fbpx
विशेष

बीच का रास्ता नहीं होता…

त्रिपुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पराजयानंतर उन्माद इतक्या थराला पोहोचला आहे की, लेनीन यांचा पुतळा जेसीबी लावून पाडून टाकण्यात आला आहे. पुतळा पाडल्यानंतर दाहिने रूख बाये रूख करत हवेत दांडे चालवणारी मंडळी म्हणत आहेत, की लेनीनचा पुतळा पाडला तर इतकं दुःख कशाला करायचं. लेनीन काय भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला सेनानी होता काय? या दंडुकेधारी विद्वानांच्या इतिहासाच्या ज्ञानाबद्दल फारसे न बोललेच बरे. कारण या दंडुकेधाऱ्यांच्या मेरुमणीलाच तक्षशिला बिहारमध्ये असल्याचा साक्षात्कार झालेला आहे. परंतु लेनीन यांचे महत्त्व भारतीय संदर्भात काय आहे हे समजून घ्यायला हवे.

लेनीन यांनी १९१८ सालीच रशियाला ज्या प्रमाणे झारशाहीपासून मुक्तीचा अधिकार आहे, तसाच तो जगातील सर्व देशांना साम्राज्यवादाच्या मुक्तीचा अधिकार असल्याचे म्हटले होते. विशेषतः साम्राज्यवादी वसाहतींमधील देशांना त्यांच्या स्वयंनिर्णयाचा व स्वातंत्र्याचा अधिकार असून त्यांच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यांना आपला पाठिंबा त्याने जाहिर केला होता. त्यातूनच पुढे ताश्कंदमधे गेलेल्या काही भारतीय क्रांतीकारकांनी लेनीन यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चादेखील केली होती. कामगार, शेतकरी, शेतमजुरांचे राज्य क्रांतीद्वारे निर्मिणाऱ्या लेनीन यांच्या बोल्शेव्हिक क्रांतीचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील व सामाजिक लढ्यातील धुरीणांवर परिणाम होणे अपरिहार्यच होते. कारण बोल्शेव्हिक क्रांतीने जगभरातीलच शोषितांच्या लढाईला मोठे बळ मिळाले होते व शोषितांचे राज्य निर्माण होऊ शकते, हे सिद्ध झाले होते. भारतात भगत सिंग हे सर्वात मोठे लेनीनवादी होते. अगदी त्यांना फासावर चढवण्यासाठी जेव्हा तुरुंगाचे कर्मचारी आले तेव्हा ते लेनीनचे ऑन ट्रेड युनियन्स वाचत बसले होते. भगत सिंग यांची फाशी ठरलेल्या दिवसाच्या एक दिवस आधीच देण्यात आल्याने भगत सिंग यांना त्याची कल्पना नव्हती. त्यांना जेव्हा कर्मचाऱ्यांनी सांगितले तेव्हा ते म्हणाले पाच मिनीटे थांबा, एक क्रांतीकारी दुसऱ्या क्रांतीकाऱ्याला भेटतो आहे. भगत सिंग यांनी आपल्या लेटर टू कॉम्रेड्स या पत्रात काँग्रेस पक्षाच्या बड्या भांडवलदार व जमिनदार धार्जीण्या भूमिकेला आपला का विरोध आहे, हे स्पष्ट केले आहे. गोऱ्या रंगाचे राज्यकर्ते जाऊन काळ्या रंगाचे राज्यकर्ते आल्याने या देशाचे काहीही भले होणार नाही. या देशातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाजाचे शोषण थांबविण्यासाठीच राज्यशकट हातात घ्यायला हवा, असे म्हणत काँग्रेस पक्ष व गांधीजी यांनी अहमदाबाद येथील कॉटन टेक्सटाईल कामगारांच्या संपाला विरोध करण्याचा भगत सिंग यांनी निषेध केला होता. भगत सिंग हे पूर्णतः मार्क्सवादी-लेनीनवादी विचारधारेचे पाईक झाले होते, यासाठी यापेक्षा आणखी कोणत्याही उदाहरणाची गरज नाही. भगत सिंग यांचे साथीदार शहीद कॉम्रेड सुखदेव हे ज्या किर्ती किसान पार्टीचे सदस्य होते हा पक्ष तर थेटच लेनीनवादी होता.

