fbpx
कला सामाजिक

बुल्ला की जाणां मैं कौन?

… ही बाबा बुल्ले शाहची रचना किंवा कलाम केवळ मुसलमानांना अल्लाचं नाव घेऊन होळी खेळण्याचं आवाहन करत नाही, तर कुराण शरीफच्या आयतचा आधार घेत जात-पंथ-धर्माची चौकट मोडून मानवता धर्म वाढवण्याची शिकवण देते. त्यामुळंच बाबा बुल्ले शाहच्या या रचनेचं महत्त्व अनन्य साधारण आहे. कदाचित म्हणूनच होळी सणाच्या दिवशी राईट ॲंगल्सनं आपल्या वेब पोर्टल आणि ट्विटर हॅंडलवरून सूफी संत हजरत बाबा बुल्ले शाहच्या या कलाम/रचना/संदेशाच्या माध्यमातून होळीची मुबारकबाद दिली, हे मानून जात-पंथ-धर्माच्या बेड्या झुगारून मानवतेचा संदेश देणाऱ्या या अवलियाच्या कलामांमधल्या तत्वज्ञानाचा उलगडा करणं सध्याच्या धार्मिक अभिनिवेशाच्या दांभिक वातावरणात गरजेचं वाटलं.

इस्लाम लिबरल वगैरे काही नाही, असं बिनअभ्यासी विधान केवळ अडनावाच्या जोरावर प्रसारमाध्यमांमध्ये टिकून राहिलेले काही महाभाग करतात तेव्हा त्यांची कीव करावी तितकी थोडी वाटते. इस्लाम म्हणजे, सलाफीजम, इस्लाम म्हणजे आयसीस, इस्लाम म्हणजे अल कायदा हे जागतिक पातळीवर साम्राज्यवादी प्रसार माध्यमांनी तर भारतातील ब्राह्मणी प्रसारमाध्यमांनी सामान्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. खरेतर याला छेद देणारं विपुल लिखाण पाश्चिमात्य विचारवंतांपैकी कॅरन आर्मस्ट्राँग, लेझ्ली हॅजलटन अशा विदुषींनी केलं, भारतात साने गुरुजींसारख्या महात्म्यानेही ते केलं. मात्र वाचनाचा `व’ माहित नसला तरी टिव्हीवर दिसतो म्हणजे अक्कल आहेच की, असा गैरसमज अनेकजण करून घेतात.

