fbpx
विशेष

आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रं

इतिहासात भारत हे पुरातन राष्ट्र असले तरी आजच्या राष्ट्र-राज्य या संकल्पनेतून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून फारच थोडा काळ अस्तित्वात होते. तरीही आपण भारतवर्षाच्या इतिहासाकडे एका राष्ट्राचा इतिहास म्हणून पाहू शकतो. कारण या देशात अनेक छोटी-मोठी राज्ये होती, ते आपापसात भांडणे करत, राजांच्या इच्छेप्रमाणे व लष्करी कुवतीप्रमाणे त्या त्या राज्याच्या सीमा व विस्तार बदलत, राजे आणि प्रजाजनही बदलत. पण त्या काळातील राष्ट्रवादाला मुख्यत्वे धर्माचा आधार होता. त्यामुळे शंकराचार्यांनी देशाच्या चार कोपर्‍यात चार मठ स्थापन केले आणि शिवाजी महाराजांना पंढरपूरच्या विठोबाची मुक्तता जितकी महत्त्वाची वाटली तितकीच काशीच्या विश्वेश्वराचीही. कारण तेच होते, चारधाम यात्रा, बारा ज्योतिर्लिंग यात्रा, नर्मदा प्रदक्षिणा, कुंभमेळे या आणि अशा अनेक धार्मिक यात्रातून तोच उद्देश साधना जात होता.

अनेक शतकांपर्यंत अनेक जाती, प्रथा, रूढी आणि परंपरा व भाषा असलेल्या या देशात हिंदू समाज मोठ्या संख्येने होता. जैन, बौद्ध यांचाही प्रभाव होता, पण हिंदू धर्माने वेळोवेळी आपलं वर्चस्व कायम ठेवलं. त्यामुळे इतर धर्म हे हिंदू धर्माचाच भाग असल्याचं भासवलं गेलं. मुसलमानांनी देशावर केलेल्या आक्रमणानंतर व मोठ्या भूभागावर राज्य प्रस्थापित केल्यानंतरही त्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या धार्मिक बाबींमध्ये फारसा हस्तक्षेप केला नाही. उलट अनेक दर्गे, मशिदी उभारल्या गेल्या आणि कबीरा सारखे संत-फकीर दोन्ही समाजांना सारखेच प्रिय झाले. ब्रिटीश-पोर्तुगीज भारतात आल्यावर काही अत्यल्प धर्मांतरे झाली तरीही माउंट मेरीच्या चर्चेला येथील लोक मोत माउली म्हणून पहात होते. अनेक ठिकाणांच्या जत्रोत्सवात सारख्याच उत्साहाने सामील होत होते.

नवी श्रद्धास्थाने, तीर्थस्थाने निर्माण झाली असे असले तरी भारत राजकीय दृष्ट्या एक राष्ट्र कधीही नव्हते. राजकीय दृष्ट्या भारताचा फार मोठा प्रदेश एका अंमलाखाली आणण्याचे कार्य प्रथम मोगलांनी केले असेच आपल्याला म्हणावे लागेल. त्यानंतर खर्‍या अर्थाने भारताला राजकीय दृष्ट्या एक केले ते ब्रिटिशांनी. ब्रिटिश राज्य हे वसाहतवादी राजवट होती. त्यांचा उद्देश या देशातील साधनसामुग्री स्वदेशात घेऊन जाऊन भारताला जास्तीत जास्त नागवणे हा होता. त्या कारणाने या राजवटीकडे देशाला गुलाम करणारी राजवट, शोषण करणारी राजवट म्हणून पाहिले जाऊ लागले. याचा अर्थ आधीच्या राजवटी शोषण करत नव्हत्या असा नाही. पण त्या काळातील साधनांच्या उपलब्धतेमुळे या शोषणाला मर्यादा होत्या. औद्योगिक क्रांतीने शोषण अमर्याद केलं आणि ही क्रांती झाली होती त्याने शोषणाच्या अमर्याद संधी उपलब्ध झाल्या. देश गुलामी आणि शोषण यात बुडून गेला.

