fbpx
सामाजिक

हे अटळ आहे

या बालमृत्यूवरून मीडियात काही दिवस गदारोळ होईल. पण दुसरी नवीन ब्रेकिंग न्यूज सापडली कि हा विषय मागे पडेल.  आपण सगळेच विसरून जाऊ. परत पुढील वर्षी हाच प्रयोग भारतातील दुसऱ्या कुठल्यातरी जिल्ह्यात सादर होईल. आणि हेच आरोप, प्रत्यारोप, लगेच प्रकरण विरून जाण, आणि परत पुढील वर्षी असेच शंभर दोनशे सहज टाळता येण्याजोगे मृत्यू हे चक्र अखंड चालू राहील.  कारण या देशात फक्त एकच वस्तू अतिशय स्वस्त आहे, जिची कधीच भाववाढ होत नाही. स्वस्त असल्यामुळे थोडीफार फुकट गेली तरी सरकार किंवा जनता काही मनास लावून घेत नाही. हि वस्तू आहे या देशातील सामान्य माणसाचा जीव. अगदी  सबका साथ सबका विकास ची घोषणा देत सत्तेत आलेले सत्ताधारी असले तरी या देशातील सामान्य माणूस मातीमोलाने मरत राहणार. हे अटळ आहे.

-डॉ अरुण बाळ

गोरखपूर येथे अलीकडेच झालेल्या त्रेसष्ट बालमृत्यू मुळे एक गोष्ट  अगदी स्पष्ट झाली आहे. या देशात काँग्रेसचे सरकार येवो कि भाजपाचे. येथे गरिबास. किड्या मुंगी प्रमाणे मरावे लागणे अपरिहार्य  आहे. त्यात काहीही बदल होणे शक्य नाही. किंबहुना आपल्याकडील सार्वजनिक आरोग्य सेवा ज्या गतीने कोसळत चालली आहे ते पाहता असे हादसे वारंवार होणे अटळ आहे.

गोरखपूर मध्ये मृत्युमुखी पडलेली मुले ज्या रोगाने पीडित होती, त्याचे नाव आहे जापनीज एन्कफलायटिस. हा आजार दुर्धर मुळीच नाही. या वरील लशी सहजी उपलब्ध आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा थोड्या दक्षतेने चालविली तर हा रोग अगदी सहज आटोक्यात येण्याजोगा आहे. जापनीज एन्कफलायटिस हा विषाणू डासां द्वारे  मानवी शरीरात पोहचतो . मानवी शरीरात साधारण २ ते १५ दिवस तो सुप्तावस्थेत राहतो. या काळात रोगी कसलीही लक्षणे दाखवत नाही. त्यानंतर लागण झालेल्या दर अडीचशे केस  पैकी एका केस मध्ये हा विषाणू खऱ्या अर्थाने आक्रमक होऊन रोगाची लक्षणे दिसू लागतात. आशिया खंडात हा विषाणू वारंवार उद्रेक घडवून  आणतो असे आकडेवारी सांगते. दरवर्षी साधारण सत्तर हजार एन्कफलायटिस चे रोगी आशिया खंडात नोंदविले जातात.

या रोगाची साथ पसरली तेथील लोकांची प्रतिकारशक्ती कितपत होती, आणि त्यावर कितपत प्रभावी उपाययोजना केली गेली यावर या रोगाच्या साथीचा  मृत्युदर ०. ३ ते ६० टक्के एवढा असू शकतो. चीन, दक्षिण कोरिया, जपान, थायलंड, तैवान या आशियायी देशानी ह्या रोगाचे पूर्ण उच्चाटन केले आहे.

भारत, नेपाळ मलेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया ब्रम्हदेश या देशांत मात्र एन्कफलायटिस वारंवार आपला हिसका दाखवीत असतो. गेल्यावर्षी ओरिसातील मलकनगिरी या मागास जिल्ह्यात या रोगाने ११६ बळी  घेतले होते. या विषाणूचे वाहक ज्या जातीचे डास असतात ते माणसांपेक्षा गाईगुरांवर अधिक फोफावतात. म्हणूच या रोगाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातच झालेला दिसून येतो. या रोगावर सध्या तीन लसी उपलब्ध आहेत. रोगनिदान करणारी रक्तचाचणी देखील उपलब्ध आहे.

