fbpx
राजकारण

फिटली काय हौस ?

येणारी दोन वर्षे भारतीयांसाठी अतिकठीण असणार आहेत. भाजपाने विकासाचा वादा करीत २०१४ साली सत्ता हस्तगत केली खरी. एकदा सत्ता काबीज केल्यावर विकासाच्या कामाला लागण्यापूर्वी, विकासात अडथळे येऊ नयेत म्हणून की काय त्यांनी सर्वांवरच जबरा वचक बसविला. राजकीय विरोधक, सरकारी कर्मचारी, उद्योगजगत, मीडिया सगळ्यांचीच भादरून टाकली. भाजपा पहिल्यांदाच सत्तेत आले होते अशातला भाग नाही, परंतु या खेपेस त्यांनी दिलेले नेतृत्व जरा जास्तीच खंबीर निघाले.

२०१४ निवडणूक पूर्वप्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी पाकिस्तानची इट से इट बजाऊंगा, चीन के आंख में आंख डालके बात करुंगा वैगेरे गोष्टी केल्या
होत्या, प्रत्यक्षात परराष्ट्र नीतीमध्ये हे नेतृत्व खरोखर किती यशस्वी झालंय ते भारतीय वृत्तसंस्थांमधील बातम्या वाचून, पाहून सांगता येणं अशक्य आहे.परंतु पाकिस्तानी हद्दीत भारताने एक सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याला भरपूर प्रसिद्धी देण्यात आली. यापूर्वीच्या सरकार मधील मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार अशा स्वरूपाचे सर्जिकल स्ट्राईक भूतकाळातही करण्यात आले होते, परंतु राजनैतिक कारणास्तव त्यास प्रसिद्धी देण्यात आली नव्हती. या व्यतिरिक्त मोदीजींनी कारभार हातात घेतल्यावर काश्मीरमधील दहशतवाद, भारतीय सैनिकांवरील हल्ले सारे खतम होईल ही जी जनतेची अपेक्षा होती ती पूर्ण झालेली दिसत नाही. अलीकडेच चीनने भूतानमध्ये केलेल्या अतिक्रमणातून उदभवलेल्या डोकलाम वादात, भारतीय फौजेला आणि खंबीर नेतृत्वाला टरकून चीन डोकलाम मधून शेपूट घालून परत जाईल अशी जनतेची अपेक्षाही पूर्ण होताना दिसली नाही. हे सार ठीकच आहे. आंतरराष्ट्रीय मामल्यांत बडी राष्ट्रे लुडबुड करतात त्यामुळें युद्ध करून प्रतिस्पर्ध्यास धडा शिकविण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागते, त्यामुळे चीन पाकिस्तानवर वचक बसविणे कदाचित शक्य झालं नसेल तर ते समजण्यासारखं आहे. त्याची भरपाई पंतप्रधानांनी देशांतर्गत सर्व घटकांवर पुरेपूर वचक बसवून केली असावी.

सत्तेत आल्यावर त्यांनी पहिले छूट मीडियावर वचक बसवला. त्यांच्या विरोधात सूर लावणाऱ्या किती एक संपादकांची, अँकर्सची गच्छन्ति होताना आपण पहिले . त्याचवेळी त्यांनी विरोधी पक्षांवर डोळे वटारले. भ्रष्टाचार केवळ विरोधी पक्षातील नेत्यांनीच केला होता अशातला भाग नाही. तो सर्वपक्षीय होता आणि आहे. २००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे पुत्र सर्वश्री राहुल महाजन यांचा दिवसाचा खर्च ६० ते ७० हजार रुपये एवढा होता असे दिल्ली पोलिसांनी एका ड्रग केस मध्ये केलेल्या चौकशीत समोर आले. हे खरे असेल तर हे पैसे काय प्रमोदजींनी घाम गाळून स्वकष्टाने मिळविलेले होते काय, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. परंतु या पूर्वीच्या सर्वच सरकारांची व राजकीय पक्षांची भूमिका भ्रष्टाचाराबद्दल फारच सहिष्णू होती. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व भ्रष्टाचार बिलकुल खपवून घेणार नाही.” न खाऊंगा न खाने दूंगा” असे वचन मोदीजींनी २०१४ साली दिले होते, परंतु या “न खाने दूंगा”ची एक खास कॅटेगरी आहे. व्यापम चा महाघोटाळा ज्यात आजवर चाळीसहुन अधिक साक्षीदारांचे ‘संशयास्पद’ मृत्यू झालेत आणि ज्यात संशयाची सुई फिरून फिरून भाजपाच्या व संघपरिवाराच्या वरिष्ठ नेत्यांकडे वळतेय तो भ्रष्टाचार ‘खाने दूंगा” या कॅटेगरीत मोडत असावा. अन्यथा आपल्या कणखर व वचनास पक्क्या प्रधानमंत्रानी आजवर व्यापम घोटाळ्यातील दोषींना चक्की पिसायला तिहार तुरुंगात बसविले असते.