इस्लामचा होळीला विरोध आहे, असं हास्यास्पद विधान काहीजण करत असतात. आता इस्लाम ज्या अरब देशात जन्मला तिथे होळी हा सण होता का? की इस्लाम त्याला विरोध करील? इस्लामपूर्व अरबस्तानामध्ये बहुइश्वरवाद होता. त्या बहुइश्वरवादाच्या स्वतःच्या विविध रुढी व परंपरा होत्या. महंमद पैगंबरांना ते मक्क्याहून दमास्कसला करत असलेल्या व्यापारामुळे ज्यू व ख्रिस्ती धर्माची ओळख झाली होती. बहुइश्वरवादातील रुढी परंपरांमुळे उभ्या राहिलेल्या शोषणला छेद देतच या एकेश्वरवादी धर्मांचा पाया रचला गेल्याचे त्यांना वाटत होते. त्यातूनच पुढे त्यांच्यावर कुराण अवतरले आणि त्यांनी इस्लामचा पाया रचला, असे थोडक्यात आधुनिक धर्मशास्त्रांच्या मान्यताप्राप्त अभ्यासकांचे जे म्हणणे आहे, त्यावरून आपण म्हणू. अरब हे प्रचंड परंपराप्रिय होते. आपल्या पूर्वजांच्या रुढी सोडण्यास ते तयार नव्हते. महंमद यांनी बहुइश्वरत्व नाकारायला सांगितल्यावर तेथील अरबांनी ते विचार तात्काळ स्वीकारले नाहीत. महंमद यांना त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. तो बराचसा वैचारिक व अनेकदा सशस्त्रही होता. असो सांगण्याचा मुद्दा असा. इस्लामच्या पूर्वी असलेले बहुइश्वर पद्धत मानणारे आपले पूर्वज हे स्वर्गात गेलेले नाहीत, असे महंमद यांनी मक्क्यातील त्याच्या आप्त स्वकीयांना सांगितल्यावर तर कोण गहजब झाला होता. आता त्यामुळेच भारतातील हिंदू या बहुइश्वरवादी धर्माला इस्लामाचा विरोध असणारच, असा सोयिस्कर अर्थ जो संघाचे धुरीण काढतात, तसेच काही पत्रकारही काढतात हे उद्वेगजनक आहे. कारण महंमद यांच्या काळात इस्लाम भारतापर्यंत पोहोचू शकला नव्हता. व इस्लाममध्ये अनेक पंथ व विचार आचार पद्धती जगभरातील सांस्कृतिक मिलाफांमुळे येत गेल्या. इस्लामचा संपूर्ण इतिहास इथे उद्‌धृत करण्याचा इरादा नाही. मात्र भारतीय उपखंडात इस्लाम पसरला तो सुफी संतांच्या माध्यमातून. इस्लाममध्ये अनेक परंपरा पैगंबर ते आजवर निर्माण झाल्या आहेत. यातील सुफी ही एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. इस्लामी अध्यात्माची ही परंपरा इस्लाम, बौद्ध व हिंदू अशा तीन परंपरांचा संगम आहे. ज्याला गंगा जमनी तहजीब म्हणतो त्या तहजीबचा जन्म देणारी ही परंपरा आहे. एका इश्वराशी अल्लाहशी एकरुपण होण्यासाठीचे गूढ अध्यात्म व्यक्तिगत भक्तीतून शोधताना आपल्या गुरुने दाखविलेल्या ध्यानधारणेच्या रस्त्यांमध्ये विकास करण्याची मुभा असलेली संपूर्ण लोकशाहीवादी अशी ही परंपरा आहे. भारतीय उपखंडातील इस्लामची स्थापना ही मोगलांनी केलेली नाही. त्यापूर्वीच चिस्ती घराण्यातून ती इथे पसरली होती. हिंदु मुस्लिम एकतेचा संदेश देणारी ही परंपरा मुख्यत्वे माणसाने माणसावर प्रेम करावे, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यावा, त्यासाठी त्या एकमात्र इश्वराचा शोध आपल्या आंतर्मनात डोकावून घेत राहावा, असे सांगणारी ही परंपरा आहे. त्यातूनच तर कव्वाली व गझल या संगीत प्रकारांना जन्म मिळाला आहे. बुल्ले शहा हे त्याचेच एक प्रॉडक्ट आहे, इतकीही माहिती नसणारे स्वतःला समाजमाध्यमांवरच व्यक्त करतात असे नव्हे तर विविध महाविद्यालयांमधून व्याख्याने देतात व समाजवादी संघटनाही अशांना गोंजारतात हे फारच विनोदी आहे. तर असो आपण या सुफी परंपरेने भारतीय उपखंडात जन्माला घातलेला एक जागतिक पातळीवरचा कवी व विचारवंत बुल्ले शहाविषयी जाणून घेऊ.

बुल्ले शहा मला पहिल्यांदा भेटला होता बॉबीच्या बेशक मंदिर मस्जिद तोडो पर प्यारभरा दिल कभी न तोडो या गाण्याच्या मुखड्यातून. १९९२ साली बाबरी ज्या धर्मांधानी पाडली तेव्हा बुल्ले शहाच्या शब्दांची खरी ताकद मला कळली होती. बुल्ले शहा तेव्हापासून माझ्या मनात खोल घर करून बसला तो कायमचाच.

 

कोण होता बाबा बुल्ले शाह?

इस्लामचा प्रसार आणि प्रचार करणारा एक कडवा हजरत की वैचारिक बंड करून मुसलमानांना मानवतेची शिकवण देणारा द्रष्टा फकीर! नाही. माझ्या मते, बाबा बुल्ले शाह हा सामान्य माणसाच्या आकलनापेक्षा फार मोठा सूफी संत होता. तो हिंदू-मुस्लीम-शिख धर्मियांना जोडणारा ईश्वरी दुवा होता. गेल्या दोन शतकांहून अधिक काळापासून पंजाब-सिंध आणि दिल्लीच्या परिसरात हिंदू-मुस्लीम संस्कृती आणि परंपरा तसंच त्यातला कडवटपणा रूढ झालेल्या काळात म्हणजे आजपासून सव्वा दोनशे वर्षांपूर्वी बुल्ले शाहने सर्वसामान्य मुसलमानांना जात-पंथ-धर्माचा निरपेक्षवाद समजावून सांगितला. १७ व्या शतकाच्या सुरूवातीला पंजाब-सिंधच्या परिसरात वैरभाव विसरून सर्वधर्मसमभाव जपण्याची शिकवण लोकांना दिली. त्यासाठी सूफी कलामांचा आधार घेतला. आज जागतिक पातळीवर सूफी संगिताचं महत्त्व वाढवण्यात बाबा बुल्ले शाहच्या पारिपारिक कलामांचा आधार खूप वादातीत वाटतो. म्हणूनच जो बाबा बुल्ले शाह ना जाणां वो खाक सूफी गाया, असं म्हणण्याचा रिवाज आहे. हा लौकिक केवळ त्याच्या काफियाँ किंवा कलामांच्या शब्दरचनेमुळं नाही तर त्यातल्या धार्मिक कट्टरतावादावर टीका करणाऱ्या आशयसंपन्न विचारसूत्रामुळं प्राप्त झालाय.

