fbpx
परराष्ट्र व्यवहार

मेरा वचन है भारत मां को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा !

तिबेटी बौद्ध धर्म गुरू दलाई लामा हे गेली ६० वर्षे भारतात आश्रयास आहेत. तिबेटवर चीनने आपला हक्क सांगितल्यापासून ते भारतात आश्रयास असून तिबेटला चीनपासून मुक्त करण्यासाठी ते जगभरात जनमत घडवत असतात. चीनच्या या दादागिरीला दलाई लामांना आपल्या देशात तब्बल साठ वर्षे आश्रय देऊन आपण उघड विरोध केला आहे. भारतात काँग्रेसपासून ते भाजपपर्यंत कुणाचीही सरकारे आली तरीही चीनच्या या भूमिकेच्या विरोधामध्ये कसलाही फरक पडलेला नाही. मात्र येत्या महिन्याच्या अखेरीस शांततेतेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या या तिबेटी धर्मगुरुंच्या कार्यक्रमांपासून दूर राहावे, अशी अधिकृत भूमिका भारत सरकार घेत आहे. तेही चीनसारख्या देशाच्या दडपणामुळे… दलाई लामा भारताच्या आश्रयास आल्याला साठ वर्षे होण्याच्या पार्श्वभूमीवर जर कोणतेही कार्यक्रम देशात होणार असतील तर त्यामध्ये सहभागी होऊ नये, असा सल्ला चक्क परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सरकारला दिला आहे. विजय गोखले यांनी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांना तसे पत्रच लिहिले आहे. त्यात विजय गोखले यांनी म्हटले आहे की, सध्या चीनबरोबरचे तणावसदृश्य नाते पाहाता कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे योग्य होणार नाही. विजय गोखले यांचे हे म्हणणे तात्काळ सिन्हा यांनी सर्व केंद्रीय अधिकाऱ्यांना पाठवून यावर यथायोग्य अंमलबाजवणी करण्याचेही निर्देश दिले आहेत.

१ एप्रिल रोजी थँक यू इंडिया नावाने तिबेटी धर्मगुरूंच्या मार्फत एक मोठा कार्यक्रम दिल्लीत होणार असून त्याला विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिवांना मिळाली होती. या कार्यक्रमाकरिता विविध सरकारी अधिकाऱ्यांना निमंत्रणे दिली जाण्याची शक्यता आहे. यात सरकारी उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाल्यास चीनचा रोष ओढवून घेतला जाण्याची शक्यता गोखले यांना वाटते आहे.

आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे चीनला आपण धडा शिकवणार होतो त्याचे काय झाले हा! म्हणजे डोकलाममधील तिढ्यानंतर तर भारतभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी चीनी मालाची होळी वगैरेही केली होती. तेव्हा प्रत्येक देशाभिमानी माणसाचा उर अभिमानाने भरून आला होता. त्यानंतर चीन बरोबर असलेले सगळे संबंध संपुष्टात आणले जातील आणि भारतासारखी भली मोठी बाजारपेठ चीनच्या हातातून गेल्यामुळे चीन जेरीस येईल, असे प्रत्येक देशाभिमानी माणसास वाटले होते. प्रत्यक्षात मात्र तसे काही झाले नाही. एकीकडे चीनला धडा शिकवण्याच्या नावाखाली काही तरी फुटकळ मालाची होळी करत असताना दुसरीकडे मात्र मेट्रोसारख्या हजारो कोटींच्या प्रकल्पांमध्ये चीनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे भाजपचीच सरकारे मान्य करत होती. मात्र सत्ता चालविणे आणि आंदोलने करणे या दोन वेगळ्या गोष्टी असतात. सामान्य माणसांच्या मनामध्ये जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या भावना जागृत करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलने ही खरेतर राष्ट्रासाठी महत्त्वाचीच ठरतात, असे आपण मान्य करुयात. मात्र आता दलाई लामांना गेली साठ वर्षे जो आपण आश्रय दिला आहे, त्या बदल्यात ते आपल्याला थँक यू म्हणण्यासाठी काही कार्यक्रम घेत असतील, आपण केलेल्या उपकाराप्रती जाहिर आभार प्रदर्शित करत असतील, तर त्या चीन्यांच्या मस्तीला, त्यांच्या दादागिरीला घाबरून आपण त्या आभार प्रदर्शानत उपस्थितही राहायचे नाही?

परमआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी २०१४च्या निवडणुकीपूर्वी जी काही आश्वासने देशातील जनतेला दिली होती. त्यातील काही चुनावी जुमले होते, हेही आपण मान्य करुयात. मात्र त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी तर काही जुमला होता वगैरे असे म्हणता येणार नाही. भारत हे एक बलशाली राष्ट्र म्हणून उभे करू व आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणीही यावे व आपल्याला टपली मारुन जावे, अशी जी काही मवाळ राष्ट्राची किंवा सॉफ्ट स्टेटची प्रतिमा बनली आहे, ती पार बदलून टाकू, हे त्यांनी वारंवार सांगितले होते. ही ते सांगत असलेली गोष्ट सर्वसामान्य मतदारांना पटावी यासाठीच तर त्यांनी त्यांच्या छातीचे मापही भरसभेत जाहिर केले होते, जे छप्पन इंच म्हणून पुढे साऱ्या विश्वात विख्यात झाले. तर ही छप्पन इंच छाती, आपल्या मातृभूकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्या चीन-पाकिस्तानसारख्या हीतशत्रूंच्या विरोधात कोट करण्याकरिता आणि सवासो करोड भारतीयांच्या सद रक्षणाय खल निग्रहणायासाठीच होती ना?

मग आता दलाई लामांचे आभार तेही दिल्ली या भारताच्या राजधानीत घेताना आपण चीनला घाबरायचे ते का?

भारताच्या अंगणात असलेला एक मालदीव नावाचा चिमुकला सुन्नी मुस्लिम देश आहे. देश कसला तो छोटेसे बेटच म्हणा हवे तर. मात्र समुद्री व्यापार व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला. वर्षा नु वर्षे भारताच्या वर्चस्वाखाली असणारा. सध्या तर तोही आपल्याला डोळे दाखवू लागलाय. कारण चीनने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आहे व लड बापू म्हणत ते मालदीवकडूनही आपल्याला हूल द्यायचा प्रयत्न करत आहे. भारताने मालदीवच्या आंतर्गत प्रश्नात काही हस्तक्षेप केलाच तर त्यात आम्हालाही सक्रीय व्हावे लागेल, अशा सभ्य शब्दांमध्ये चीनने जाहिरच करून टाकले आहे.

इतकेच कशाला अगदी दोन तीन आठवड्यांपूर्वीच भारताच्या पूर्व समुद्री इलाख्यात चीनी नौदलाच्या लढाऊ नौकाच चीनने तैनात करून ठेवल्या होत्या. चीनी नौदलाच्या ब्ल्यू २०१८ए या नौदल जथ्थ्याचे प्रशिक्षण आपल्या सागरी सिमारेषेच्या आत केले गेले.

