fbpx
विशेष

राजगुरू संघाचे मग नथुराम कोणाचा ?

आयुष्यात केलेली चूक कालांतराने लक्षात आल्यावर सज्जन मनुष्य ती कबूल करतो, पश्चाताप करतो आणि लोकही त्याला क्षमा करतात. ही गोष्ट जितकी व्यक्तीला लागू होते तितकीत संघटनेलाही लागू आहे. परंतू काही व्यक्ती व संघटना ढोंगी असतात. केलेल्या चुकीची लाज तर सोडाच पण त्यांना खंतही नसते. कारण त्यांची चूक ही जाणीवपूर्वक केलेली असते. अशावेळी ती चूक कबूल करण्याएेवजी आम्ही तसं केलेच नाही, हा आरोपच चुकीचा आहे, अशी भूमिका ते ढोंगी घेतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी बेजबाबदारपणे घटस्फोट घेतलेल्या आणि स्वातंत्र्यदिनी सूतक असल्याप्रमाणे वागणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव धारण करणाऱ्या संघटनेची (संघाची) अवस्था त्या ढोंगी माणसासारखीच आहे. या ढोंगातूनच स्वातंत्र्य आंदोलनात संघाने कसा भाग घेतला, संघ संघटना म्हणून नसला तरी संघाचे स्वयंसेवक स्वातंत्र्य आंदोलनात व्यक्तिगतपणे कसे सामील होते याविषयी वारंवार दावे करण्यात आले. स्वातंत्र्य आंदोलनातील संघाच्या आणि एकूणच हिंदुत्वावाद्यांच्या अ-सहभागाची लाज लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न संघ आणि संघाच्या विचारवंतांकडून केला जातो.

संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सहगल यांचा शहीद राजगुरूंना संघाचे स्वयंसेवक ठरवण्याचा प्रयत्न त्याच केविलवाण्या प्रकारात मोडतो.

“भारत वर्ष की सर्वांग स्वतंत्रता” या पुस्तकातील “स्वयंसेवक स्वतंत्र सेनानी” या प्रकरणात सहगल यांनी शहीद शिवराजम राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक होते आणि १९२८ मध्ये ब्रिटीश पोलीस अधिकारी सँडर्सची हत्या केल्यानंतर ते नागपूरला संघ मुख्यालयात आले. पोलीस त्यांच्या शोधात असल्याने संघानचे संस्थापक डॉ. हेगडेवार यांनी त्यांना आश्रय दिला व पुणे येथे न जाण्याचे बजावले, असा दावा या पुस्तकात केला आहे. राजगुरू हे मोहिते बाग शाखेचे स्वयंसेवक होते असा दावाही सहगल यांनी केला आहे.

खरंतर कोण संघाचा सभासद होता वा आहे हे जर संघाची तसे जाहीर करण्याची इच्छा नसेल तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. संघाची सदस्यता फी नसते. संघ गुरूदक्षिणेवर (ती ही गुप्तपणे दिलेल्या) चालतो. सदस्यांचे रजिस्टर ठेवायची पद्धत संघात नाही. त्यामुळे सदस्यत्वाच्याबाबत संघाचा शब्द अंतिम असतो. नथुराम गोडसेने संघ सोडला होता, असं संघाने जाहीर केलं की त्यावर सगळ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवायचा असतो. अर्थात गोपाळ गोडसे याला संघाचा भ्याडपणा म्हणातात व आम्ही सारे नथुरामसह अखेरपर्यंत संघाचेच होतो असे जे म्हणातात ते खोटे समजायचे. पण तसं समजण्यात काही अडचणी आहेत.

राजगुरू यांचा जन्म १९०८ सालचा आहे. १९२८ मध्ये त्यांनी साँडर्सच्या हत्येत भाग गेतला. त्यापूर्वी त्यांनी वाराणसीमध्ये संस्कृतचे अध्यपन केल्याचा आणि ते संस्कृतचे स्कॉलर असल्यचा संदर्भ सापडतो. हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना किमान दोन-तीन वर्ष लागली असणार. १९२८ मध्ये ज्याअर्थी ते साँडर्स हत्येसारख्या महत्त्वाच्या कामगिरीसाठी निवडले गेले याचा अर्थ त्याच्या काही काळ आधी त्यांनी क्रांतीकारक संघटनेमध्ये भाग घेतला असणार. संघाची स्थापना १९२५ची आहे. या काळात म्हणजे १९२८ पर्यंत संघ केवळ विदर्भाचे काही जिल्हे व मध्य प्रदेशातील थोड्या शहरांपुरता मर्यादीत होता. याचाच अर्थ जर राजगुरू संघाच्या शाखांवर जात असतील तर ते व्हिजिटिंग प्रोफेसरसारखे व्हिजिटिंग स्वयंसेवक म्हणून जात असावेत. त्या काळातल्या प्रवासाच्या कमी सुविधा लक्षात घेता हे केवळ अशक्य आहे.

