fbpx
शेती प्रश्न

सगळं सगळं उट्टं फिटू दे… बळीचं राज्य येऊ दे.

या समाजाला शेतकऱ्यांची गरज आहे का?

माणसाच्या मूलभूत गरजा आज बदलल्या असल्या तरीही दुधाचे टँकर पोलीस संरक्षणात घेऊन जावं लागतं ही छोटीशी गोष्ट अन्न या तुच्छ गोष्टीचं मानवसारख्या महान प्राण्याच्या आयुष्यातील स्थान दर्शवतं.

पोस्ट अपोकॅलिप्टीक मुव्ही मॅड मॅक्स फ्युरी रोड मध्ये एक सीन आहे किंबहुना अख्खा सिनेमा हा पाण्याच्या शेतीच्या अन्नाच्या भोवती फिरतो, अन्न ही मानवाची एकमेव मूलभूत आणि शेवटची गरज आहे आणि ती भागली तरच हा डोलारा आहे असा उभा राहील अन्यथा मानवाचा माणूस ते जनावर हा प्रवास सुरू होईल.

इश्यू चालुय दुधाचा, दूध हे शेतकऱ्याचं एक हक्काचं कॅशक्रॉप आहे. आज त्याची माती झालेली आहे.
शेतकरी आत्महत्या प्रमाणात होण्याचं कारण म्हणजे दुधाने संसाराला लावलेला मोठा हातभार. या फाटक्या शेतकऱ्याचा संसार सांधायचं काम दुधाने केलेलं.

खतं बियाणांपासून ते रोजच्या कपड्यालत्त्याच्या सांसारिक सर्व सर्व गोष्टींचा भार या गोठ्यांच्या छपरावर येऊन पडलेला आणि तो त्यांनी समर्थपणे पेललेला आहे.
गोवंशहत्याबंदीने खिळखिळीत केलेल्या या गोठ्यांना दुधाच्या कोसळलेल्या भावाने उध्वस्त केलं. मनुष्य प्राणीपालन तो प्राणी नातेवाईक होता म्हणून नाही तर स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी करतो. माणसाचं कष्ट वाटून घेतलेल्या प्रगतीच्या इमारतींच्या पायाची दगडं वाहणाऱ्या गाढवाला उकीरडा आणि गायीला माता हा भेद कशासाठी?

दुधाच्या या इश्यू कडे बघायचं तर संपूर्ण शेतीकडे किंबहुना शेतकऱ्याकडे उघड्या डोळ्यांनी शेवटचं विवेचन करण्यासाठी पाहणं गरजेचं आहे.
त्यामुळं सर्व प्रश्नांना सामावून घेणारा एकमेव प्रश्न एकच आहे, ” या समाजाला शेतकऱ्यांची गरज आहे का? ”

MilkFarmerStrikeउत्तरं भरपूर येतील, सरळ विभागणी हो किंवा नाही अशी होते. शेतकऱ्यांव्यतिरिक्त समाज हा भावनिक काहीतरी बोलून हो अशी उत्तरं देतो तर शेती आधारित समाज नाही असं उत्तर देतो.

ही धारणा का झाली? शेतकऱ्यांचा जीव इतका वर का आला? का आत्महत्या स्वीकारली जाते? आत्महत्येला ग्लॅमर आहे, प्रसिद्धीसाठी शेतकरी आत्महत्या होते म्हणणारे कृषिमंत्री या देशाला लाभले ते या देशाचं भाग्य थोर म्हणून, त्याहून थोर गोष्ट आम्ही तूर खरेदी करू शकत नाही म्हणणारे मुख्यमंत्री देशातील सर्वात व्हर्सटाईल पिकांचा आलेख असणाऱ्या शेतीप्रधान राज्याला लाभणे हे आहे.

हा देश कृषिप्रधान होता.

आज परिस्थिती बदलली आहे, हा देश `ग्रॅम’वाल्या मध्यमवर्गीयांचा झालेला आहे.

