विशेष

शिकारी खुद यहाँ, शिकार हो गया !!!

गुजरात दंगलीचा चेहरा म्हणून कुतुबुद्दीन अन्सारी यांचा फोटो जगभरात गेला. समोर अत्यंत हिंसक असलेल्या जमावासमोर डोळयात जिवाच्या भितीने दाटलेले अश्रू सावरत हात जोडून दयेची भिक मागणाऱ्या अन्सारी यांना कॅमेऱ्यात टिपलं होतं रॉयटर्सचे फोटोग्राफर ऑर्को दत्ता यांनी. आज या फोटोची आठवण झाली ती म्हणजे गुजरात दंगलीतील हिंसाचाराचं उघड समर्थन करणारे, अत्यंत जहाल हिंदुत्ववादी, भारत हा केवळ हिंदुचाच आहे व याला विरोध करणाऱ्यांना या देशात राहण्याचा कसलाही अधिकार नाही, हे ठासून सांगणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांची पत्रकार परिषद पाहून. या पत्रकार परिषदेलवा संबोधित करताना त्यांच्या डोळ्यातून घळघळ ओघळणारे अश्रू, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने एन्काऊंटर करण्याचा कट केला होता, हे सांगताना त्यांचे थरथरणारे ओठ, आपण आयुष्यात सगळं सोडून हिंदुंच्या उत्थानासाठी काम करत आहोत, आपल्या घरात दोन जोडी कपडे आणि पुस्तकांशिवाय काहीही मिळणार नाही, असं म्हणताना त्यांनी तमाम वृत्तवाहिन्यांसमोर जोडलेले हात, हे सगळे पाहिल्यावर अन्सारींशिवाय इतर कुणाचीच प्रतिमा डोळ्यासमोर येणे शक्यच नव्हते. जिवाची भिती अन्सारी काय आणि तोगडियाजी काय सगळ्यांनाच सारखीच म्हणा! असो.
पण तोगडियाजींना त्यांना ठार मारले जाण्याची भिती आहे, हे काय नवीन नाही. त्यांनी या पूर्वीसुद्धा असे अनेकदा सांगितलेले आहे. येवढा ज्वाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे, त्यासाठी संपूर्ण जीवन त्याच्या प्रचारात घालवणाऱ्या तोगडियाजींना मुस्लिम अतिरेक्यांकडून, ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून किंवा देशातील दलित-आदिवासींना कायम ज्या नक्षली हिंसक कारवायांसाठी ब्रँडिंग केले जाते, त्या नक्षलवाद्यांकडून जीवाचा धोका, असला तर ते समजण्यासारखे आहे. कारण तसे त्यांनी स्वतःही कायम सांगितलेले आहे. मात्र सध्या तर देशात चक्क भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. देशात म्हणजे खऱ्या अर्थाने हिंदुस्तानातील काही नतद्रष्ट दोन-तीन राज्ये सोडली तर बाकी संपूर्ण हिंदुस्तान कसा भगवा झालेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना पुज्य डॉक्टरसाहेबांनी केली व पुढे त्यावर पुज्य गुरुजींनी आपल्या विचारधनाद्वारे जो सोन्याचा कळस चढवला तो हेच दिवस पाहण्यासाठी तर होता. आता हे हिदु संघटनांना आलेले अच्छे दिन काही नतद्रष्ट पुरोगाम्यांना पाहवत नाहीत. ते आपले काहीतरी सोशल मिडियावरून किंवा इकडे तिकडे पाच पन्नास माणसांच्या बैठका घेऊन काहीबाही बोलत असतात. मात्र बाकी तर देशात सगळीकडे आबादी आबादच आहे. काँग्रेसला काही पप्पूजींच्या नावाखाली फारसे चांगले दिवस येण्याची शक्यता हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनाच काय दस्तुरखुद्द काँग्रेसच्याच कार्यकर्ता व नेत्यांना वाटत नाहीये. देशातील साधे पानही पंतप्रधान मोदींच्या मनात आल्याशिवाय व रा.