fbpx
विशेष

करावे तसे भरावे

सुषमा स्वराज या देशाच्या परराष्ट्र मंत्री आहेत. आता लेखाची सुरुवात अशी इयत्ता सातवीतल्या निबंधाप्रमाणे का केली याचं कदाचित काही लोकांना आश्चर्य वाटू शकतं. परराष्ट्र खातं हे केंद्राच्या अखत्यारितील खातं आहे. राज्य सरकारं अगदी ३७०वं कलम असताना काश्मीरचं राज्य सरकारही या खात्यात काही ढवळाढवळ करू शकत नाही. आणि त्या खात्याच्या सुषमा स्वराज मंत्री आहेत. मात्र देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसल्यानंतर या खात्याच्या मंत्री कोण आहेत, हे लोकांना माहितच नाही. कारण नेपाळपासून अमेरिकेपर्यंत आणि श्रीलंकेपासून दक्षिण कोरियापर्यंत पंतप्रधान मोदीजीच संपूर्ण जग पालथं घालत असतात. ते कुठे जाऊन मोठमोठाले नगारे वाजवतात, कुठे जाऊन लहान मुलांचे गालगुच्चे वगैरे घेतात. अनेक देशांमध्ये तर ते मोठमोठाल्या सभा घेऊन मोदी मोदी असे घशाच्या नसा फुटेपर्यंत ओरडणारे त्यांचे भक्तगण परदेशात असल्याचंही देशी भक्तांना दाखवून देतात. असो सांगण्याचा मुद्दा काय, त्यामुळे आपल्याला अनेकदा देशाच्या परराष्ट्र मंत्री कोण आहेत, याचा विसरच पडतो. अर्थात मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री आहेत, पण त्याला तसा काही अर्थ नाही. कारण शोलेत ज्याप्रमाणे गब्बर सिंग सांगतो की तुम्हे अगर गब्बर से कोई बचा सकता है तो  वो है सिर्फ गब्बर… तसेच तुम्ही केंद्रीय मंत्रीमंडळात असलात आणि तुमच्याकडे कोणतंही खातं असलं, तरीही ते खातं खऱ्या अर्थाने चालतं ते मोदीजींच्याच सांगण्यानुसार. त्यात कधी कधी ते अमित शहा व अजित ढोवाल यांचेही सल्ले घेत असावेत, अशा आशयाच्या बातम्या येत असतात. सांगण्याचा मुद्दा असा की, गेली अऩेक वर्षे सुषमाजी राजकारणात आहेत. पण गेल्या चार वर्षांत त्या अगदी लपल्यासारख्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात मात्र त्या पुन्हा एकदा अगदी राष्ट्रीय चर्चेत आल्या, त्याचं कारणही अगदी जबरदस्तच म्हणायला हवं. सुषमाजी थोड्या थोडक्या नाही चाळीस पंचेचाळीस वर्षे भारतीय राजकारणात सक्रीय आहेत. जॉर्ज फर्नांडिस यांनी जे अनेक मोहोरे भारतीय राजकारणात आणले त्यातल्याच एक सुषमाजी. त्यांचे घर संघाचे. वडिल कट्टर संघ स्वयंसेवक. त्याही महाविद्यालयीन जीवनात अभाविपच्या सक्रीय कार्यकर्त्या. परंतु त्यांचे पती स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे आणीबाणीच्या काळात सुषमा स्वराज यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासाठी कोर्टकज्जाची कामे पाहण्यास सुरुवात केली. यातूनच त्या राजकारणात सक्रीय झाल्या. पुढे समाजवादी व संघवाले एकत्र येऊऩ त्यांनी जनता पक्ष स्थापन केला आणि मग पूर्वाश्रमीच्या संघातील संबंधाचा फायदा उठवत सुषमा स्वराज सत्तेचा एकेक सोपान चढत गेल्या. तर अशा या सुषमाजी भाजपमधील सुसंस्कृत, शालीन नेतृत्वात मोडल्या जातात. अाता भाजपमधील शालीनपणाच तो, त्यामुळे त्याला तुम्ही सर्वसामान्यांच्या शालीनपणाप्रमाणे मोजायला लागलात, तर पंचाईतच व्हायची. म्हणजे बघा जेव्हा वाजपेयी सरकारला धूळ चारून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस केंद्रात जिंकून आली तेव्हा, सुषमाजींमधील प्रखर हिंदुत्ववादाने अशी काही उसळी खाल्ली की, हिंदू धर्मशास्त्रात विधवेला दिली गेलेली केशवपनाची शिक्षा त्या स्वतःहून घ्यायला तयार झाल्या होत्या. त्यामागे त्यांनी कारण दिलं की विदेशी वंशाच्या सोनिया जर देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या तर त्या केशवपन करून घेतील. सोनिया गांधींनी मात्र डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवून अशी काही गुगली टाकली की भल्या भल्यांची भंबेरी उडाली. खरंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण प्रत्येकाला काळजी होती की, कायम टीव्हीवर केशवपन केलेल्या सुषमा स्वराज यांना पाहावे लागते की