fbpx
सामाजिक

 जातजाणीवा आणि जातीवाद गंभीर वळणावर 

  महाराष्ट्राची ओळख आज ही ‘पुरोगामी महाराष्ट्र’ अशी करून दिली जाते. परंतु ही ओळख काळानुसार बदलत चालली आहे. कोणे एके काळी ती संतांची भूमी म्हणून पुरोगामी होती. नंतर त्यात भर पडली ती छ. शिवरायांच्या कार्य-कर्तृत्वाची. १९ व्या शतकात सत्यशोधक चळवळ, इतर सुधारणावादी चळवळीमुळे परिवर्तनाचे वारे वाहू लागले आणि जातीअन्ताची चळवळ करणारा महाराष्ट्र, स्त्री सन्मानासाठी उभा ठाकणारा महाराष्ट्र हा पुरोगामी असण्याचा संदर्भबिंदू बनला. मग स्वातंत्र चळवळ, दलित चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या निमित्ताने जमीन, पाणी, अस्मिता-आत्मसन्मान, जातीअंत, स्त्रीमुक्ती असे विविध प्रश्न ऐरणीवर आले. निर्हुतीच्या प्रदेशातून या घटनांचे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न.

अलीकडील काळात जाती अत्याचार फार पूर्वीपासून होत आहेत. पण काळानुसार त्याच्या स्वरूप व तीव्रतेत बदल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यात गुणात्मकरीत्या बदल होताना दिसत आहे.  पूर्वी  अशा स्ववरूपाच्या जाती अत्याचाराची चर्चाही केली जात नव्हती. कारण ते अत्याचार ‘स्वाभाविक’ मानले जात होते. कनिष्ठ जातींनाही तो ‘धर्म ‘ वाटावा अशीच मानसिकता घडविण्यात आली होती. जातिव्यवस्थांक समाजात जात जाणीव ‘घडविलया ‘ जातात, त्याचाच तो परिणाम होता. काळ बदलत गेला ताशा जातीजाणिवांमध्ये बदल होताना दिसतात. अर्थातच त्या आपोआप बदलत नाहीत. त्याला विविध करणे आहेत. जाती समाजात जातजाणिवा या पहिल्या टप्प्यावर जाती अस्मितांच्या स्वरूपातच व्यक्त होताना दिसतात. पुढील टप्प्यावर त्या जातीविरोधाच्या दिशेने विकसित होत जातात. अनेक महामावनवांचे विचार, त्यावर आधारित झालेल्या चळवळीच्या परिणामी त्या अधिकाधिक प्रगल्भ, विकसित होत जातात. बदलते उत्पादन साधने आणि संबंध, परिस्थितीत होत असलेले भौतिक बदल त्याला कारणीभूत असतात. प्रबोधनातून जातीविरोधी – अंतक जाणीव विकसित करण्याचे प्रयत्न होत होते. परंतु अराजाक संघगणाच्या काळात गौतम बुद्ध यांच्या वैचारिक नेतृत्वात झालेल्या सामाजिक क्रांतीसारखी जातीस्त्रीदास्यान्ताची क्रांती अद्याप झालेली नाही. आधुनिक काळात, १९ व्या शतकात म. जोतीराव फुले आणि सत्याशोधक चळवळीतून जातिअंतक जाणिवांच्या घडणीला आणि विकासाला सुरवात झाली. २० व्या शतकाच्या सुरवातीला छ . शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर चळवळीतून ती कार्यरत राहिली. आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील दलित चळवळीत ती सामाजिक सर्वहारांपर्यंत पोहचताना दिसते. जाती जाणीव विकसित होऊ लागल्या की  आत्मभान जागृतीला  सुरुवात होते. त्यातूनच माणूसपणाचे हक्कांवर दावा सांगायला सुरवात होते. पारंपरिक जाती मानसिकतेला धक्के बसायला सुरुवात होते तेंव्हा जाती अहंगंडाला धक्का बसतो आणि जाती अत्याचारांना सुरुवात होते. पूर्वी अत्याचार होते पण ते ‘स्वाभाविक’ मानले जाण्यापासून आधुनिक काळात ते जातीच्या नावावर अपमान सहन करणार नाही इथ पर्यंत हा बदल होत जातो. वर्तमानपत्रात आणि अलीकडील काळात सामाजिक माध्यमात साधकबाधक त्याची चर्चा होताना दिसते. अत्याचाराचे स्वरूप बदलले आहे आणि त्याविरुद्ध किंवा बाजूनेही बोलण्याचा, समजावून घेण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत.