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मिच्या नौदलातील दोन ०५२डी पद्धतीच्या विनाशक बोटी, ०५४ए पद्धतीच्या फ्रिगेट म्हणजे युद्ध नौका आणि ०७१ पद्धतीच्या डॉक लँडिंग शिप म्हणजे ज्यातून किनारपट्टीवर सैनिक उतरवल जाऊ शकतात असा हा जथ्था होता. या सगळ्या प्रकारावर एका संरक्षण विषयावर माहिती देणाऱ्या ऑस्ट्रेलियन वेबसाईटने म्हटले की, भारताच्या समुद्री हद्दीत चीनी नौकांचे अशा प्रकारे उघड संचलन हे तेथील सत्ता समीकरणे बदलत असल्याचेच द्योतक आहे. मालदीवसारख्या छोट्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी आम्ही तैनात आहोत, असा हा इशाराच होता. आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर परमआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ज्या अपेक्षेपोटी त्यांना मतदारांनी मते दिली होती, त्या मतदारांना काय वाटत असेल बरे? भारत की तरफ कोई आँख उठा के देख नही सकेगा, असे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोदीजींनी सांगितले होते. ती मुलाखत अजूनही सामाज माध्यमांवर जोरदारपणे फिरत असते. ते पाहताना किती आश्वास्त वाटते. एका अशा माणसाच्या हाती आपली प्राणांहूनही प्रिय मातृभू आपण सोपवली आहे की, जिच्याकडे भली भली विकसित राष्ट्रेही वाकड्या डोळ्याने पाहू शकत नाही. प्रत्यक्षात मात्र मालदीवसारखी छटाकभर सुन्नी राष्ट्रे चीनच्या जीवावर आपल्या वेशीवर येऊन आपल्याला थेट आवाज देत आहेत. यावर आपल्या नौदल प्रमुखांनी चीनच्या या कारवायांकडे आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहोत आणि भारतीय नौदल कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यास समर्थ असल्याचे म्हटले आहे. हेतर पूर्वीच्या सरकारसारखेच झाले. पं. नेहरुंच्या बोटचेपेपणामुळेच आपल्याला चीन बरोबरच्या युद्धात नामुष्की पत्करावी लागली होती, हे मोदीजी आणि त्यांच्या आजुबाजुच्या बुद्धिवंतांनी तेव्हा सांगितले होते. त्यामुळेच तर त्यांच्या या जाज्ज्वल्य कठोर राष्ट्रभक्तीला भाळून मते देण्यात आली होती. आता नौदल प्रमुख म्हणत आहेत की, आम्ही चीनी नौदलाच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहोत. पण चीनी नौदल थेट भारतीय समुद्र हद्दीत आपल्या विनाशिका आणि युद्ध नौका पाठवते आहे. तेही छटाकभर मालदीवसारख्या देशाला आश्वस्त करण्यासाठी. आपण मात्र लक्ष ठेवून आहोत. म्हणजे शेजाऱ्याने उघडपणे आपला दरवाजा तोडून त्याच्याकडची अडगळ आपल्या व्हरांड्यात ठेवावी व आपण आपल्याच घऱात बायकोसमोर माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्याकडे, असं गंजीफ्रॉकला पडलेली भोकं लपवत बेटकुळ्या काढत सांगावे, तसे झाले. दुसरीकडे दलाई लामा ज्यांना आपण गेली साठ वर्षे अत्याचारी चीनच्या दादागीरीच्या विरोधात उघड आश्रय दिला आहे. त्याकरिता आपल्या देशाला आपल्या देशवासीयांना थँक यू म्हणू इच्छितात, आपले आभार मानू इच्छितात तर आपले परराष्ट्र सचिव केंद्रीय मुख्य सचिवांना सल्ला देतात की, या व अशा प्रकारे इतरही देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता असून त्याला कुणीही सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये… हे नक्की देशात काय सुरू आहे? मोदीजी या सगळ्यावर गप्प आहेत. कदाचित ते लवकरच चीनला धडा शिकवण्याची रणनिती वगैरे मनातल्या मनात आखत असतील. त्यामुळे लवकरच चीनी च्यांव च्यांवांच्या छाताडावर आपले विराट विश्वरूपदर्शन ते दाखवतील, अशी आशा आपण तरी नक्कीच करायला हवी. काहीही होवो, मात्र चीनसारखे शेजारी राष्ट्र जे वारंवार आपल्या कुरापती काढते आहे, व ज्याला भूतकाळात नेहरुंसारख्या लोकांमुळे धडा शिकवण्याची संधी हुकलेली आहे, त्या चीनला एक जबरदस्त धडा शिकवण्याची वेळ नक्कीच आली आहे. ही वेळ बिलकूलच दवडता कामा नये. आमच्या समुद्र हद्दीत येऊन लष्करी सामर्थ्य दाखविणाऱ्या चीनला पाच हजार वर्षांपूर्वीच हे सगळे समुद्र एकट्या अगस्ती ऋषींनी पिऊन टाकले होते. विंध्य पर्वत झुकवला होता. न्यूटनच्या गतीच्या नियमांपासून ते फॅरेडेच्या विजेपर्यंत विविध अविष्कार करणाऱ्या महाप्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी ही भूमी व तसाच महानायक आता देशाला लाभलेला आहे, हे दाखवून द्यायलाच हवे. त्यामुळे चीनच्या या दादागिरीला मोडून काढत त्यांना कायमचा धडा शिकविण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल यात वादच नाही. परमआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चीनला हा धडा कधी शिकवणार त्याकडे आता आपण डोळे लावून बसुयात!

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

1 Comment

  1. वानखेडे Reply

    माफ करा माहिति चांगली आहे पण पञकारांनी भक्तिगत पञकारीते पासुन लांब राहावे व कोणाच्याही बाजुने बोलु नये…आणि भाबड्या इतिहासाचे दहन करावे व आधुनिकते विषयी जागरुकता पसरावी
    धन्यवाद
    #परमआदरणीय

Write A Comment