fbpx
सामाजिक

मनुवादी – ब्राह्मणी पिनल कोड

जम्मू काश्मीर नेहमीच आधीचा जनसंघ आणि नंतर भाजपाच्या रडारवर राहिला आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये सतत संघर्ष तेवत ठेवण्याचा प्रयत्न या ब्राह्मणी-फॅसिष्ट  शक्तींनी केला आहे. जम्मू काश्मीर मध्ये 370 कलमावरून संभ्रमाचे वातावरण ठेवण्याचा पद्धतशीर प्रयत्न त्यांनी केला आहे. या संघर्षाचे बळी सामान्य कष्टकरी जातवर्गीङ्म लोक ठरतात.  केंद्र आणि काही राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर देशात एक प्रकारचे उन्मादाचे वातावरण पसरले आहे. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी स्वयंघोषित गोरक्षक बनून उन्मादाचे नमुने त्यांनी सदर केले आहेत. सावधान! नव्या रुपात मनुवादी ब्राह्मणी इंडियन पिनल कोड उच्छाद मांडत आहे. परवापरवा तर जम्मूकाश्मीर मध्ये बकारवाल (जे धर्माने मुस्लीम आहेत आणि पशुपालन करतात. त्यात मुख्यतः गाई आणि बकर्यांचा समावेश असतो.) या भटक्या जमातीच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांच्या मोहिमा सतत चालू असतात. अशाच एका मोहीमेत अवघ्या 8 वर्षाच्या मुस्लीम मुलीला पकडून 8 दिवस कैदेत ठेवण्यात आले. तिला गुंगीचे औषध देण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. बलात्कारासाठी मेरठवरून एकाला पाचारण करण्यात आले. त्याला बोलवताना ‘तुझी वासना भागवायची असेल तर इकडे ये ’ असा निरोप त्याला देण्यात आला होता. मंदिरात या अल्पवयीन मुलीवर अनेकांनी सतत बलात्कार केला अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवाब्राह्मणाच्या साक्षीने केलेलं लग्न श्रेष्ठ, पवित्र मानणारांनी देवाच्या साक्षीने मुस्लीम मुलीवर अत्याचार केला आहे. या सामुहिक बलात्काराचा मास्टरमाईड हा सांजीराम आहे. तो मुस्लिमविरोधी गरळ ओकणार्या विंगचा म्होरक्या आहे. बाकरवाल गाईची हत्या करतात, त्यांना हिंदुनी गुरे चरण्यासाठी जमीन देऊ नये अशा मताचा तो आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न तो करीत होता. बकरवालाना हद्दपार करावे यासाठी तो योजना बनवण्याच्या तयारीत होता.  एखाद्या जाती, जमातीला किंवा परधर्मातील व्यक्तींना धडा शिकविण्यासाठी ब्राह्मणी विचारसरणी नेहमीच त्या त्या जाती-धर्मातील स्त्रियांना टार्गेट करीत असतात. खैरलांजी येथे असेच घडले, 2000 साली गुजरात मध्ये असेच प्रयोग करण्यात आले. नऊ महिन्यांच्या गर्भार मुस्लिम स्त्रीचे त्रिशूळाने पोट फाडण्यात आले, मुस्लिम स्त्रियांच्या योनीमार्गात सळया खुपसण्यात आल्या होता. त्यांचा गुन्हा इतकाच की त्या  शत्रूच्या स्त्रिया होत्या. नुसत्या जन्मदात्या किंवा आई नाही तर शत्रूचा वंश जन्माला घालण्याचा गुन्हा करत होत्या, म्हणून योनीमार्गात त्रिशूळ खुपसण्यात आले होते. या अशा मानसिकतेतुन इतक्या हिंस्त्र पातळीवरची कृती धर्मांधांनी उन्मादात केली होती. आता सांजी राम त्याचाच कित्ता गिरवताना दिसत आहे.  बकरवाल हे मुस्लिम भटकेविमुक्त. ब्राह्मणी-फॅसिस्टांनी त्यांना शत्रू घोषत केले आहे. म्हणून त्यांच्या विरोधात वाट्टेल ती कृती करण्याचा अधिकार ते स्वत:कडे घेतात. त्यांचा आक्षेप बकरवाल हे भटके विमुक्त नाहीत. त्यांना यामुळेच सवलती व अधिकार मिळत आहेत.

