fbpx
सामाजिक

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर…

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांत सोशल मीडियावर काही पोस्ट पाहिल्या. आपण ज्या समाजातून येतो त्या समाजातील महनीय व्यक्तींचे स्त्रीवादाबद्दलचे कार्य सांगून आपलाच नेता कसा महान वगैरे आहे, हे सांगण्याचे बालिश प्रकार देखील पाहिले. शिवाय याला बळी पडणारे चांगली हुशार आणि स्त्रीवादी नेणिवा जागृत असणारे मित्र आणि मैत्रिणी देखील पाहिल्या. खरतर स्त्रीवादाला कोणत्याही विभूतींच्या साच्यात अडकवणे, हा देखील एकप्रकारे स्त्रीवादाला संकुचित करायचाच प्रकार आहे. अमुक एका व्यक्तीला काउंट केल्याशिवाय स्त्रीवाद किंवा इतर कोणताही विचार पूर्ण होऊ शकत नाही किंवा तसा विचार करणे हे मूर्खपणाचे आहे असं म्हणनेच मुळात मूर्खपणाचे आहे. अर्थात अश्यावेळी वेळोवेळी त्या महनीय व्यक्तींनी स्त्रियांच्या बाबाबती केलेल्या कामाला कोणत्याच दृष्टीने नाकारता येणार नाही. पण म्हणून त्या व्यक्तींनी केलेल्या कार्यालाच अनुसरून स्त्रीवादाच गणित मांडलं जात असेल तर ते चुकीचे आहे.

बाबासाहेबांनी, फुले दाम्पत्यांनी मांडलेला स्त्रीविषयक दृष्टिकोन जसा महत्वाचा आहे तसाच मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर, किंवा मार्क्सने मांडलेला स्त्रीवादी विचार देखील महत्वाचाच आहे. मुळातच बाबासाहेबांनी काय किंवा इतर कोणी मोठ्या व्यक्तीने काय, भारतीय समाजव्यवस्थेत मांडलेले स्त्री विषयक विचार हे त्यांच्या उत्थानाचे असले तरी, सध्याच्या एकूणच परिप्रेक्षात, भारतीय समाजव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, सामाजिक उतरंडीवर आणि क्लिष्ट समाजरचनेवर अधिकच संकुचितपणे स्वीकारला जाण्याचा धोका अधिक आहे. कारण, आपल्याच जातीतील आणि आपल्याच धर्मातील एखाद्या महापुरुषाला “हाच फक्त एकमेव आयडल” म्हणून बघायची सवय इथल्या समाजच्या रोमारोमात भिनलेली आहे. अश्यावेळी बाबासाहेबांसारख्या महनीय व्यक्तीने स्वप्न पाहिलेली, ती सत्यात आणायचा प्रयत्न केलेली “जातीअंतासारखी” चळवळ ही नाममात्र ठरू शकते. भारतीय समाजव्यवस्था क्लिष्ट आहे, प्रचंड गुंतागुंतीची आहे. अश्यावेळी एखादा महापुरुष फक्त आपल्या जातीचा आहे म्हणून त्याच्या भूमिकेचं समर्थन करत बाकीच्या विभूतींना नकळत का होईना कमी लेखायचं, हा एकप्रकारे लादला जाणारा हेकेखोरपणाच आहे. जिथं दर चार कोसांवर भाषा बदलते, संस्कृती बदलते तिथंल्या व्यवस्थेतील गुंतागुंतीच्या समाजारचनेचा विचार करता हा विचार त्या विभूतींच्या कार्यालाच मारक ठरतो असे दिसते.

उदाहरण द्यायचे झाले तर भारतातील एकूणच साहित्य आणि त्यातील स्त्रीवाद, त्या वादावरील भूमिका याबद्दल पाहुयात. भारतातील स्त्रीवाद हा मूलतः साहित्याच्या क्षेत्रातून इथे आला आणि त्यातूनच त्याची पाळंमुळं देशात पसरली. थोडक्यात भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीवादाचा विचार हा साहित्यातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आणि या माध्यमातून देशात त्याची पेरणी होत असताना, त्यात योगदान देणारे हे सर्वच समाजातील, स्थरातील लोक होते.

मराठी साहित्य हे आधुनिक होत असताना भारतात समाजसुधारणांच्या चळवळींचे पर्वही आकाराला येत होते. नवी सामाजिक जाणीव, मानवतामूल्याची ओळख आणि शिक्षणाने दिलेली नवी दृष्टी या कारणांनी राजराम मोहन राॅय, गो.ग.आगरकर, महात्मा फुले, लोकहितवादी आदी समाजसुधारकांनी जुन्या वाईट प्रथापरंपरांवर हल्ले चढवले. महात्मा गांधी, वि.रा.शिंदे, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या समाजसुधारणेच्या चळवळींचा मराठी साहित्यावरवर परिणाम झाला. ठराविक परीक्षेत्रात बंदिस्त राहिलेली अभिव्यक्ती हळूहळू विस्तृत सामाजिक आशयाच्या अंगाने बहरू लागली.

