fbpx
सामाजिक

सर्वच जातीच्या ठेकेदारांची मानसिकता स्त्रियांच्या ‘ कौमार्य ’ तपासणीचीच…

भारतीय समाजात आजही जातपुरुषसत्ताक मूल्यव्यवहार राजरोसपणे चालू आहेत. जाती समाजात स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेऊन जातीची उतरंड कायम आणि भक्कम केली जाताना दिसते. स्त्रियांच्या शरीर, मन, श्रम आणि सर्वस्वावर जात पुरुषांचा ताबा-नियंत्रण-वर्चस्व ठेवणाऱ्या अनेक प्रथा, रूढी, परंपरा, चालीरीती निर्माण करण्यात आल्या. मनुस्मृतीसारखे अनेक ब्राह्मणी ग्रंथ मुलीच्या जन्मापासूनच नाही तर तिचा जन्मच नको इथ पर्यंतचा विचार रूढी-परंपरांचा आधार देत सांगतात.

‘ त्यांच्या बायका ’- ‘आमच्या स्त्रिया ’

ब्राह्मणी-पुरुषसत्ताक मुल्य संस्कृती स्त्रियांचे भेदभावार आधारित वर्गीकरण करते. मुली, कुमारिका, बाई, स्त्री, महिला, पोरी या शब्दांना वेगवेगळे अर्थ प्राप्त करून दिले गेले आहेत. तथाकथित संस्कृती रक्षक या शब्दांचा चपखलपणे वापर करीत असतात. ते सहसा स्त्री ऐवजी महिला या शब्दाचा वापर करतात. स्त्री शब्द त्यांना मुक्तीशी जोडला गेल्याने वापरण्याजोग वाटत नसावा; परंतु, ‘आमच्या स्त्रिया ’ या शब्दाचा वापर जाती अहंगंडच्या राजकारणात परवलीचा शब्द असतो. ‘ त्यांच्या बायका ’ , ‘आमच्या स्त्रिया ’ असा भेदभाव / विभेदन जाती अहंगंडच्या राजकारणात  दिसते. संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या वेळीही टीव्ही चॅनेल वरून सद्य पेशवीण बाईनी ‘आमच्या स्त्रिया ’ अश्या नाचत नाहीत असे उभ्या महाराष्ट्राला ऐकविले होते. पद्मावत सिनेमातही ‘आमच्या स्त्रिया ’ ही जातपुरुषसत्ताक परिभाषा सर्रास वापरली जात आहे. जाती अहंकार आणि अहंगडात ‘आमच्या स्त्रिया ’ अशी भाषा तर पर जातीतील स्त्रियासंदर्भात ‘ त्यांच्या बायका ’ असा हिनवणारा शब्दप्रयोग केला जातो.

स्त्रियांचे सधवा, विधवा, कुमारिका, बाजारबसवी, परित्यक्ता असे वर्गीकरण ब्राह्मणी धर्म करतो. स्त्रिया सधावा, विधवा, कुमारिका….या पैकी कोण असतील, त्या नुसार त्यांची  कुटुंब, समाजातील प्रतिष्ठा-अप्रतिष्ठा ठरविली जाते. ब्राह्मणी धर्मातील काही सण-उत्सवांमध्ये कुमारिकांना मान दिला जातो, वयात आल्यावर म्हणजे तिला ऋतुप्राप्ती झाल्या नंतर घरात गोडधोड बनवले जाते, आप्तस्वकीय स्त्रियांना बोलवून तिच्या फलवती होण्याचा गौरव, उदात्तीकरण करतात. मुलगी वयात आली, ती आता अपत्य निर्मिती करू शकते यासाठी वयात येणाऱ्या मुलीला या समारंभात सन्मान दिला जातो. ‘ संस्कारी गर्भावती ’ कडे तिचा प्रवास सुरु होणार याची ती नांदी असते. योनिशुचिता, शुद्धता या सारख्या संकल्पनांमधून स्त्रियांच्या चारित्र नावाच्या घडविल्या गेलेल्या संकल्पने भोवती तिला बांधून ठेवले जाते.                                 स्त्रीसत्ताक गणसमाजात अश्या स्त्रियांना बंदिवान करणाऱ्या, त्यांच्या लैंगिकतेवर पहारा ठेवणाऱ्या मूल्यांचे तुरुंग उभारले गेले नव्हते. निर्हुती दुर्गेच्या प्रदेशात असे शुद्धतेचे, योनिसुचीतेचे ब्राह्मणी नीतीनियम नव्हते. परंतु मावळती स्त्रीसत्ता आणि उगवत्या पुरूषसत्तेचा काळ म्हणजे रामायण-महाभारत कालखंड. या काळात सीता ही परित्यक्ता म्हणून रानावनात सोडून दिली जाते. तिला ही शिक्षा चारित्र्याच्या संशयावरून दिली गेली होती. स्त्रीसत्तेच्या ऱ्हासानंतर उगवत्या पुरुषसत्ताक समाजात स्त्रिया क्रय्य (म्हणजे विक्री योग्य ) आणि वध्य (म्हणजे जिंकून घेण्याजोग्या )बनल्या हा इतिहास प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी उकलून दाखविला आहे.

