‘रस्ते हे आमचे कुंचले आहेत, आणि चौक हे रंगमिश्रणासाठीचे पॅलेट’- व्लादिमीर मायकोव्हस्की
ऑक्टोबर क्रांतीचा आढावा घेणे म्हणजे भूतकालीन स्मरणरंजनात मश्गुल होणे नाही. ‘कोई लौटा दो मेरे बीते हुए दिन’ असला भावूकपणा नाही. तर परखडपणे त्या ऐतिहासिक स्थित्यंतराची चिकित्सा- त्यातील उद्दिष्टे आणि त्यांची आज काही उपयुक्तता उरली आहे का, त्या उद्दिष्टांची कितपत पूर्तता झाली, आलेल्या अपयशाची कारणे कोणती इ. याच चौकटीत राहत ऑक्टोबर क्रांती आणि कला यांच्या संबंधाचा आढावा घेण्याचा माझा प्रयत्न आहे.
मार्क्सवाद आणि आधुनिक कला- एक गुंतागुंतीचे समीकरण
१९१७ साली रशियामध्ये झालेल्या साम्यवादी ऑक्टोबर क्रांतीला आता १०० वर्षे पूर्ण होतील. ऑक्टोबर क्रांती आणि सोविएत युनियनचा जन्म, जागतिक महासत्ता म्हणून झालेला प्रवास आणि १९९१ मधील अस्त हा सगळा इतिहास आता फार जुना, दूरस्थ भासतो. गेल्या काही दशकांत आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, मूलतत्ववादी दहशतवाद, अधिकाधिक बळकट होत चाललेल्या अति-उजव्या शक्ती आणि विशेषतः २००८ मध्ये उद्भवलेले जागतिक आर्थिक अरिष्ट ह्या सगळ्यातून जग कल्पनेपलीकडे बदलले आहे. सोविएत युनियनच्या अस्तानंतर ‘नवउदार भांडवलशाहीला कुठलाही पर्याय उरलेला नाही’ अशी होणारी दर्पोक्ती आता ‘जो पर्याय उरला आहे तो म्हणजे पर्यावरणीय संकट किंवा दहशतवादी कारवाया आणि अणुयुद्ध यांतून जगाचा अंत’ अश्या भयावह दुःस्वप्नात परावर्तित झाली आहे. आणि हे दुःस्वप्नच आपल्या आजच्या ‘उत्तर-आधुनिक/ उत्तर-साम्यवादी, विचारसरणी, इतिहास इ.इ. चा अंत मानणाऱ्या’ फॅशनेबल वैचारिक चौकटीच्या मर्यादाच अधोरेखित करते. फ्रेडरिक जेम्सन यांनी एकदा म्हटले होते ‘जगाच्या अंताची कल्पना ही भांडवलशाहीच्या अंताच्या कल्पनेपेक्षा अधिक शक्य कोटीत बसणारी आहे’. त्यातून भांडवली व्यवस्थेचा होणारा सिनिकल आणि दैववादी स्वीकार हाच अधोरेखित होतो.
पण जर हे भयावह दुःस्वप्न आणि जगाच्या अंताची अशी दैववादी स्वीकृती मंजूर नसेल तर त्याला ठोस पर्यायी मांडणी करता येणे- रूढ विचारसरणी, वर्गसत्ता यांच्या बेड्या झुगारून समाजपरिवर्तनाची लढाई उभारणे; हे गरजेचे आहे. त्यासाठी कुठल्याही प्रागतिक विचाराला तात्कालिकतेच्या पलीकडे पाहण्याची हिंमत आणि पर्यायी समाजाचे स्वप्न चितारण्याची सर्जनशीलता अंगी बाणवावी लागते. आधुनिकतेशी असलेली ही बांधिलकी- रूढ समाज आणि वास्तव यांच्या चौकटी बदलणे, त्यांना आव्हान देणे; हाच १९व्या शतकात आणि नंतर उदयाला आलेल्या आधुनिक कलाप्रवाह-चळवळी आणि मार्क्सवाद यांना जोडणारा दुवा होता. म्हणूनच रशियातील साम्यवादी ऑक्टोबर क्रांतीनंतर आर्थिक पुनर्रचनेबरोबरच रूढ सामाजिक जाणिवा, सांस्कृतिक दृष्टी यांच्यात समग्र परिवर्तन घडणे हेदेखील क्रांतीचे एक महत्वाचे उद्दिष्ट होते.