देशात केवळ भगत सिंगच नाही, तर अनेक क्रांतीकारकांनी बोल्शेव्हिक क्रांतीपासून प्रेरणा घेतली होती. रशियन क्रांतीचा भांडवली ब्रिटीशांवर इतका खोल परिणाम झाला होता व त्यांच्या मनात इतकी प्रचंड भिती घर करून राहिली होती की, १९१८ नंतर देशातील कुठल्या सशस्त्र क्रांतीकारी गटाला बोल्शेव्हिक असेच पोलीस रेकॉर्डमध्ये नोंदविणे त्यांनी सुरू केले होते. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर स्वतः शाहू महाराजांनी आपल्या कामगारांसमोरील दोन भाषणांमध्ये बोल्शेव्हिक क्रांतीचे उदाहरण देऊन त्याचे कौतुक केले होते. समोर उपस्थित कामागारांना उद्देशून शाहू महाराजांनी तिथे रशियात कामगारांनी क्रांती केली असून आता तुम्हालाही काही निर्णय घ्यायला हवा, असे थेट आवाहन केले होते. दिनकरराव जवळकर यांच्या लिखाणात तर बोल्शेव्हिक क्रांतीच्या स्वागताचे अनंत दाखले आहेत. अगदी पेरियारदेखील सोव्हिएत युनियनला भेट देऊन आले होते व लेनीन यांच्या नेतृत्वात झालेल्या बोल्शेव्हिक क्रांतीचे समर्थक होते. चलेजाव आंदोलनात कम्युनिस्टांचा सहभाग नव्हता, असा आरोप कायम, काँग्रेस व समाजवादी धुरिणांकडून केला जातो. मात्र चले जाव आंदोलन जाहिर झाल्यावर देशभरात काँग्रेसच्या सर्वच लहान मोठ्या आंदोलकांना ब्रिटीशांनी तात्काळ पकडून तुरुंगात टाकले होते. त्यावेळी हे आंदोलन पुढे महाराष्ट्रात सुरू ठेवण्याची सर्वात मोठी जवाबदारी कुणी पार पाडली? त्यांचे नाव होते क्रांतीसिंह नाना पाटील! या ढाण्या वाघाला ब्रिटीश सरकार चळचळ कापत असे. नाना पाटील कुठल्या विचारांचे होते बरे? ते कोणत्या पक्षातून संसदेवर निवडून गेले होते बरे?

ब्रिटीश साम्राज्यशाहीचे जोखड झुगारून देशातील गोरगरिब जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार हवा, स्वातंत्र्य हवे, यासाठी या देशात ब्रिटीश साम्राज्यशाहीच्या विरोधातील जे लढे संघटित झाले त्यात कानपूर कॉन्स्पिरसी व मिरत कॉन्स्पिरसी ही दोन प्रकरणे विख्यात आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये केवळ आणि केवळ कम्युनिस्ट नेतेच सहभागी होते. एम. एन. रॉय, कॉम्रेड श्रीपाद डांगे, शौकत उस्मानी,  मुझफ्फर अहमद, नलिनी गुप्ता हे सगळे लनीनवादी नेते होते. मार्क्सच्या विचारांवर आधारित कामगार वर्गीय क्रांतीचे आद्य पुरुष लेनीन हेच त्यांची प्रेरणा होते.

डांगे, उस्मानी मुझफ्फर अहमद याच नेत्यांना पुढे मिरत कॉन्स्पिरसीत ब्रिटीशांनी अटक केली. १९२४ ते १९३० या कालखंडात हे सगळे नेते तुरुंगात होते.