टनांमध्ये विकणाऱ्याचं दुःखं, व्यथा ग्रॅम मध्ये खरेदी करणाऱ्याला समजत नसतात जाणवत नसतात.
प्रत्येक शेतकऱ्यामागे सरासरी दोन कृषी तज्ञ राज्यात निर्माण झालेले आहेत .

कॉफी टेबल पासून टपरी पर्यंत
पिज्जा खाता खाता ते पार्टी पर्यंत
खळखळणारे ग्लास आणि सरकारी खर्चावर ईमानं उडवत उदंड जाहले तज्ञ वगैरे म्हणू शकतो

आकडेवारीच द्यायची झाली तर..

शेतीसासाठी लागणारं बियाणं, ख़तं, विज, पाणी यांची बेरीज ही येणाऱ्या उत्पनाला मिळणाऱ्या किमतीच्या ७०-८० टक्के जास्त आहे. उत्पन्न कितीही वाढवलं तरी त्याचा मोबादला नाही वाढला तर माती खायची का?
प्रॉडक्शन कॉस्ट १००० रुपये आणि मोबादला ५० ते ५०० रुपये ?

“बियाणं उधार किंवा स्वस्त मिळत नाहीत, ते रोख घ्यावं लागतं, मिळेल त्या भावाला. त्याची उगवेलच अशी शाश्वती नाही.
तीच गोष्ट विजेची. लाईट बिल माफ केलं वगैरे या अफवा असतात. त्यातही १८-१८ तास लाईट नसते, रात्री १२ ते पहाटे ३ वगैरे अशा वेळेत पाणी देणे.

ड्रीप, ठिबक वगैरे सुद्धा उधार किंवा स्वस्त मिळत नाही. तेही विकतच घ्यावं लागतं रोखीने.
औषधं, फवारण्या, खत वगैरे फुकट मिळत नाही, प्रचंड महाग असा हा प्रकार आहे (सेंद्रिय शेती वगैरे जोक सांगणाऱ्याने शेण खावं, हे सल्ले देऊ नयेत.) आणि हे सुद्धा रोखीने घेतलं जातं.

नंतर आली मजुरी वगैरे, तेही रोखीने असतं म्हणजे मजूरसुद्धा पैसा बाजूला घेऊन असतो आधीच.

या सर्व प्रकारानंतर सट्टा असतो तो फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या आयुष्याचा.”

“एकरी १ लाख खर्च केलेल्या पिकातून उत्पन्न मिळालं ५ हजार. वरील सर्व खर्च व्याजाने वगैर पैसे काढून केलेला असतो शेतकऱ्याने, बँक कर्ज देत नसते, कोणाचा गैरसमज असेल तसा तर जावे कर्ज मागायला. ५ हजार उत्पन्नात अंतिम संस्काराचा खर्च सुद्धा होत नाही.”

या सर्व प्रोसेसमध्ये शेतकरी त्या मजुरांना, त्या खताच्या – औषधाच्या दुकानदारांना, ट्रान्सपोर्टवाल्याला, आडत्याला, व्यापाराला, जैन ठिबकवाल्याला पोसतो. हो पोसतो.

एक शेतकरी मेला की या सर्वांचं एक गिऱ्हाईक कायमचं जातं. हे आज नाही आणखी १० वर्षांनी शेतकरी म्युझियममध्ये दाखवावा लागेल तेव्हा लक्षात येईल, फार दूर नाही काळ.

सध्याचा तापलेला विषय आहे दूध आंदोलन.

दुधाचा हिशोब थोडक्यात बघू –

दुधाची प्रोडक्शन कॉस्ट आहे ३० रुपये प्रति लिटर.