ऑक्टोबर क्रांती आणि सोविएत कला यांचा या व्यापक पटलावर अभ्यास गरजेचा आहे. युरोपातील औद्योगिक क्रांती, टेलीफोन, विमाने, ग्रामोफोन इ. यामुळे झालेले दळणवळण आणि संपर्क क्षेत्रातील क्रांतिकारी बदल, आणि कलाप्रकारांचे त्यातून घडून आलेले लोकशाहीकरण यामुळे १९व्या शतकाच्या अखेरपासून ‘कला म्हणजे काय’ या कल्पनेतच आमूलाग्र बदल झाला. क्युबिझम, दादाइझम, एकस्प्रेशानिझ्म वगैरे प्रवाह साहित्य, चित्रकला, स्थापत्य इ. कलांचा आमूलाग्र कायापालट करत होते. हे क्रांतिकारी बदल १९व्या शतकातील उतरती कळा लागलेल्या जमीनदारी-बूर्झ्वा सांस्कृतिक संकेतांच्या विरोधात होते. ‘युरोपातील प्रस्थापित-विरोधी सोशल डेमोक्रॅट आणि ही सांस्कृतिक बंडखोरी करणारे कलावंत हे दोन्ही ‘आऊटसायडर’ होते, बूर्झ्वा प्रस्थापिततेच्या विरोधात होते, वयाने तरुण होते, आणि बंडखोर- बोहेमियन कलावंत हे तर बहुधा गरीबच असत’[1]– त्यामुळे डाव्या आणि आधुनिक कला-चळवळी यांच्यात अनेक साम्यस्थळे होती. आणि त्यातून त्यांचा अनेकदा मिलाफ होत गेला. साहित्यिक, समीक्षक आणि कला आणि नाटके यांतील बंडखोरीचा खंदा पुरस्कर्ता जॉर्ज बर्नार्ड शॉ हा स्वतः समाजवादी चळवळीत होता. फ्रान्समध्ये एमिल झोला हा समाजवादी लेखक होता आणि त्याचा वास्तववाद, दोस्तोवस्की, टॉल्स्टॉय, गोर्की वगैरे थोर रशियन कादंबरीकार ह्या सर्वांचा मार्क्सवादी वर्तुळांत उत्साहाने स्वीकार होत होता.
मार्क्सवाद्यांनी दृश्यकलांना अधिक महत्व दिले होते आणि त्या कलांवर देखील मार्क्सवादाचा प्रभाव पडला होता. विल्यम मॉरीसची ‘ब्रिटीश आर्ट्स क्राफ्ट’ चळवळ ‘सृजनशील कामगार-कारागीर यांचा केवळ ‘मजूर’ म्हणून वापर करून घेणाऱ्या भांडवली व्यवस्थेच्या’ विरुद्ध बंड करत होती[2]. स्थापत्यकलेवर देखील मार्क्सवादाचा प्रभाव पडला होता. बॉहॉस हा १९२० आणि ३० च्या दशकातील जर्मनीमधला, सर्वाधिक महत्त्वाकांक्षी आधुनिक कलाप्रकल्प, होऊ घातलेल्या (आणि अखेर फसलेल्या) मार्क्सवादी क्रांतीच्या छायेत बहरला होता. बॉहॉस चळवळीने ‘ब्रिटीश आर्ट्स क्राफ्ट’ कडून प्रेरणा घेतली होती. ओवेन, फुरियर असे स्वप्नाळू समाजवादी तिचे आदर्श होते. ‘भांडवली जगात, परात्मिकरण नाकारणारी समाजवादी श्रमप्रधान अशी बेटे आणि त्यासाठी मोहक असे सामाजिक स्थापत्य’ असा एकूण त्यातील आशय होता. बॉहॉसचा संस्थापक वाल्टर ग्रोपियास हा १९१९ मध्ये स्थापत्यविशारदांच्या कलेसाठीच्या वर्किग काउन्सिलचा (या काउन्सिलने ‘जगातील सर्व कलावंतांना एकत्र येण्याचे आवाहन’ केले होते) अध्यक्ष झाला होता. चित्रकलेतील क्युबिझम, दादाइझम वगैरे प्रवाहांना मार्क्सवाद्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला- आणि ‘केवळ शैली आणि फॉर्म यांच्यात प्रयोग म्हणजेच आधुनिकता’ अशी बूर्झ्वा समज बाळगण्याबद्दल कलावंतांवर टीकाही होत होती. मात्र थोर चित्रकार पिकासो हा स्पेन मधील यादवी युद्ध आणि फॅसिस्टविरोधी लढ्यातील कम्युनिस्ट योगदानाने प्रभावित होऊन फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य बनला. रोमा रोलँ सारखे फ्रेंच लेखक सोविएत युनियनमधील समाजवादी प्रयोगाने प्रभावित झाले होते. चार्ली चॅप्लिन, सार्त्र, ब्रेटन हे कम्युनिस्ट सह-प्रवासी होते किंवा पक्षसदस्यदेखील होते. थोडक्यात, आधुनिकतेच्या या सामायिक प्रकल्पात अराजकी, बंडखोर कला आणि कम्युनिस्ट चळवळ यांची सातत्यपूर्ण भागीदारी राहिली.
