जर शासनानेच गांधींना राजकारण समाजकारणापासून तोडून संत करायचे ठरवले असेल तर हा अख्खा हिंदू संत या देशातील, धर्मातील समाजवादी राजकीय प्रवाहाला पचण्यास जड जाईल आणि हा संत हिंदुत्ववादी राजकारणात पार पचवला जाईल.”

नेमका हाच प्रयत्न केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून संघाने सुरू केला आहे. गांधींना आत्मसात करून आम्हीच त्यांचे खरे वारस हा भ्रम लोकांमध्ये पसरवून संघ एकीकडे गांधींचे क्षुल्लकीकरण करतोय तर दुसरीकडे त्यांचे गौरवीकरण करत असल्याचा आभास निर्माण करतोय. गांधींच्या आजही शाबूत असलेल्या प्रतिष्ठेचा आणि त्यायोगे साधावयाच्या ईप्सितांचा कसा वापर करायचा याची योजना रेशीमबागेत केव्हाच ठरवून टाकली आहे.
२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मोदींचे लक्ष गांधींच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे त्यांचे २०१९ कडे होते. स्वतः गांधीजींनी आपल्या वाढदिवसाची वाट जितक्या आतुरतेने पाहिली नाही तितक्या आतुरतेने मोदी महोदय वाट पाहत होते. संधी मिळताच त्यांनी गांधींना स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसेडर बनवून टाकले. मग काय हातात झाडू घेऊन महात्मा रस्तोरस्ती झाडू मारायला लागला. राष्ट्रपित्याने सर्वात मोठा संदेश कोणाता दिला असेल तर देश स्वच्छ करा, असे पसरवण्यात आले.

त्यानंतर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या दैनंदिनीवर महात्मा गांधींचा चरखा चालवतानाचा फोटो काढून त्या जागी महात्मा मोदींचे चित्र टाकण्यात आले. महात्माजींना मोदींच्या बरोबरीला आणण्याचा तो कट होता. महात्मा मोदी चित्रातल्या चरख्यावर बसले आणि खादीची विक्री प्रचंड वाढली असे निर्लज्ज समर्थन आजही केले जाते. यात महात्म्याच्या चरख्याबरोबरच खादीचा विचारही बाजूला फेकण्यात आला. खादीमागचे तत्वज्ञान हे  उत्पादनाची साधने शक्यतो उत्पादकाच्या हाती असावी असा होता. गरिबांना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना घरच्याघरी रोजगार उपलब्ध होऊन त्यांना सक्षमीकरणाचा मार्ग दाखवण्याचा होता. ही बाब लुप्त होऊन गेली. हे कमी की काय म्हणुन माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १५ सप्टेंबर २०१७ ला कानपूर जिल्ह्यात ईश्वरगंज या गावात “स्वच्छता ही सेवा” हे अभियान सुरु केले. तेव्हाही कुठल्या संदर्भात म्हटलेले गांधीजींचे “स्वच्छता राजकीय स्वातंत्र्य हून अधिक महत्त्वाची” हे वाक्य वापरले या सार्‍या गोष्टी जाणीवपूर्वक करत आहे. संदर्भ देण्याची संघाची प्रथा नाही. कारण तेही सोयीस्करपणे वापरायचे असतात.

गांधीजींची सार्वजनिक स्वच्छतेची मोहीम अस्पृश्यता निवारणाची मोहीम होती आणि प्रथम अस्पृश्यतेवर हल्ला चढवून नंतर त्यांना जाती अंताकडे यायचे होते. हे संघ सांगणार नाही.  गांधी म्हणतात,  “सुरुवातीला अस्पृश्यता स्वच्छतेचा एक नियम होता. भारत सोडून जगाच्या सगळ्या भागात तो आजही आहे. नियम असा आहे की अस्वच्छ वस्तू वा व्यक्ती अस्पर्श असते. परंतु तिची अस्वच्छता दूर होतात ती व्यक्ती व वस्तू अस्पर्श राहत नाही. त्याप्रमाणे सफाई करणारी व्यक्ती व पैसे घेऊन काम करणारा भंगी म्हणा की निशुल्क काम करणारी आमची आई म्हणा तोपर्यंतच अस्वच्छ आहे जोपर्यंत घाण साफ केल्यावर हे लोक स्वतः स्वच्छ होत नाहीत.”  (हरिजन, फेब्रुवारी ११, १९९३, पान ८).
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गांधीजींना अस्पृश्याची भावना नष्ट करायची होती. संघाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.
रामराज्य, गोहत्याबंदी यासारखे विषय सोयीने वापरला वापरायला संघाला गांधीची हवा आहे. म्हणूनच ही जाहिरात सुरू आहे.  गांधींच्या वचनांना त्यांच्या आशयापासून तोडून सोयीने वापरण्यात यश मिळावे म्हणून गांधीजींचे खरे वारसदार आम्हीच हे सिद्ध करायचा संघाचा आटापिटा आहे. आणि तितकाच गांधी यांना समोर आणायचा आहे.

संघाचे रामराज्य आणि गांधींचे रामराज्य या अगदीच वेगळ्या गोष्टी आहेत. संघाला रामाचा जन्म जिथे झाला तिथे रामाचे मंदिर बांधून रामराज्य साकारायचे आहे. पण गांधी रामराज्य बद्दल म्हणतात, “माझ्या कल्पनेतील राम पृथ्वीवर कधी राहिले असतील वा नसतील परंतु रामराज्याचा प्राचीन आदर्श एका खर्‍या लोकशाहीचा आदर्श आहे यात काही संशय नाही या राज्यपद्धतीत क्षुद्रतम नागरिकालाही लांबलचक आणि महाग प्रक्रियेशिवाय ताबडतोब न्याय मिळू शकतो,” (यंग इंडिया, सप्टेंबर १९, १९२९, पान ३०५).  पुढे ते म्हणतात “माझ्या स्वप्नातील रामराज्यात राव आणि रंk दोघांनाही समान अधिकार असतो,” (अमृत बाजार पत्रिका, अगस्ट २, १९३४).

अत्यंत विकसित अशी लोकशाही हे गांधींचे रामराज्य आहे. भाजपच्या रामराज्यात म्हणजे हिंदूराष्ट्रात मशीद पाडणे आणि विरोधकांना देशद्रोही, पाकिस्तानी ठरवणे अशा गोष्टी अभिप्रेत आहेत. पण भाजप आज त्यांच्या हिंदू राज्यासाठी गांधीजींचा वापर करत आहे.
गांधीजींची गोरक्षणाच्या कल्पनेला असेच विकृत स्वरूप दिले आहे. गो- सेवेतून गोरक्ष ही कल्पना झुगारून आज गोरक्षकांच्या झुंडी रस्त्यावर उतरून व गोमांसाच्या संशयाने दलित आणि मुस्लिमांच्या भर रस्त्यात हत्या करीत आहेत. म्हणूनच गांधी सोयीस्करपणे आत्मसात करायचा आणि हाच खरा गांधी असे लोकांच्या मनात बिंबवून त्यांच्या गांधी विषयीच्या श्रद्धांचा वापर संघाचा जातीयवादी विषारी अजेंडा राबवण्यासाठी करायचा. गांधीजींचा सर्वधर्मसमभाव, अहिंसा, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित “आयडिया ऑफ इंडिया” ही कल्पना नष्ट करायची आणि तसे करण्यासाठी संविधानात बदल करायचे असा हा विषारी अजेंडा आहे. म्हणूनच खरा गांधी आणि भोंदूवाद्यांचा गांधी यातील फरक लोकांसमोर मांडून “गांधी १५०”च्या निमित्ताने गांधीजींना आत्मसात करण्याचा करण्याचा, त्यांचे क्षुल्लकीकरण करण्याचा आणि नंतर त्याचा वापर सोयीप्रमाणे करण्याचा संघाचा डाव आहे. हा डाव हाणून पाडायलाच हवा.

गांधीजींच्या पुण्याईवर जगणारे काही तथाकथित गांधीवादी त्यांच्या बगलेत नथुराम बाळगून आहेत आणि महात्म्याला झाडू आणि चरख्यात बंद करायच्या संघाच्या कटात भोंदूही सामील आहेत. अशा परिस्थितीत संघाचा हा डाव हाणून पाडण्याची जबाबदारी स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि सेक्युलरिझम या संविधानिक मूल्यांवर श्रद्धा असणाऱ्या सर्वांची आहे. हा डाव हाणून पाडायलाच हवा.

२०१९ हे गांधीजींच्या जन्माचे १५० वे वर्ष आहे. गांधीजींच्या खुनाला जबाबदार असणाऱ्या संघ विचाराच्या भाजपचा पराभव हीच महात्म्याला खरी श्रद्धांजली होईल.

लेखक  गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 

Write A Comment