fbpx
विशेष

सावरकरांचे उदात्तीकरण कशासाठी?

स्वातंत्र्य चळवळीशी कसलाच संबंध नसलेल्या खरं तर स्वातंत्र्य आंदोलनाला घातक अशा जातीयवादी राजकारण करून ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला सातत्याने सहाय्यक ठरलेल्या व स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववादींचे सरकार सध्या केंद्र व अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आले आहे. हे हिंदुत्ववादी देशभक्तीचा आणि राष्ट्रवादाचा सारा ठेका यांच्याकडेच असल्यासारखे देश प्रेमाच्या आरत्या आवेशाने आळवतात आणि यांच्याखेरीजचे सारेच लोक देशद्रोही म्हणजे पाकिस्तानी असल्याचं जाहीर करतात. परंतू, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यांच्या योगदानाचा विषय काढल्यावर मात्र त्यांच्याकडे तोंड वर करू बोलायला जागा नसते आणि जे काही सांगितलं जातं त्यातील खोटेपणा अगदी सर्वसामान्य लोकांच्याही ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. कारण स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेला कोणताच नेता हिंदुत्ववाद्यांकडे नाही. डॉ. हेडगेवार, मा. स. गोळवलकर, डॉ. मुंजे, मदन मोहन मालवीय यांच्याबद्दल कितीही आदराने वा उदात्तपणे उल्लेख संघाने केला तरी संघ परिवाराच्या बाहेर कुणाला यांची नावे फारशी ठाऊक नसतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एक नाव असते ते म्हणजे वि. दा. सावरकर. सावरकरांना काळ्या पाण्याची झालेली शिक्षा, त्याआधी त्यांनी लिहिलेला ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथ, त्यांनी फ्रांसच्या समुद्रात उडी मारून पराक्रम गाजवल्याच्या कथा यामुळे संघ परिवार सावरकरांचे उदात्तीकरण करतात आणि ते स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी नसल्याचा कलंक पुसून काढण्याचं काम करतात. महात्मा गांधींच्या खुनामध्ये एक आरोपी असलेल्या आणि त्याची संपुष्टी करणारा पुरावा न्यायालयात न आल्याने किंवा आणला न गेल्याने शिक्षा न झालेल्या सावरकरांना भारतरत्नाने सन्मानीत करण्याचाही या सरकारचा प्रयत्न आहे. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर), अटल बिहारी वायपेयी (२०१४ साली) या हिंदुत्ववाद्यांना या सरकारने भारतरत्न देऊन जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा अशा थोर नेत्यांच्या पंक्तीला नेऊन बसवले आहे. त्यावेळी अनेकजण मदन मोहन मालवीय कोण? असा प्रश्न विचारत होते. वाजपेयींचा भारतरत्न देऊन सन्मान करणाऱ्या या सरकारने १९४२ मध्ये ब्रिटिशांची माफी मागून तुरुंगातून सुटका करून घेणाऱ्याचा सन्मान केला. आता याच सरकारला दुसऱ्या माफीवीराचा सन्मान करायचा आहे. म्हणूनच सध्या सारे सरकारमान्य लेखक, संशोधक सावरकरांचे उदात्तीकरण करण्यास पुढ सरसावले आहेत. 

सावरकरांचा जन्म १८८३चा आणि १९०१ मध्ये ते मॅट्रिकला असताना त्यांचे लग्नं झाले. क्रांतिकारकांना वा देशासाठी त्याग करणाऱ्यांना विवाहबंधन अडचणीचे ठरत नाही असं त्यांचं मत होतं. त्यांच्या कॉलेजच्या शिक्षणाचा भार त्यांचे सासरे (भाऊराव चिपळूणकर) सांभाळतील या अटीवर सावरकर लग्नाला तयार झाले. सासऱ्यांवर त्यांची श्रद्धा इतकी दांडगी की पुढे १९०६ ते १९१० या काळात ते जेव्हा कायद्याचा अभ्यास करण्यासाठी पं. कृष्णवर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला गेले त्या आधीही आपल्या सासऱ्यांना भेटले.  इंग्लंडमधील वास्तव्यात पुरवणीदाखल जी मदत लागेल ती मदत देण्याचे आश्वासन सासऱ्यांकडून घेतल्यावरच सावरकरांनी शिष्यवृत्तीचा अर्ज पाठवला होता. यावरून ते किती दूरदर्शी होते याची कल्पना येते. सासऱ्यांवरचे त्यांचे प्रेम एवढे उदंड होते की त्यांच्या समाधानासाठी त्यांनी बोललेला नवस फेडायलाही सावरकर त्यांच्याबरोबर गेले होते व बुद्धीवादी सावरकरांनी त्यांचा नवसही फेडला. 