या ब्रिटिश वसाहतीच्या शोषणाविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जो लढा दिला त्यातून निर्माण झालेल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ या कल्पनेतून एका नव्या राष्ट्र संकल्पनेची निर्मिती झाली. या संघर्षात सारा देश एकत्र आला. भारतातील गरीब, दलित, शेतकरी, मजूर, स्त्रिया, अस्पृश्य अशा साऱ्यांना महात्माजींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी जोडलं. त्यातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही आणि सेक्युलॅरिझमच्या आधुनिक मूल्यांचा अंगिकार करणार्‍या भारत या नव्या राष्ट्राचा उदय झाला. त्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपले वर्चस्व अर्पण केले त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांची स्मारकं या देशाची नवीन तीर्थस्थळ आहेत. कारण पूर्वीच्या काळात तीर्थक्षेत्रं ही धर्माशी निगडीत होती. आजही आहेत. पण आता आपण धर्माला मागे टाकून स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही आणि सेक्युलरिझम या आधुनिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन करणारी, अशी तीर्थक्षेत्र पहायला हवीत.

स्वदेशी, हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि अस्पृश्यता निवारण ही गांधीजींची स्वराज्याची त्रिसूत्री होती होते.

या लढ्यात खादीला अनन्य महत्त्वं होते. खादी केवळ कपडा नव्हता तर आर्थिक शोषणातून मुक्तीचा मंत्र होता. शक्य होईल तिथे उपभोगताच उत्पादक असावा हे तत्त्व त्यात अनुस्यूत होते. व्यापारी ब्रिटिशांनी घाऊक उत्पादनांच्या आधारे बेरोजगारी आणि दारिद्र्य निर्माण केले होते. त्यावर स्वदेशी हा उत्तम पर्याय होता. स्वदेशी हे महत्त्वाचे व्रत होते. तसेच अस्पृश्यतानिवारण हेदेखील गांधींनी भारतीयांना दिलेले व्रत होते. त्या व्रताचा प्रारंभ गांधीजींनी आपल्या आश्रमीय जीवनात कटाक्षाने केला. पण त्याच बरोबर हे कार्य त्यांनी स्वातंत्र्याच्या त्रिसूत्री मध्ये सामील केले. शतकानुशतके जो समाज पशूहूनही हीन परिस्थितीमध्ये जगत होता त्या समाजाला एका किमान पातळीचे, प्रतिष्ठेचे जीवन उपलब्ध व्हावे यासाठी महात्म्याची तळमळ आणि प्रयास होते. हिंदू मुस्लिम ऐक्य हा गांधींचा ध्यास होता. केवळ ब्रिटिशांनी अंगिकारलेल्या फूट पाडा आणि राज्य करा या नीतीला गांधींनी दिलेले ते उत्तर नव्हते तर धर्मश्रद्धा वेगळ्या असल्या तरी एक राष्ट्र निर्माण करता येऊ शकते हे सिद्ध करून साऱ्या जगाला सर्वधर्मसमभावाचे उदाहरण घालून देऊन, साऱ्या जगात धर्माच्या नावे चालणाऱ्या हिंसेला शांती आणि सद्भावना परिवर्तित करून, एका नव्या संस्कृतीचा पाया महात्मा घालू पाहत होते.

धर्म वेगळा असू दे, पण माणसं एक देश म्हणून एकत्र राहतील ही गांधींची दृढ भावना होती. नव्हे तो हट्ट होता. या हट्टापायी महात्मा जगला आणि मेला. त्‍या महात्‍म्‍याचे रक्त दिल्लीत ज्या बिर्ला हाऊसमध्ये छातीवर गोळी झेलून सांडले ते बिर्ला हाऊस आणि ज्या राजघाटावर महात्म्याचे पार्थिव पंचत्वाचा भाग बनले तो राजघाट आधुनिक भारताची तीर्थस्थळ आहेत, प्रेरणास्थान आहेत.