दुसरी अडचण म्हणजे त्या काळात महाराष्ट्र, बंगाल आणि उत्तर भारत अशा तीन ठिकाणी क्रांतिकारक गट जास्त कार्यरत होते. त्यात महाराष्ट्रातला गट हिंदुत्ववाद्यांचा होता. बंगालचा गट प्रामुख्याने हिंदू क्रांतीकारकांचा असला तरी त्यांच्या प्रेरणा अध्यात्मिक होत्या आणि हिंदुत्ववाद्यांप्रमाणे मुस्लिम द्वेष करावा अशा नव्हत्या. उत्तर भारतातील क्रांतीकारकांचा गट हा समाजवादाकडे झुकलेला होता. भगतसिंगांनी तर समाजवाद हा शब्द आपल्या संघटनेच्या नावातच मिळवला. राजगुरू संघाचे सभासद असते तर त्यांना महाराष्ट्र (अर्थात तेव्हा हा गट जवळ जवळ निष्क्रिय झाला होता) वा बंगालच्या क्रांतीकारी गटाला पसंती दिली असती. संघ संस्कारांमध्येच समाजवाद आणि साम्यवादाविषयी घृणा निर्माण केली जाते आणि कम्युनिस्टांना मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यानंतर शत्रू क्रमांक तीन समजले जाते. म्हणूनच राजगुरू संघाचे स्वयंसेवक होते हा दावा टिकणारा नाही. त्यामुळेच कदाचित संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांनी ठामपणे हा दावा न स्वीकारता “होय, असे असू शकेल, होय अशी शक्यता आहे,” अशी जर तर विधानं केली.

आपल्या विधानांना कोणताही आधार न देणे हे संघ प्रकाशने आणि संघाच्या लोकांचे वैशिष्ट्यच आहे. पण असं करताना ही मंडळी एक काळजी घेतात. ती कशी ते पाहुया. १९८० साली के. आर. मलकानी यांनी डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकाळात कधीच प्रसिद्ध न केलेली माहिती प्रसिद्ध केली. “हेडगेवार कुटुंबाची पुजारीपदी नेमणूक खुद्द शंकराचार्यांनी केली होती. हे धर्मरक्षक कुटुंब होते. १९०७ साली डॉ. हेडगेवार यांनी नागपूरात वंदे मातरमला चेतना दिली म्हणून त्यांची शिस्तभंगाखाली बडतर्फी झाली. पोलीस खाते सतत त्यांच्यावर नजर ठेवून होते. कलकत्ता येथे त्यांचा क्रांतीकारकांशी संबंध आला. ते क्रांतीकारकांच्या मेळाव्यात होते. पुलिन बिहारी घोष यांच्यासोबत त्यांनी क्रांतीकारक कामे केली. टिळक मंडाले तुरुंगात गेले तेव्हा त्यांनी एकादश व्रत केले क्रांतीकारक अनुशीलन समितीचे ते पूर्णवेळ सदस्य होते. त्यांनी अनेक धोक्याची कामे केली. १९११ ला दिल्ली दरबार बहिष्कारात त्यांनी पुढाकार घेतला. मेडिकल पदवी घेतल्यावर काही काळ ते पुण्याला टिळकांच्या सोबत होते.” (के. आर. मलकानी, आर. एस. एस. स्टोरी, नवी दिल्ली, १९८०, पान ८). आधी कोणीही न सांगितलेली ही कथा मलकानी हेडगेवारांच्या मृत्यूनंतर ४० वर्षांनी प्रसिद्ध करतात. संघाबाहेरील त्यांचं जीवन पाहिलेले बहुतेक जण तेव्हा हयात नव्हते. त्यामुळे ते सांगतात हाच मलकानी यांचा पुरावा ठरतो आणि त्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवायचा असतो. हे वाचल्यावर मूळात पोलिसांची नजर असताना हेडगेवार डॉक्टर कसे झाले, हा प्रश्न आहेच.

आता गांधीजींबाबतचं दुसरं उदाहरण पाहुया. १९३४ साली २३-२५ डिसेंबरला गांधींनी संघाच्या वर्धा येथील दिवाळी कँम्पला भेट दिली,असा दावा संघाने केला. गांधीजींनी भगव्या ध्वजाला प्रणाम केला. “मी खूप खूप खूष झालो, आपल्या देशात मी असला अपूर्व देखावा इतर कुठेही पाहिला नाही” अशी प्रशस्ती महात्मा गांधीजींनी दिली, ही माहिती अप्पाजी जोशी ३५ वर्षांनी १९६९ मध्ये देतात. (अप्पाजी जोशी, अॉर्गनायजर- महात्मा गांधी सेंटेनरी , १९६९ २२(२४) जानेवारी २६, १९६९, व्हेन गांधी व्हिजेटेड आर. एस. एस. कॅम्प पान १७-२०). यातही पुरावा अप्पाजीच.