इंग्लंडमध्ये सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. ते इंडिया हाऊसमध्ये राहत होते. त्याचे अध्यक्ष शामजी कृष्ण वर्मा होते असं आपल्याला सांगितलं जातं. पण उपाध्यक्ष अब्दुल्ला सुरावर्दी होते हे सांगितलं जात नाही. तसेच तिथून सावरकरांनी १९ ब्राउनिंग पिस्तुलं भारतात पाठवली हे आवर्जून सांगतात. पण त्याआधी ८० हून अधिक पिस्तुलं एका मुसलान सेवकाकरवी पाठवण्यात आली होती हे आपल्याला सांगितलं जात नाही. 

या ठिकाणी सावरकरांनी मदनलाल धिंग्रा या तरुणाला एक पिस्तुल देऊन त्याच्याकडून कर्नल वायलीची हत्या करून घेतली. याच काळात त्यांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहिलं होतं. कर्नल वायलींच्या खूनामध्ये सावरकरांचा हात आहे, असा संशय ब्रिटिशांना होता. त्यामुळे सावरकर लंडन सोडून पॅरिसला येऊन राहिले. मदनलाल एकाकी तुरुंगात पडला आणि पुढे फासावर गेला. नाशिकला ब्रिटीश अधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ती हत्या सावरकरांनी अमीन याच्यामार्फत पाठवलेल्या पिस्तुलाने करण्यात आली होती. सावरकर पॅरिसला होते. ते स्वतः काही करत नाहीत केवळ बोलतात अशी चर्चा त्यांच्याच संघटनेतील सहकारी करू लागल्याने सावरकर पॅरिसहून पुन्हा लंडनला आले. त्यांना परत आणत असताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात बोटीच्या स्वच्छतागृहातून समुद्रात उडी मारली व पोहत फ्रान्सचा किनारा गाठला. पण पलायनाचा हा प्रयत्न फसला. सावरकरांच्या नावावर हा एकमात्र प्रयत्न जमा असूनही हिंदुत्ववादी त्यांना  ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणतात. हा वीर शब्दाचा अपमान आहे. कारण पुढे त्यांच्यावर दोन खटले चालवून त्यांना जन्मठेपेच्या दोन शिक्षा देण्यात आल्या आणि ४ जुलै १९११ रोजी त्यांची रवानगी ५० वर्षांसाठी अंदमानला करण्यात आली. अंदमानात गेल्यावर या वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागण्याचा सपाटा लावला आणि केवळ ९ वर्ष १० महिन्यांतच त्यांना माफी देण्यासाठी भारतात परत आणण्यात आलं. याच काळात अंदमानात शेकडो स्वातंत्र्यसैनिक हालअपेष्टा भोगत होते. त्यातील अनेकांना अंदमानातच मृत्यू आला. असं असताना सावरकर म्हणजे अंदमान असं समीकरण रूढ करण्याचा प्रयत्न म्हणजे इतर देशभक्तांचा अपमान आहे. 