या घटनेचा मुख्य आरोपी सांजीराम चा वकील शर्मा याने तर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनाच जिहादी मुख्यमंत्री घोषित केले आहे. जम्मूमध्ये हिंदू बहुसंख्यांक आहेत, त्यांना येथील हिंदुची संख्या कमी करायची आहे असा आरोपही त्याने केला आहे. म्हणजे ही घटना एका मुलीवर अत्याचार करणारी आहे, माणूसकीला काळीमा फासणारी आहे याबद्दल त्यांच्या मनात अजिबात खंत नाही. त्यांच्या लेखी हा प्रश्न हिंदु विरुध्द मुस्लिम असा आहे. ते त्याला त्याच संदर्भात मांडू इच्छितात. इतकेच नाही तर अॅड. अंकुर शर्मा या घटनेसंदर्भात हिंदु महासभेसहित सर्व संघटनांना भेटणार आहेत. हिंदु एकता मंच स्थापन करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला आहे. हे म्हणजे चोर तर चोर वर शिरजोर असाच प्रकारचे वर्तन आहे. खरे तर ही एक प्रकारची गर्भित धमकीच आहे.

या घटनेच्यानिमित्ताने ब्राह्मणी फॅसिस्टांचे खरे रुप आणखीन गडद स्वरुपात पुढे येत आहे. त्यांची काळीकुट्ट बाजू मोदींच्या मंत्रीमंडळात सहभागी असणारे कामगार मंत्री संतोष गंगवार, हेमा मालिनी यांनी बलात्काराच्या घटनांबद्दल केलेल्या असंवेदनशील वक्तव्यांमधुन समाजाच्या समोर येत आहे. त्यांचे अध्यात्माच्या क्षेत्रातील नेते आसाराम, सांस्कृतिक क्षेत्रातील म्होरके मनोहर भिडे, पोलीस खात्यातील काही प्रतिनिधींच्या निमित्ताने एकंदर स्त्रियांकडे बघण्याचा त्यांचा  विकृत  दृष्टीकोन पुढे आला आहे. भाजपा खासदार असणार्या हेमामालिनी यांनी आजकाल बलात्कारांच्या बातम्यांना जरा जास्तच प्रसिध्दी दिली जाते असे विधान केले आहे. म्हणजे चक्क अशी तक्रार केली आहे. आजकाल बलात्काराच्या घटनांमध्ये जास्तच वाढ होत आहे असे म्हंटले असते तर निर्ऋतीच्या लेकींच्या गणगोतात त्यांचा समावेश करता आला असता. परंतु आदिम गणमातेच्या समतावादी वारश्यापेक्षा त्यांना पक्ष, नेता आणि खूर्ची अधिक महत्वाची वाटते. निर्ऋतीच्या लेकींमध्ये ब्राह्मणी-पुरुषसत्ताक विचारसरणीने उभी फूट पाडली आहे. स्त्रियांचे जातीजातींमध्ये कप्पेबंद विभाजन केले गेले आहे. म्हणूनच मनुवाद्यांच्या फैजेकडून समतावाद्यांवर हल्लाबोल करायला ममता, स्मृती, हेमा, सुषमा, वसुंधरा, सुमित्रा पुढे सरसावत आहेत. हेमामालिनीला बलात्कारामुळे देशाची प्रतिमा डागाळते याची अधिक काळजी आहे. स्त्रियांवर होणार्या संघटित हिंसाचार दुय्यम आणि देशाची तथाकथित प्रतिमा महत्वाची मानणे हाच मनुवाद आहे. त्यांचाच भाऊबंद असणारा गंगवार भारतासारख्या मोठ्या देशात बलात्कारच्या एकदोन घटना होत असतात, त्यात मोठी गोष्ट नाही असे उद्दामपणे म्हणण्याचे धाडस करतो.