काय! तर अशा या जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेम व धर्मप्रेमाने पेटून उठलेल्या या महान विदुषीला गेल्या आठवड्यात काही ट्विटर ट्रोलांनी फार छळले. इतके छळले की सुषमाताईंना अगदी गहिवरून आले. कारण होतं ते दिल्ली जवळच्या नोयडा येथील एका दांपत्याच्या पासपोर्टचे. तन्वी सेठ या मुलीचे एका मोहम्मद अनस सिद्दीकी नावाच्या मुस्लिम तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र तिला आपल्या पासपोर्टवर तिचे नाव तन्वी सेठ असेच ठेवायचे होते. मात्र त्या पासपोर्ट कार्यालयात सुषमाजी जशा जाज्ज्वल्य धर्मप्रेमाने व राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या होत्या तसाच एक विकास मिश्रा नावाचा अधिकारी होता. त्याने या तन्वी सेठला धर्माभिमानाचे भले मोठे लेक्चरच दिले. एकतर हिंदू असून मुसलमानासोबत लग्न केलेस, बरे केलेस ते केलेस वर हिंदू नाव तसेच ठेवून पासपोर्ट बनवतेस? असे खडे सवालच या मिश्राजींनी त्या तन्वीला केले. म्हणजे काय बघा, आपल्या देशातील भक्तगणांची अक्कल जाऊदेत पण प्रशासकीय अधिकाऱ्याची अक्कल बघा काय ती. एक तर तन्वी सेठ हे नाव असले तर माणूस हिंदूच कसा काय असू शकतो? तन्वी सेठ या नावाने मुसलमान होता येत नाही हा पहिला गैरसमज. किंवा मोहम्मद नावाचा माणूस मुसलमानच असेल कशावरून? मोहम्मद नावासकट घरवापसी केली तर त्याला संघ मुख्यालयातून देशप्रेमाचे किंवा धर्माभिमानी असल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही काय? पण असो त्या बिचाऱ्या मिश्रा साहेबांनी बरेच प्रयास करून पासपोर्ट कार्यालयात कशीबशी नोकरी मिळवली असेल, त्यांच्या उगाच सामान्य ज्ञानाची परीक्षा आपण घेणे बरोबर नाही. पण मुद्दा असा की, पासपोर्टवर कोणते नाव असावे आणि कोणते नाही, याचे काही नियम सरकारने केलेले आहेत. ते विकास मिश्रा किंवा चाळीस पैशाला एक कॉमेंट या दराने ट्वीटरवर टीवटीव करणाऱ्या मंदबुद्धी भक्तांनी ठरवलेले नाहीत. तुमच्या अधिकृत सरकारी कागदपत्रांवरील नाव, तुमच्या बँकेच्या खात्यावरील नाव अशा अनेक गोष्टी या नियमावलीत येतात. आपल्याकडे सर्वसाधारणतः लग्नानंतर स्त्रिया नाव बदलतात. म्हणजे अडनावच नाही तर नावही बदलतात. कारण लग्नानंतर त्या स्त्रीचे पूर्वीचे संपूर्ण व्यक्तिमत्व मृत झाले याचे व्यवस्थित भान तिला यावे यासाठी ही व्यवस्था केलेली आहे बरं. पण अनेक मुली हे सगळे धर्म व धर्मशास्त्र लाथाडतात. म्हणजे सुषमाजी, विकास मिश्रा, झालेच तर योगी, रामदेव बाबा वगैरे नारिंगी कपड्यातील विद्वान जे काही बोलतात त्याची या मुलींच्या लेखी काही किंमत नसते. त्या आपले पूर्वीचेच नाव लग्नानंतरही कायम ठेवतात. आता सुदैवाने स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले नव्हते व संपूर्ण भारतात स्वातंत्र्यापासूनच मोदी भक्तांची फौज धुडगूस घालत नव्हती. त्यामुळे या देशाचे संविधान, कायदे कानून हे बऱ्यापैकी उदारमतवादी व सेक्युलर वगैरे आहेत. अगदी सेक्युलर या शब्दाचा कितीही तिटकारा या मंदबुद्धी भक्तगणांना असला तरीही… तर त्या तन्वीने विकास मिश्रा साहेबांना विरोध केला. मग विकास मिश्रा साहेबांमधील जाज्ज्वल्य धर्माभिमानाने पेट घेतला. म्हणजे अगदी पेट्रोलच्या टाकीवर माचीसची जळती काडी पडावी तसा. मिश्रासाहेब म्हणाले जा देणार नाही तुला पासपोर्ट कर काय करायचं ते. या बयेने हा सगळा वृत्तांत ट्वीट केला. ट्वीटवर फक्त ट्रोलर्सनाच लिहायची परवानगी अाहे, असा नियम अजून तरी केला गेलेला नसल्याने असा अधून मधून जाज्ज्वल्य धर्माभिमानी लोकांच्याही विरोधात त्याचा वापर होत असतो. ते ट्वीट परदेश दौऱ्यावर असलेल्या… म्हणजे अनेक दिवसांनी त्यांची मोदीजींना दया आल्याने त्यांना परदेश दौरा करण्याची परवानगी मिळालेली असल्यामुळे परदेश दौऱ्यावर असलेल्या सुषमाजींनी दखल घेतली. तन्वीला पासपोर्ट तर मिळालाच पण या मिश्रासाहेबांची तडकाफडकी बदली झाली.