असाच वेस्ट बंगाल मधील मुकुल रॉय चा भ्रष्टाचार खरं तर मोदीजी बिलकुल खपवून घेणार नव्हतेच. मुकुल रॉयच्या बरोबरच्या ज्या दोघांवर श्रद्धा चिट
फ़ंड घोटाळ्यात आरोपी होते, ते मदन मित्रा आणि सुदीप बंडोपाध्याय तुरुंगात सात-आठ खेळत बसलेत. मुकुल रॉयनी वेळेत तृणमूल सोडून भाजपात प्रवेश केला म्हणून नाहीतर आज हे तिघे, तुरुंगात पाच तीन दोन खेळत बसलेले दिसले असते. हिमाचल मध्ये काँग्रेस नेते सुखराम व त्यांच्या पुत्राचा भ्रष्टचार असाच “खपवून घेणार नाही” कॅटेगरी मधून “खपवून घेऊ” श्रेणीत आपल्या डोळ्यासमोर परिवर्तित झाला.महाराष्ट्रात नारायण राणे काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर त्यांच्या मागची इडीची चौकशी थांबविण्यात आली. एकंदरीत आपल्या राजकीय विरोधकांना मोदीजींनी एक्दम क्लियर इशारा दिलाय. छगन भुजबळ गेले दिड वर्ष भ्रष्टाचाराच्या चौकशीनिमित्त जेल मध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेस व इतर विरोधी पक्षीयांचे नेतृत्व एकदम घाबरलेल्या अवस्थेत आहे. लालू यादवांसारखा एखादा नेता वगळल्यास कोणीच मोदींना नडायच्या मनस्थितीत नाही. जेल मध्ये जाऊन बसायची हौस कोणालाच नसते, पण बराच काळ सुखासीन सत्ता भोगल्यामुळे काँग्रेसकडे संघर्ष करण्याची, झगडण्याची, आणि प्रसंगी तुरुंगात जाण्याची हिम्मतच उरलेली नाही. एके काळी ज्या अण्णा हजारेंनी काँग्रेसच्या नाकात दम आणला होता, त्या अण्णा हजारेंना मोदी हिंगलावून विचारत नाहीत. अण्णा हजारे सांगतात मी लोकपालसाठी मोदींना ३० पत्रे पाठविली, पण त्यांनी एकाही पत्राचे उत्तर दिलेले नाही. परत आंदोलन करावे लागेल. परंतु अण्णा हजारेसुद्धा ‘पानी बगुन पवनारा ‘ गडी असल्यामुळे ते मोदींविरोधात आंदोलन छेडतील याची शक्यता धूसर आहे. आणि कोणीतरी डोक्यावर चढवून समजा अण्णांना जंतर मंतरवर काही कसरती करायला लावलेच तरी त्यांना हवा द्यायची मीडियाची व विरोधी पक्षांची हिम्मत होणार नाही.