या सर्व काळात कलेबद्दल मार्क्सवादाचा दृष्टीकोन ‘शैली आणि फॉर्म’ यांच्यापेक्षा ‘कथनाच्या आशयाला’ महत्व देण्याचा राहिला. मात्र आधुनिक कलेला केवळ शैली आणि फॉर्म यात कलाकुसर करण्यात धन्यता मानणारी असा शिक्का मारणे योग्य ठरणार नाही. ही कलासुद्धा कथनाचे विषय आमूलाग्र बदलत गेली. उतरती कळा लागलेल्या जमीनदारी-बूर्झ्वा सांस्कृतिक संकेताना झुगारत नव्या आधुनिक भांडवली समाजाचे ताणतणाव, जटील होत चाललेले मानवी संबंध ह्या सगळ्यांना आधुनिक कलेने पृष्ठभागी आणले. थोडक्यात प्रागतिक आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध उभी ठाकलेली आधुनिक कला आणि मार्क्सवाद यांच्यातील ही देवाणघेवाण आधुनिक संस्कृती समृद्ध करणारी ठरली.
रशियन बंडखोर कला (अवांत-गार्ड) आणि ऑक्टोबर क्रांती
रशियन आधुनिक कला आणि रशियन क्रांतिकारक ह्यांच्यातदेखील युरोपप्रमाणेच घट्ट दुवा होता. क्रांतीची कल्पना प्रत्येक सर्जनशील मनाला आकर्षित करणारी होती. ‘मिलेनियलिस्ट, अवांत-गार्ड, आणि सर्व प्रकारचे स्वप्नाळू कलावंत क्रांतीनंतरची वाटचाल आपापल्या तऱ्हेने चितारत होते. बोल्शेविझमला ह्या सगळ्या प्रवाहांना एकत्रित करण्याची गरज होती. त्यांचा असा एकसंध ऐतिहासिक दुवा सांधण्याची गरज होती- ज्यामुळे त्या सर्व प्रवाहांना दिशा मिळाली असती आणि त्याचबरोबर त्या सगळ्या प्रवाहांची अंतर्भूत ताकद बोल्शेविझमला मिळाली असती’[3].
१८९० ते १९३० ह्या काळात रशियन अवांत-गार्ड कला बहरली. ‘१९१५ ते १९३२ ह्या काळात मॉस्को आणि पेट्रोग्राड (१९२४ नंतर लेनिनग्राड) ह्या शहरांत घडून आलेल्या कला आणि राजकीय क्रांत्यांमुळे आधुनिक कला आणि इतिहास ह्यांचा प्रवाहच बदलला. व्लादिमिर तातलीन च्या “material assemblages” आणि काझीमीर मेल्विच च्या ‘Suprematism’ ह्या शैलीतील उपक्रमांमुळे कलेत घडलेले क्रांतिकारी बदल क्रांतीपूर्व असले तरी त्यांचा खरा प्रभाव ऑक्टोबर क्रांतीनंतरच, आणि क्रांतीमुळेच स्पष्ट झाला. अवांत-गार्ड कलावंतांनी आत्मसात केलेल्या शैली आणि साधने याबद्दलच्या नव्या जाणिवांचा बोल्शेविक क्रांतीची स्वप्नील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापर केला आणि त्यातून कला आणि जीवन ह्यांचा अपूर्व मिलाफ पाहायला मिळाला’.