दूध अजूनतरी शेतकऱ्याला जनावरांपासून मिळते व जनावरं पिकांप्रमाणेच जिवंत असतात. ज्यांना अन्न लागते. जे बाजारात फुकट मिळत नाही. जिवंत असल्याने ती आजारी पडतात किंवा मृत्युमुखी पडतात आणि तसे झाल्यास तो संपूर्ण तोटा हा एकमेव शेतकऱ्यास झालेला असतो.

एक गाय सात लिटर एका वेळी प्रमाणे दिवसाचे १४ लिटर दुध देते.

त्याचे साधारण २५२ रुपये होतात, तर प्रति दिन साधारणपणे तिला खुराक म्हणून दोन किलो सुग्रास ४४ रुपये, भरडा दोन किलो ३८ रुपये, पेंड अर्धा किलो २० रुपये, टोटल १०२ रुपये एका वेळी खुराकाला लागतात. दोन वेळच्या खुराकाचे २०४ रुपये होतात.

तिची दिवसाला वैरण कमीत कमी कडबा १० पेंढ्या असते,
पेंढी ची किंमत १० रुपये प्रमाणे,१०० रुपये.

हिरवा चारा किमान ५० किलो, तीन रुपये किलो प्रमाणे बाजारात मिळतोय. त्याचे १५० रुपये.
परंतु एक गाय दिवसाला २५२ रुपयांचेच दूध देते आणि तिच्या खर्चाचा हिशोब हा असा होतो :

कडबा- १०० रुपये
हिरवा चारा- १५० रुपये
खुराक- २०४ रुपये

एकूण खर्च- ४५४ रुपये

मिळकत- २५२ रुपये

२०२ रुपये प्रति दिन ( कमीत कमी ) प्रत्येक गायीमागे शेतकरी तोट्यात आहे सध्या !
( दवाखाना – कमीत कमी २० रुपये प्रति दिन )

हा हिशोब १० गायी धरल्या तर २००२ रुपये वर येतो प्रतिदिन.
महिन्याला जवळपास ६० हजार रुपये आणि वर्षाला ७,२०,०००- रुपये.

बुडाला घाम फुटेल सर्वच पिकांची ही आकडेवारी दिली तर.
हे खाणारा पिणारा हा समाज या शेतकऱ्याचं देणं आहे अरबो रुपयांचं.

कांदा, हरभरा, तुरीतलं नुकसान तसंही मागत नाही कधी.
ड्रीपच्या तर अनुदानाचीबी फाईली हरवतात आमच्या ऑफिस मधून.
मारलेला काटा न बुडवलेली FRP त्यालाही आमी अस्पृश्याय.
कृषिसंजीवनी मधलं सुटीचं लोणचं दाखवलेलं लाईटबिलबी भरून घिऊन डीपी स्वतःच्या पैशावर जळल्यावर बसवाव लागलाय.

पळून गेलेला मल्ल्या तुमची चीड वाढवत नाही, आमचं अस्तित्व अन कृषक समाजाच्या बाबतीतल्या घोषणा तुमची चीड वाढवत असतील तर थोराव लोकहो.
नुकसान भरपाई घ्यायचीच तर कोट कोट रुपये देणं आहे समाज न सरकार प्रत्येक शेतकऱ्याचं.

शेतकरी माल डायरेक्ट का गिऱ्हाईकाला विकत नाही?

आणखी एक सामान्य प्रश्न असतो समाजाचा – शेतकरी माल डायरेक्ट का गिऱ्हाईकाला विकत नाही?

तुम्ही वाहन सरळ टाटा च्या कंपनी मधून घेता? कपडे कारखान्यातून घेता? की तो कारखानदार, टाटा तुमच्या दारात येतो?