मोदीसरकार हे उद्योगपतींचे सरकार असल्याचे एक चित्र सामान्यतः सोशल मिडियामधून उभे राहते, त्यात फारसा अर्थ नाही. उद्योगपतीसुद्धा या सरकारला टरकून आहेत. त्या डी एस कुलकर्णींची मुलाखत पाहा. नोटबंदीमुळे बांधकाम व्यवसायाचे दिवाळे निघाले, त्यामुळेच मीही भिकेला लागलो असं कुलकर्णी म्हणाले , परंतु नोटबंदी ही देशाच्या आर्थिक विकासासाठी एक फारच उत्कृष्ट चाल होती अशी पुस्तीही त्यांनी त्याच दमात जोडून टाकली. मुकेश अंबानींपासून रतन टाटांपर्यंत हरेक उद्योगपती कोठल्याही मुलाखतीत मोदींच्या आर्थिक धोरणांची तोंडफाटेपर्यंत स्तुतीच करताना दिसतात याच कारण मोदींच्या आर्थिक धोरणात त्यांना मनोमन देशाचा अभ्युदय दिसतोय हेच असेल असं सांगता येत नाही. नोटबंदी व पाठोपाठ घिसाडघाईने आलेल्या जी एस टी नंतर येणारे आर्थिक वाढीची, रोजगार निर्माणाची सरकारी आकडेवारी काही भलतंच सांगते, तुम्ही आसपासच्या लहान व्यापारी, उद्योजकांना, नोकरदारांना विचारून पहा, एकजात सगळे नोटबंदी, जी एस टी च्या नावाने बोट मोडतात. परवा एक केमिस्ट दुकानदार सांगत होता – “या जी एस टी च्या लफड्यात रविवारची सुट्टी पण घ्यायला होत नाही. कसले कसले रेकॉर्ड बनवत, बिल लावत बसायला लागतं. पूर्वी सी ए तीस हजारात वर्षाचे टॅक्स रिटर्न फाईल करून द्यायचा, आता जी एस टीच्या अतिरिक्त कामाने ने त्याने आपली फी ७५ हजार केली. झक मारली आणि यांना मत दिलं”- आणि आदी गोदरेज पासून ते सुनील मित्तल पर्यंत सर्वच उद्योगपतींना मोदीजींचे आर्थिक निर्णय भारताचा कायापालट करून टाकणारे वाटतात, एकाही उद्योगपतीला मोदींच्या धोरणाविषयी कसलीही शंका नाही ? याच कारण मोदीजी काय चीज आहेत याची पुरेपूर जाणीव या चतुर लोकांना आहे. “भाऊंशी वाकडं तर नदीवर लाकडं” या भीतीतून उद्योगपतींच्या तोंडून स्तुतीसुमनांचा वर्षाव होत असल्याची शक्यता जास्त वाटते.

एकीकडे मीडिया दुसरीकडे विरोधी पक्ष ही फळी गारद करून टाकल्यावर मोदीजी थेट जनतेकडेच वळले. मीडियाच्या मुसक्या तर बांधल्या, पण सोशल मीडिया मोकाट होता. सरकारच्या धोरणावर, निर्णयावर सोशल मीडियातून टीका करणाऱ्या, विरोधात व्यक्त होणाऱ्या सामान्य लोकांवर तुटून पडायला पक्षाचे पगारी ‘आय टी सेल’ होतेच. हे आय टी सेल चे जाळे भाजपाने २०१४ च्या निवडणुकीची तयारी करतानाच मजबूत विणले होते, परंतु जसजसा विरोधी आवाज ट्रोलरना जुमानेसा झाला, तसतसे सरकारने आपल्या हक्काचे पोलीस आणि इंटेलिजन्स या लोकांच्या मागे लावले. मोदींवर, त्यांच्या सरकारच्या धोरणावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार नागरिकांना आहे. परंतु मोदींना विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह आहे अशा अविर्भावात सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या सामान्य नागरिकांना आठ आठ तास काम धंदे सोडून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बसवून ठेवण्याचे प्रकार सर्रास होत आहेत.

मध्यमवर्गीय सुखवस्तू मराठी घरांतून होणाऱ्या राजकीय चर्चांतून पूर्वी .”काय नाय, इथे डिक्टेटरच पाहिजे. उठता लाथ आणि बसता बुक्की घातली तरच देश सुधारेल” अशा आशयाचा निष्कर्ष नेहमीच निघत असे. आपल्या बाळ ठाकरेंच्या “मला लोकशाही मंजूर नाही, ठोकशाहीनेच सर्व कारभार सुतासारखा सरळ करेन” या बाण्याचे आकर्षण मराठी माणसाला होतेच, पण ठाकरेंच्या या स्पष्टोक्तीचे कौतुक देशभरातील बऱ्याच लोकांना होते. एकूणच ‘इथे डिक्टेटरच पायजे’ या स्वप्नाची २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनतेने पूर्तता करून घेतली. गुजरातच्या जनतेने तर आपला माणूस पंतप्रधान होणार म्हणून सर्वच्या सर्व सव्वीस जागा भाजपाच्या पदरात घातल्या. छप्पन इंचाची छाती, इट से इट बाजाऊंगा ची भाषा, भ्रष्टाचार निपटून काढण्याचा निर्धार, विकासाचे स्वप्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे “अच्छे दिन” आणण्याचे वचन या सगळया घटकांची बेरीज होऊन अख्खा देश मोदींवर भाळला आणि २०१४ साली काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेस हरली खरी पण विजय भाजपचा नव्हता. विजय मोदींचा झाला होता. राजकारणाच्या आखाड्यात काँग्रेस, भाजप पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत, २०१४ पूर्वी एकमेकांचे राजकारण, निवडणुकीतील डावपेच त्यांना तोंडपाठ होते, पण भाजपाने हा जो नवीन पैलवान उतरवला त्याचे तंत्र काँग्रेसला साफ अपरिचित होते. चोवीस तास राजकारण जगणारा हा अत्यंत उर्जावान नेता आहे. मोदींना टक्कर देऊ शकेल असे नेतृत्व आजघडीस कोणत्याच पक्षाकडे नाही. किंबहुना त्यांच्या विरोधात नेमके कसे लढायचे हेही विरोधीपक्षांना कळत नाही. वास्तविक मोदीजी बेधडक खोटे बोलतात. याचे पुरावे जागोजागी मिळतात. २०११ साली त्यांच्या ब्लॉग वर त्यांनी “अमेरिकेस मोदींची भीती वाटते कारण ते भ्रष्ट नाहीत हे अमेरिका जाणते ” अशी बातमी विकिलिक्सचा हवाला देऊन टाकली होती. पुढे विकिलिक्स ने खुलासा केला की आम्ही असं बिलकुल म्हंटलेले नाही पण आजही हे धडधडीत असत्य मोदीजींच्या ब्लॉगवर मौजूद आहे
(http://www.narendramodi.in/i-am-glad-that-america-admits-modi-is-incorruptible-hon%E2%80%99ble-cm-3902)

गेल्या साडेतीन वर्षाचा मोदी सरकार चा अनुभव आपण घेतला आहे. गेल्यावर्षी एका फटक्यात अचानक खुद्द पंतप्रधानांनी घोषणा करून नोटबंदी लादली. त्याचे असंख्य फायदे मोदीजी आणि त्यांचे समर्थक तेव्हा हिरीरीने सांगत होते. प्रत्यक्षात किती काळा पैसा या कारवाईने नष्ट होईल याचा मोदीजींचा अंदाज साफ चुकला. म्हणूनच रिझर्व बँकने नेमक्या किती नोटा परत आल्या हे जाहीर करायला आठ महिने घेतले. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या धंदे बुडाले, पण अर्थकारण एवढं खड्ड्यात घालूनही मोदीजी आणि समर्थक नोटबंदी यशस्वी झाल्याचे डंके पिटत आहेत. असाच प्रयोग मोदिजीनी आधीही करून दाखविला होता. २००५ साली नर्मदेच्या खोर्यात महाप्रचंड नैसर्गिक इंधन वायूची खाण सापडल्याचे जाहीर केले, त्यामुळे पूर्ण देशाची इंधनाची गरज भागणार होती. आयातीची गरजच राहणार नव्हती, गुजरात आर्थिक महासत्ता बनणार होता. हा वायू हस्तगत करण्यासाठी मग गुजरात राज्य पेट्रोलियम कंपनीला भरीस पाडण्यात आले. वायू उत्खननाच्या चाचण्या घेण्याच्या निमित्ताने बोगस खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आली. त्याचा खर्च म्हणून सार्वजनिक बँकांकडून एकूण २० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले. प्रत्यक्षात या नर्मदा बेसिन मधून दोन स्वयंपाकाचे सिलिंडर भरतील एवढाही वायू काढता आला नाही. बुडीत गेलेली ही सरकारी कंपनी नंतर ओ एन जी सी या दुसऱ्या सरकारी कपंनीच्याच्या गळ्यात बांधण्यात आली. हे सगळं मोदीजींच्या नाकाखाली घडलं आणि दाबून टाकलं गेलं. कसला कपाळाचा ‘गुड गव्हर्नन्स’ आणि कसली डोंबलाची ‘पारदर्शकता’. न खाऊंगा न खाने दूंगा म्हणता, तर गुजरातेत २००३ पासून लोकायुक्त का नेमू दिला नाहीत ? कसली भीती वाटत होती ? असो. प्रत्यक्षात काहीही घडत असले तरी मोदीजींनी जनतेचा विश्वास प्राप्त केला हि वस्तुस्थिती आहे.

