fbpx
सामाजिक

हो ! ‘ते’ विचारांनाच घाबरतात………

‘ते’ फारच अजब असतात. ‘ते’ समाजावर वर्चस्व गाजवू पाहतात. त्या साठी वाट्टेल ‘ते’ करू धजतात. ‘ते’ सामान्यांना दहशतीखाली ठेवतात. धुरीणात्वासाठी भयाचे साम्राज्य पसवितात. ‘ते’ धर्म नावाच्या अफूच्या गोळीने सामन्यांची मती गुंग करतात. ‘ते’  पुरुषसत्तेच्या पायावर जातीचा मनोरा रचतात. ‘ते’ बेमालूमपणे समाजात भ्रम पसरवतात. ‘ते’ संस्कृतीचे मुखंड असतात. ‘ते’ नाडतात, फसवतात, लुटतात. इ इ सर्व करण्यासाठी ‘ते’ एकच मुख्य खबरदारी घेतात ती सामन्यांच्या मेंदूला कुलूप लावण्याची! तुम्ही शिकू नका. ज्ञान घेऊ नका. ते धमकावतात – पायरीन रहा, पायरीन वागा. नेमक काय असत हे पायरीन वागण? ते असत जातीच्या ज्या उतरंडीवर तुम्ही आहत तिथेच रहा, आणि मरा, हे सांगण. जातपुरुषसत्ताक समाज कायम ठेवण्यासाठी ‘ते’ मनुस्मृतीचे चोपडे वापरतात. ‘न स्त्री शूद्राय मतिम दध्यात’ चा मंत्र गिरवला जातो. फक्त लिहून नाही ठेवत, या कुविचारांचे पुनरुज्जीवन आणि पुनरुत्पादनही करत राहतात. त्यासाठी निर्माण केल्या जातात रूढी, परंपरा, चालीरीती इ इ. यासाठीच असतात राम नवमी, कृष्णजन्माष्टमी, गुरु पोर्णिमा, वट पोर्णिमा इ इ . स्त्रीदास्य रुजविण्यासाठी, त्याचा विसर पडू न देण्यासाठी वट पोर्णिमा, निर्हुतीची लेक विदेह गणाची नाईका वैदेही सीतेचा परित्याग करणाऱ्या श्रीरामाचा जयघोष सद्य समाजात होत राहावा, सीते प्रमाणे आज मितीला स्त्रियांनी मुकाटपणे फक्त सोसत आणि सोसतच रहाव हा संदेश जनमनात रुजाविण्याच तर हा घाट असतो. पुरुषप्रधान संस्कृतीचा जागरच तर केला जातो वटपौर्णिमेला! रूढी, परंपरा साजऱ्या करत रहा, त्याची चिकित्सा करू नका, हा त्या मागील मुख्य हेतू. स्त्रीशुदअतिशुद्र शहाणे झाले, शिकले तर आपल्या प्रभुत्वाला धोका पोहचेल हे भय ज्यांना वाटते ‘ते’ घाबरतात इतरांच्या विचार करण्याला.