गांधीजींना आपण स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्वाचे नेता मानतो. राजकीय स्वातंत्र्य इतकेच सामाजिक मुक्तीच्या लढ्यांचेही महत्त्व आहे. जातिव्यवस्थेच्या बंधनांनी आपल्या सर्व बांधवांना गुलाम होऊन हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. मान, प्रतिष्ठा नव्हे तर सारे मानवी हक्क नाकारले गेले होते. तेव्हा राजकीय स्वातंत्र्याने या समाजाच्या यातना संपणार नव्हत्या. त्यासाठी सामाजिक समता प्रस्थापित होणे महत्त्वाचे होते. अशा समाजाच्या मुक्तीचा, सामाजिक समतेचा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी दलित समाजाला दिला. प्रसंगी नको ती टीका सहन केली, पण सामाजिक समतेचा लढा प्रखरपणे दिला. साधी मान वर करून बघायची हिंमत या समाजात नव्हती. त्या समाजाला बाबासाहेबांनी ताठपणे उभा करून त्यांच्या मानवी हक्कांचा एल्गार भारतभर पुकारला. बाबासाहेब केवळ अस्पृश्यांचे नेते होते आणि त्यांचे कार्य यापुरतेच मर्यादित होते, असं म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. वंचितांच्या वेदनांची त्यांना जाणीव होती. जातीच्या उतरंडीत प्रत्येक जात आपल्या खालच्या जातीचा शोषण करते ही गोष्ट खरी आहे. पण या प्रत्येक जातीतील पितृसत्ताक पद्धती घराघरातील स्त्रियांचे शोषण करते याची जाणीव बाबासाहेबांना होती. महिलांविषयी त्यांचं मन करूणेने भरलं होतं. आपल्या अनुयायांना नवऱ्याला आपला मित्र माना, असा उद्देश बाबासाहेब करतात. स्त्री-पुरुषांना समान वेतन, महिलांना बाळंतपणाची रजा अशा गोष्टी बाबासाहेबांनी कामगारांचे नेतृत्व करत असताना मान्य करून घेतल्या आहेत. हिंदू कोड बिलासाठीचा बाबासाहेबांचा आग्रह दलित महिलांसाठी नव्हता तर त्यांच्यासमोर सवर्ण जातीतील महिलांना मिळणारी अन्याय्य वागणूक होती.

आजही शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे. बाबासाहेबांनी स्थिती पाहिली होती. त्यासाठी बाबासाहेब सामुदायिक शेतीचा उपाय सुचवतात आणि हा सारा खर्च सरकारने करावा असं म्हणतात. बाबासाहेब कायद्याचे प्रकांड पंडित होते. जगभरातील उत्तम संमेलनांचा त्यांचा अभ्यास होता. संविधानाच्या लेखा समितीच्या अध्यक्षपदाचे त्यांनी सोने केले आणि साऱ्या जगालाच आदर्श ठरावे अशी संविधानाची निर्मिती त्यांनी केली. समान नागरिकत्व, स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारलेल्या भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर आंबेडकर यांची मुंबई दादर येथे असलेली समाधी चैत्यभूमी हे आधुनिक भारताचे आणखीन एक तिर्थस्थळ आहे.

अहिंसेचे पुजारी असलेल्या महात्मा गांधीबद्दल जितका आदर भारतीयांमध्ये आहेत तितकाच आदर भारतीय समाजाला भगतसिंगांबद्दलही आहे. “जीवनात पैसा हीच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं मानत असाल तर आपण कुणा एका धर्माचे आहात या कारणाने दुसऱ्या धर्मातील लोकांचा द्वेष करत असाल आणि आपण भारताच्या भूमीत आणि वर्तमानकाळाकडे टीकात्मक दृष्टीने पाहण्यास तयार नसाल तर आपण दुसऱ्या आदर्शाचा शोध घ्या. मी तुमच्यासाठी नाही,” असे भगतसिंगांचे रोखठोक प्रतिपादन आहे. आजही याचा अंगिकार करण्याची तितकीच आवश्यकता आहे. सांप्रदायिक आणि जातीय दंगली करायला अलीकडे काही निमित्त लागत नाही. उलट आमच्या राजकारणाचा ते एक अविभाज्य भाग झाला आहेत. माणसाकडे माणूस म्हणून नव्हे तर जात आणि धर्माच्या चौकटीतून पाहणं आणि त्याचा द्वेष करण्यात आपल्याला फारसं वावगं वाटत नाही.

