fbpx
राजकारण

गुजरात डायरीज – भाग ६

येणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना एकूण १८२ पैकी १५० जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. भाजपाचा छोटामोठा हरेक कार्यकर्ता आता १५० जागा जिंकण्याचीच पोपटपंची करताना दिसतो.
भाजपा अध्यक्षांचे हे १५० जागा जिंकण्याचे स्वप्न, वास्तवाशी कितपत मेळ खाते कि सगळा खयाली पुलावच आहे ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गेल्या तीन विधानसभा निकाल पाहावे लागतील.


२००२ साली गोध्राकांडानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला आणि जनादेश मागण्यासाठी निवडणुका घेतल्या. धार्मिक ध्रुवीकरणाने या निवडणुकीत टोक गाठले होते. गोध्राची जखम भळभळत होती. त्यावेळी भाजपास १२७ जागांवर यश मिळाले होते. १९८५ साली काँग्रेसने खाम फॉर्मुला – क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम युती – वापरून १४९ जागावर विजय मिळविला होता. २००२ साली भाजपाने गुजरात मध्ये गोध्रा व त्यापाठोपाठ झालेलया भीषण दंगलीच्या पार्श्वभूमीवर ज्या १२७ जागा मिळविल्या, त्या काँग्रेसच्या जातीय एकजुटीच्या फॉर्मूल्यावर १९८५ साली मिळविलेल्या १४९ जागांपेक्षा कमीच भरतात.
त्यानंतर झालेल्या २००७ च्या निवडणुकीत, मोदींची ‘हिंदू हृदय सम्राट’ हि छबी घेऊन भाजप मैदानात उतरला. अब तक छप्पन स्टाईलने एन्काउंटर करणारे गुजरात पोलिसांचे स्क्वाड आणि त्यांच्यापाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले मुख्यमंत्री मोदी या विषयीच्या बातम्या भरभरून येत होत्या. मोदींची ‘टफ मॅन’ व ‘हिंदू हित रक्षक’ ची प्रतिमा या निवडणुकीत अतिशय ठळकपणे रंगविण्यात आली. या निवडणुकीत भाजपच्या जागा १२७ वरून ११६ वर घसरल्या.
पाच वर्षानंतर २०१२ साली झालेल्या निवडणुकीत, मोदींनी ‘विकास पुरुषाची’ भूमिका रंगविली. तोपर्यंत गुजरातच्या ‘विकास मॉडेल’ चा बोलबाला सुरु झाला होता.
व्हायब्रंट गुजरात समिटला देशातील प्रमुख उद्यजकांनी हजेरी लावून मोदी हेच भारताचे पंतप्रधान होण्यासाठी सर्वात लायक व्यक्ती असल्याचा हवाला दिला होता. या २०१२ च्या निवडणुकीत भाजपाने ११५ जागा जिंकल्या. म्हणजे २००७ च्या तुलनेत १ जागा कमीच. काँग्रेस व भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतील फरकही २०१२ च्या निवडणुकीत कमी झालेला दिसला. मात्र शहरी भागात भाजपाचे वर्चस्व २०१२ सालीही स्पष्ट दिसून आले होते. अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट येथील जागा भाजपाने एकहाती जिंकल्या होता, तर मध्य व उत्तर गुजरात मधील ग्रामीण भागात कॉन्ग्रेसने कडवी लढत दिली होती.
आनंदीबेन पटेल, ज्या मोदी सरकारमध्ये नंबर दोन स्थानावर होत्या त्यांनी गठोडीया या अहमदाबादमधील आपल्या मतदारसंघात विक्रमी विजय मिळविला होता. त्यांचे मताधिक्य १ लाख दहा हजार एवढे भरले होते. खुद्द मोदींनी मणिनगर या मतदारसंघातून ८६ हजारांची आघाडी घेतली होती. तर एलिस ब्रिज व नारायणपूरा या मतदारसंघातून अमित शहानी अनुक्रमे ७६ हजार व ६३ हजार एवढे मताधिक्य मिळविले होते.

गुजरातमधील शहरी व ग्रामीण मतदारांचा परस्परविरोधी कल २०१५ सालच्या पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांत परत एकदा स्पष्ट दिसून आला. भाजपाने सर्व सहा महानगरपालिकांमध्ये विजय मिळविला तर ३१ पैकी २४ जिल्हा पंचायती व २३० पैकी १३४ तालुका पंचायतींमध्ये काँग्रेसने वर्चस्व दाखविले.

या नंतर झालेल्या २०१४ सालच्या लोकसभेत मात्र सर्व २६ जागांवर भाजप विजयी झाली. त्याच कारण अर्थातच वेगळं असावं. प्रत्येक गुजराती माणसाला मोरारजी देसाईंनंतर परत एकदा गुजराती माणूस पंतप्रधान झालेला पाहायचा होता. परंतु २०१२ विधानसभेत भाजपाने काँग्रेसच्या तुलनेत मिळवलेली ८.९२ टक्के अधिकची मते व नंतर २०१५ साली काँग्रेसने जिल्हानिवडणुकांत मिळविलेले ३.८८ चे व तालुका निवडणुकांत मिळविलेले ३.६८ चे मताधिक्य पाहता अमित शहांचे १५० जागांचे ‘लक्ष्य’ हे स्वप्नरंजन वाटते.

लेखक गुजरातस्थित ज्येष्ठ पत्रकार असून इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेतील अनेक वर्तमानपत्रे, वैचारिक नियतकालिकांत सातत्याने लेखन करतात. २००२ च्या दंग्यांनंतर गुजरातचा सामाजिक, राजकीय व आर्थिक अंगाने अभ्यास करणारे विचारवंत म्हणून त्यांची ओळख आहे.

Write A Comment