समाजाचा अर्धा भाग म्हणजे स्त्रिया. या भारत नावाच्या देशात धर्मग्रंथ रचून त्यांना सांगितल जात खबरदार विद्या संपादन केली तर….मनुस्मृती सांगते स्त्रिया शिकल्या तर अनर्थ होतो. शिकलेल्या स्त्रीने स्वयंपाक केला तर अन्नाच्या अळ्या होतात आणि ते अन्न खावून नवरा मारतो. जीवालगाच्या मृत्याच भय दाखविल्यावर स्त्रिया विद्यार्जन करणार तरी कशा? समस्त स्त्रिया लिहू वाचू लागल्या तर त्या स्वतंत्रपणे विचार करू लागतील याचे प्रचंड भय ज्यांच्या मनात होते त्यांनीच स्त्रियांवर ज्ञानबंदी लादली. आणि ती फक्त धर्मग्रंथामधेच नाही तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात. चूल आणि मुल या चौकटीत बंदिवान यासाठीच केले गेले. घर हे तचे सर्वस्व ठरविले गेले. आणि त्या घर नावाच्या संरचनेत काम ते काय करायचे? तांदूळ निवडा, धुणी धुवा, भांडी घासा, रंधा वाढ उष्टी काढा. ज्या कामामध्ये बौद्धीकतेला फारसा वाव, संधी नाही. काय रंधायचं याच स्वतंत्रही नाही. तांदूळ निवडायला खास असे बौद्धीक श्रम लागत नाहीत. स्त्रीपुरुष तुलनाकार ताराबाई शिंदे यांनी याच संदर्भात स्त्रियांना ना कोठे बाहेर जाणेयेणे, ना लिहावाचायची मुभा मग त्यांची मती वाढणार तरी कशी? असा रोकडा सवाल केला होता. अशा प्रकरची ज्ञानबंदी फक्त स्त्रियावारच होती असे नाही; बहुजन पुरुषांवारही होती. रामायण काळात शुद्र शंबूक विद्या संपादन करू लागताच त्याचे शीर धडा वेगळे केले गेले. त्याच्या हत्येचे कारण काय तर एका ब्राह्मणाचा लहान मुलगा मेला. कारण शूद्राने विद्या संपादन करायला सुरुवात केली. आदिवासी एकलव्य श्रेष्ठ धनुर्धारी ठरू नये यासाठी त्याचा अंगठा कापण्यात आला. चार्वाक, महात्मा बसवेश्वर, बुद्ध ते संत तुकोबारायांनी ज्ञान संपादन करण्याचा ‘गुन्हा’ केला असे मानून त्यांना छळण्यात आले. काहीना शारीरिकदृष्ट्या संपले तर काहींच्या विचाराचे ब्राह्मणीकरण करून तर काहींच्या बाबत मौनाचा कट करून संपविण्यात आले. या विचारांचे पाईक असणारे २१ व्या शतकातही त्याच मानसिकतेचे आहेत.

२१ व्या शतकात ब्राह्मणी झुंडशाही बोकाळली आहे. त्याचे बळी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश हे ठरले आहेत. ही गणना इथेच थांबत नाही. राज्यशकट हाती येताच अशाच विचारांच्या अनियंत्रित संघटना, व्यक्ती सक्रीय होतात. कधी ते गोरक्षक बनून तर कधी कर्नाटक मधील भाजपा आमदाराच्या रुपात प्रकट होत आहेत. बसनगौडा पाटील यत्नाळकर या भाजप आमदाराने अलीकडेच विचारवंताना गोळ्या घाण्याची भाषा केली आहे. कोण आहेत हे बसनगौडा ? हो, अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार मध्ये राज्यमंत्री होते तेच हे सदगृहस्थ. कर्नाटकात सध्या ते सत्ताधारी नाहीत. ते म्हणतात मी गृहमंत्री असतो तर विचारवंताना गोळ्या घातल्या असत्या. हा उद्दामपणा येतो कोठून? देशभरात सत्तेत आल्यावर ते काय करू इच्छितात हे बसनगौडा यांनी बोलून दाखवले आहे. त्यांना विचारवंतांची भीती वाटते. समाजाला प्रबोधित करणे त्यांना गुन्हा वाटतो.  अभ्यासातून त्यांचे पितळ विचारवंत उघडे पडतील याचे प्रचंड भय त्यांना वाट आहे. म्हणूच बसनगौडा अतिरेक्यांचा, दहशतवाद्यांचा, जनतेला लुटनार्यांचा, स्त्रियांवर हल्ले करणार्यांचा बंदोबस्त करण्या पेक्षाही विचारवंताना संपवण्याची भाषा करत आहेत. अगदी महात्मा गांधीना गोळ्या घालून संपवलं तस. खरे तर विचारांचा सामना विचारांनीच केला पाहिजे. हा विचार ही ते सोयीने वापरात आले आहेत म्हणा. उदा टाईम्सने अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर टीका केली तेंव्हा यांच्या झुंडीनी टाईम्सचे कार्यालयाची मोडतोड केली होती. तेंव्हा विचारांचा सामना विचारांनी केला नव्हता. आता तर बसनगौडा अविचारी पद्धतीने बोलत आहेत; नव्हे ते संविधानविरोधी बोलत आहेत. गोळ्या घालण्याचे ‘स्वतंत्र’ भारतीय राज्यघटना त्यांनाच काय कोणालाच देत नाही. बसनगौडा यांच्यावर खरे तर गुन्हा दाखल व्हायला हवा.