इसवी सन पूर्व ५ वे शतक – बुदधोत्तर  कालखंडात जातीव्यवस्था उदयाला आली. जातीव्यवस्था घट्ट होण्याच्या काळात जातीची प्रतिष्ठा, भावकी, इभ्रत ही स्त्रियांच्या शरीराशी, लैंगिकतेशी, तिच्या कुटुंबातील स्थानाशी, जातीतील पुरुषांच्या अहंगडाशी जोडली गेली. म्हणजे जात-पुरुषसत्तेची व्यवस्था भक्कम करण्यासाठी मुलींची ऋतुप्राप्तीपूर्वी लग्ने लाऊन देणे, स्त्रियांना ज्ञानार्जानाचा अधिकार नाकारणे, पावित्र्याच्या, शुद्धीच्या नीतीनियमांचे ओझे त्यांच्यावर टाकण्यात आले. या प्रकारची व्यवस्था कायम करण्यासाठी जातीपंचायती सारख्या संरचना उभ्या राहिल्या.

जात-पुरुषसत्ताक मूल्यव्यवस्थेला चिरस्थायी करण्याचे काम नंतरच्या काळात विवाह संस्थेने केले. विवाह संस्थेचाही एक इतिहास आहे. गण समाजात स्त्री-पुरुष सहागमन होते, गंधर्व विवाह, सकुल, सपिंड विवाह, वैदिक विवाह, शैव विवाह इ. प्रकार चालत आलेले दिसतात. परंतु जातपुरुषसत्ताक समाजातील विवाह हे जाती घट्ट करण्याचे एक साधन बनले. त्यात स्त्रियांची मर्जी, तिचे मत पूर्णतः डावलले गेले. जातीश्रेष्ठत्व, कुलीनता दाखविण्यासाठी विवाहाचे नीतीनियम स्त्रियांवर अधिकाधिक अन्याय करणारे, दुय्यम लेखणारे बनले. जाती अंतर्गत विवाह, रोटी-बेटी व्यवहार जाती अंतर्गत करणे हे जाती व्यवस्थेचे एक लक्षण असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटले आहे. त्या नुसार विवाह होऊ लागल्या नंतर अल्प वयातच जाती अंतर्गत विवाह करणे हीही पद्धत रूढ होऊ लागली. जातीअंतर्गत किवा कोणत्या विवाहात वधू – मुलगी वर – मुलापेक्षा वयाने लहान असावी, गृह्श्रम करणारी असावी, आपल्या नियंत्रणात रहाणारी असावी असे निकष जातीपुरुषसत्ताक समाज तयार करतो. ऋतुप्राप्ती पूर्वी विवाह करण्यामध्ये मुलगी ‘ कोरी ’, शुद्ध योनीची, भ्रष्ट न झालेली याच कल्पना कार्यरत असतात.