या गोष्टी प्रॅक्टिकली अश्यक्य असतात. प्रश्न फक्त माझा किंवा माझ्या गावचा नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आहे. लाखो टन पिक करोडो जनतेच्या दारात कसं पोहोचवायचं? त्यासाठीच मधली फळी असते. त्यात हमालापासुन व्यापाऱ्यापर्यंत सर्व जगतात. व्यापारी, आडातदार यांवर अंकुश ठेवून किमान हमीभाव ठरवणे आणि ते बांधनकारक करणे हे काम सरकारचे आहे. त्याकडे सरकारकडून रीतसर दुर्लक्षित केलं जातं. आणखी ८-१० वर्षं चालेल हे असंच चालल तर. हळू हळू विस्थापन होतेय, शेतकरी शेतीपासून लांब जाईल नाईलाजाने.

भारतीय समाजाचा प्रवास हा दूध गुरं, म्हसरं देतात पासून दूध गवळी देतो इथपर्यंत झालेला आहे.

निओलिथिक रेव्होल्युशन
निओलिथिक रेव्होल्युशन

सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी मानवाला शेतीचा शोध लागला. किंबहुना ४० हजार वर्षांपूर्वीपासून असणाऱ्या प्रोटो फार्मिंग ची डेव्हलपमेंट होत होत माणसाने निओलिथिक रेव्होल्युशन घडवून आणलं.

माणसाची या जीवनपद्धतीमध्ये उत्क्रांती दोन टप्प्यात झाली, पहिली प्लांट डोमेस्टीकेशन आणि दुसरी अॅनिमल डोमेस्टीकेशन. प्लांट डोमेस्टीकेशन या प्रोसेसमध्ये माणसाने खाण्यायोग्य विविध बियांचा शोध घेतला जे पचवता आलं ते ठेवलं आणि बाकीचं सोडून दिलं.

गायी-म्हशी शेळ्या मेंढ्या डुकरं यांचं डोमेस्टीकेशन नाईल-यूफ्रेट्स-टिग्रीस नद्यांकाठच्या पूर्व तुर्की इराक दक्षिण-पश्चिमी इराण यांनी मिळून बनवलेल्या फर्टाईल क्रेसेंट मध्ये १००००-१३००० वर्षांपूर्वी करण्यात आलं.

इतिहासातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून या संपूर्ण निओलिथिक एज कडे पहावं लागेल.

शेतीच्या शोधानंतर माणूस स्थिरावला आणि रोजच्या शिकारीवरचं त्याचं अवलंबित्व संपूर्णपणे कमी होऊ मानवाची अन्न ही एकमेव गरज भागली, शारीरिक झीज ही वेगळ्या कारणामुळे आणि ठराविक वर्गाची व्हायला लागली. अन्नधान्याचे साठे झाले आणि त्याच्या सुरक्षेसाठी ते त्या शेतीच्या जीवनपद्धतीला लागणाऱ्या विविध गोष्टींसाठीची मानवी चेन उभी राहिली. त्या सर्व्हिसेसच्या बदल्यात धान्याची देवाण-घेवाण व्हायला लागली, आणि सर्व्हाईव्ह व्हायसाठी स्वतःचं अन्न स्वतः मिळवणे किंवा उत्पादित करणे हे नामशेष होत गेलं.

यातून शोषण व्यवस्था उभा राहिली आणि फक्त काही हजार वर्षात होमो सेपियन या जमातीने स्वतःला तसेच या ग्रहाला विनाशाच्या द्वारावर आणून उभं केले.

शेतीसोबत जनावरांना पाळून त्यातून उदरनिर्वाहाला जोड द्यायची पावलं शेतकऱ्याने उचलली. त्यात दुधापासून ते जनावरांच्या चामड्यापर्यंत सर्व आले, बाकीचे बायप्रॉडक्ट आणि मुख्य दूध.

आणि त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करायला, लॉबिंग करायला, मोठं व्हायला दूध डेअऱ्या काढल्या असा एकंदर राज्यातील जाणत्या तज्ञांचा व्ह्यू आहे.

आज समाजात कुठला वर्ग स्वतःचं अन्न स्वतः पिकवून खातो? किंवा कुठल्या वर्गाचं अस्तित्व हे अन्नासाठी आहे किंवा कुठल्या वर्गाला सर्वाईव्हल ची लढाई रोज लढाई लागते?