अवांत-गार्ड हा वैश्विक आणि आधुनिक दृष्टी असलेला कला-प्रकल्प होता. रशियन अवांत-गार्डचा विशेष म्हणजे त्याने लोकप्रिय आणि सर्वहाराकेन्द्री होण्याचा प्रयत्न केला. चित्रपट दिग्दर्शक झिगा वेर्टोव, कवी, फ्युचरिस्ट नट आणि कलाकार व्लादिमिर मायकोव्हस्की, चित्रकार काझीमीर मेल्विच असे प्रयोगशील कलावंत त्यात अग्रभागी होते. नुकत्याच अस्तित्वात आलेल्या कम्युनिस्ट सोविएत युनियनने सर्वाधिक भविष्यवेधी, प्रागतिक, प्रयोगशील असे संगीत, नृत्य, कला, आणि चित्रपट निर्माण केले. सोविएत युनियनने अशी एक जबाबदारी घेतली होती जी कुठल्याही आधुनिक राजवटीने घेतली नव्हती- सोविएत युनियनला सर्व नागरिकांना मागास अवस्थेतून बाहेर काढून शिक्षित करायचे होते, संघटित करायचे होते, एक आधुनिक समाज निर्माण करायचा होता आणि हे सर्व करताना नव्याने उदयाला येणारी प्रचारयंत्रणा सर्जनशीलतेला मारक ठरू नये याची काळजी घ्यायची होती. १९२० ते १९३० ह्या काळात सोविएत युनियनने ह्या आघाड्यांवर नेत्रदीपक यश मिळवले.
क्रांतीनंतरचे नवे वास्तव, नव्या समाजाचे स्वप्न मुखरित करण्याची राजकीय गरज यामुळे कलेच्या कथनात, आशयात आमूलाग्र बदल घडून आला. औद्योगिक कामगार वर्ग, शेतकरी, त्यांचा जीवनसंघर्ष हे सगळे क्रांती-उत्तर कला आणि सौंदर्यशास्त्रीय मापदंड यांचा भाग बनणे गरजेचे होते. ती साम्यवादी प्रचाराची, कलावंताचे आणि आशयाचे अभिन्नत्व राखण्याची आणि त्याचबरोबर बदलत्या वास्तवाचीही गरज होती. यासाठी बोग्डानोवच्या नेतृत्वाखाली १९१७ मध्ये ‘Proletkult’ ची निर्मिती करण्यात आली. ही संस्था स्थानिक सांस्कृतिक संघटना, अवांत-गार्ड कलावंत यांचे फेडरेशन होती. दृश्यकला, साहित्य आणि नाट्य क्षेत्रात तिचा लक्षणीय प्रभाव होता. मात्र पहिला ‘सोविएत पीपल्स कमिसार फॉर एज्युकेशन’ (कला आणि शिक्षण क्षेत्रासाठी नेमलेला प्रतिनिधी) लुनाचार्स्की याने अवांत-गार्ड, आधुनिक कलावंत, त्यांची सर्जक स्वातंत्र्याची गरज यांचा उदयोन्मुख समाजवादी संस्कृतीशी मेळ घालण्यात महत्वाची भूमिका बजावली. लुनाचार्स्की याने अभिजात आणि आधुनिक साहित्य, चित्रकला, संगीत, शिल्पकला इ. तील महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करणारे विपुल लिखाण केले. रशियन आणि प. युरोपीय साहित्याचा इतिहास, साहित्य आणि सौंदर्यशास्त्रीय प्रश्न, समकालीन कला आणि राजकारण, यांवर त्याने निबंध, भाषणे लिहिली. कलावंतांचे सर्जक स्वातंत्र्य आणि मार्क्सवादी सामाजिक समीक्षा ह्यांच्यातील ताण कायम राखणे हे कला आणि आधुनिक सर्वहारा संस्कृती यांच्यासाठी कसे महत्त्वाचे आहे हे विषद करणारा त्याचा ‘On Literature and Art’ हा निबंध विशेष महत्वाचा आहे.
या काळात ‘फॉर्म’ मध्ये मिळवलेल्या यशाचे एक उदाहरण फारच रंजक आहे. एक अवांत-गार्ड सोविएत संगीतकार आर्सेनी आव्रामॉव सिनेमा मधील रेकॉर्डिंगच्या तंत्राने फारच प्रभावित झाला. सिनेमाला समांतर दुसऱ्या निगेटिव्हवर त्याने ध्वनीफीत रेकॉर्ड केली. बॉहॉस कलावंत लस्झ्लो मोहोली-नागी याने म्हटले ‘अब्स्ट्रक्ट साउंड ही नवी दुनिया ऑप्टिकल फिल्म साउंडट्रॅकवरील ह्या प्रयोगामुळे खुली झाली’. सिंथेसाइजरच्या किमान २० वर्षे आधीच तयार झालेला जगातील हा पहिला कृत्रिम आवाज होता’.