‘ते’ घाबरतात विचारी माणसाना. ‘ते’ घाबरतात सत्य कथनाला, ‘ते’ घाबरतात शुद्र अतिशूद्र स्त्रियांच्या मेंदूला लावलेले कुलप उघडू पाहणाऱ्या विचारांच्या सामर्थ्याला! विचारवंताच्या आकलन शक्तीचे, विवेकीपणाचे, सर्जनशीलतेचे भय त्यांना वाटते. त्यांना भय वाटते ते पुराणमतवादी विचाराला विचारवंत देत असलेल्या आव्हानाला. वादे वादे जायते तत्त्वबोध! तत्त्वबोध होण्यासाठी वाद्विवाद झाले पाहिजेत ही बौध्द मतप्रणाली त्यांनी कधीच स्वीकारली नाही. पठण, घोकंपट्टी हीच त्यांची अनेक शतकांची परंपरा राहिली आहे. म्हणूच ते कपट करतात, सत्य दडवू पाहतात. त्यांना संविधानाच्या ऐवजी म्हणूनच मनुस्मृती आणायची आहे. त्यांना गांधींचा खून करणाऱ्या नथूरामची जयंती साजरी करायची आहे. महाबळी उत्सव बंद करून वामन जयंती साजरी करायची आहे.

खरे तर विचारवंत असा काही मोठा वर्ग नसतो. तो संघटीतही नसतो. त्याच्याकडे शस्त्रात्रही नसतात. मग त्यांचे इतके भय यांना का वाटते? कारण ते शास्त्रशुद्धपद्धतीने विचार करतात, त्याचा प्रसार करतात. कार्ल मार्क्स म्हणतो विचार जेंव्हा जनमनाची पकड घेतात तेंव्हा ते भौतिक हत्यार बनतात, प्राचीन काळात गौतम बुद्ध प्रज्ञा, विचारप्रबोधन, वादविवाद परंपरेला महत्व देत होते. म फुले यांनी आधुनिक काळात ज्ञानबंदीविरुद्ध बंड पुकारले होते. छ. शाहुनी बहुजन समाजात ज्ञान प्रसाराचे कार्य हाती घेतले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दुध म्हंटले होते. हे ज्ञानरूपी दुध पिऊन व्यवस्थे विरोधात गुरगुरण्याची क्षमता विचारवंतांमध्ये असते, ती सर्वात्रिक होण्याचे भय त्यांना वाटते म्हणूनच ‘ते’ विचारवंताना गोळ्या घालण्याची भाषा करत आहेत. या गोळ्या विचारवंत व्यक्तीला तर घातल्या जातातच पण त्यातून समतावादी, समाज विकसी विचार दाबून टाकण्याचे षड्यंत्रही त्या मागे असते ये लक्षात घेतले पाहिजे.

आचारविचार स्वातंत्र्यची पहिलीवहिली अनुभूती स्त्रीसत्ताक गणसमाजाने अनुभवली होती. स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, गण भूमीचे समान वाटप केले, या राजकार्यामुळे त्या शास्त्या ठरल्या होत्या. स्त्रीसत्तेची आद्य राणी निर्हुतीच्या वारासदारानी याचा विसर पडू देता कामा नये. सद्य स्थितीत अविचाराला राजमान्यता देण्याचे कटकारस्थान सुरु आहे. आपण सारे निर्हुतीचे वारसदार स्त्रीसत्तेकडून समतेचा, संघर्षाचा, सृजनाचा वारसा घेऊन हा कट उलथून लावण्यासाठी कटिबद्ध होऊयात!

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

1 Comment

  1. किशोर Reply

    किती ढोबळ लेख आहे! अशा विषयांची चिकित्सा अधिक मर्मग्राही व मूलगामी स्वरूपाची असायला हवी. त्यात टीकाही असणे गरजेचे आहेच. परंतु अशा लेखांनी आपल्या तथाकथित कंपूशी तथाकथित संवाद साधल्याचे समाधान तेवढे मिळेल, बाकीचे जग आहे तसे चालू राहील. असो. इतक्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना हे कळत नसेल, असे वाटत नाही. तरीही त्यांना हाच मार्ग योग्य वाटत असेल, तर काही बोलावे वाटत नाही. आमच्यासारखे सर्वसामान्य वाचक अशा विषयांना समजून घेण्यासाठी इथे येतात. पण अशा ढोबळ मांडणीने निराशा होते.

Write A Comment