रा. अमितभाई शहा यांच्या इशाऱ्याशिवाय हलण्याचा प्रयत्नही करत नाही, सगळीकडे कसे जणू दर दिवशी दसरा दिवाळीसारखे वातावरण आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायमूर्तींनीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या सरकारवर केलेला हल्ला, या सगळ्या दसरा दिवाळीप्रमाणे असलेले वातावरण बिघडवण्याचा केलेला प्रयत्नही फुसकाच ठरण्याच्या बेतात आहे. असे असताना चक्क ज्वाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या तोगडियाजींना जिवे मारण्याचा प्रयत्न होतो आणि तो सुद्धा जैश ए मोहम्मद, किंवा लष्कर ए तय्यबा, किंवा आयसीस किंवा गेला बाजार सिमी वगैरे सारख्या संघटनेकडून नाही, तर चक्क केंद्रीय आयबीकडून हा होतो, असा थेट आरोप तोगडियाजीच प्रसारमाध्यमांसमोर करतात हे फारच भयंकर आहे. हिंदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांपासून ते फेसबूक, ट्वीटरवर निवृत्तीनंतर अथवा बेकारीच्या निमित्ताने ट्रोलर म्हणून झटणाऱ्या सगळ्यांच्याच परिश्रमांवर पाणी फेरणारे आहे. या देशातील पोलीस यंत्रणा, लष्कर, गुप्तचर यंत्रणा या कधीही राष्ट्रवादी माणसांच्या नादालाही लागत नाहीत. त्यांनी आजवर ज्यांचे ज्यांचे मुडदे पाडले आहेत, ते सगळे देशद्रोही होते, असाच तोगडियाजींसह अनेक ज्वाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांचे म्हणणे होते, कदाचित आजही तसेच असेल पण आता तोगडियाजींच्या या विधानामुळे तो समज एका किंतूसहच मान्य करावा लागेल.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणा किंवा इंटेलिजंस ब्युरो ही काही ऐरीगैरी संघटना नाही. ती येते थेट देशाच्या पंतप्रधानांच्या अखत्यारित. असे असताना तोगडियाजींनी त्यांना मारण्याचा कट या संस्थेने केल्याचा आरोप करावा म्हणजे त्यांना नक्की काय म्हणयाचे आहे?
तोगडियाजी सोमवारी बेपत्ता झाले. ते कुठेच सापडेनात. अचानक ते बेशुद्ध अवस्थेत अहमदाबादमधील एका पार्कमध्ये सापडले. खरेतर त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा म्हणजे किमान त्यांच्यासोबत दहा बारा पोलीस चोवीस तास असायला हवेत. असे असताना तोगडियाजी बेपत्ता होतात म्हणजे एखाद्या हॉलीवूड थ्रीलर सिनेमात शोभावी अशीच ही घटना आहे.
तोगडिया यांना अटक करण्यासाठी राजस्थान पोलीस गुजरातमध्ये आले होते. आता राजस्थानातदेखील भाजपाचेच राज्य आहे. तरीही राजस्थान पोलिसांनी असा अगोचरपणा का बरे करावा, हे ज्वाज्वल्य हिंदुत्वासाठी सर्वस्व त्यागायला तयार देशभरातील हजारो कार्यकर्त्यांच्या समजेच्या पलिकडले आहे. मात्र त्या पोलिसांना तोगडियाजी सापडलेच नाहीत. आता राजस्थान पोलिसांच्या अटक वॉरंटला घाबरून तोगडियाजी पळाले किंवा लपून बसले असावेत काय, जे तोगडियाजी काँग्रेसच्या राज्यातही इतक्या प्रचंड यंत्रणेला घाबरले नाहीत व बिनधास्त देशभरात ज्वाज्वल्य हिंदुत्वाचा बेधडक प्रचार करत फिरत होते, ते त्यांच्याच विचारांच्या राजस्थान सरकारच्या पोलिसांना घाबरले असतील?
बरे त्यानंतर ते अहमदाबाद विमानतळाच्या शेजारी सापडावेत, तेही बेशुद्धावस्थेत? हे मोठेच गौडबंगाल आहे. मुख्य म्हणजे आज ते अचानक ते मिडियासमोर प्रकट झाले आणि त्यांनी जे सांगितले त्याने तर ज्वाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांच्या छातीत धस्सच व्हावे, अशीच परिस्थिती आहे. ते म्हणाले की आपण हिंदुंच्या कल्याणाचे जे व्रत घेतले आहे, त्यामुळेच त्यांना मारण्याचा कट रचला जातो आहे. अर्थात हा कट रचते आहे ती केंद्रीय गुप्तचर यंत्रणा. म्हणजे हिंदुत्वाच्या कल्याणासाठी निघालेल्या तोगडियाजींना मारण्याचा कट पंतप्रधान मोदीजींच्या अखत्यारित येणारी गुप्तचर यंत्रणा रचते आहे, हे भयंकर आहे. त्यामुळे या देशातील हिंदुत्वाच्या कल्याणाचा वसा नक्की कुणाच्या खांद्यावर आहे आणि कोण मनातून हिंदुत्वाच्या आड येतो आहे व आसेतु हिमाचल हिंदुराष्ट्र करण्याच्या ध्येयामध्ये आडकाठी घालतो आहे, हा संभ्रम यामुळे निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इतर सुडो सेक्युलर पक्षांना २०१४च्या निवडणुकीत चारी मुंड्या चीत करून या देशात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्वबळावर राज्य आणले. परमपुज्य डॉक्टरसाहेब, परमपुज्य श्रीगुरुजी, परमपुज्य देवरसजी यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी हा दिवस यावा यासाठी हाडाची काडं केली. कित्येकांनी आपले अख्खे आयुष्य कुठेतरी ईशान्येच्या राज्यांमध्ये, कुठेतरी दक्षिणेत काढले. घरदार कशाची तमा बाळगली नाही. आयुष्यात काही मिळवले नाही. ते दाणे मातीत मिसळले म्हणून या सत्तेचे डौलदार पीक आज उभे राहिले. अशा वेळी नेमका हा आघात सहन होण्या पलिकडचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना वाटणे साहजिक आहे. थेट तोगडियाजींच्या खुनाचा प्रयत्न आणि तोही मोदीजींच्या अखत्यारित येणाऱ्या संस्थेकडून?
या सगळ्यामुळे शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकातील उक्तीप्रमाणे समथिंग इज रॉटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्कसारखी प्रत्येक ज्वाज्वल्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्याची अवस्था झाली आहे. आज तोगडियाजींच्या या पत्रकार परिषदेला वृत्तवाहिन्यांनीही म्हणावी तशी प्रसिद्धी दिली नाही. उलट बहुतांश मोठ्या वृत्त वाहिन्यांनी ही बातमी दाबण्याचाच प्रयत्न केल्याचेच दिसले. संपूर्ण मिडिया मोदीजींच्या प्रेमात आकंठ बुडालेला असताना तोगडियाजींसारख्या इतक्या मोठ्या नेत्याच्या खुनाच्या झालेल्या प्रयत्नांना दाबतो? वर एका इंग्रजी मोठ्या वृत्तवाहिनीनेतर तोगडिया यांना काँग्रेसचे काही नेते भेटले, राहूल गांधी यांचे खास समर्थक यांनी तोगडियाजींची भेट घेतली, अशा बातम्याही दाखवल्या. म्हणजे तोगडियाजी काय आता काँग्रेसचा प्रचार करणार आहेत काय? संपूर्ण आयुष्य़ या देशाला हिंदुराष्ट्र घडविण्यासाठी वेचणाऱ्या एका कार्य़कर्त्याची राजकीय अखेर अशी व्हावी? त्याच्या खुनाचा प्रयत्न त्या विचारांनी प्रेरित असंख्य कार्यकर्त्यांच्या त्यागातून आलेल्या आपल्याच जवळच्या पक्षाच्या सरकारातील संस्थेने करावा. तो झाल्यानंतर त्यांच्या सांत्वनासाठी सेक्युलॅरिजमच्या नावाखाली देशाची पुरती वाट लावणाऱ्या पप्पू नामक एका घराण्याच्या वारसाने पुढाकार घ्यावा?
अशा असंख्य प्रश्नांनी देशभरातीलच नव्हे (कारण तोगडिया हे विश्व हिंदु परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत) जगभरातील त्यांच्या अनेक चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. त्यामुळे या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा असेल, तर तात्काळ राजस्थान सरकार, गुजरात सरकार व केंद्र सरकार यांनी एक उच्च स्तरीय चौकशी समिनी नेमून या सगळ्या मागे नक्की काय गौडबंगाल आहे, त्याचा खुलासा करणे गरजेचे आहे. तो केवळ संघटनेत खुसफूशीद्वारे नेहमीप्रमाणे पसरवून चालणार नाही, कारण आता संघटनेबाहेरही खूप समर्थक वाढले आहेत. प्रत्येकाच्या मनाचे समाधान व्हावे यासाठी या चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल, ते जगासमोर आणावे. यात दोषी कोणीही असो, ज्वाज्वल्य हिंदुत्वाच्या रक्षणासाठी दोषी व्यक्तीस कठोर शासन करावे, हीच सगळ्यांची इच्छा आहे.

 

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

Write A Comment