जगभरातील किंबहुना भारतसदृश्य देशातील शेती या एकमेव व्यवस्थेत जगणारा वर्ग आणि या ग्रहावरील काही ट्राईब आहेत ऍमेझॉन आणि नाईल च्या काठी ज्या सर्वाईव्हल चा लढा लढतायत. इतर संपूर्ण वर्ग समाजगट शेती या व्यवस्थेच्या शोषणावर टिकून आहे.

Saale Raosaheb

इंडस व्हॅली भोवतालचा भारतीय उपखंड हा शेतीवर टिकून आहे, शेती संपली की या देशांची स्वायत्तता संपली. हे नष्ट केले जातील देश जगाकडून.

मुख्यमंत्र्यांची कामगिरी काय आहे ती पाहिलीच आहे उघड उघड. आम्ही तूर खरेदी करू शकत नाही, हे या मुख्यमंत्र्यांचे विधान विसरता कामा नये. मंत्रालयात शेतकऱ्याला केलेली मारहाण ते ठिकठिकाणी निवेदन देण्यासाठी जेव्हा कोणी काही सामाजिक प्रश्न घेऊन पुढं आलेलं आहे तिथं झालेल्या मारहाणी हिशोबात धराव्या लागतील.

शेतकऱ्यांना साले म्हणणारा यांचाच खासदार व मोठा नेता आहे, हेही अॅड करावं लागेल.
केंद्रीय कृषिमंत्री बरळतो, शेतकरी आत्महत्या मीडिया कव्हरेजसाठी करतात.
बहुधा हेच सद्‌गृहस्थ बोललेले प्रेमभंगातून शेतकरी आत्महत्या करतो.

आता या विधानाने मस्तक हलतंय यात दुमत नाही, पण ज्या माणसाला शेतीची माहिती नाही त्या माणसाला हेच वाटतं शेतकरी आत्महत्येबद्दल. शहरातील कित्येक मध्यम वर्गीय ते उच्च तसेच नवश्रीमंत वर्गाचं हेच मत आहे, शेतकरी आत्महत्येबद्दल. याने बोलल्यामुळे ते सर्वश्रुत झालं इतकाच काय तो फरक.

करतो शेतकरी मातीच्या प्रेमातून आत्महत्या करतो. या मातीशी फारकत घेऊन जगणं शक्य नाही. त्यापेक्षा स्वतःला नष्ट केलेलं बरं हे मत तयार झालेलं असतं कैक श्वास मातीशी एकरूप झाल्या नंतर.

शेतकऱ्यांच्या बायका आत्महत्या करत नाहीत, हा एक युक्तिवाद असतो. मातीमध्ये राबणाऱ्या पुरुषापेक्षा मातीमध्ये राबणाऱ्या स्त्रीमध्ये एक उपजत मातीचा गुणधर्म आहे. सर्व पोटात घेऊन वांझ भावना पुन्हा जिवंत करायचा.

“ती मरत नाही कारण उरलेला उष्टा संसार ओढायचा असतो आणि तो मरतो कारण त्या उष्ट्या ताटावरून तो उठला तरच उरलेल्या कुटुंबाचं पोट भरू शकतं. हे धाडस डेव्हलप व्हायला फार फार खाली कोसळावं लागतं लोकहो.”

जनहो बंधुहो आत्महत्या म्हणजे जीव देणे सोपं वाटत असलंच तर देऊन बघा.

चार गोष्टी सांगतो

विर्गो क्लस्टर मध्ये गारपीट झाली व अवकाळी मुळे नुकसान झाले तसेच गेल्या दशकात जवळपास ३० लाख आत्महत्या झाल्या अशी बातमी आल्यानंतर आपल्या रिअॅक्शन काय असतील?