गेल्या साडेतीन वर्षांत विकास खरोखर कितपत झाला, आणि गोरक्षा, लव्ह जिहादअशा तद्दन प्रतिगामी अजेंड्याखाली धार्मिक ध्रुवीकरण, दहशत किती पसरवली गेली हे आपण पाहतोच आहोत. तरीहि आपण खड्ड्यात जातो आहोत हे दिसत असूनही मेंढरा सारखी जनता मोदी, मोदी चा घोष करत एका मागोमाग एक निवडणुका, एखादा बिहारचा अपवाद वगळता भाजपच्या पदरात टाकत आहे. किमान तसं होत असल्याचा आभास तरी भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांवर उभा करीत आहे.

गुजरातची निवडणूक पथदर्शी ठरेल, कारण या परीक्षेत मोदीजींच्या विकासाच्या थापा जनतेस पचेनाशा झाल्या आहेत हे तरी सिद्ध होईल, किंवा ‘अच्छे दिन’ पाहायची जनतेची हौस अजून फिटली नाही हे तरी सिद्ध होईल. गुजरातमध्ये भाजपचे सध्या ११५ आमदार आहेत.ही संख्या जर या निवडणुकीत लक्षणीयरित्या कमी झाली तर तो मोदींचा पराभवचं गणला जाईल. अगदी गुजरातमध्ये बहुमत मिळालं तरी सीट कमी होणे हा पराभवच असेल कारण गुजरात हे मोदी व अमित शहा दोघांचेही ‘होम स्टेट’ आहे. गुजरात मध्ये आता पराभव झाला, तर २०१९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपास माती खावी लागेल. खंरतर पराभव हि निवडणूक निकालानंतरची गोष्ट आहे. २०१९ च्या निवडणूक प्रचारातच गोची होऊन जाईल. कुठल्या तोंडाने जनतेला सामोरे जातील ? विकास, अच्छे दिन वैगेरेच्या वार्ता करता येणार नाहीत.पण याच साठी तर संघ/भाजपचा प्लान बी तयार आहे. म्हणजे मोदीजी २०१४ साली, सबका साथ सबका विकास, अच्छे दिन वैगेरे गोष्टी अगदी मनापासून सांगत असतीलही, त्यांना कदाचित खरोखरच सर्वांचं भलं करायचंही असेल. पण समजा, हे सांर जे त्यांना मनापासून करायचं होतं, त्यात ते अपयशी ठरले तर काय करायचं ? गेले साडेतीन वर्षे जे गोरक्षा, लव जिहाद, वैगेरे इंधन जाळत हिंदुत्वाचे कुंड पेटते ठेवले गेले, तो प्लान बी होता. त्याची फळे दिसू लागली आहेत. विकासाचं सोंग निकामी ठरतंय हे दिसू लागलं, की भाजप कट्टर हिंदुत्वाचे कातडे पांघरेल यात काही शंका नाही. पुढील दोन वर्षांत भाजपा उघड आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेईल.त्याला जनता २०१९ च्या निवडणुकीत कितपत प्रतिसाद देईल हे सांगता येत नाही, परंतु येणारी दोन वर्षे धार्मिक हिंसेची असतील.

आणि गुजरात मध्ये जर आता प्रचंड बहुमताने भाजपा सत्तेत आलीच, तर जनतेची ‘अच्छे दिन’ ची हौस अजून फिटली नाही हे सिद्ध होईल. आक्रमक हिंदुत्वाचा प्लान बी सुरूच राहील, कारण खास तेवढ्यासाठी भाजपास मतदान करणारा एक मोठा वर्ग आहेच. परंतु मोदीजी ‘अच्छे दिन’ आणणार आहेत, खरोखरच भ्रष्टाचार निपटून काढणार आहेत, करोडो नवीन रोजगार निर्माण करून देणार आहेत, शेतीमालाला उचित भाव मिळवून देणार आहेत, या भ्रमात जनता अजूनही असेल तर जनतेच्या या ‘अच्छे दिन’ च्या हौसे चे मोठे मोल तिला चुकवावे लागेल. अर्थव्यवस्थेस अपंग करून सोडणारा मोदीजींचा तुघलकी कारभार दुप्पट जोमाने सुरु राहील.एकंदरीत गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही येवो, भारतीय जनतेचा येणारा काळ अत्यंत खडतरच असणार आहे.

राईट अँगल्स Editorial Board

Write A Comment