आता देशात पहिल्यांदाच हिंदुत्ववादी पक्षाचे स्वबळावर सरकार आलेले असताना व प्रथमदर्शनी एका मुसलमानाने लव्ह जिहाद केल्यासारखे दिसत असताना त्याला धडा शिकवायचा सोडून, परदेशात आहेत, म्हणून पाश्चिमात्य सेक्युलर विचारधारेच्या चरणी सुषमाजींनी लीन होणे इथल्या भक्तांना कसे काय रुचणार?

त्यांनी तात्काळ सुषमा स्वराज यांच्यावर जोरदार हल्ला सुरू केला. त्यात प्रामुख्याने त्यांना एकच मूत्रपिंड असल्याने त्या लवकरच मरणार असल्याचे सगळेजण बोलू लागले. त्यातही काहींनी त्यांचे मूत्रपिंड हे त्यांना मुसलमानाने दान केले असावे म्हणूनच त्यांच्यातील सेक्युलरिजम उफाळून वर आल्याचेही म्हटले. ( भक्तांची लिस्ट तयार करून त्यांना रक्त, मूत्रपिंड, यकृत वगैरे केवळ हिंदूचेच असल्यास देण्यात यावे असा अध्यादेश मोदीजी लवकरच काढणार असावेत बहुदा… नाहीतरी उबेर मुसलमान चालवत असला तर कँसल केली जाते मग मुसलमानाचे रक्त किंवा मूत्रपिंडतरी कशाला हवे, हा साधासोपा विचार यामागे आहे बाकी काही नाही.)

आपल्या देशात हे एक फारच मस्त असतं बुवा. म्हणजे ज्याला १००तून ७३ वजा केले तर किती आले, हे सांगायला दहा चान्स द्यावे लागतात तो बिनधास्त नोटबंदी कशी बरोबर आहे व यामुळे फिस्कल डेफिसीटचा प्रश्न कसा सुटणार आहे, असे वाद अत्यंत कॉन्फिडंसने घालत राहतो. तसाच हा प्रकार. म्हणजे सातवीत जीवशास्त्रात नापास झाल्याने आठवीत प्रमोट झालेले हे चाळीस पैसे ट्वीट करणारे ट्वीटरवर अगदी थेट नेफ्रॉलॉजिस्ट बनतात. (नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे मूत्रपिंडाचा म्हणजे किडनीचा डॉक्टर…खास भक्तांसाठी अर्थ सांगणं महत्त्वाचं आहे)

यामुळे सुषमाजी खूप दुःखी झाल्या. मग त्यामुळे भक्त खूश झाले. मग त्यांचं अजून रेशनपाणी घेऊन सुषमाजींच्या विरोधात सुरू झालं.  त्यात आपले ते पासपोर्ट अधिकारी मिश्राजी त्यांनाही दहा हत्तींचं बळ चढलं. ट्वीटर वॉरमुळे त्यांना वाटू लागलं की देशभरातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मग ते म्हणाले की, तन्वी आणि मोहम्मद यांच्या निकाहनाम्यात त्यांचे नाव बदललेले आहे, त्यामुळे तेच नाव लावावे असे मी त्यांना सांगितले. वेगवेगळ्या नावांनी पासपोर्ट काढणे हा कायद्याने गुन्हा आहे वगैरे अगदी कायदेशीर लोणकढ्या मिश्राजींनी बिनदिक्कत उत्तरेतील बिमारू राज्यातील हिंदी वर्तमानपत्रांमध्ये प्रतिक्रिया देताना दिल्या आहेत. आता खरं तर पासपोर्टच्या नव्या कायद्यानुसार पासपोर्ट अधिकाऱ्याला कुठल्याही दांपत्याकडे किंवा स्त्रीकडे त्यांच्या लग्नाचा दाखला मागण्याचा अधिकारच नाही. पण कायदा वगैरेंचा संबंध काय हा भावनेचा प्रश्न आहे, असे यावर उत्तर तयारच असते… म्हणजे काहीही झालं की भावनेचा प्रश्न आहे किंवा सियाचीनमध्ये आमचे जवान रात्रंदिवस उभे आहेत ही ठरलेली मास्टर की मोदीजींनी भक्तांकडे देऊनच ठेवलेली आहे. त्यामुळे मग भक्तांनाही चेव चढला आणि ते विकास मिश्रा यांची बदली रद्द करा याच्यासाठी जोरजोरात मोदी मोदीच्या आवेशात ट्वीट करू लागले आहेत.