सावरकरांच्या चरित्राकडे पाहता निदान १९०८ पर्यंत त्यांना ब्रिटिशांच्याविरोधात लढायचे होते. अर्थात अशी इच्छा असणाऱ्यांना हिंदू-मुस्लिम एेक्याचा पुरस्कार करणं आवश्यक होतं आणि तसे सावरकर होते हे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ वाचल्यावर लक्षात येतं. सावकरांनी त्यांना अटक होऊन शिक्षा होईपर्यंत केवळ हिंदू-मुस्लिम एेक्याचा पुरस्कारच केला नाही तर एक मुसलमान हा हिंदू इतकाच राष्ट्रवादी असू शकतो, असं म्हटलं आहे. बरेलीला छापून प्रसिद्ध केलेला अयोध्येच्या नबाबाने काढलेला जाहीरनामाच सावरकर मोठ्या अभिमानाने या पुस्तकामध्ये उद्धृत करतात. या देशात राहणारे हिंदू, मुसलमान, शीख हे हिंदी आहेत, असं त्या जाहिरनाम्यात म्हटलं आहे. “हिंदुस्थानातील सर्व हिंदूंनो आणि मुसलमानांनो, उठा ! स्वदेश बांधव हो, परमेश्वराने दिलेल्या देणग्यांत अत्यंत श्रेष्ठ देणगी म्हणजे स्वराज्य आणि तुम्ही अजूनही स्वस्थ बसणार काय ?  तुम्ही स्वस्थ बसावे अशी परमेश्वराची इच्छा नाही कारण सर्व हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या हृदयात त्याच्याच इच्छेने या फिरग्यांना आपल्या देशातून हाकलून देण्याची बुद्धी उत्पन्न झाली आहे. …. लहान थोर हे सर्व क्षुल्लक भेद विसरून जाऊन त्या सैन्यात सर्वत्र समताच नांदली पाहिजे. कारण जेजे पवित्र धर्मयुद्धात स्वधर्मासाठी आपली समशेर उपसतात ते सर्व सारख्याच योग्यतेचे आहेत !  त्यांच्यात मूळीच भेद नाहीत…. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व हिंदूस म्हणतो की, उठा व या परमेश्वरी दिव्य कर्तव्यासाठी रणांगणात उडी घ्या !” (‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ पान ८)     

या पुस्तकामध्ये अशी उदाहरणे अनेक देता येतील. सांगायचा मुद्दा हा की, सावरकर त्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवले जाण्यापूर्वी हिंदू-मुस्लिम एेक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. इतके कट्टर समर्थक की बंडवाल्यांनी दिल्लीच्या सिंहासनावर केलेली बादशाह बहादूरशहा जफरची नेमणूकही समर्थनीय ठरवतात. असे सावरकर ब्रिटिशांच्या तुरुंगात अंदमानला जातात त्यावेळी १८५७ त्या स्वातंत्र्य समरातील हिंदू-मुस्लिम एेक्याचा विचार आणि त्यातून इंग्रजांपुढे उभ राहिलेले प्रचंड आव्हान या गोष्टी सावरकर जाणत होते. हा देश धर्मभेद विसरून एकत्रितपणे जोपर्यंत ब्रिटिशांविरोधात संघटीत होत नाही तोपर्यंत स्वतंत्र होणार नाही ही गोष्टही ते जाणत होते. ब्रिटिशांच्या चिथावणीनेच काँग्रेसच्या राजकारणाला शह देण्यासाठी १९०६ साली मुस्लिम लीगची झालेली स्थापनाही त्यांना माहीत होती आणि पुढे माफी मागून सुटून आल्यावर १९१६ मध्ये मुसलमानांचे सहकार्य स्वराज्याला (home rule) मिळावे म्हणून लोकमान्यांनी केलेला सिमला करारही त्यांना माहीत होता. असे सावरकर हिंदुत्वाचा पुरस्कार आणि मुस्लीम द्वेष का करतात ?   

बरं हा मुस्लिम द्वेष एवढ्या थराला गेला की, शत्रू पक्षातील मुस्लिम स्त्रीला शिवाजी महाराजांनी सन्मानाने परत पाठवण्याला सावकर ‘सद्गुण विकृती’ म्हणून मोकळे झाले. “शत्रू स्त्री दाक्षिण्यासारखी राष्ट्रविघातक आणि कुपात्री योजिलेल्या प्रकारांमध्ये सहस्त्रावधि उदाहरणांपैकी दोन ठळक उदाहरणे येथे दिल्यास ते अप्रस्तुत होणार नाही. छत्रपति शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सालंकृत तिच्या नवऱ्याकडे पाठवले आणि पोर्तुगीजाचा पाडाव झालेल्या शत्रूस्त्रीसही चिमाजी अप्पाने वरील प्रकारे गौरवून तिच्या पतीकडे परत पाठवले.

या दोन गोष्टींचा गौरवास्पद उल्लेख आजही आपण शेकडोवेळी मोठ्या अभिमानाने करीत असतो. पण शिवाजी महाराजांना किंवा चिमाजी अप्पांना महंमद गझनी, घोरी, अलाउद्दीन खिलजी इत्यादी मुसलमानी सुलतानांनी दाहीरच्या राजकन्या, कर्णावतीच्या कर्णराजाची कमलदेवी नि तिची स्वरुपसुंदर मुलगी देवलदेवी इत्यादी सहस्रावधी हिंदू राजकारण्यांवर केलेले बलात्कार आणि लक्षावधी हिंदू स्त्रियांची केलेली विटंबना यांची आठवण, पाडाव झालेल्या मुस्लिम स्त्रियांचा गौरव करताना झाली नाही, हे आश्चर्य नव्हे काय ?” (सहा सोनेरी पाने, वि. दा. सावरकर, पान १४४).   