अशी अनंत उदाहरणे या ठिकाणी देता येतील. प्रश्न आहे तो लेनीनचा पुतळा तोडल्याने आनंद व्यक्त करणारे याच कालावधित काय करत होते? ते देशातील ब्रिटीशविरोधी कुठल्या चळवळीत सामील होते, याचा एक दाखला तरी त्यांनी द्यावा. लेनीनच्या विचारांनी प्रेरित होऊन तुरुंगवास व फाशीसारख्या सजा क्रांतीकारक भोगत होते तेव्हा या दंडुकाधाऱ्यांचे आद्य पुरुष जर्मनीत जाऊन हिटलरची भेट घेत होते, मुसोलीनीची भेट घेत होते. एखाद्या धर्मविशेषाच्या विरोधात द्वेष कसा पसरवावा याच्या टिप्स घेऊन त्यांच्यासारखाच गणवेश घालणारी एक फौज यांच्या आद्य पुरुषांनी या देशात उभी केली. काँग्रेसच्या भांडवली धोरणाशी मतभेद असूनही ब्रिटीश साम्राज्यवादाच्या विरोधातील स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान वादातीत आहे. समाजवाद्यांच्या भंपक बालीश भूमिका या अनेकदा फॅसिस्ट पक्षांना मदत करणाऱ्या असल्या तरी त्यांच्या आद्य पुरुषांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान वादातीत आहे. मात्र या देशातील जी विचारधारा आज सत्ताधारी झाली आहे, त्यांनी हा देश ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी नक्की केले काय? रणनिती म्हणून ब्रिटीशांना माफीनामे लिहिणे व मुक्तता झाल्यावर ब्रिटीश देश सोडून जात नाही तोवर एकाही सरकारविरोधी आंदोलनात सहभागी न होणे या पलिकडे कोणते कर्तृत्व लेनीनचा पुतळा पाडणाऱ्या विचारधारेने दाखविले आहे?

पुतळे कधीही उभे करतात येतात. प्रश्न आहे तो भारतीय राजकीय संस्कृतीत अशा प्रकारचे टोकाचे राजकारण आजवर घडत नव्हते. आधी माणसे मारण्याचे पर्व सुरू केले, जे अजूनही संपलेले नाही. गौरी लंकेशच्या हत्येत पकडलेल्या आरोपीची पाळेमुळे काय आहेत, याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्याच आहेत. अाता पुतळे पाडण्याचे पर्व सुरू झाले आहे. एका अर्थी हे बरेच आहे. या देशात सबगोलंकारी भूमिका घेणाऱ्यांचे जे पेव फुटले होते, ते या निमित्ताने कमी होईल. बीच का रास्ता नहीं होता असे महाकवी पाश यांनी आपल्या तुम्हारे बगैरे मै होता ही नही या कवितेत म्हटले आहे. या देशात बीच के रास्ते शोधणाऱ्या पिढीला शहाणं बनविण्याची ही कृती त्रिपुरातील ज्या महाभागांनी केली आहे, त्यासाठी त्यांना धन्यवादच द्यायला हवेत. त्यांनी एका नव्या पर्वाची सुरुवात या देशात केली आहे. या देशात राज्ये आली व गेली. अगदी अलेक्झांडरपासून ते लोधी आणि मोगलांपर्यंत भली मोठी साम्राज्ये लयास गेली. अगदी या देशातील लोकशाही संपवून समजा उद्या कुणी साम्राज्यशहा उभा राहिलाच, तरी या देशातील जनता त्याच्या विरोधात लढणे सोडणार नाही हे नक्की. ज्या दिवशी लढाईत लेनीनचा पुतळा पाडणाऱ्यांचा पराजय होईल, त्या दिवसाचा विचार करा. त्या दिवसाकरिता स्वतःच्या धुरीणांच्या पुतळ्या भोवती नक्की कसले कोट तुम्ही उभे करणार आहात, हा एकच प्रश्न या निमित्ताने त्यांना विचारावासा वाटतो!

लेखक न्यू जर्सी स्थित राजकीय विश्लेषक आहेत.

Write A Comment