fbpx
जागतिक / परराष्ट्र व्यवहार

नाठाळांचे माथी हाणा की काठी !!!

भारताचे माजी पंतप्रधान आणि माजी उपराष्ट्रपती हे पाकिस्तानबरोबर संधान बांधून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचत आहेत.

हे वाक्य केवळ चीड आणणारेच नाही तर अत्यंत गंभीर आहे.  कारण हे वाक्य भाजपच्या एखाद्या जिल्हाध्यक्ष, वा राज्यातला मंत्री किंवा आमदार खासदाराने म्हटलेलं नाही. संघाच्या एखाद्या प्रचारकाच्या तोंडून आलेलं हे वाक्य नाही. हे वाक्य थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरात निवडणुकीच्या पालनपूर येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधानांनी हा तथाकथित गौप्यस्फोट केला. हा गौप्यस्फोट तथाकथित यासाठी आहे की, पाकिस्तानबरोबर संधान बांधून देशातील कोट्यवधी लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं सरकार उलथवून टाकण्याचा कट करणे हा उघड उघड देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. तसा तो मनमोहन सिंग व हमिद अन्सारी यांनी केला असेल, तर त्यांना कडक शासन व्हायला हवे. तसे ते शासन व्हावे म्हणून ज्या कोट्यवधी लोकांनी पोलादी पुरुष असलेल्या व ५६ इंचाची छाती वेळोवेळी दाखवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सत्ता दिली आहे. इतका मोठा कट शिजवणाऱ्यांच्या विरोधात केवळ निवडणुकीच्या प्रचार मंचावरून टीका करणे यासाठी मोदी यांना देशाचे पंतप्रधान म्हणून देशाच्या जनतेने खचितच निवडून दिलेले नाही. त्यामुळे जोवर हा कट जर खरा असेल व त्या अपराध्यांना शासन केले जाणार नाही तोवर मोदींचा हा आरोप तथाकथितच म्हणायला हवा.

मात्र नरेंद्र मोदी असे करतील, असे दिसत नाही. जर मोदी यांनी मनमोहन सिंग व हमिद अन्सारी यांना अटक केली नाही, तर याची दोनच कारणे असू शकतात. एकतर मोदी यांनी सरळ सरळ थाप मारलेली आहे. किंवा दुसरे कारण असू शकते की पाकिस्तानसोबत मनमोहन सिंग व हमिद अन्सारी या माजी पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती रचत असलेल्या कटामुळे ते घाबरलेले आहेत. या दोन्ही परिस्थितीत मोदी हे पंतप्रधानपदी राहण्यास योग्य आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

मोदी यांनी याच वक्तव्यात असेही म्हटले की, मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या या बैठकीत पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख अर्शद रफिक हेदेखील उपस्थित होते आणि त्यांनी गुजरातमध्ये अहमद पटेल यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याचा खल केला.

आता ही बैठक कशासाठी होती, त्यात भारत-पाक संबंधाबाबत काय चर्चा झाली, त्यात मनमोहन सिंग, हमिद अन्सारी, अनेक भारतीय पत्रकार, माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी व पाकिस्तानी माजी लष्करी अधिकारी, सनदी अधिकारी व इतर महत्त्वाचे लोक उपस्थित राहून काय चर्चा करत होते वगैरे मुद्दे गौण ठरतात. भारताचे पंतप्रधान ज्यांच्या हातात या विशाल सार्वभौम राष्ट्राच्या संपूर्ण नाड्या देशातील जनतेने सोपविलेल्या आहेत. संविधानाने त्यांना जे अमर्याद अधिकार दिलेले आहेत. संपूर्ण देशातील प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे. या देशातील आयबी, सीबीआय, रॉ सारख्या गुप्तचर यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत. भारतीय लष्कर, ज्यात भारतीय सैन्याची तीनही दले येतात, येथील पोलीस, निमलष्करी दले इतकी अफाट शक्ती ज्यांचा हातात एकवटलेली आहे, असे असताना देशाच्या राजधानीमध्ये एक माजी पंतप्रधान आणि माजी उपराष्ट्रपती अशा प्रकारच्या षड्‌यंत्राची आखणी करत असतील, आणि त्यांना अटक करण्यात आली नाही, तर ती मोदींसारख्या स्वतःला कायम कणखर भासवणाऱ्या नेतृत्वासाठी खरोखरीच नामुष्कीची बाब आहे, हे मान्य करावेच लागेल.