त्यांच्या देशभक्तीपासून मुस्लिमद्वेष, हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कार करून मुस्लिम, ख्रिश्चन यांना दुय्यम ठरवणे आणि मग द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडण्यापर्यंत झालेला मत बदल सध्याच्या वातावरणात लोकांपुढे येणं गरजेचं आहे. त्यांच्या मतपरिवर्तनाचं उत्तर सावरकरांच्या दयेच्या अर्जावर क्रॅडॉक यांनी केलेल्या टिपणीत आहे. “हे त्या दर्जाचे धोकादायक कैदी नाहीत, ते …. परिस्थितीशिवाय त्यांच्या कैदेतील आचरणावरही अवलंबून असेल आणि १०-१५ वा २० वर्षांनंतर परिस्थिती काय असेल हे कोणालाही सांगता येणार नाही. त्यासाठी मी त्यांना इतकाच सल्ला दिला की, त्यांनी तुरुंगातील शिस्तीचे पालन करून उपलब्ध पुस्तके वाचून आपल्या कैदी जीवनाला वर उचलण्याची जी संधी मिळाली आहे त्यासाठी त्याचा उपयोग करावा. ” (Savarkar Myths and Facts, Shamshul Islam, p 44)

त्यानंतर सावरकरांनी अंदमानमध्ये आपले वर्तन आदर्श कैद्यासारखे ठेवले आहे. तुरुंगातील कोणत्याही आंदोलनापासून स्वतःला अलिप्त ठेवले. इतकेच नाही तर त्यांच्याबरोबर ज्यांना (एकाच खटल्यात) शिक्षा झाली त्या कैद्यांपासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवण्याची विनंती, इतरांच्या चुकीची शिक्षा त्यांना न देण्याची विनंती दिलेल्या दयेच्या अर्जात केली आहे. त्यांच्या या आदर्श वागणूकीची बक्षिसी ब्रिटीश सरकारने त्यांना दिली. त्यांची ५० वर्षांची शिक्षा कमी करून ९ वर्षे  १० महिन्यांत भारतात आणण्यात आलं. त्यानंतरची पाच वर्षे राजकारणात भाग न घेण्याची आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवायन ओलांडण्याची अट घालून रत्नागिरीत ठेवण्यात आले. तेव्हा एक गोष्ट स्पष्ट आहे की, सावरकर तुरुंगामध्ये गेल्या गेल्या माफी मागू लागले. पहिला माफीचा अर्ज ३० ऑगस्ट १९११ ला म्हणजे अंदमानला गेल्यावर केवळ ५७ व्या दिवशी केला आहे त्यांनी जो कोलू चालवण्याचा उल्लेख केला जातो तो कोलू तोपर्यंत चालवलाच नव्हता. तसंच त्यासाठी आवश्यक शारीरिक पात्रता सावरकरांकडे नव्हती. सावरकरांनी एकूण पाच दयेचे अर्ज केले आहेत. त्यांच्या पत्नीने आणि वहिनीने त्यांच्या सुटकेसाठी अर्ज केले आहेत. सावरकरांनी आपली सुटका ब्रिटिशांची माफी मागून करून घेतली आणि ही लीन-दीन होऊन मागितली याचे एकच उदाहरण पुरेसे आहे १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहिलेल्या माफी नाम्यांत ते लिहितात की, “…. परंतु जर आम्हाला सोडण्यात आले तर लोक सहज प्रेरणेने दंड देणे आणि सूड घेणे यापेक्षा क्षमा करणे आणि सुधारणे हे अधिक जाणणाऱ्या सरकारचा आनंदाने आणि कृतज्ञतेने जय जयकार करतील शिवाय संविधानिक तत्वांवर ते माझे परतणे भारतातील आणि भारताबाहेरील एकेकाळी माझ्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहणाऱ्या त्या भरकटलेल्या तरुणांना पुन्हा मार्गावर आणेल. मी सरकारची सेवा जशी सरकारला आवडेल त्या पद्धतीने करायला तयार आहे कारण माझे संविधानिक मार्गाने इमानदारीचे आहे म्हणून माझी भविष्यातली वर्तणूकही तशीच असेल अशी माझी आशा आहे मला कैदेतून सोडवण्याच्या तुलनेत मला कळले ठेवल्याने काहीच मिळणार नाही केवळ सर्वशक्तिमान दयावान बनू शकतो आणि म्हणून अतिव्ययी मुलगा मायबाप सरकारच्या दारी करण्यावाचून काय करू शकेल ? ”