स्वातंत्र्योत्तर काळातील सुशिक्षित ग्रामीण व दलित समाजातील पिढीने मराठी साहित्यात असणारी कोंडी फोडली आणि दलित व ग्रामीण साहित्यप्रवाह उदयास आले. त्याचवेळी जागतिक साहित्यविश्वाच्या प्रभावातून मार्क्सवादी व स्त्रीवादी वाङ्मयदृष्टीही मराठी साहित्याला प्राप्त झाली.

साहित्यामध्ये स्त्रीवादी विचारसरणीची जशी सुरवात झाली तशी, मराठीतील स्त्रीवादी लिखाणाची समीक्षा,मीमांसा  देखील होण्यास सुरवात झाली.राजाराम मोहन राॅय, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, महात्मा फुले आदी समाजसुधारकांचे स्त्रीसुधारणाविषयक खुले विचार सुरुवातीला स्त्रीसाहित्याची प्रेरणा होते. स्त्रीसाहित्याचे स्वातंत्र्यपूर्व काळातील हे स्वरुप अपवाद वगळता पारंपरिकच होते.इथेही आपणसा हेच दिसून येते की,सुरवातीच्या काळात देखील स्त्रीवादी विचार लोकांसमोर मांडण्यात सर्वच समाजातील समाजसुधारक आघाडीवर होते. किंबहुना या लोकांनीच ही चळवळ गांभीर्याने घेतल्याने ती पुढे झिरपत झिरपत समाजातील वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहचली.

मराठी स्त्रीवादी साहित्याच्या स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदींचे विचार कार्य, ताराबाई शिंदे, विभावरी शिरुरकर यांचे प्रकाशित निर्भीड व सडेतोड तसेच काळाच्या कक्षा ओलांडणारे लिखाण तसेच मार्क्सवादी, दलित व ग्रामीण साहित्यचळवळीतील विचार यांच्या प्रभावाचा वाटा लक्षणीयरीत्या दिसून येतो.

सोबतच भारतातील स्त्रीवादी विचारांच्या तत्वांच्या मूळाशी भारतीय समाजात स्त्रीला परंपरेने दिलेले दूय्यम स्थान कारण म्हणून आहे. जागतिक पातळीवरील स्त्रीमुक्तीच्या विचारांनी प्रभावित होऊन स्त्रीला तिचा आत्मसन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने भारतात स्त्रीवादी विचारांची मांडणी झाली. आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे इथल्या एकूणच स्त्रीवादावर देशाबाहेरील अनेक मोठ्या व्यक्तींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या का होईना पण मोठा प्रभाव आहे. म्हणजेच देशातील अनेक विभूतींबरोबरच देशाबाहेरील थोर लोकांनी देखील आपलं योगदान इथल्या स्त्रीवादी चळवळीला नक्कीच दिले आहे. असं असताना आपण मात्र  जातीय चष्म्यातून बघत, जातीतीलच नेत्याची महती गात, आमच्याच नेत्याने मांडलेला स्त्रीवाद हाच परिपूर्ण स्त्रीवाद आहे किंवा त्याच्याशिवाय तो अपूर्ण आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरत नाही. कारण स्त्रीवादी चळवळीला अनेक पदर आणि पैलू आहेत.त्यातील एखादा पैलू एखाद्या नेत्याच्या नजरेतून सुटला आहे पण त्याचवेळी तो दुसऱ्या एखाद्या विभूतींने लक्षात आणून दिला आहे. म्हणजेच आजची जी काही स्त्रीवादी चळवळ या देशात रुजली आहे तिला अनेक समाजातील, जातीतील, धर्मातील मोठी लोक जबाबदार आहेत.

थोडक्यात,

स्त्रीवाद विषयक साहित्याच्या एका उदाहरणातून भारततातील स्त्रीवाद हा समाजातील अनेक घटकातील,स्तरातील,स्थरातील विविध महान व्यक्तींच्या प्रयत्नातून आज आपल्या समोर जसा काही आहे तसा उभा आहे.त्याला उभा करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांची,महनीय व्यक्तींची मेहनत आणि प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत.अश्यावेळी स्त्रीवादाला एखाद्या महानायकाच्या  दावणीला बांधून ठेवणे हा म्हणूनच संकुचितपणा ठरतो. ही पण एक प्रकारची “पॅट्रीअारकी”च झाली. स्वतः ते महनीय लोक देखील अश्या गोष्टीला कोठेच थारा देणारे नाहीत किंवा नव्हते.