जागतिकीकरणानंतर या वास्तवात बदल होऊ लागले. जातीअंत मागे पडत जाती अस्मिता टोकदारपणे पुढे येऊ लागल्या. बदलत्या अर्थव्यवस्थेच्या परिणामी उत्पादन पद्धतीत बदल झाले. बेरोजगारीत वाढ, चंगळवादी संस्कृती बोकाळत गेली. हाताला काम नाही, हराकी – हायब्रीड बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके या चक्राच्या परिणामी शेती आणि शेतकरी हवालदिल झाले. स्त्रिया असंघटीत क्षेत्रात ढकलल्या गेल्या असे विविध परिणाम दिसू लागले.

एकीकडे जाती अस्मिता तीव्र होत जाणे तर दुसरीकडे जाती अत्याचारात कमालीची वाढ होणे असे चित्र २१ व्या शतकाच्या सुरवातीलाच निर्माण झाले आहे. जातीसमाजाची मानसिकता हि जातीयचं असते. हाताला काम नाही, शेतीमालाला भाव नाही, पोराबाळांचे शिक्षण करता यात नाही यासारख्या अनेक कारणासाठी शास्त्रीय पद्धतीने विचार-व्यवहार करण्यामध्ये जात मानसिकता आडवी येते. आधीच्या जातव्यवस्थेत कनिष्ट स्तरावर असणाऱ्या जातींना संविधान, आरक्षण आणि संघर्ष यातून मिळालेल्या किमान जीवनमनाबद्दल असूया, द्वेष निर्माण होतो हा जातिव्यवस्थेचा परिणाम आहे. मध्ययुगापासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून झालेले प्रबोधन जागतिकीकरणाने वजा करायला सुरुवात झाली. कनिष्ट जाती ज्या जाती आत्मसन्मानासाठी, हक्क-अधिकारांसाठी संघर्ष करण्यासाठी पुढे येतात त्यांच्यावर संघटीतपणे हल्ले, मारहाण, दुजाभाव, मानहानी, सामाजिक बहिष्काराचे, इ. हत्यार उपसली जातात. कॉ. शरद पाटील यांच्या मते, आपल्यासारख्या देशात ब्रिटीश आगमनानंतर वर्ग उदयाला आले, त्या आधी जाती याच प्रधान शासन-शोषणाची संस्था होती. जातिव्यवस्थेमुळे भौतिक शोषण होते. या वास्तवाकडे डाव्यांनी दुर्लक्ष केले. भारतीय भांडवलदार वर्ग जो प्राय: बनिया जातीतून आला होता त्याने संकुचित जाती मानसिकतेतून अर्थकारण केले.

जातीव्यवस्था जातीत विभागलेल्या व्यक्तीची क्रयशक्ती निर्धारित करते. कोणी कोणत्या प्रकारचे श्रम करायचे किंवा करायचे नाहीत हे जातीनुसार ठरते. श्रमशक्ती जात्याधीष्ठीत आहे. भारतातील ब्राह्मणी भांडवलशाहीने जातीवार्चास्वामुळे स्वजात केन्द्री, नात्यागोत्यात, सालोहित म्हणजे रक्त संबंधात अर्थकारण मर्यादित ठेवले. स्ववर्गाच्या हितासाठी युरोप मधील भांडवलदार वर्गाने लोकांची क्रयशक्ती वाढविण्याचे काम केले. सरंजामशाही संपून औद्योगिक भांडवलशाही आणली. परंतु भारतातील उच्चजातवर्गीय भांडवलदार वर्गाने हि कामगिरी बजावली नाही. परिणामी समाजव्यवस्थेचा पायाभूत भाग असणारी जात शोषणाची संस्था म्हणून काय राहिली. विकासत अडथळे निर्माण झाले.