अर्ध्याअधिक समाजाला गावकुसाबाहेर ठेवणाऱ्या आणि उर्वरित अर्ध्या महिलांना घरामध्ये कोंडून ठेवणारा समाजाच्या इतिहासाच्या उदात्तीकरणाचे निर्लज्ज प्रयत्न या देशात नव्याने सुरू केले आहेत. अवयव रोपणापासून प्लॅस्टिक सर्जरीपर्यतच्या आण् टेस्टट्यूब बेबीपासून रॉकेट टेक्नॉलॉजीपर्यंतच्या साऱ्याच गोष्टी आमच्या पूर्वजांना ज्ञात होत्या, अशा फुशारक्या जबाबदार अधिकारपदांवर असलेल्या व्यक्ती मारू लागल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये साऱ्याच बाबींकडे अत्यंत चिकित्सक पद्धतीने पाहणे आवश्यक होऊन बसलं आहे. अशावेळी गोष्टींकडे चिकित्सात्मक पाहणं गरजेचं आहे. त्यासाठीची प्रेरणा आपल्याला भगतसिंग यांच्या विचारातून मिळते. भगतसिंग क्रांतिकारक होते. ते दहशतवादी असल्याचा अपप्रचार करणाऱ्यांसाठी त्यांनी आधीच लिहून ठेवलं होतं की, “मी दहशतवादी नाही. मी एक असा क्रांतिकारक आहे ज्याच्याकडे एक प्रदीर्घ कार्यक्रम आहे आणि त्याबाबतचा एक सुनिश्चित विचारही आहे.” त्यांची क्रांती ही सशस्त्र संघर्षा इतकी मर्यादित नव्हती. त्या सशस्त्र संघर्षाबरोबरच त्यांना नव्या समाजव्यवस्थेचे दरवाजे खुले करायचे होते. त्यांची क्रांती भांडवलशाही वर्गवाद, तसेच काही लोकांना विशेषाधिकार देणाऱ्या प्रणालीचा शेवट करणारी आणि एक नवे राष्ट्र निर्माण करणारी होती. नव्या व्यवस्थेला जन्म देणारी होती. त्यांची क्रांती कामगार, शेतकर्‍यांचे राज्य कायम करून राजकीय सत्ता हाती घेण्यासाठी टपून बसलेल्या तत्त्वांना समाप्त करणारी होती. २८ सप्टेंबर १९०७ रोजी जन्मलेल्या भगतसिंगांना सुखदेव आणि राजगुरू यांच्या साथीने २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. फाशीची शिक्षा अमलात येईपर्यंत भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी जे धैर्य दाखवलं, बेडरपणे या तरुणांनी फाशीचा दोर आपल्या गळ्यात अडकवून घेतला त्याची तुलना इतर कशाशीही करणं कठीण आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सेक्युलारिझम या मूल्यांचा भगतसिंगांनी केवळ स्वीकारच केला नव्हता तर त्यांची पुरती हाच त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांचे बलिदान दिले. या तिघांची एकत्रित समाधी पंजाबात हुसेनीवाला येथे आहे. ते स्थळ आधुनिक भारताचे तीर्थक्षेत्र आहे. हे तरुणांचे प्रेरणास्थान आहे.

आज सर्वत्र संधिसाधूपणा बोकाळला आहे देशाच्या दुर्दैवाने भारतीय संविधानाचा गाभा असणाऱ्या मूल्यांवर श्रद्धा नसणारे लोक आपला देश ताब्यात घेऊ पाहत आहेत. समान नागरिकत्वाच्या पायाला सुरुंग लावला जात आहे अशा स्थितीत ही नवीन तीर्थक्षेत्र तरुणांना प्रेरणा देतील.

लेखक  गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 

Write A Comment