आता गुजरात निवडणुकीतही पाकिस्तानी ढवळाढवळ करत असल्याचाही यात गंभीर आरोप आहे. गुजरात निवडणुकीत कुणाला जिंकवायचे व कुणाला हरवायचे हे गुजरातची जनता बहुमताने ठरवणार आहे. या निर्णयात जर शेजारील राष्ट्रे ढवळाढवळ करणार असतील तर ते केवळ आक्षेपार्ह नाही ही गंभीर बाब आहे. ज्या राष्ट्रात लोकशाही कधी रूजुच शकली नाही व ज्या राष्ट्राला स्वतःच पोसलेल्या दहशतवादाने पूर्णतः पोखरलेले आहे, ते भारतीय जनमानसात खोलवर रुजलेल्या लोकशाहीचे धिंडवडे काढणार असतील तर या देशातील लष्कर, निमलष्करी दले गुप्तचर यंत्रणा सोडाच पण संपूर्ण देशातील जनतेनेच चपराक लगावायला हवी. मात्र त्यासाठी आधी पंतप्रधानांपाशी इतक्या विशाल यंत्रणेद्वारे जी माहिती मिळाली आहे, ती अशी केवळ प्रचारसभेतील भाषणात वापरून चालणार नाही, तर त्याची थेट अधिकृत चौकशी करायला हवी व त्यासाठी या सगळ्यांना ताब्यात घ्यायला हवे. बरे पाकिस्तानी गुजरातबाबत आखत असलेला कट काय तर ते अहमद पटेल यांना मुख्यमंत्री बनवायला निघाले आहेत. म्हणजे अहमद पटेल यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत, असा त्याचा सरळ अर्थ आहे. किंवा पाकिस्तानी हितसंबंध जपण्याचे काम अहमद पटेल गेली अनेक वर्षे कर आहेत. त्याशिवाय पाकिस्तान त्यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी इतके मोठे षड्‌यंत्र रचण्याची तोशिष कशासाठी झेलेल? त्यामुळे मनमोहन सिंग, हमिद अन्सारी यांच्यासोबत तात्काळ अहमद पटेल यांनाही तुरुंगात टाकून त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी.

माजी आयएफएस अधिकारी व युपीएच्या कालावधित केंद्रीय मंत्री असलेले मणिशंकर अय्यर यांनी मोदींनी जे नीच संबोधले आहे, ते नीच संबोधनदेखील त्यांना याच बैठकीतून स्फुरल्याचाही आरोप आहे. मणिशंकर अय्यर यांच्या नीच या संबोधनावर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबितही केले आहे. मात्र त्यांना देशाच्या पंतप्रधानांना नीच संबोधण्याचा सल्ला जर पाकिस्तानने दिला असेल, तर प्रकरण केवळ त्यांच्या काँग्रेस पक्षातून हकालपट्टीपुरते मर्यादित राहात नाही. कारण तसे जर झाले असेल, तर मनोहमन सिंग, हमिद अन्सारी, अहमद पटेल यांच्यासोबत मणिशंकर अय्यर यांनाही तुरुंगात डांबणे भाग ठरते.

मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानी माजी लष्करी तसेच सनदी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या या गुप्त बैठकीबाबतचा पहिला गौप्यस्फोट केला तो अजय अगरवाल या भाजपच्या पदाधिकाऱ्याने. ६ डिसेंबरच्या संध्याकाळी ही गुप्त बैठक मणिशंकर अय्यर यांच्या घरी पार पडली. आता मणिशंकर अय्यर म्हणजे काय कुणी सदाशीव पेठ किंवा, डोंबिवलीत राहणारे सद्‌गृहस्थ नव्हेत. ते काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे अशा गुप्त बैठकीला इतके उघड ठिकाण पाकिस्तानी लोकांनी आणि त्यांच्याबरोबर कट करणाऱ्यांनी निवडले हा त्यांचा मूर्खपणाच. पण त्यांनी हा मूर्खपणा करून देखील भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्याबाबतीत पंतप्रधनांना वा आपापल्या संस्थेच्या प्रमुखांना काहीच खबर का दिली नसावी? दुसरे म्हणजे या बैठकीच्या निमित्ताने अय्यर यांच्या घराबाहेर जोरदार पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. दिल्लीतील पोलीस यंत्रणा ही दिल्ली सरकारच्या अखत्यारित येत नसल्यामुळे हा बंदोबस्त केजरीवाल यांनीच पुरवला होता, असे म्हणायलाही संधी नाही. दिल्लीची पोलीस यंत्रणा येते ती केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित. म्हणजे राजनाथ सिंग यांनीच या बैठकीला बंदोबस्त पुरविण्याचा अक्षम्य अपराध केला आहे. मात्र राजनाथ सिंहजी हे कट्टर देशप्रेमी, धर्माभिमानी वगैरे असल्यामुळे त्यांना तुरुंगात डांबणे योग्य होणार नाही, मात्र त्यांची किमान चौकशी व्हायला हवी. अशा देशविरोधी कटकारस्थानांना पोलीस बंदोबस्त पुरविण्याचा अपराध हा काही कमी महत्त्वाचा ठरत नाही.

तर भारतमातेच्या विरोधात असे अक्षम्य कट कारस्थान घडल्याची माहिती पंतप्रधानांना मिळाल्यामुळे त्यांनी तात्काळ या देशद्रोही माणसांना तुरुंगात डांबले पाहिजे. ते जर डांबले नाही, तर यातून मोदी यांच्याच देशनिष्ठेवर शंका घेण्यास वाव उरतो. मोदी हे देशाचे बाप आहेत, असं संबित पात्रा हे ओएनजीसीचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. ज्या देशाला मातेनुरूप बघण्याचा आणि पुजण्याचा ज्या राष्ट्रप्रेमी संघटनेचा प्रघात आहे, त्या संघटनेत वाढलेल्या एका स्वयंसेवकाने आपल्या आवडत्या नेत्याला थेट जिला मातेचा दर्जा दिला आहे, त्या मातेचा बाप मोदी यांना म्हणावे, हे कसेतरीच वाटत असले तरीही मोदी यांना देशाचा बाप मानून नागरिकरुपी मुला बाळांनी आता मोदी यांच्याकडे ही मागणी लावूनच धरायला हवी. मममोहन सिंग, हमिद अन्सारी, अहमद पटेल, मणिशंकर अय्यर यांना तात्काळ तुरुंगात टाका.

जर ही मागणी मान्य झाली तर ठीक नाहीतर, तमाम देशप्रेमी जनतेने हे लक्षात घ्यायला हवे, की याचा अर्थ या देशद्रोही कामाला पाठीशी घालण्याचेच काम पंतप्रधान करत आहेत. देशद्रोही गोष्टीला पाठीशी घालणे हा देशद्रोहापेक्षाही मोठा गुन्हा असतो. त्यामुळे पंतप्रधानपदासारख्या सर्वोच्च पदाला ही व्यक्ती योग्य आहे की नाही, याचाही विचार जनतेने करायला हवा.

जर या सगळ्या शक्यता नसतील तर वर उल्लेखिल्याप्रमाणे मोदी यांनी पालनपूर येथील प्रचारसभेत लोणकढी थाप मारली हा एकच अर्थ यातून निघतो. मग ती जर थाप असेल, तर राहूल गांधींना पप्पू म्हणणाऱ्या सोशलमिडियाकारांनी मोदींसाठी जो एक शब्द रूढ केला आहे, तो खरा ठरण्याची भिती आहे. मोदीजींवर प्रेम करणाऱ्या असंख्य भारतीयांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार निष्ठा आणि प्रेम आहे. त्या सगळ्यांना मोदीजी खोटे बोलत असतील यावर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे त्या असंख्य चाहत्यांच्या विश्वासाला स्मरून पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, माजी केंद्रीय मंत्री व सोनिया गांधींचे सल्लागार व राज्यसभा सदस्य यांना तुरुंगात पाठवणे ही काळाची गरज आहे!

 

राईट अँगल्स Editorial Board

1 Comment

Write A Comment