सुरवातीच्या काळात जातीविरोधी चळवळीच्या परिणामी नवबौद्ध समुदाय शिकला, संघटीत होऊन संघर्ष करू लागला त्याचावर हल्ले झाले. २१ व्या शतकात ही प्रक्रिया आता मातंग समुदायात सुरु झाली. शिक्षणाचे प्रमाण वाढत चालले आहे. जात संघटनांचे प्रमाणही वाढले आहे. आपल्या जातीच्या माणसावर अन्याय झाला तर या संघटना दाद मागू लागल्या आहेत. आत्मसन्मानाने उभे राहण्याची जात समाजातील अशीच पद्धती राहिली आहे. आत्मसन्मानाची उभारणी होऊ लागली की त्याचा दुसरा परिणाम त्या जातीसमुहावर अत्याचार करण्यातही होतो. महाराष्ट्रात अलीकडील काळात मातंग जातीच्या व्यक्तीवर हल्ले होण्याचे प्रमाण याही कारणामुळे वाढताना दिसत आहे. यासाठी जळगाव आणि लातूर जिल्ह्यातील घडलेल्या दोन घटना लक्षात घेतल्या तरी जातवास्तव अधोरेखित होईल.

वाकडी, ता. जामनेर, जि. जळगाव येथे विहिरीत पोहणे हा गुन्हा ठरवला जाऊन चामड्याचा पट्टा, दांडकी यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. मातंग समाजाची मुले विहिरीत पोहल्यामुळे नग्न करून अत्याचार  करण्यात आले. मारहाण करणे जणू ‘मर्दुमकी’ असल्याच्या थाटात त्याचा व्हिडीओ बनविण्यात आला. त्यात मारहाण करणारे जातीवाचक भाषा वापरतात, हसतहसत- मज्जा घेत मारहाण करतात. हे जाती क्रौर्य आहे. ही आहे जातपुरुषसत्ताक मानसिकता ! पोलीस यंत्रणाही जाती प्रभावपासून मुक्त नाही. अशा घटनांमध्ये तक्रार दाखलच करून न घेणे हा उपाय योजला जातो. जामनेर मधेही तेच घडले आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावचे प्रकरण ताजे असतानाच लातूर जिल्ह्यातही अशीच किंबहुना याहीपेक्षा भयानक घटना घडली. इतकी की गावातील सवर्णांनी केलेल्या भेदभाव, छळ आणि सामाजिक बहिष्काराला कंटाळून लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी या गावातील २४ मातंग कुटुंबांना अखेर गाव सोडावं लागलंय. काय घडल रुद्र्वाडीत? तर मारूतीच्या पारावर मातंग  समाजातील नवरदेवा गेला. देव-धर्म जणू बाटला या मानसिकतेतून त्यांना मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर गावातील २४ मातंग  कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला होता. देशात दलित, मुस्लीम, स्त्रिया या सर्व प्रकारच्या हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत. या मागचे मुख्य कारण ते गतानुगतिक जीवन जगण्यास नकार देत आहेत, ते ‘परंपरांना’ हादरे देत आहेत, ते जुलमाविरुद्ध आवाज उठवीत आहेत, ते स्वतंत्रपणे विचार आणि त्यानुसार व्यवहार करत आहेत – थोडक्यात ते जातीव्यवस्थेनुसार ‘आपल्या पायरी प्रमाणे ’ वागायचे सोडून देत आहेत. त्यांचा विद्रोह पचविण्याची ताकद सनातनी धर्माने अत्याचार करणाऱ्यांना दिलेली नाही. उलट मनुस्मृती प्रमाणे ते शुद्रादीअतिशुद्राना – सामाजिक सर्वहारा वर्गाला शिक्षा करत आहेत. धर्मशास्त्र वर्ण-जाती आधारित आहे. कोण कोणत्या वर्ण-जातीतील आहे या नुसार शिक्षा करणे ही मनुस्मृती आहे. आजहि या अर्थाने मनुमत जिवंत आहे.

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसट होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. जाती संघटना जाती अत्याचारच्या प्रश्नावर आक्रमक होतात हे जात वास्तव समजावून घेतानाच डाव्या-पुरोगामी पक्ष-संघटनांनी जातीअंताकडे केलेले दुर्लक्षही अक्षम्य आहे. जातीअंताची चळवळ बदलत्या युगात नव्या संदर्भात, नव्या पद्धतीने करण्याची गरज आहे. त्यासाठी तत्वज्ञान ते व्यवहार या पातळ्यांवर विचार होण्याची खरी गरज आहे. ना उरबडवेपणा, ना जातीद्वेष सम्यक विचार हे उत्तर असायला हवे.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment