fbpx
राजकारण

गुजरात डायरीज – भाग १

पंतप्रधान मोदींचे राजकीय भवितव्य पणाला लावणारी निवडणूक

९ व १४ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या गुजरात निवडणुकीकडे साऱ्या देशाचे डोळे लागले आहेत. १८ डिसेंबरला या निवडणुकीचे निकाल घोषित होतील. हा निर्णायक दिवस असणार आहे. पंतप्रधान मोदींचे राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. याच गुजरात राज्याच्या प्रगतीचा हवाला देत मोदींनी विकासाचे गुजरात मॉडेल देशासमोर ठेवले होते. भारत काँग्रेसमुक्त करून माझ्या हातात केंद्रीय सत्ता दिलीत तर हेच विकासाचे गुजरात प्रारूप आम्ही देशभर राबवू अशी ग्वाहीही मोदींनी दिली होती. २०११ साली व्हायब्रंट गुजरात समारंभात देशातील १२ बड्या उद्योगपतींनी मोदी हेच प्रधानमंत्रीपदाचे सर्वात लायक उमेदवार असल्याची हमी दिली होती. २००२ पासून सतत १२ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले मोदी हे देशाचे भाग्यविधाता विकास पुरुष असल्याच्या प्रचारावर पूर्ण विश्वास ठेवून जनतेनेही त्याना स्पष्ट बहुमत देऊन केंद्रीय सत्ता त्यांच्या हाती सोपविली होती.

आता डिसेंबरच्या निवडणुकीत गुजरातची जनता मोदींच्या विकास मॉडेलवर कितपत खुश अथवा नाखूष आहे हे देशाला समजेलच. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या सर्व २६ जागांवर भाजपा विजयी झाला होता. देशाचे प्रधानमंत्रीपद भूषविणारे मोरारजीं नंतरचे मोदी हे दुसरे गुजराती व्यक्ती आहेत आणि गुजराती जनतेस अर्थातच त्याचा अभिमान आहे.

परंतु मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातेत ४ मोठी जनआंदोलने उभी राहिली. आंदोलने उभी राहण्यासाठी तशी परिस्थिती तयार व्हावी लागते.असंतोष असल्याशिवाय जनआंदोलने उभी रहात नाहीत. ज्या राज्याच्या विकास मॉडेलचा ढोल पिटत मोदीजी पंतप्रधानपदापर्यंत पोचले, त्याच राज्यात असा सर्वदूर असंतोष पसरला असेल, तर त्या विकास मॉडेलवरच प्रश्नचिन्हे उभी राहतात.
औद्योगिकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या विरोधात किसानांनी आंदोलन छेडले. वाढती बेरोजगारी व महागडे उच्चशिक्षण याचे चटके सोसणाऱ्या पाटीदार युवकांनी आपणास इतर मागास जातींप्रमाणे शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन केले. राज्यभरात सवर्णांच्या हिंसक अत्याचाराविरोधात दलितांनी आंदोलन केले. तर राज्यात नशाबंदी असूनही तरुणाईस विळखा घालणाऱ्या अमली पदार्थांच्या सर्रास चाललेलया व्यापाराविरोधात दलित व आदिवासींचे अजून एक आंदोलन उभे राहिले.

ही चारही आंदोलने जनतेच्या आक्रोशातून उभी राहिली आहेत. ही काही भाजपच्या राजकीय विरोधकांनी रचलेली आंदोलने नव्हेत. या आंदोलनांनी गुजरातच्या राजकीय क्षितिजावर चार युवा नेत्यांचा उदय झाला. शेतीयोग्य जमीन, उद्योगांसाठी शेतकऱ्याकडून हिसकावून घेण्याच्या विरोधात उभ्या राहिलेल्या गुजराती खेडूत आंदोलकांचा नेता जयेश पटेल, पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल, सौराष्ट्रातील उना येथे गोहत्येच्या संशयावरून पाच दलित युवकांना नग्न करून सवर्णांनी मारहाण केली, त्या घटनेने उसळलेल्या दलित आक्रोशाचा उद्रेक राष्ट्रीय स्तरावर पोचविणारा नेता जिग्नेश मेवानी व नशाबंदीच्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी म्हणून ओ बी सी , दलित, आदिवासी एकता मंचने उभारलेल्या लढ्याचा नेता अल्पेश ठाकोर. मुळात ही आंदोलने भाजप किंवा मोदी विरोधात नव्हती, परंतु राज्यातील भाजप सरकारने ही आंदोलने निर्ममतेने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे चार नेते व त्यांचे समर्थक भाजपाच्या विरोधात गेले. त्यातच गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला मोदीजींनी नोटबंदी घोषित करून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा तडकाफडकी चलनातून बाद करून टाकल्या. त्याचा जाच सर्वांनाच झाला, पण खरा जीवघेणा फटका बसला तो कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी बँका, त्यांचे खातेदार व असंघटित क्षेत्रातील मजूर वर्गाला. दूध, फळे, भाज्या अशा नाशवंत मालाची विक्री ठप्प झाली तर नुकसान शेतकऱ्यास सोसावे लागते. मुख्य मंडयांसमोर भाजीपाले, फळांच्या गाड्या लोटून देऊन, दुधाचे टँकर्स ओतून देऊन शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
नोटबंदीचा घाव भरतो न भरतो तोवर मोदीजींनी जी एस टी लागू करून टाकला. वीस लाखांहून अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवर जी एस टी लागू झाला. त्यात अत्यंत क्लिष्ट कर रचना, रोज बदलणारे नियम, व तो टॅक्स ऑनलाईन भरण्यासाठी करावी लागणारी यातायात यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त होऊन गेला. गुजरातेतील बहुतेक शहरातून व्यापाऱ्यांनी जी एस टी च्या विरोधात प्रचंड मोर्चे काढले. यावर्षी गुजरातेत दिवाळी फारच अनुत्साहात साजरी झाली. रोषणाई, आतषबाजी सारेच थंड होते.
खरंतर मोदींनी गुजरात सोडून दिल्लीत प्रयाण केल्यानंतर भाजपाची गुजरातेतील लोकप्रियता ओहोटीस लागली होती. २०१५ साली झालेल्या जिल्हा, तालुका पंचायत, पालिका व महानगर पालिकेच्या निवडणूक निकालांकडे एक नजर टाकली तर गुजराती जनमानसाचा अंदाज येतो. २०१४ मध्ये सर्व २६ लोकसभा सीट्स हसत हसत जिंकणाऱ्या भाजपास २०१५ मध्ये फक्त सहा महानगरपालिका आपल्याकडे राखता आल्या. ३१ पैकी २४ जिल्हा पंचायतींमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. एका वर्षात भाजपाची परिस्थिती एवढ्या झपाट्याने खालावेल असं कोणास स्वप्नातही वाटलं नव्हतं.

२०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला १८२ पैकी ११७ जागांवर विजय मिळाला होता तर काँग्रेस ६१ जागांवर निवडून आली होती. डिसेंबर २०१७ च्या विधानसभेसाठी, पक्षाध्यक्ष अमित शहांनी कार्यकर्त्यांसमोर १५० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. आता या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपास २०१२ सालची नरेंद्र मोदींची हिंदू हृदय सम्राट व विकास पुरुषची प्रतिमा पुंन:प्रक्षेपीत करावी लागेल. कारण राज्यात गेल्या २ वर्षांत झालेल्या जनआंदोलनामुळे गुजरातचे विकास मॉडेल ही गोष्ट किती खोटी व भंपक होती या विषयी गुजरात्यांच्या मनात तरी काही शंका असतील, असे वाटत नाही. गेल्या निवडणुकीत जो पटेल समाज भाजपाचा कट्टर समर्थक होता त्यानेच यावेळी “भाजपा हराओ” चा नारा बुलंद केला आहे. राज्यातील जवळपास ४००० गावांत, जेथे पटेल बहुसंख्य आहेत तेथे आंदोलनकर्त्यांनी गावाच्या प्रवेशद्वारावरच “भाजपा साठी इथे धारा १४४ लागू आहे ” अशा आशयाचे बॅनर लावले आहेत . भाजपा प्रचारकांनी इथे पाऊलही टाकू नये अशी ताकीदच पटेलांनी दिली आहे.

जनआंदोलनातून उभ्या ठाकलेल्या ४ तरुण नेत्यांपैकी अल्पेश ठाकोर याने अलीकडेच राजधानी गांधीनगर मध्ये एका विशाल रॅलीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. अर्थातच तो काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा लढेल. पाटीदार आंदोलनाचा २३ वर्षीय नेता हार्दिक पटेलसुद्धा काँग्रेसबरोबर युती करण्याची शक्यता आहेच. दलित युवा नेता जिग्नेश मेवानी व किसान नेता जयेश पटेल यांनी काँग्रेसमध्ये सामील न होता भाजप विरोधात प्रचार करण्याची घोषणा केली आहे. या दरम्यान राहुल गांधींनी गुजरातच्या तीन भागांत, उत्तर गुजरात, दक्षिण गुजरात व सौराष्ट्र येथे झंझावती दौरे काढून प्रचाराचा धडाका लावलाय, त्यांच्या सभांना होणारी गर्दी व मिळणार प्रतिसाद लक्षणीय आहे. राहुल त्यांच्या ब्लॅक कॅट कमांडोंचे सुरक्षा कवच तोडून खुशाल दर्शकांच्या गर्दीत मिसळतात, लोकांबरोबर संवाद साधतात, कधी बैलगाडीतून तर कधी पायी चालत राहुल गांधींची प्रचार यात्रा पुढे जाते. सामान्य नागरिकांप्रमाणे कुठे रोडसाईड धाब्यावर थांबून राहुल चहा पिताना किंवा दाल रोटी खाताना जनतेला दिसतात.

प्रधानसेवक नरेंद्र मोदींनी देखील गुजरातचे तीन दौरे आजवर पार पडले आहेत. निवडणूकांपूर्वी ५० सभा घेण्याचा त्यांचा मानस आहे. भाजपाचे एकमेव स्टार प्रचारक मोदी आहेत, आणि त्यांच्या पोस्टरवर सुद्धा एकच नारा आहे. “अमे विकास छो, अमे गुजराती छो” म्हणजे “मी विकास आहे , मी गुजराती आहे ” कुठेतरी ही घोषणा आणीबाणीनंतर काँग्रेसच्या पतनापूर्वी तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष देवकांत बरुआनी दिलेल्या ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ या घोषणेची आठवण करून देते.
पाटीदार आंदोलकांनी भाजपशासित गुजरातच्या आर्थिक दुरावस्थेकडे लक्ष्य वेधताना, एकदा सत्तेत आल्यावर भाजपा निवडणूकपूर्व आश्वासने कशी गुंडाळून ठेवतो याचा प्रचार करण्यासाठी “विकास गांडो थायो छे ” म्हणजे विकासला येड लागलय ही थीम वापरून हर तऱ्हेची गाणी, व्यंगचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेत.

भाजपाकडून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न या निवडणुकीत होताना दिसतोय. अलीकडेच अटक झालेला एक दहशतवादी, वरिष्ठ काँग्रेस नेता अहमद पटेलयांचा निकट्वर्ती असल्याचा मुख्यमंत्री विजय रूपांनी यांचा “गौप्य्स्फोट” भाजपाचा हा प्रयत्नच अधोरेखित करतो. गुजरातेत सध्या ओ बी सी, दलित आदिवासी, मुस्लिम व पटेलांचे जे काँग्रेसच्या हिताचे समीकरण जुळून येताना दिसते, त्यास छेद देण्यासाठी धार्मिक अक्षावर ध्रुवीकरण करण्याचा रामबाण इलाज भाजप वापरेल यात काही शंका नाही. गुजरातेतील लहान मोठ्या देवळातील संत, महंत, पुजारी मोदीजींचे गोडवे गातानाचे नवनवीन व्हिडियोज सोशल मेडिया वर रोज प्रसारित होतायत.

या सगळ्या गदारोळात ‘विकासाचा मुद्दा हरवून गेलाय. पण एक गोष्ट मात्र नक्की. गुजरातची ही निवडणूक देशाच्या राजकारणास एक निर्णायक वळण देणारी असेल. किंबहुना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काय होईल याची झलक डिसेंबर २०१७ चे गुजरात विधानसभेचे निकाल देतील.

लेखक गुजरातस्थित ज्येष्ठ पत्रकार असून इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेतील अनेक वर्तमानपत्रे, वैचारिक नियतकालिकांत सातत्याने लेखन करतात. २००२ च्या दंग्यांनंतर गुजरातचा सामाजिक, राजकीय व आर्थिक अंगाने अभ्यास करणारे विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे.

1 Comment

  1. अनिल खांडेकर Reply

    श्री नचिकेत देसाई यांनी थोडक्यात , पण नेमके मुद्धे उपस्थित केले आहेत . अनेक ठिकाणाहून गुजरात संबधी बातम्या प्रसारित होत आहेत . बहुतेक बातम्याचा सूर भाजप =मोदी विरोधी वातावरण गुजरात मध्ये आहे , असा दिसत आहे . अलीकडचे बातम्या , youtube , whatsapp , facebook अशा माध्यमांवरील साहित्य फार जपून स्वीकारावे लागते . त्यामुळे मोदी यांच्या उदोउदो करणाऱ्या बातम्या खर्या कि राहुल गांधी यांना नवा सूर गवसल्याच्या बातम्या खऱ्या , या बद्धल सतत शंका निर्माण होत असतात . श्री देसाई यांचे बातमी पत्र अतिशयोक्तीचे नाहीये आणि त्यातील संयमी , समतोलपणा आवडला . धन्यवाद .

Write A Comment