खरा पुरावा हा आहे की, गांधीजी संघाला हुकुमशाही संघटना मानीत असत. (आर. डी. गोयल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नवी दिल्ली १९७९ पान २३). या पुराव्याला गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांचा दुजोरा आहे. (प्यारेलाल, महात्मा गांधी, द लास्ट फेज पान ४४०).

नसलेली प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी संघ अशाच प्रकारचा खटाटोप करत असतो. राजगुरू संघाचे स्वयंसेवक होते आणि त्यांना संघाच्या मुख्यालयाने म्हणजे डॉ. हेडगेवार यांनी आश्रय दिला ही गोष्ट आता इतक्या वर्षांनी प्रकट करणे आणि त्याला पुरावा पुन्हा संघ प्रकाशनातच असल्याचे म्हणणे हा अशाच प्रकारचा उद्योग आहे. मध्यंतरी संघाचे शहीद भगतसिंगांवरचे प्रेमही उफाळून आले होते. त्यांना वाचवण्यासाठी गांधीजींनी काहीही केले नाही, हे सत्य आजही आळवले जाते. पण विचारांच्या कसोटीवर भगतसिंग आपल्याला पेलणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आता राजगुरूंवर दावा केली आहे का, असा संशय येतो. किमान तसा संभ्रम तरी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो.

अर्थात लोकमान्यता असलेले सारेच जण संघाचे असतात. नरहर कुरुंदकरांनी ही गोष्ट अत्यंत चपखलपणे मांडली आहे. “ज्या राजकारणाचा प्रवाह जनतेला वास्तविक प्रश्नांबाबत शहाणे करण्याच्या खटपटीत नसतो, तर उलट जनतेच्या श्रद्धा बेमालूमपणे आपल्या राजकारणासाठी ज्यांना वापरायच्या असतात त्यांना सगळेच संत आत्मसाद करणे भाग असते. द्वैत मतवादी, मध्व संघाला प्रमाण आहेत. मध्वांनी ज्यांना कलियुगातील राक्षस म्हटले ते शंकराचार्यही संघाला मान्य आहेत. यज्ञवादी वेद संघाचेच, यज्ञविरोधक बुद्ध हा तर संघाचाच. शिवाजी व राणा प्रताप हे तर हिंदूंचे राज्यकर्ते म्हणून संघाला वंदनीय आहेतच. पण पंजाबात मराठ्यांच्या विरुद्ध लढलेले शीखही संघाचेच! सगळेच आमचे म्हणून टाकल्यावर एकेकाचे कार्य त्यांचे वेगळेपण तपासण्याची गरज काय? (नरहर कुरुंदकर,शिवरात्र पान ६). ”

नेमकी हीच गोष्ट संघाला क्रांतीकारकांच्याबाबतीत करायची आहे. तसं करत असताना आम्हीही कसे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये होतो हे सिद्ध करायचं आहे. याचाच भाग म्हणजे आता राजगुरूंवर केलेला दावा. या ठिकाणीही संघाचा ढोंगीपणा सिद्ध होतो. त्याचवेळी संघाचा खरा प्रचारक असलेल्या नथुरामाने केलेल्या गांधीजींच्या खूनातील आपल्या पापाचा वाटा संघाला नाकारायचा आहे. त्यामुळे नथुराम सदस्य असूनही त्याला दोन हात लांब ठेवणंच संघ पसंत करते. मात्र दूरचा संबंध नसतानाही राजगुरूंना मात्र आपल्या शाखेवर ओढू पाहते.

फॅसिस्टांना सत्य-असत्य, न्याय-नीती अशा कशाशीही काहीही कर्तव्य नसते. आपला छुपा अजेंडा साध्य करण्यासाठी ही मंडळी जनतेच्या मनात भ्रम पैदा करण्यासाठी इतिहासाची मोडतोडच नव्हे तर विकृतीकरण करण्यातही पटाईत असतात. स्वातंत्र्य आंदोलनाशी संघाने केलेली गद्दारी जनता अद्यापही विसरायला तयार नाही. म्हणूनच वारंवार आपण स्वातंत्र्य लढ्यात कसे होतो हे दाखवण्याचा खोटारडा प्रयत्न संघाकडून होत असतो. फॅसिझमच्या विरोधात लढा द्यायचा आहे त्या सर्वांनी हा प्रयत्न हाणून पाडायला हवा. संघाचा स्वातंत्र्यद्रोही चेहरा जनतेसमोर वारंवार मांडायला हवा.

 

लेखक  गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 

Write A Comment