सोविएत कलेच्या अनेक क्षेत्रांत अवांत-गार्डचे लक्षणीय योगदान आहे. सिनेमामधील मोन्ताज, constructivist स्थापत्य, आणि पोस्टर्स(भित्तीपत्रके) या महत्वाच्या तीन सोविएत कलांची इथे आपण चर्चा करू.
सोविएत सिनेमा मधील मोन्ताज
पहिल्या महायुद्ध काळात झारकालीन सिनेमा पूर्ण कोसळला होता. फेब्रुवारी क्रांतीनंतर निर्माण झालेली रिळांची चणचण आणि ऑक्टोबर क्रांतीनंतर सुरु झालेले यादवी युद्ध ह्या सगळ्यामुळे सोविएत सिनेमापुढच्या अडचणी अधिकच वाढत गेल्या. मात्र तंत्रज्ञ आणि संसाधनांची टंचाई यातून सोविएत सिनेमाने एक विलक्षण तंत्राची निर्मिती केली ती म्हणजे ‘मोन्ताज’. लेव कुलेशोव, पुडोवकीन, सर्गेई आईझेनस्टीन आणि वेर्टोव हे दिग्दर्शक ह्या तंत्राचे प्रमुख उद्गाते होते. त्यांचा सिनेमा उघडउघड राजकीय आणि आंदोलनात्मक सिनेमा होता. आईझेनस्टीनच्या ‘Strike!’ किंवा ‘Battleship Potemkin’ अशा अभिजात आणि जगविख्यात सिनेमांतली राजकीय जाणीव मोन्ताजच्या वापराने अधिकच भेदकपणे भिडते.
बहुतेक आधुनिक चित्रपट ‘सलगता’- continuity system’ वापरतात जेणेकरून प्रेक्षक कथेत गुंतून जातील आणि चित्रपट निर्मिती आणि तिची तंत्रे याकडे लक्ष देणार नाहीत. मात्र सोविएत मोन्ताज पूर्णपणे वेगळे आहे. ते आपल्या चित्रपटांना प्रभाव पाडण्याचे बरेच मार्ग देतात आणि प्रेक्षकांना आपल्या कल्पनांबद्दल विचार करायला भाग पाडतात’[4] आईझेनस्टीन यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये’ मोन्ताजच्या भावनिक आणि बौद्धिक परिणामांना एकत्र आणेल अशी कला व विज्ञान यांचा मेळ साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. (Eisenstein 1977:62-63)
नंतरच्या काळातील ब्रेख्तच्या परात्मीकरण आणि didactic थिएटर याबद्दलच्या चिंतनाशी असलेले मोन्ताजचे साधर्म्य उघड आहे. त्याचबरोबर हेही उल्लेखनीय आहे की मोन्ताजचे तंत्र आणि त्याचे यश हे सोविएत राज्याच्या पूर्ण मागास अवस्थेच्या आणि साधनांच्या चणचणीच्या पार्श्वभूमीवर मिळवलेले होते. ह्या सगळ्या कमजोरीवर मात करणारा घटक होता- राजकीय दृष्टी आणि शोषणमुक्त समाजाचा प्रकल्प यांची आंदोलन, माहिती आणि प्रचार यासाठीच्या तंत्रज्ञानाशी घातलेली सांगड. रशियाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा लक्षात घेता सिनेमा आणि इतर दृश्य माध्यमे यांना केवळ राजकीय प्रचार नव्हे तर समाजशिक्षण आणि घडण हेदेखील साध्य करायचे होते. ‘लोकशिक्षण आणि त्यातून लोकांना सांस्कृतिक क्रांतीसाठी तयार करणे, आणि समाजवादाकडे वाटचाल करणे हे त्याचे उद्दिष्ट होते.