हे नुसते क्षमापत्र नाही तर वाघाचे पार कोकरू झाल्याचा पुरावा आहे आणि हे कोकरू आपल्या विरोधात जाणार नाही याची खात्री झाल्यावर कोकराला मुक्त केले गेले आहे. क्रॅडॉच्या वरील टिप्पणीनुसार, “१०, १५ वा २० वर्षानंतर परिस्थिती काय असेल हे कोणालाही सांगता येणार नाही” अशी एक ओळ आहे. १९२० मध्ये सरकारला हिंदू-मुस्लीम ऐक्य फूट पाडण्यासाठी मनुष्याची गरज होती. ही गरज सावरकर पुरी करतील यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना मुक्त केले होते. कारण अंदमानमध्ये बुद्धिवादी सावरकरांची शुद्धीची चळवळ ब्रिटिशांनी बघितली होती. सावरकरांवर राजकारणात भाग घेण्यास बंदी होती. परंतु सावरकर १९२४ मध्ये ती रत्नागिरी वास्तव्यास येताच काही आठवड्यातच रत्नागिरीत हिंदू महासभेची शाखा सुरू करण्यात आली. ती सुरू करण्यासाठी सावरकरांचे बंधू बाबाराव यांचा पुढाकार होता. सावरकर रत्नागिरी रहाण्यास येणे आणि हिंदू महासभेची शाखा सुरू होणे हा योगायोग नव्हता आणि ही गोष्ट ब्रिटिशांच्या नजरेतून सुटणारीही नव्हती. पण त्याला ब्रिटिशांनी हरकत घेतलेली नाही कारण ह्यासाठी सावरकरांची सुटका करण्यात आली होती. 

शी. ल. करंदीकर, धनंजय कीर यांच्यासारखे सावरकर चरित्रकार सावरकरांच्या माफीवर काही बोलत नाहीत आणि अन्य समर्थक गनिमी कावा होता असे त्यांच्या माफीचे उदात्तीकरण करतात. य दि फडके काहीशा अशाच मताचे आहेत. ते लिहितात की, “आधी नाशिक मध्ये आणि नंतर लंडनमध्ये केलेल्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नाबद्दल कारावासात तात्यांनी फेरविचार केला आणि त्यामुळे सरकारकडे त्यांनी क्षमायाचना वजा पत्रे पाठवली असा काहींचा समज झालेला दिसतो. १९५८ चाली मुंबई सरकारने भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा दुसरा खंड प्रकाशित केला. त्यात ३० मार्च १९३० रोजी अंदमान-निकोबार बेटाच्या मुख्य आयुक्तांना पाठवलेला अर्ज प्रसिद्ध केला आहे. या अर्जात निष्ठापूर्वक सरकारशी सहकार्य करण्याची भाषा वापरली आहे. पण ती भाषा शब्दशः खरी धरता कामा नये. तात्यांनी वेळोवेळी केलेले अर्ज, त्यामागील त्यावेळचा राजकीय संदर्भ, तसेच इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेली प्रतिक्रिया समग्र लक्षात घेतली तर तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते हे लक्षात येते. पन्नास वर्षे अंदमानच्या कोठडीत राहून जीवित यात्रा संपवण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन सशर्त व बिनशर्त मुक्त होण्यासाठी ते अंदमानातून प्रयत्न करीत होते. म्हणूनच सुटकेला उपकारक परिस्थिती निर्माण झाली आहे असे त्यांना वाटले की ते सुटकेसाठी अर्ज करीत. या व्यवहारिक धोरणाला यश यावे म्हणून ते सरकारला अनेक आश्‍वासने देत असत आणि सहकार्याचे आमिष दाखवीत असत. १९३७ पर्यंत हा खेळ ते खेळत होते.”   (शोध सावरकरांचा य. दी. फडके ५०-५१) फडके यांचा युक्तिवाद मान्य करायचा तर सावरकरांना धोरणी, व्यवहारी वगैरे म्हणता येईल. पण ‘वीर’ का म्हणायचे? आणि सावरकरांना वीर म्हणायचे तर जे सावरकरांपेक्षा श्रेष्ठ कामगिरी करून फासावर लटकलेल्या व अंदमानातील ज्यांनी छळ सोसला, माफी मागितली नाही त्या खऱ्या वीरांना काय म्हणायचे? सावरकरांनी माफी मागून करून घेतलेली सुटका गनिमी कावा होता तर महाराष्ट्रातले हिंदुत्ववादी क्रांतिकारक १९२० ते १९४७ ही सत्तावीस वर्ष काय करत होते  