रोगाच्या प्राथमिक अवस्थेत थंडी वाजून ताप येतो. हे साधारण १ ते ६ दिवस चालते. रोग बळावल्यास मान कडक होणे, फेफरे येणे, ताप चढणे अशी लक्षणे दिसू लागतात. या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत निदान होणे फार महत्वाचे असते. विशेषतः गावातील वृद्ध व लहान मुलांना ताप येऊ लागला, कि रक्ताची एलिसा चाचणी करून घेणे आवश्यक असते. कारण जरी लागण झालेल्या २५० पैकी एका केस मधेच एन्कफलायटिस गंभीर रूप धारण करीत असला, तरी त्या एका केस चा वाचण्याचा संभव फारच कमी असतो. असा पेशंट वाचला तरी पुढे आयुष्यभर प्यारेलिसिस किंवा अपस्मार सारखी व्यंगे त्याला आयुष्यभर सोबत करतात.  आताच ज्या देशानी या रोगावर मात केल्याचा उल्लेख केला, त्या देशानी प्रभावी लसीकरणाच्या मोहिमेतून हि गोष्ट साध्य केली आहे.

म्हणजे हा रोग आटोक्यात आणता  येणाजोगा निश्चितच आहे.

 

हे भारतातच  का घडते ?

 

या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सार्वजनिक आरोग्यसेवेत सापडते. भारतीय उपखंडातील साथीचे चे रोग वेळीच आटोक्यात आणता यावेत म्हणून  ब्रिटीशानी भारतात जिल्हावार इस्पितळे उभारली होती. हि इस्पितळे अतिशय प्रशस्त होती. आजही महाराष्ट्रातहि  जागोजागी हि ब्रिटिशकाळात स्थापन झालेली भव्य  सिव्हिल हॉस्पिटल्स नजरेस पडतात.

परंतु ब्रिटिश जे सोडून गेले ते जतन  करण्याची आपली कुवत नव्हती. स्वातंत्रोत्तर काळात आलेल्या सरकारांनी सार्वजनिक आरोग्यसेवेची अक्ष्यम्य हेळसांड केली आहे. साथीचे रोग फैलावू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना वर खर्च करावाच  लागतो. त्याला प्रत्येक सरकारने प्रत्येक अर्थसंकल्पात कात्रीच लावली आहे. सध्या वेगाने फैलावणार्या , टीबी ,स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस अशा रूपात आपण त्याचे परिणाम भोगतो आहोत.

आज भारतात ७०७ जिल्हे आहेत. ५१२ मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्यातून दार वर्षी ५० हजार डॉक्टर तयार होतात. परंतु डॉक्टर   प्रति  रुग्ण व परिचारिका  प्रति रुग्ण  हे गुणोत्तर मात्र जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्रमाण पेक्ष्या फारच कमी आहे. गेल्या डॉ तीन दशकांपासून तर भारतातील सरकारे, वैद्यकीय शिक्षणातून तसेच सार्वजनिक इस्पितळातून आपले आंग काढून घ्यायचे धोरण राबविताना दिसतात. वैद्यकीय शिक्षण व सेवा क्षेत्रात खासगी भागीदारीस प्राधान्य द्यायचे धोरण आहे. अगदी जिल्हास्तरीय रुग्णालयेसुद्धा खासगीकरणाच्या दिशेने ढकलली जात आहेत.

चीन, कोरिया थायलंड तैवान या देशानी डासां मुळे फैलावणारे जे मलेरिया, डेंगू एन्कफलायटिस सारखे साथीचे रोग आटोक्यात आणले, ते त्यांच्या प्रतिबंधक उपाययोजनांचे यश आहे. खर तर हे उपाय काही महागडे नसतात. त्यासाठी डॉक्टर पेक्ष्या प्रतिबंधाचे लोकशिक्षण देणाऱ्या परिचारक व आरोग्य सेवकांचे जाळे विणणे फार महत्वाचे असते.