मुळात बाबा बुल्ले शाह त्याच्याच अस्तित्वाशी लढत मोठा झाला. म्हणूनच तो स्वत:चं तत्वज्ञान विकसित करू शकला. लोकांना ते पटवून देऊ शकला. बुल्ले शहा सय्यद या वरच्या जातीचा आणि महंमद पैगंबरचा वंशज म्हणविणाऱ्या समाजातील होता. त्यावेळी सय्यद आणि अराइन या खालच्या जातीमधलं हाडवैर सर्वश्रुत असताना त्याने अराइन जातीच्या हजरत इनायत शाह कादरीचं शिष्यत्व पत्करलं. ईश्वराशी म्हणजे अल्लाहशी तादात्म्य साधण्याची ओढ बुल्ले शाहला हजरत इनायत शाहच्या दारी घेऊन गेली. खालच्या अराइन जातीच्या गुरूची दिक्षा घेतली म्हणून त्याचं अख्खं कुटुंब नाराज झालं. पण बुल्ले शाहला जातीभेदाच्या भिंती भेदून रब अर्थात अल्लाहला गाठायचं होतं. म्हणूनच एका कलाममध्ये तो म्हणतो, मला कोणी सय्यद उच्च जातीचा म्हणेल आणि माझ्या मुर्शिदचा म्हणजे गुरूचा अपमान करेल तर तो नरकात जाईल. आणि मला अराइनचा समजणारा स्वर्गात जागा मिळवेल. बुल्लेशाह जरी दरवेश हजरत असला तरी त्याचं तत्वज्ञान हे धार्मिक कट्टरतावादाच्या विरोधात आणि जातीय-सामाजिक सलोखा वाढवणारं आहे. तो इस्लामच्या पुढं जाऊन मानवतेचा पुरस्कार करणारा होता. हिंदू-मुस्लिम ऐक्यावर तर बुल्ले शाहने मार्मिक भाष्य केलंय. एका ठिकाणी तो म्हणतो,

दूई दूर करो कोई शोर नहीं

हिन्दू मुस्लिम कोई होर नहीं

सब साध है कोई चोर नहीं

हर घट में वाही समाया है।

यापेक्षा समर्पक शब्दांमध्ये हिंदू-मुस्लिम भाईचाऱ्याचं वर्णन ते काय असू शकतं. एवढंच नाही तर औरंगजेब बादशाहने नाच-गाण्यावर गैरइस्लामी म्हणत बंदी आणली तेव्हा बुल्ले शाहने गावागावांमध्ये जाऊन घरोघरी औरंगजेबाच्या हुकूमशाहीला ताकीद दिली. त्यावर कट्टर मुसलमानांनी बुल्ले शाहला काफीर म्हणून हिणवलं. तिथे बुल्ले शाह म्हणतो,

बुल्लेया आंशिक होयों रब्ब दा, मलमत पई लाख,

लेका काफर काफर आख दे, तूं आहो आहो लाख।

खरंतर, होळी हा पंजाब-सिंधचा सण नाही आणि मुसलमान होळी खेळत नाहीत. म्हणूनच बाबा बुल्ले शाहने मुसलमानांना अल्लाचं नाव घेऊन होळी खेळून हिंदूंबरोबरचा भाईचारा वाढवण्याचं आवाहन केलं. हेच म्हणणं तो त्याच्या होळीच्या काव्यात मांडतो.