रशियन constructivist स्थापत्य–
Constructivism ही रशियातील सर्वात क्रांतिकारी, तीव्र, महत्त्वाकांक्षी आणि शोकांतिक अशी आधुनिक कला- चळवळ होती. १९२० च्या दशकात ह्या चळवळीने स्थापत्यात नवे आणि मूलगामी बदल केले, ग्राफिक डिझाईन, सिनेमा आणि फोटोग्राफी ह्यांच्यात क्रांती केली आणि व्यापक प्रमाणावरील उत्पादनाच्या नव्या तंत्रांसाठी नवी डिझाईन शैली विकसित केली. ‘डिझाईन, फॉर्म हा काही कलावंताचा व्यक्तीनिष्ठ सर्जक आविष्कार नाही तर तो पूर्णतः सामाजिक, आणि राजकीय आहे, नवा सोविएत समाज घडवण्याच्या स्वप्नाचे ते एक हत्यार आहे’ अश्या आदर्शवादी विचाराने प्रेरित झालेली ही कला-चळवळ होती.
आवर्जून उल्लेख करायला हवा तो constructivist स्थापत्याचा. टाटलिन आणि या चळवळीतील इतर अनेकांनी ‘स्थापत्य म्हणजे आधुनिक, कॉस्मोपॉलिटिन अशी सर्वांसाठी खुली आणि उपयोगाची स्पेस’ अश्या दृष्टीने काम केले. त्यातूनच त्यांनी ‘आपल्या कामाचा, डिझाईन्सचा औद्योगिक तऱ्हेने व्यापक उत्पादक रीतीने वापर व्हावा, ‘केवल/ विशुद्ध कला’ म्हणून नव्हे’ असा आग्रह धरला. क्रांतीनंतर स्थापन करण्यात आलेल्या कामगारांसाठीच्या क्लब्सच्या स्थापत्यात ह्या आधुनिक, आदर्शवादी दृष्टीचा प्रत्यय येतो. आधुनिक अवांत-गार्ड कला हा दररोजच्या जगण्याचा भाग व्हावा असा constructivist चळवळीचा आग्रह होता. म्हणूनच १९२७ नंतर त्यांनी कामगारांसाठी क्लब्स, कामगार विभागातील मनोरंजनाच्या सार्वजनिक जागा वगैरे प्रकल्पांवर काम केले.
नवा माणूस घडवण्याचा सोविएत प्रयोग आणि त्यातून झपाट्याने बदलणारे सामाजिक वास्तव ही ह्या सर्व प्रकल्पांची प्रेरणा होती. आधुनिक स्थापत्य हे सार्वजनिक जागा आणि वास्तू यांतून एक कॉस्मोपॉलिटिन सोविएत संस्कृतीचा आविष्कार करण्याचा प्रयत्न करत होते.
सोविएत पोस्टर्स (भित्तीपत्रके)
सोविएत पोस्टर्स कदाचित या काळातील कलेच्या सर्वात जास्त दृश्यमान व चिरस्थायी आठवणी आहेत. आधी वर्णन केल्याप्रमाणे कामगार आणि शेतकऱ्यांना क्रांतीचा अर्थ समजावणे, त्यांचे शिक्षण करणे, नवा समाज घडवण्याची त्यांची मानसिकता तयार करणे हे क्रांतीपुढील मोठे आव्हान होते. नवा समाज घडवण्याची ऐतिहासिक जबाबदारी सहजपणे मांडू शकेल, लगेच अर्थ समजू शकेल अश्या नव्या आदर्शांची गरज होती. पोस्टर्सनी ह्या प्रचारक-कलेमध्ये महत्वाची भूमिका बजावली. हा प्रचार म्हणजे केवळ राजकीय घोषणा आणि उद्दिष्टे यांचे यांत्रिकपणे केलेले नीरस प्रक्षेपण नव्हते. तर क्युबिझम, दादाइझम, सरीअलीझम वगैरे प्रचलित अश्या आधुनिक चित्र आणि डिझाईन शैलींचा कल्पक वापर त्यासाठी करण्यात आला होता.
स्त्रीत्वाचा समाजवादी अर्थ बूर्झ्वा ‘सौंदर्य’ संकल्पनेला आव्हान देत होता. ‘समाजवादातील स्त्री’ची ओळख ही लिंग नव्हे तर ‘वर्ग’ आधारित होती. वरील पोस्टरमध्ये हा आशय चांगल्या प्रकारे मांडला होता- स्त्रीमुक्ती ही केवळ स्त्रियांच्या कामगार वर्गात आणि औद्योगिक श्रमातील सहभागानेच शक्य आहे. त्याचप्रमाणे कामगार, शेतकरी, सैनिक, स्त्रिया यांची प्रतिमा पिळदार स्नायूंनी चित्रित केली जात होती. समाजवादाच्या बांधणीचा त्यांचा निर्धार जसा त्यातून प्रतीत होत होता तसाच धार्मिक किंवा सरंजामी नायकांची जागा आता सर्वसामान्यांनी घेतली आहे त्याचा गौरव त्यातून करण्यात येत होता.
(‘आम्ही आमच्या शस्त्रांनी शत्रूचा बीमोड केला, आम्ही आमची उपजीविका आमच्या श्रमांवर करू- कॉम्रेड्स, चला, कामाला सज्ज व्हा!’- निकोलाय कोगौट याचे १९२० मधील पोस्टर)
‘समाजवादी वास्तववाद’ आणि सोविएत अवांत-गार्ड कलेची पीछेहाट
साहित्य, नाटक, चित्रकला इ. कलाप्रकारांत सोविएत अवांत-गार्ड निर्मितीला मर्यादित लोकप्रियता मिळाली. कामगार आणि शेतकरी वर्गाची मागास सांस्कृतिक स्थिती त्याला कारणीभूत होती. आजवर ह्या कला ह्या वर्गांसाठी खुल्याच नव्हत्या. त्यांना आता अचानक कॉस्मोपॉलिटिन अवांत-गार्डचा परिचय करून देण्यात आला. पण त्यासाठी त्यांचे आधी काही एक शिक्षण होण्याची आवश्यकता होती. म्हणूनच बोग्डानोवच्या नेतृत्वाखाली ‘Proletkult’ चा कलेबद्दलचा दृष्टीकोन निराळा होता- ‘कामगार वर्गाचे जीवन जसे होते तसे त्याचे उत्सवी सादरीकरण करणे’. त्यात कामगार, बोल्शेविक नेते, क्रांतिकारी युद्धप्रसंग यांचे वास्तववादी, गौरवपूर्ण चित्रण होते. त्यातून ‘कामगार वर्गीय संस्कृती’बद्दल स्तोम माजवले जात असल्याबद्दल लेनिनने त्यांच्यावर टीकाही केली होती. लेनिनचे म्हणणे होते ‘क्रांतिकारी कामगार वर्गाची विचारसरणी म्हणून मार्क्सवादाने जे ऐतिहासिक महत्व प्राप्त केले आहे ते बूर्झ्वा कालखंडातील महत्वाच्या मिळकती नाकारून नव्हे. मार्क्सवादाने गेल्या दोन हजार वर्षातील सर्व मानवी विचार आणि संस्कृती यांतील मिळकती स्वीकारल्या, आत्मसात केल्या आणि त्यांचा अधिक विकास केला’.
मात्र, १९३०च्या दशकात स्टालिनच्या नेतृत्वाखाली ‘इतिहासाची एकरेषीय दिशा आणि वास्तववाद’ यांची अवास्तव भलामण करणाऱ्या प्रवृत्ती वरचढ ठरल्या. ‘Proletkult आणि कामगार कला ह्यांचा विचित्र अश्या स्मारकप्रधान अवांत-गार्ड सोबत संगम झाला. आणि त्यातून स्टालिनवादी समाजवादी वास्तववादाचा दबदबा वाढत गेला[5].
झाद्नोव याने १९३४ मध्ये भरलेल्या सोविएत लेखकांच्या कॉंग्रेसमध्ये समाजवादी वास्तववादाची व्याख्या केली- ‘मानवी आत्म्याला आकार देणारे अभियंते या नात्याने लेखकांनी आपल्या कलेत वास्तवाचाच आविष्कार केला पाहिजे- तोही केवळ निर्जीव, वस्तुनिष्ठ तऱ्हेने नाही तर वास्तव हे क्रांतिकारी विरोधविकासाचा आविष्कार आहे अश्या तऱ्हेने. क्रांतिकारी आदर्शवाद हा साहित्यिक निर्मितीचा घटक असला पाहिजे’[6].