देशात एक दोन नाही तर बलात्काराच्या घटनांची साखळी  दिसत आहे. गंगवार तर मोदींसारख्या परदेश वार्या करताना दिसत नाहीत. ते भारतातच असतात तरी त्यांना ह्या घटनांमधील गांभीर्य कळू नये. त्यांना ते कळत नाही कारण त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टकोनच मूळात उपयुक्ततावादी, जातीयवादी स्वरुपाचा आहे. आसाराम भक्तगण असल्यावर असे होणारच! आसाराम हा त्यांचा या बाबतीत आयडॅलॉग आहे. त्याने ब्रह्मज्ञानी माणसाने बलात्कार करणे पाप नाही असे म्हंटले होते. आसारामचा हा नवा मनुवादी ब्राह्मणी इंडियन पिनल कोड आहे. कारण भारतीय पिनल कोड नुसार बलात्कार करण्याची मुभा कोणालाच नाही. खरेतर या विधानावरच त्याला संविधान आणि कायद्याचा अवमान केला, स्त्रियांची अप्रतिष्ठा केली या कारणावरुन अटक व्हायला हवी. परंतु सरकार त्यांच्या विचाराचे मग उन्माद आणि उन्माद सर्वत्र संचारणारच. या आसारामला जेल मध्ये जरी डांबण्यात आले तरी त्याला कैद्याचे कपडे न देता आवडीचे कपडे परिधान करण्याची मुभा होती. त्याला शिक्षा सुनावली गेल्यानंतर प्रसारमाध्यमांनी अगदी चघळून चघळून त्यांचे कैद्याच्या वेशाकरीता शिंपी माप घ्यायला आला अशा बातम्या प्रसिध्द केल्या. त्याला जेवणाचा डबा आश्रमातून येत होता. एकंदर काय तर माणसामाणसात भेदभाव हे त्यांचे सूत्र आहे.

या घटना पहाताना, समजुन घेताना वि.दा. सावरकर यांच्या विचारांची, लेखनाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. सहा सोनेरी पाने लिहिताना त्यांनी छ. शिवरायांबद्दल आपली मते मांडली आहेत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवरायांनी  सन्मानाने परत पाठविले. यावर भाष्य करताना सावरकर लिहितात, ही शिवाजी महाराजांच्या ’’सदगुणांची विकृती’’ आहे. याचा अर्थ काय? तर शत्रूच्या घरातील स्त्रियांना सन्मान देण्याची आवश्यकता नाही. तसे करणे ही महाराजांची विकृती ठरविताना सावरकरांच्या मनात या स्त्रीबाबत महाराजांनी काय करावला हवे होते? आज कदाचित सांजी राम प्रवृत्ती ते युपीतील भाजपा कार्यकर्ते, मंत्री इ. तसेच करत आहेत. रास्वसंघ, हिंदु महासभेसारख्या संघटनांनी पेरलेल्या विकृत विचारांची परिणती आज उनाव व कठुवा सारख्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातही दलित महिलेवर भाजपा कार्यकर्त्याने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

या पक्षाचे प्रधानमंत्री बेटी बचावचा नारा देत असतात. या घटना पाहता बेटी बचाव… चा अर्थ नेमका काय घ्यायचा? तुमच्या मुली वाचवा – बेटी बचाव, ते यांच्या  पाठीराख्यांपासून असा तर त्याचा अर्थ नाही ना? दलित, अल्पसंख्यांक स्त्रियांवर, मुलींवर बलात्कार होत आहेत. त्यांच्याविरोधात धाडसाने कुटुंबिय तक्रार दाखल करत आहेत. परंतु जातीवर्गस्त्रीदास्य समर्थक पक्ष, संघटना आणि सरकार बघ्याची भुमिका घेत आहे. इतकेच नाही तर तक्रार दाखल करणार्या पित्याचाच खून करण्यात आला आहे. ब्र शब्दही आमच्याविरोधात काढलात तर गाव, देश किंवा प्राण त्यागावा लागले अशी गर्भित नव्हे उघड धमकी दिली जात आहे. धमकीच नाही तर तशी प्रत्यक्ष कृतीही केली जात आहे. देश दुभंगण्याच्या वाटेवर असायला अजून कोणत्या घटना बाकी आहेत? दलित मुलाने मिशा ठेवल्या, गावातून वरात काढली यासारख्या कारणांमधुन 21 व्या शतकात देहदंडाची शिक्षा उन्मादाने पछाडलेले जातीयवादी, पुरुषी लोक देत आहे. देशात कायदा-सुव्यवस्थाच धोक्यात आली आहे. संविधान मूळातच मान्य नसणारे लोक सत्ताधारीवर्गाचे भाग बनले आहेत. त्यामुळे व्यक्तिची प्रतिष्ठा, सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार संपुष्टात आणला जात आहे, अशा  जनविरोधी शक्तींना रोखायलाच हवे!

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

1 Comment

Write A Comment