नरहर कुरुंदकर लिहितात “ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याशी फक्त वैरच केले ते तुमचे जिव्हाळ्याचे जिवलग असतात. निदान हैदराबादचा लढा हा तर मुस्लिम विरोधी होता भारताची एकात्मता निर्माण करणारा होता. हिंदुत्ववाद्यांनी या लढ्यात काय भाग घेतला, शक्ती लहान असणे हा गुन्हा नसतो. स्वातंत्र्यलढा सुरू असताना शक्तींना न वापरणे हा मात्र गुन्हा असतो. निझामावरती बॉम्ब फेकणारा हा पुन्हा गांधींचा जयघोष करणारा असतो. हिंदुत्ववाद्यांच्या पिस्तुलांना कासिम रझवी दिसला नाही. निझाम व जिना दिसले नाहीत. इसवी सन १९२० नंतर इंग्रजांच्या ही विरोधी झाडली गेली नाही. जणू ही गोळी गांधींसाठीच होती ! ”  ( शिवरात्र नरहर कुरुंदकर पा. १९)

लढणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा वाचाळपणा सत्तावीस वर्षे टिकलेला स्वातंत्रद्रोह होता आणि त्याचे नेते सावरकर होते. त्यांना वीर कशासाठी म्हणायचे ?

सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी, समाजसुधारणांसाठी केलेल्या कामाबद्दल नेहमी बोलले जाते. परंतु ही सर्व कामे त्यांनी १९२४ ते १९३७ या काळात केली आहेत. १९३७ नंतर सावरकर पूर्णपणे बंधमुक्त झाले होते. तेव्हा ही कामे त्यांनी सोडून दिली आणि ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले. त्यांचे अनुयायी तर समाज सुधारणांचा त्यांच्या कामात कधीही सहभागी झाले नाहीत. त्यामुळे सावरकरांचे समाजसुधारकाचे कार्य म्हणजे राजकीय कार्य करता येत नाही म्हणून फुरसतीचा उद्योग होता. त्यांच्या पतितपावन मंदिराबद्दल आजही कौतुकाचे ढोल बडवले जातात. याबाबत कुरुंदकर लिहितात की, “पतित पावन मंदिर ही गोष्ट कौतुकास्पद नसते हेच पुष्कळांना कळत नाही. अशा घटना चिंताजनक असतात. सर्व जाती-जमातींना मोकळे असणारे मंदिर शेवटी फक्त अस्पृश्यांचे मंदिर उरते आणि पुढे तेही तिथे येणे सोडून देतात. ”( शिवरात्र नरहर कुरुंदकर पा २४)

अस्पृश्यांना देवदर्शनाची मोठी ओढ लागली होती म्हणून मंदिर-प्रवेश नको होता तर सामाजिक समतेची प्रतिष्ठेची आकांक्षा त्यांना मंदिरप्रवेशावरील बंदी उठवण्यात प्रवृत्त करत होती. ही सामान्य बाब सावरकरांच्या ध्यानात आली नसावी वा त्यांनी ती घेतली नसावी. कारण त्यांच्यासाठी सुधारणा हा फुरसतीचा उद्योग होता. पतितपावन मंदिराची मूळ कल्पना ही सावरकरांची नसून श्री. म. माट्यांची आहे. सावरकरांच्या बुद्धिप्रामाण्यवादाचेही ढोल पिटले जातात. अर्थात शुद्धीची चळवळ चालवणाऱ्या, वेदोक्त सर्वांनाच द्या, असे म्हणणाऱ्या आणि सासरेबुवांनी बोललेला नवस फेडण्यासाठी बरोबर जाणाऱ्या सावरकरांचा बुद्धिवाद त्यांचे अनुयायी जाणोत. 

“रत्नागिरी वास्तव्यात सावरकरांना सरकारकडून दरमहा १९२९पासून  साठ रुपये पोटगी दाखल देण्यात येत होते. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह जेमतेम चालला होता. लेखनावर पैसे मिळवणे त्यांना शक्य नव्हते. सार्वजनिक थैलीमधून त्यांना ज्या देणग्या मिळाल्या होत्या तो सगळा पैसा त्यांनी पतपेढीत ठेवला असता, तर त्याच्यावर त्यांना व्याज मिळाले असते. पण त्यांनी तसे केल्याचे दिसत नाही. ते आपल्या परिचयातील गरजू माणसांना व्याजावर पैसे देत असत. त्यामुळे उभयतांची सोय होत असे.” (स्वातंत्र्यवीर सावरकर, धनंजय कीर, अनुवाद द. वा. खांबेटे, पा २२७)

थोडक्यात ब्रिटिश देत असलेल्या पैशांत सावरकरांचे भागत नव्हते. म्हणजे ब्रिटिशांकडून पैसे घेऊन त्या काळात सावरकर गनिमीकावा वगैरे काही करत नव्हते हे स्पष्ट आहे. उलट नेटका संसार करत होते कारण याच काळात सावरकरांना मुले झाली आहेत. ब्रिटिश पेन्शनवर गुजराण करणारे सावरकर ब्रिटिशांविरोधात काही करण्याची शक्यता नव्हती. पण पुढे १९३७ मध्ये ही बंधने उठल्यावर आणि सावरकर हिंदूमहासभेचे अध्यक्ष झाल्यावरही ब्रिटिशांविरोधात एखादा लढा तर सोड पण नाकातला शेंबूड ही सावरकरांनी फेकलेला नाही. त्यांची सारी हयात काँग्रेस आणि गांधीजींना विरोध करण्यात गेली. “ हिंदुस्तान हिंदूओं का” ही केवळ शनिवारवाड्या पुढची घोषणा होती. त्यासाठी ब्रिटिश या देशातून जावे म्हणून कृती मात्र शून्य होती. मुस्लिम आणि हिंदू महासभा यांच्या नेत्यांना अटक करण्याची गरज ब्रिटिशांना कधी वाटलीच नाही. कारण ते दोघेही ब्रिटिशधार्जिणे राजकारण करत होते आणि स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करत होते. या काळात सावरकरांनी केलेले महान कार्य म्हणजे त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. १९३७ साली अहमदाबादेत हिंदूमहासभेच्या अधिवेशनात ते म्हणतात की, “भारत हे एकजूट असलेले एकसंघ राष्ट्र नसून त्यात हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत” जिनांनी पाकिस्तान मागायच्या तीन वर्ष आधीच सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्य करून टाकला होता. पुढे जिनांशी आपले कोणतेच भांडण नाही असेही जाहीर करून टाकले होते. म्हणूनच १९४२च्या चले जाव आंदोलनात साऱ्या सरकारांनी राजीनामे दिले, त्यावेळी सिंध आणि बंगालमध्ये सावरकरांच्या हिंदू महासभेने मुस्लिम लीगच्या बरोबर युती करून संयुक्त सरकार बनवली. मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा ब्रिटिशधार्जिणे होते. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे गांधी त्या दोघांचे शत्रू होते. मुस्लिम आणि हिंदू महासभा संयुक्त सरकार बनू शकत होते. खाल्ल्या मिठाला जागूनच ही कृती होती. सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्य भरती करून हिंदूंचे सैनिकीकरण केल्याचे ढोल पिटले जातात. हे सैन्य ब्रिटिशांनी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेने विरुद्ध लढण्यास वापरले होते याचे उत्तर कसे द्यायचे? आणि याला देशप्रेम कसे म्हणायचे ? अखंड भारताबद्दलही बरेच सांगितले जाते. पण स्थानिकांना भारतात विलीन होतात स्वतंत्र रहा असा सल्ला देणारे सावरकर, अखंड भारत कसा निर्माण करणार होते? त्याची उकल सावरकरांचे गोडवे गाणाऱ्यांनी करायला हवीत.