इथे घराबाहेर पडल्यावर गू, घाण, खड्डे यांना हूलकावण्या देत, कसाबसा ट्रेनचा दांडा एका हाताने धरून वाटेतल्या खांबाना डोकं आपटून थेट स्वर्गात रंभा उर्वशीचा डांस बघण्याचा योग येणार नाही, याची काळजी घेत लोक पोट भरायला निघतात. ते पोट ज्यावर भऱते त्या नोकरीचीही शाश्वती नाही. मोदीजींच्या नोटबंदीमुळे गूडनाईट जाळल्यावर मच्छर जसे टपाटप खाली पडतात तसे व्यवसाय बंद पडू लागले आहेत. आणि या भक्तांना काळजी कसली तर विकास मिश्राची बदली रद्द करा, तन्वी सेठची चौकशी करा याची. म्हणजे या देशातील या अशा पद्धतीच्या घटना पूर्वी ब्लॅक कॉमेडी वाटाव्यात अशा होत्या. म्हणजे बीफ खाल्ल्याच्या संशयावरून एकाची दगडाने ठेचून हत्या होते. त्यानंतर पोलीस येतात. आता खरेतर कुठल्याही देशात ही घटना झाली असती तर पोलिसांनी मारलेल्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची फोरेन्सिक लॅबमध्ये चाचणी केली असती. की हा कसा मेला, दगड कुठे बसला. मग त्यानंतर विभागात चौकशी करून संबंधित कंटकांना अटक वगैरे केली असती. इथे पोलीस येऊन त्या मृत व्यक्तीच्या घरातील फ्रिज उघडतात व ते मांस जप्त करून त्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवतात… आता हा विनोदच होता पण तो काळा विनोद असल्याचं तेव्हा वाटलं होतं. आता हे विकास मिश्राचं पासपोर्ट प्रकरण व त्यानंतर सुषमाजींना झालेली उपरती व त्यानंतर भक्तांच्या मंदबुद्धीला चढलेली धार पाहून हा म्हणजे अगदीच एक चावट संध्याकाळसारख्या नाटकातला पांचट विनोद वाटायला लागला आहे.

तर मोदीजी, सुषमाजी, माझ्या प्रिय व अत्यंत सर्जनशील शिव्याष्कार करणाऱ्या भक्तांनो  आम्ही प्रामाणिकपणे मेहनत करून महिन्याला काही पैसे कमावणाऱ्या आणि त्यातून या देशाचे असेल नसेल ते कर भरणाऱ्यांच्या वतीने तुम्हाला एकच विनंती आहे की, अगदीच व्होडाफोनसारखं बिल भरूनही कुठेच धड नेटवर्क न येणाऱ्या व्यवस्थेसारखं वागू नका. आमच्या रोजच्या जगण्यातली एकतरी कष्टप्रद गोष्ट कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जाज्ज्वल्य धर्माभिमानाला व राष्ट्रप्रेमाला आमचा सलामच आहे. तो आम्ही तुमचे राज्य गेलं तरी करत राहू, पण उगाच या चुर्रनच्या गोळ्या देणं थांबवा आणि साध्या साध्या मागण्या जनता करते आहे, त्या तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

आणि हो सुषमाताई, तुम्ही बिलकूल वाईट वाटून घेऊ नका… अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंच असतं. कसं ते तुम्ही सोनिया गांधींना विचारा. तुम्ही स्वतःच्या डोक्यावर वस्तरा फिरवण्याची धमकी दिली होतीत, तेव्हा गालातल्या गालात हसत त्यांनी कसं तुमच्याकडे दुर्लक्ष केलं होतं, तसंच या ट्रोलांकडे दुर्लक्ष करा…

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

1 Comment

Write A Comment