जातीव्यवस्थेत सर्वात शेवटी सहभागी झालेल्या वर्ण, जमाती यामध्ये ही स्त्रीयान्संदार्भातील मुळ कल्पना दीर्घकाळ टिकून राहिलेल्या दिसतात. भटक्या, विमुक्त जाती-जमातीमध्ये आजही विवाहाच्या वेळी स्त्रियाच्या संदर्भात तथाकथित शुद्धीचे, पावित्र्याचे, चारित्र्याचे नियम पाळले जाताना दिसतात. पुण्यात पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच अशीच एक भयावह घटना घडली. कंजारभट जमातीचे . पिंपरी येथे सनी मलके यांच्या बहिणीचे लग्नकार्य होते लग्न होते. कंजारभट जमातीत विवाहानंतर आजही जातपंचायत भरवली जाते. त्यात वधूच्या वडिलांकडून लग्नावर अधिकृततेचा शिक्का घेण्यासाठी जातपंचाना पैसे देण्याची ‘ ख़ुशी ’ नावाची प्रथा पार पाडली जाते. तसेच लग्नानंतर वधूला लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्याची परीक्षेच्या अग्निदिव्यातून जावे लागते. काही भटक्या जातीपंचायती लग्न नंतर त्यांच्या उपस्थितीत एका बंद खोलीत नवविवाहित जोडप्याला जाण्यास सांगतात. वधूवराची कसून तपासणी केली जाते. त्यांच्या कडे ब्लेडचे पाते इ. नाही याची खात्री केली जाते. एक पांढरा रुमाल किंवा वस्त्र वर मुलाकडे दिले जाते. शरीरसंबध दरम्यान लाल डाग वस्त्रावर पडला की नाही हे जातपंचाना दाखविले कि मग विवाह ‘ खरा ’, ‘ वैध ’ घोषित केला जातो. या सर्व प्रकारात ज्या प्रकरची भाषा वापरली जाते ती स्त्रियांना एक उपभोगाची वस्तू मानणारी असते. पंच वर मुलाला विचारतात माल खरा आहे कि खोटा? वधूचा उल्लेख  ‘ माल ’ असा केला जातो. ‘ माल ’ खरा कोणता तर पांढऱ्या रुमालावर लाल रक्ताचा डाग पडल तो.

यात कोणती मानसिकता काम करते? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. ‘ माल ’ खरा की खोटा या प्रश्नात वधूच्या शुद्धतेचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. तिचे पर पुरुषामुळे लग्न आधीच कौमार्य भंगलेले नाही याची तपासणी आहे. त्यानुसार तिचा सन्मानच काय भवितव्य अवलंबून आहे. वराची – पुरुषांची शुद्धता तपासली जात नाही. कारण त्यांना अनेक स्त्रियांशी संभोगाचा, विवाहाचा अधिकार मनुस्मृतीसारख्या संहिता देतात. जाती समाजात जात अधिकाधिक कप्पेबंद करण्यासाठी सर्व बंधने, नीतीनियमांचे ओझे स्त्रियांवर टाकले जाते. जात पंचायतीती सर्व पुरुषच असतात. स्त्री सभासद त्यात नसतात. आणि स्त्रियांना जात पंचासमोर आपली बाजू, मत मांडण्याचा अधिकार नसतो. डॉ. आंबेडकर यांनी जाती स्त्रीयायांवर बंधने लादूनच टिकविल्या गेल्याचे म्हंटले आहे ते अश्या घटनांमधून अधोरेखित होत राहते.