गांधी हत्येच्या खटल्यात सावरकरांना उगीचच गोवल्याची ओरडही करण्यात येते. तसेच त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले असा प्रचारही केला जातो. पण हे आणखी एक असत्य आहे. सावरकरांच्याविरुद्ध बडगेने दिलेली साक्ष  न्यायालयाला सत्य वाटली होती. पण त्यात साक्षीची संपुष्टी करणारा पुरावा त्यावेळी न्यायालयासमोर न आल्याने व आणला न गेल्याने सावरकरांना पुराव्याअभावी सोडण्यात आले. त्यानंतर  कपूर कमिशनपुढे आलेल्या अंगरक्षक आप्पा कासार आणि सचिव गजानन दामले यांच्या साक्षी हा आधार कपूर कमिशनला मिळाला. तो जर आधी न्यायालयासमोर आला असता तर सावरकरांना गांधीहत्येतील सहभागासाठी शिक्षा झाली असती. सरदार पटेलांना सावरकर गांधी हत्येच्या कटात सामील असल्याची पूर्ण खात्री होती. २७ फेब्रुवारी १९४८ रोजी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी थेट सावरकरांच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या हिंदू महासभेच्या कट्टर शाखेने हात लावला आणि तडीस नेला, असे लिहिले आहे. या खटल्यावर बारीक लक्ष ठेवून असलेल्या काकासाहेब गाडगीळ यांनी त्यांच्या ‘लाल किल्ल्याचे मनोगत’ या पुस्तकात एखादा गुन्हेगार सुटला असेल पण एकाही निरपराध्याला शिक्षा झालेली नाही, अशी मार्मिक टिप्पणी केली आहे. 

लंडनमधून १९ पिस्तुले भारतात पाठवणे, मदनलालला भरीस घालून कर्नल मुलीची हत्या करण्यासाठी पिस्तूल देणे १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहिणे आणि फ्रान्सच्या किनाऱ्यावर बोटीतून मारलेली उडी इतकेच काय ते क्रांतिकार्य सावरकरांनी केले. त्या जगप्रसिद्ध उडी नंतर सावरकरांचे क्रांतिकार्य संपले. या क्रांतिकार्याचा गौरव करणे हे हिंदुत्ववाद्यांना भागाच आहे कारण स्वातंत्र्य आंदोलनातले त्यांचे योगदान केवळ तितकेच मर्यादीत आहे. ते १९०९ मध्येच संपले होते. १९०९ पर्यंतच्या कामाचा गौरव कोणाला करायचा असेल तर तो जरूर करावा. पण त्याच वेळी अंदमानच्या काळ्यापाण्याची शिक्षा आणि हाल-अपेष्टा सहन करत ज्यांनी प्राण सोडले पण ब्रिटिशांची माफी मागून सुटका करून घेतली नाही त्या शेकडो क्रांतीकारकांचा आधी सन्मान करावा. त्यांच्यापुढे तर सावरकरांचे कार्य फारच थिटे आहे. सावरकरांच्या त्यागाचा गौरव करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जगात वाल्याचा वाल्मिकी झाला तरच तो वंदनीय असतो. पण वाल्मिकीचा वाल्या झाला तर त्याची तुलना अन्य दरोडेखोरांबरोबरच करावी लागते. सावरकरांनी आधी काय केलं त्यापेक्षा त्यांनी नंतर काय केलं यावरच त्यांचे मूल्यमापन करणं भाग आहे. आज हिंदुत्ववादी त्यांचे उदात्तीकरण करतात ती त्यांची गरज आहे, सत्य नव्हे !   

लेखक  गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 

5 Comments

  1. गांधी ना सावरकरांनी ठार मारलं. हे खर आहे का कोरडे?

  2. Dr. Supriya Reply

    अतिशय सुंदर व शास्त्रशुद्ध मांडणी ..अशा लेखांची समाजाला गरज आहे. धन्यवाद

  3. डॉ. विवेक कोरडे म्हणून गांधी भक्त्त असलेल्या विचारवंताला हिंदुत्ववादी सावरकर विषयी प्रचार करताना फाळणी किंवा हिंदूंची झालेली हानी आणि फाळणी मुळे बेघर झालेले हिंदू विषयी काही माहिती असावी असे वाटत नाही ! केवळ गांधी प्रेम म्हणजे सावरकर विरोध आणि त्या बरोबर क्रांतिकारक विरोध असा हा उपसुंद प्रकार आहे ! लेखक फाळणी विसषयी चूप आहे ! फाळणी मुळे झालेले अत्याचार विषयी मौन आहे ! अहिंसेचे पुजारी असेच वागतात आणि प्रचार करतात ह्याचे चांगले मार्ग दर्शक आहेत !!

  4. Mohan Patil Reply

    सावरकरांचे परखडपणे पोलखोल केल्याबद्दल अभिनंदन.!

Write A Comment