तो म्हणतो,

होरी खेलूंगी कह कर बिस्मिल्लाह,

नाम नबी की रतन चढी, बूँद पडी इल्लल्लाह,

रंग-रंगीली उही खिलावे, जो सखी होवे फ़ना-फी-अल्लाह,

होरी खेलूंगी कह कर बिस्मिल्लाह।

 

अलस्तु बिरब्बिकुम पीतम बोले, सभ सखियाँ ने घूंघट खोले,

क़ालू बला ही यूँ कर बोले, ला-इलाहा-इल्लल्लाह,

होरी खेलूंगी कह कर बिस्मिल्लाह।

 

नह्नो-अकरब की बंसी बजायी, मन अरफ़ा नफ्सहू की कूक सुनायी,

फसुम-वजहिल्लाह की धूम मचाई, विच दरबार रसूल-अल्लाह,

होरी खेलूंगी कह कर बिस्मिल्लाह।

 

हाथ जोड़ कर पाऊँ पडूँगी आजिज़ होंकर बिनी करुँगी,

झगडा कर भर झोली लूंगी, नूर मोहम्मद सल्लल्लाह,

होरी खेलूंगी कह कर बिस्मिल्लाह।

 

फ़ज अज्कुरनी होरी बताऊँ , वाश्करुली पीया को रिझाऊं,

ऐसे पिया के मैं बल जाऊं, कैसा पिया सुब्हान-अल्लाह,

होरी खेलूंगी कह कर बिस्मिल्लाह।

 

सिबगतुल्लाह की भर पिचकारी, अल्लाहुस-समद पिया मुंह पर मारी,

नूर नबी सडा हक से जारी, नूर मोहम्मद सल्लल्लाह,

बुला शाह दी धूम मची है, ला-इलाहा-इल्लल्लाह,

होरी खेलूंगी कह कर बिस्मिल्लाह।

…यात बुल्ले शाह होळी खेळायला नकार देणाऱ्या मुसलमानांना अल्लाह आणि महंमद पैगंबराचे नाव घेऊन बिनधास्त होळी खेळण्याचं आवाहन करतोय. एवढंच नाही तर एकमेकांबरोबर सुख-दुःख वाटून रंगात रंगून जायला सांगतोय. त्यासाठी कुराण शरीफच्या आयतचा आधार घेऊन माणुसकी हाच धर्म असल्याचं सांगतोय. यापेक्षा अधिक काय ते होळी किंवा रंगपंचमीचं औचित्य असू शकेल.

बाबा बुल्ले शाहच्या काफियाँ किंवा कलामांनी सूफ़ी संगीत भारावून गेलंय. सूफी संगीत उदयास आलं ते ८ व्या शतकात. ते बहरलं पीर-फकीरांच्या दर्ग व मजारींच्या ठिकाणी ईश्वराशी तादात्म्य साधण्याच्या संगीत मार्गाने. कव्वाली (समूहगान), नाह (स्तुतीगान), हम्द (गुणगान), मरसिया (शोकगित) या मुख्य प्रकारांच्या माधमातून सूफी संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. पण सूफी संगीत आज लोकप्रिय झालं त्यात बाबा बुल्ले शाहच्या कलामांचा मोठा वाटा आहे. गेल्या दोन शतकांपासून बुल्ले शाहच्या कलामांनी पंजाबी-सिंधी लोकांच्या मनावर राज्य केलंय. आजही भारत व पाकिस्तानच्या नावाने पंजाब उभा चिरला गेला तरी सिमेच्या दोन्ही बाजूंना गावा खेड्यांतून संध्याकाळी सांझा चुल्हा लागला की हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बायका बुल्ले बाबाचीच गाणी गातात. त्याच्या साहित्यसंपदेतलं तत्वज्ञान नव्यानं मांडण्याचा प्रयत्न आज जागतिक पातळीवर होतोय. अगदी कोलंबिया विद्यापीठापासून ते केंब्रिजपर्यंत बुल्ले शहाच्या साहित्यावर पीएचड्या केल्या जात आहेत… बुल्ला की जाणां मैं कौन, बंदया हो, कतया करूँ, तेरे इश्क़ नचाया कर थैया थैया; अशा अनेक अजरामर सूफ़ी कलामांमुळं बाबा बुल्ले शाह सर्वदूर पोहोचला. शेवटी, बुल्ला की जाणां मैं कौण?, हे ओळखणं बाबा बुल्ले शाहला धर्माच्या चौकटीत बांधणाऱ्यांचं काम नाही!

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत, कैक मराठी वृत्तपत्रांत तसेच वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Write A Comment