दुसरीकडे अजून एका गोष्टीकडे मला लक्ष वेधायचे आहे. ती गोष्ट म्हणजे आजच्या एकूणच परिस्थितीत स्त्रीवादा पुढील समस्या.

‘स्त्रीवाद’ म्हणजे कुटुंबव्यवस्थेला आव्हान देणारी पुरुषविरोधी चळवळ असा संकुचित अर्थ या चळवळीबद्दल प्रसृत झाला आणि ‘स्त्रीवादा’बद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले. सोबतच ‘स्त्रीवाद’ उकलून दाखवीत असलेली पुरुषसत्तेची व्यापकता आणि त्यातून निर्माण झालेला लिंगभाव स्त्रीला जगण्याच्या प्रत्येक पावलावर कसा अनुभवावा लागतो,ही देखील एक मोठी समस्या आहे. तसेच आज जो काही स्त्रीवाद इथे प्रतिपादित केला जातो,सांगितला जातो त्याने अजूनही शहराची वेस ओलांडलेली नाहीये. ग्रामीण भागात स्त्रीवाद म्हणजे काय..? हेच माहिती नाहीये. सोबतच सध्याच्या भांडवलवादी आणि धार्मिक धृवीकरणाचा घाट घालत असणारे सरकार, धार्मिकतेला केंद्र स्थानी ठेवून एकूणच देशाची धुरा हाकत आहे. याचा परिपाक म्हणून देशात कधी नव्हे ते इतक्या प्रमाणात इथल्या प्रत्येक समाजाच्या अस्मिता या अणुकूचीदार झाल्या आहेत. अश्या निराश करणाऱ्या परिस्थितीत एकूणच स्त्रीवादी विचारांची मांडणी कशी करायची..? हा मोठा प्रश्न देखील इथल्या स्त्रीवादी चळवळीपुढे आ वासून उभा आहे.

आणि म्हणूनच परिस्थिती अवघड असताना, आपल्याच नेत्याच्या किंवा आयडॉल्सच्या भूमिकेचं कौतुक करत आपण जर स्त्रीवादी विचारांना आपल्या नेत्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत असू तर, तुम्ही कितीही सर्वसामावेशकतेचा आव आणत असालात तरी आपल्या चष्म्याच्या काचा या धार्मिक रंगाने रंगलेल्या आहेत असेच म्हणावे लागेल.

एखादा “इझम” किंवा एखादी चळवळ ही कोणा एका नेत्यामुळे कधीच पूर्णत्वाकडे जात नाही. चळवळ ही एक निरंतर घडणारी प्रक्रिया आहे. जिच्यात कालानुरूप बदल होत असतात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने ५० वर्षांपूर्वी मांडलेला विचार हा आजच्या घडीला जसाच्या तसा लागू होईलच असे नाही. तर त्यात बदल होऊनच तो मांडला जातो आणि काळाच्या कसोटीवर आणि एकूणच परिस्थितीत तो स्वीकारला जातो. पण म्हणूनच एखाद्या नेत्याने तो मांडलेला विचार हा चुकीचा ठरतो असं नाही. तर तो त्या काळात स्वीकारहार्य असतो. ती सुरवात असते एखाद्या इझमच्या प्रवासाची. तो बेस असतो एखाद्या चळवळीच्या मांडणीचा. आणि म्हणूनच वर्तमानकाळात जगत असणाऱ्या व्यक्तींनी विचार करूनच ती विशिष्ट चळवळ आणखी कशी प्रगल्भ होईल याकडे लक्ष देत तिला सक्षम आणि सशक्त करणे गरजेचे ठरते. असे करत असताना कदाचित त्या मूळ विचार मांडणाऱ्या व्यक्तीचे विचार देखील पुढच्या पिढीला चुकीचे वाटू शकतात. अश्यावेळी भावनिक न होता प्रॅक्टिकली अश्या गोष्टीकडे पाहत योग्य तो निर्णय घेत मार्गक्रमण करणे अपेक्षित असते.

मुळातच स्त्रीवाद हा देखील स्वतः समानतेचा पुरस्कार करत.अश्या परिस्थितीत फक्त अमुक एकाने सांगितलेला स्त्रीवाद, तमुक एकाचा स्त्रीवाद अश्या चौकटीत स्त्रीवादाला बंदिस्त करण्यात काहीच पॉईंट नाहीये. पेक्षा… तो अधिक rational पद्धतीने स्वीकारला जावा हीच एकमेव अपेक्षा आहे..!!

लेखक पत्रकार व सामाजिक, राजकीय चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आहेत.

Write A Comment