च्यायला कुठलं विर्गो क्लस्टर, त्यातला कुठला आर्म, त्यातली कुठली गॅलॅक्सी, त्यातला कुठला ग्रह, त्यातली कुठली जुवसृष्टी, न त्यातला कुठला देश न कुठले रहिवासी न त्यांचे कुठले प्रॉब्लेम, असं आपल्या सारख्या हुशार आणि प्रगल्भ मेंदूच्या लोकांना वाटणं साहजिक आहे.

आता दिवसरात्र शेतीविषयक बातम्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे विश्लेषण हे इतर सर्व समाजवर्गासाठी असंच आहे. शेती शेतकरी गावं ही दुनिया वेगळ्या क्लस्टर मधली झालेली आहे, चीड येते इतर दुनियेतील लोकांना हे दिवसरात्र वाचून ऐकून. आणि मला वाटतं त्यांचं चुकीचं नाही, त्यांना आनंदी राहण्याचा पॉझिटिव ऐकण्या वाचण्याचा हक्क आहे, त्या हक्कावर आपण गदा आणतोय.

दुसरी गोष्ट म्हणजे सततचा भिकारी प्रोजेक्ट झालेला फाटका शेतकरी चुकून भाव लागला की बोंबाबोंब करतो आणि देशभर गाजावाजा होतो त्याचा, आता हे तो स्वतः करतो की TRP साठी माईक वाले मनुक्ष करतात. त्याच्या नावावर ते काय मला माहित नाही, पण यामुळं होतं काय कालपर्यंत फास घेऊन मेलेला शेतकरी दुसऱ्या क्लस्टर मधल्या लोकांना नाटकी वाटतो म्हणजे ते म्हणतात हे येडझवं कर्मानं मेलं असणार, त्यापेक्षा जमीन विकायची आणि कर्ज फेडायचं. पण जमीन काय फ्लॅट नाही. म्हणजे ती फ्लॅट असते म्हणजे सपाट पृष्ठभाग असतो पण त्यावर भीताड नसतं एफएसआय वगैरे मध्ये गुंतलेलं. त्यामुळं त्याला विकत घ्यायला कोण धजत नाही आजकाल आणि त्यावरचं कर्ज असतं किमतीएवढं, त्यामूळं शेतकऱ्याने विचार करून गेम केलेली असते. म्हणजे कसं ती विकून भिका मागवण्यापेक्षा स्वतः जीव दिला तर जो वर्ग आजपर्यंत याने पिकवलेलं स्वस्तात खाऊन चरबी चढवून घेत होता तो वर्ग किंवा त्या वर्गाचे प्रतिनिधी मदतीचा तुकडा फेकतात.

तिसरी गोष्ट म्हणजे सुतार सुतारकाम करतो, प्रोग्रॅमर प्रोग्रॅम लिहितो, डॉक्टर इंजेक्शन देतो तसं शेतकरी शेती करतो. आता या बाकीच्या सगळ्या प्राण्यांना हे नॉलेज आईच्या पोटात माय ऑर्कुट फेसबुक वॉट्सएप वर चॅटिंग करत बसताना आलेलं नसतं. तो जमाना गेला. किसनासंग गप्पा हाणत बसल्यावर अभिमन्यूला अर्धी अक्कल आली. हाफ नॉलेज डेंजर असतंय त्यामुळं शेतकरी जन्म घेतल्यावर इतर सर्वांसारखं त्याचा त्याचा उद्योग हळूहळू शिकतो, रिसर्च करतो आणि डेव्हलप होतो. पण बाकीचे १२ वी नंतर शिकायला सुरू करतात किंवा जॉब ला लागल्यावर ट्रेनिंग मध्ये शिकतात पण शेतकरी बोलायला लागायच्या आधी बापाच्या खांद्यावर बसून फिल्ड व्हिजिट आणि प्रॅक्टिकल नॉलेज (ज्ञान ज्ञान) घ्यायला लागतो. त्यामुळं आयुष्यभर शिकलेलं अचानक तिशीत चाळीशीत सोडून दुसरा उद्योग कसा करायचा?? इंजिनिअर ऑपरेशन करतो का? डॉक्टर प्लॅन काढतो का बिल्डिंग चा? टीव्ही अँकर सीमेवर जाऊ शकतो का? मग शेतकरी निम्म्यात शेती सोडून इतर उद्योग का करेल? जे आयुष्यभर मरमरून शिकलाय ते निदान पुढच्या पिढीला शिकवेपर्यंत तो जगतो.