कौमार्य चाचणीचे प्रकार फक्त भटक्या जमातीमधेच होतात का? याचे उत्तर फक्त हो किंवा नाही अश्या स्वरूपाचे देणे चुकीचे ठरेल. कारण प्रत्यक्ष कौमार्य तपासणीचे अग्निदिव्य इतर जातीत केले जात नसले तरी विधवा पुनर्विवाहास अजिबात मान्यता न देणाऱ्या जाती याच प्रकारचा व्यवहार करत असतात. त्यांची मानसिकता त्याच प्रकारची असते. एखाद्या स्त्रीचा पहिला विवाह झाला म्हणजे कौमार्याचा भंग झाला असे मनण्यात येते. म्हणजे त्या स्त्रीरुपी वस्तूचा एका पुरुषाने वापर केला, ब्राह्मणी धर्मानुसार आता तिचा पुन्हा सन्माने दुसरा विवाह होऊ शकत  नाही.  भटक्यांमध्ये पुनर्विवाह असला तरी तिचे जातव्यवस्थेवर उभ्या समाजात तिचे दुयामत्व आणि वस्तूकरण अधोरेखित करण्यासाठी कौमार्य – व्यभिचार इ. चारित्र्यविषयक संकल्पना आकार घेतात.

जात ही एक पद्सोपानात्मक संरचना आहे. डॉ. आंबेडकर यांनी तिचे वर्णन श्रेणीबद्ध विषमता असे केले आहे. या जात श्रेणीच्या जसजसे वरच्या बाजूस गेल्यास – म्हणजे उच्च जातींमध्ये हे नीतीनियम काटेकोरपणे अमलात आणले जाताना दिसतात. जातीची वरची श्रेणी जाती अहंकार देते, जात प्रतिष्ठा जपण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला जाताना दिसतो. मग या तथाकथित जातप्रतिष्ठेसाठी जातीतील स्त्रियांवर कडेकोट पहारा, नियंत्रण ठेवले जाते. करुनारू जातीमध्ये सती प्रथा, विधवा पुनर्विवाहास बंदी, स्त्रियांनी फक्त गृह्श्रम करत सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश करू नये या सारखी बंधने दिसत नाहीत. कारण या श्रमशक्तीचा ऱ्हास या कष्टकरी जातींना परवडणारा नव्हता असे विश्लेषण शरद पाटील यांनी केले आहे. जाण्याची साधने नाहीत , त्यासाठी सार्वजनिक श्रमात उतरणे अपरिहार्य – स्तलान्तारा मधली असुरक्षितता, विशेषतः स्त्रियांबाबत पराकोटीची. हे द्वंद्व भटक्यांमध्ये दिसते. त्यातून भटका पुरुष स्त्रीविरोधी हिंसेत ‘ जातीने ’ उतरतो.

ज्या जाती विधवा पुनर्विवाहास मान्यता देत नाहीत, त्या स्त्रियांकडे कौमार्य भंग झालेली बाई या प्रकारेच बघतात. वर्तमानपत्रात जरी कंजारभाट, गोपाळ समाज इ. ची उदाहरणे प्रसिद्ध होत असली तरी इतर उच्चभ्रू जातींचा स्त्रीयासंदार्भातील व्यवहार फारसा वेगळा नाही. त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत. भटक्या जमातीमाधे जातपंचायती आजमितीला कार्यरत असल्यामुळे या जमातीतील स्त्रिया अधिक शोषित आहेत हे खरे, पण सर्व जातींना व्यापून असलेली पुरूषसत्ता स्त्रियांकडे बघण्याचा शुद्धतावादी-उपभोगवाद हा दृष्टीकोन सार्वत्रिक स्वरूपाचा आहे. तथाकथित आधुनिकीकरण न झालेल्या भटक्यांमध्ये क्रौर्य दिसते. विकासाच्या प्रक्रियेतून दूर ठेवायचे आणि पुन्हा मागास, स्त्रीविरोधी, हिंसक म्हणून जाहीरपणे हिणवायचे राजकारण अश्या बातम्यांमध्ये दिसते, हीदेखील एक बाजू आहे. बदलत्या अर्थ-सामाजिक-राजकीय परिस्थितीच्या परिणामी काही जातींनी स्वजातीय स्त्रियांच्या नितीकल्पनेत बदल केले आहेत हे जरी खरे असले तरी स्त्रियान्संदर्भात सर्वसाधारण परिस्थिती फार बदलेली नाही हे खरे. विषमतेच्या जुन्या प्रथांना पुन्हा प्रकाशात बाकी तर अंधारतर जुनाच !

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

Write A Comment