खरं तर २००५ सालीच प्रत्येक गावात एक आरोग्यसेवक नेमण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली होती. हि योजना २०१२ साली पूर्णत्वास जायची होती. केंद्रीय आरोग्यखात्यांतर्गत या योजनेची तरतूद व्हायची होती. पूर्णत्वास गेल्यावर दहा राज्यात मिळून २ लाख पन्नास हजार आरोग्य सेवक नेमले जाणार होते.

मोठ्या गाज्यावाज्या  ने घोषित झालेल्या  या  योजनेचे पुढे काय बारा वाजले ते आपण पाहतोच आहोत. सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी जर खर्चाची तरतूदच केली नाही, तर साथीच्या रोगाने माणसे किड्यामुंग्यासारखी मरणारच. त्यात नवल ते काय ?

इंडियन क्रिटिकल केअर सोसायटी चे मानक

जे रुग्ण अतिगंभीर अवस्थेत आहेत त्यांना अत्यवस्थ सेवा पुरविण्या बाबत इंडियन क्रिटिकल केअर सोसायटी चे मानक काय आहे ?

तर दार दोन रुग्णांसाठी १ परिचारिका, दर सहा रुग्णामागे १ डॉक्टर, अत्यवस्थ सेवा विभागातील प्रत्येक खाटेस एक महिना अखंड पुरवठा करू शकेल एवढा प्राणवायूचा मध्यवर्ती साठा. हा साठा किती शिल्लक आहे हे दररोज तपासून तो एक महिन्याच्या गर्जे पेक्षा कमी असेल तर तात्काळ व्यवस्थपना कडे आणीबाणीचा इशारा नोंदविण्याची सक्ती अशी मानके  इंडियन क्रिटिकल केअर सोसायटीने ठरवून दिली आहेत. भारतभरातील खासगी व सार्वजनिक इस्पितळात  हि मानके पाळणे बंधनकारक आहे. गोरखपूर चे बी आर डी इस्पितळ हे काही जिल्हा रुग्णालय नव्हे. ते  वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न होते. म्हणजे मुंबईचे नायर किंवा के इ एम च्या पातळीचे इस्पितळ. त्यामुळे प्राणवायू संपल्याची जी कारणे सरकार देत आहे, ती निरर्थक आहेत. तेथील अत्यवस्थ सेवा विभागात दर चाळीस रुग्णामागे १ डॉक्टर असे गुणोत्तर आहे. म्हणजे सध्याच्या युद्धपिडीत सिरीयात सुद्धा याहून बरी परिस्थिती आहे. लाल बहादूर शास्त्रींचे नातू जे सध्याच्या यु पी सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत, त्यांच या प्रकरणी असं मत आहे कि हे सर्व बाल मृत्यू नैसर्गिकच होते. रोगाच्या अतिशय गंभीर अवस्थेत पोचलेली हि बालके दगावली यात कोणाचाच काहीच दोष नाही. हे म्हणजे निलाजरेपणाचा कळस आहे.

या बालमृत्यूवरून मीडियात काही दिवस गदारोळ होईल. पण दुसरी नवीन ब्रेकिंग न्यूज सापडली कि हा विषय मागे पडेल.  आपण सगळेच विसरून जाऊ. परत पुढील वर्षी हाच प्रयोग भारतातील दुसऱ्या कुठल्यातरी जिल्ह्यात सादर होईल. आणि हेच आरोप, प्रत्यारोप, लगेच प्रकरण विरून जाण, आणि परत पुढील वर्षी असेच शंभर दोनशे सहज टाळता येण्याजोगे मृत्यू हे चक्र अखंड चालू राहील.  कारण या देशात फक्त एकच वस्तू अतिशय स्वस्त आहे, जिची कधीच भाववाढ होत नाही. स्वस्त असल्यामुळे थोडीफार फुकट गेली तरी सरकार किंवा जनता काही मनास लावून घेत नाही. हि वस्तू आहे या देशातील सामान्य माणसाचा जीव. अगदी  सबका साथ सबका विकास ची घोषणा देत सत्तेत आलेले सत्ताधारी असले तरी या देशातील सामान्य माणूस मातीमोलाने मरत राहणार. हे अटळ आहे.

 

डॉ. बाळ हे मुंबईस्थित प्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट आहेत. डायबेटिक फूट सर्जरी या विषयात त्यांचे विशेष प्राविण्य आहे.

Write A Comment