शेवटची गोष्ट, लोकं म्हणतात पाणी रात्रपाळीत देतात भडवे, तर दिवसा हमालीकामं करायला शेहरात जात नाहीत. पण आठवड्याखाली पाणी दिलेल्या दुसऱ्या प्लॉट मधलं माळवं वगैरे विकायला तो काढणीपासून ते खतं टाकणे, छाटने, निवडणे वगैरे वगैरे उद्योग दिवसा करतो, पिकाच्या किमतीत ओव्हरटाईम किंवा झालेली अर्धी मजुरीही अॅड न करता. पण दुसऱ्या क्लस्टरमध्ये या गोष्टी सांगणं म्हणजे मूर्खपणा आणि उद्दामपणा आहे. त्यामुळं त्यांच्या शांत सुखी समृद्ध मनोरंजक आयुष्यात या गोष्टी दिवसरात्र आल्यामुळे त्यांच्या शांत जीवनाच्या आयला वॉट्सएप लागतो व शेती कशी करावी ते २०/२२ रिकव्हरी चे वाण या फॉरवर्डेड झोलझप्पा सुरू होतात. आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी हे असे असे केले पाहिजे व आम्हाला सेंद्रिय खाऊ घातले पायजेल म्हणून.

मानवी इतिहासातील शेती नावाच्या एका सर्वात मोठ्या शाश्वत गोष्टीच्या विध्वंसाच्या एड्ज वर उभारलेल्या आमच्या भावना या आज अशा आहेत.

ईडा पीडा टळू दे बळीचं राज्य येउदे !

छावण्याबिगर मेलेली जित्रापं
कोसळवलेला शेतमालाचा भाव
तूर खरेदी
साले शेतकरी
पाण्यापेक्षा स्वस्त झालेलं दूध
हमीभाव देऊ शकत नाही म्हणणारे शी.एम.
मंत्रालयात मारून केलेला शेतकऱ्याचा गेम
प्रेमभंगातनं शेतकरी आत्महत्या म्हणणारा मंत्री
छाताडावरुन नेलेला समृद्धी मार्ग
धरणांचं पळवलेलं पाणी
आयात केलेली कच्ची साखर ते शेतमाल
सहकार चा घोटलेला गळा

नोटबंदी
जीएसटी
युरियाची काढलेली सबसिडी
बोगस औषधांना पास करून मारलेले शेतकरी
बापाच्या कष्टाची माती बघून जीव दिलेल्या पोरी
शेवटी ए.सी. स्टुडिओ मधनं आरोपी ठरवलेला शेतकरी

अन दाबून टाकलेला शेतकरी संप !!!

बोगस फसवी क्रूर थट्टा केलेली न झालेली कर्जमाफी
आणि समजामध्ये भिकारी म्हणून प्रोजेक्ट केलेला शेतकरी.

सगळं सगळं उट्टं फिटू दे
ईडा पीडा टळू दे
बळी चं राज्य येउदे

वामनाचा पाय उलथून टाकू
झोळीसकट वामन पाताळात गाडू
मेलेल्या हर एक शेतकऱ्याचा आत्मा तडपतोय
त्याला शांती लाभू दे
ईडा पीडा टळू दे

बळीचं राज्य येउदे..

लेखक इंजिनिअर असून शेती करतात, मानववंशशास्त्र व शेती हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.

Write A Comment