fbpx
विशेष

मुंबई दहशतवादी हल्ल्याची १० वर्ष

गेल्याच आठवड्यात मुंबईवर झालेल्या २६/च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाली. दहा दहशतवादी समुद्रामार्गे येऊन ससून डॉकमध्ये उतरले होते. हातात बंदुका, जीन्स पँट आणि टी-शर्ट घातलेले ते सर्व जिहादसाठी आले होते. खूपच विचारपूर्वक हा हल्ला नियोजित केला होता आणि ते तडीस नेण्याचं काम या दहशतवाद्यांनी केलं. त्यानंतर झालेल्या तपास कामानुसार, गुजरातमध्ये नोंदणी असलेली एक मासेमारी बोट या दहशतवाद्यांनी पळवली आणि गेट वे अॉफ इंडियाच्या नजीक पोहोचले. पाठीवर बॅग भरून शस्त्र घेतलेले हे १० जण मग पाच गटांमध्ये विभागले गेले आणि ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन अशा ठिकाणांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात एकूण १२६ लोक ठार झाले. त्यातले ९८ भारतीय नागरिक होते तर १४ पोलीस, १४ परदेशी नागरिक होते तर ३२७ जण जखमी झाले.

दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह दोन अधिकारीही या हल्ल्यामध्ये मारले गेले. करकरे हे मालेगावमधील स्फोटांचा तपास करत होते त्याचा संबंध हैद्रराबादमधील मक्का मस्जिद, अजमेर दर्गा आणि समझौता एक्सप्रेसवर झालेल्या दहशतवादाशी होता.

मुंबईलवर गेल्या दशकांत अनेक दहशतवादी हल्ले झाले. बाबरी मशीद पाडल्यानंतर मार्च १२, १९९३ मध्ये मुंबईत १३ ठिकाणी स्फोट झाले ज्यांत २५७ लोक ठार झाले. घाटकोपरच्या एका बसमध्ये डिसेंबर २, २००२ ला स्फोट होऊन दोन ठार झाले. याला गोध्रामध्ये मुस्लिमांच्या केलेल्या कत्तलीची पार्श्वभूमी होती. त्यानंतर मार्च १३, २००३, जुलै २९, २००३, अॉगस्ट २५, २००३ आणि पश्चिम रेल्वेमध्ये जुलै ११, २००५ अशी स्फोटांची मालिकाच मुंबईने पाहिली. पण या घटनांकडे केवळ स्फोट किंवा हल्ला अशा पद्धतीने न बघता त्याची पार्श्वभूमीही लक्षात घ्यायला हवी. पहिल्यांदा मुंबईमध्ये १९९२-९३ च्या दंगली झाल्या व त्यानंतर या दहशतवादी हल्ल्यांना गुजरात दंगलींची पार्श्वभूमी आहे.

करकरे यांचा मृत्यू मात्र २६/११ च्या हल्ल्यामध्ये अत्यंत दुःखदायी होती. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये वापरलेली मोटार बाइक ही हिंदुत्ववादी कार्यकर्ता साध्वी प्रज्ञा सिंगची होती हे दाखवून दिलं. मालेगाव स्फोटांमध्ये प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित हे दोघेही आरोपी आहेत. त्यांचा संबंध पुढे स्वामी दयानंद पांडे आणि मेजर उपाध्याय यांच्याशी असल्याचं पुढे आलं. करकरे यांनी तपासातून हे पुढे आणलं तेव्हा त्यांच्यावर खूप टीका झाली. शिवसेनेने सामनातून तर अत्यंत वाईट शब्दांत त्यांच्यावर टीका केली.  करकरे यांच्या मृत्यूनंतर सध्याचे पंतप्रधान जे तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी करकरे यांच्या पत्नीला मुंबईत येऊन एक कोटी रुपये देऊ केले.

या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक भाग म्हणजे तरुणांना देण्यात आलेलं प्रशिक्षण. अजमल कसाबला जिवंत पकडल्यावर त्याने दिलेल्या माहितीनुसार, बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ या तरुणांना वारंवार दाखवण्यात आला आणि भारतात मस्जिदी कशा धोक्यात आहेत हे सांगून त्याचा बदला घेण्याचं शिकवण्यात आलं. यामुळेच कसाब भारतात आला होता.

भारत पाक संबंध हेसुद्धा दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत होते. वाजपेयी सरकारच्या काळात संसदेवर हल्ला झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तान बॉर्डरवर अॉपरेशन पराक्रम सुरू केलं. यातून निष्पन्न काहीच झालं नाही केवळ आर्थिक नुकसान आणि मनुष्यबळाची हानी झाली.  २६/११ च्या हल्ल्यानंतर राजकारण्यांना जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. पाकिस्तानवर हल्ला करावा म्हणून सरकारवर प्रचंड दबाव टाकण्यात आला. पण यूपीए-१ सरकारने थोडी सबुरी दाखवली. शेवटी हेच निष्पन्न झालं की, हा हल्ला पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने केला होता. पण पाकिस्तानवर हल्ला झाला असता तर लोकशाही मार्गाने निवडून आलेलं आसीफ झरदारी यांच्या सरकारला धोका होता आणि देशाची सत्ता पुन्हा लष्कराच्या अंकुशाखाली आली असती.

त्यामुळे दहशतवादाच्या घटनांकडे एकांगीपणे न पाहता त्यांचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे.

लेखक हे गेली अनेक वर्षे सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी कार्यरत असून सेक्युलरिझमच्या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांची कम्युनल पॉलिटिक्सः फॅक्ट्स वर्सेस मिथ्स, गॉड पॉलिटिक्स, फॅसिझम अॉफ संघ परिवार, रिलिजन, पॉवर अॅण्ड व्हायलंस अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

Write A Comment