व्यवहारात त्याचा अर्थ अवांत-गार्ड कलेला दोष देणे, बदनामी करणे आणि परंपरावादी कलाप्रकारांचे स्तोम वाढवणे असा झाला. त्याचे कारण परंपरावादी कलाप्रकार हे कामगारांना जवळचे आहेत, त्यांच्या जीवनाचा भाग आहेत असे देण्यात आले. सर्जनशील कलावंताचा स्टुडिओमधला सराव हा बूर्झ्वा, व्यक्तिवादी आणि मार्गच्युत म्हणून बदनाम झाला. त्याच्या ऐवजी नोकरशाही पद्धतीने औद्योगिक उत्पादन ठरवावे तशी लक्ष्ये कलावंतांसाठी ठरवण्यात आली. अर्थात सोविएत युनियनमधील सर्वच कला दडपण्यात आल्या असा त्याचा अर्थ नाही. पण अवांत-गार्ड कलेच्या खुल्या विकासातून आधुनिक सांस्कृतिक क्रांतीच्या ज्या शक्यता होत्या त्या मात्र मावळून गेल्या[7].
__
कला आणि राजकीय विचार- (विशेषतः मार्क्सवादी राजकीय विचार आणि क्रांतीनंतरचा समाज) ह्यातील संबंध हे गुंतागुंतीचे राहिले आहेत हे आपण पाहिले. ब्रेख्त, लुकाच, बेंजामिन आणि अडोर्नो ह्या फ्रांकफुर्ट स्कूलच्या आघाडीच्या विचारवंतामध्ये झालेला ‘चांगली कला म्हणजे काय’ या विषयावरील राजकारण आणि कला यांचे परस्परसंबंध उलगडणारा वाद प्रसिद्ध आहे. वास्तववाद विरुद्ध एकस्प्रेशानिझ्म, फयुचरिझम, आशय विरुद्ध फॉर्म, व्यक्ती विरुद्ध समष्टी- इ. विविध मुद्दे आणि त्यातील विरोधविकास, त्याचे ताण, हे आजदेखील साहित्यिक आणि सांस्कृतिक अभ्यासासाठी महत्वाचे आहेत.
फ्रेंच मानसशास्त्रज्ञ लकान याने म्हटले होते- ‘खरी ऐतिहासिक घटना ही केवळ सांकेतिक विश्वाचे नियम भूतकाळासाठीदेखील बदलते इतकेच नाही तर त्यात अनुस्यूत अशी स्वप्न-कल्पना हीदेखील त्यामुळे बदलून जाते’. ऑक्टोबर क्रांती ही अश्याच अर्थाने ‘ऐतिहासिक घटना’ होती. तिच्यामुळे रूढ कलेचे केवळ संकेत आणि मानबिंदूच बदलले असे नाही तर कलेत अंतर्भूत अशी स्वप्नील कल्पना, आदर्श आणि त्याची रचना हेदेखील आमूलाग्र बदलले. सोविएत अवांत-गार्ड कला हा ह्या आदर्शवादी सामुदायिक उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाचा सर्जनशील उद्गार होता. कलावंत खुलेपणाने अभिव्यक्त होत होते आणि सोविएत राज्याकडून त्यांना प्रोत्साहन मिळत होते. हे कलावंत व्यक्तिवादी भावनांच्या गुंत्यात अडकले नव्हते तर सामायिक सामाजिक परिवर्तनात ते सहभागी झाले होते. त्या परिवर्तनाला कॉस्मोपॉलिटिन, आधुनिक रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थाने राजकीय आधुनिकता आणि कलात्मक आधुनिकता यांचा तो संगम होता. आज डाव्या चळवळीला रूढ संस्कृती, परंपरा, कामाच्या पद्धती यांचे स्तोम न माजवता पुन्हा एकदा ‘राजकीय आधुनिकता आणि कलात्मक आधुनिकता’ यांचा समकालीन संगम साधत ठोस पर्यायी जगाची मांडणी करणे गरजेचे आहे. ऑक्टोबर क्रांतीचा आणि तिच्या यशापयशाचा तो एक आवश्यक धडा आहे.
[1] Eric Hobsbawm, ‘How to change the world’, pg. 246
[2] Eric Hobsbawm, ‘How to change the world’, pg. 249
[3] Susan Buck-Morss- ‘Revolutionary Art: The Bolshevik Experience’ pg. 5
[4] http://learnaboutfilm.com/soviet-montage/
[5] https://thecharnelhouse.org/tag/soviet-art/
[6] https://www.marxists.org/subject/art/lit_crit/sovietwritercongress/zdhanov.htm
[7] Susan Buck-Morss- ‘Revolutionary Art: The Bolshevik Experience’ pg. 13