fbpx
सामाजिक

दिपीका, तुझं नाक कापू, भन्साळी, तुझं मुंडकं उडवू !!!

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या चित्रपटांनी व्यापलेला दिसत आहे. चित्रपट माध्यमाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन आहेत. काहींना चित्रपट मनोरंजनाचे मध्यम वाटते तर काही त्याकडे एक उद्योग म्हणून पाहतात. आकादामिक क्षेत्रात चित्रपटांबद्दल गांभीर्याने संशोधन ,
विश्लेषण केले जात आहे. अभ्यासकांच्या मते कोणताही चित्रपट मग तो निव्वळ मनोरंजनासाठी निर्माण केला आहे असा दावा जरी केलेला असला तरी त्यातून एक विशिष्ट विचारप्रणाली मांडली जात असते. मराठी चित्रपट निर्मितीच्या सुरवातीच्या काळात सर्व चित्रपट हे धार्मिक स्वरूपाचे निघाले. भारतीय माणूस हा धार्मिक असतो असा समाज निर्माण करत त्याच धर्तीवरचे चित्रपट निर्माण करण्यात आले. त्याला कारण मराठी माणूस चित्रपटगृहाकडे वळला पाहिजे, हे होते. परंतु सोबतच चित्रपट निर्माते कोण होते? कोणत्या जातीवार्गातील होते? हेही पहिले पाहिजे. धार्मिक आशयातून गल्ला तर भरला जाणार होताच ; त्याही पेक्षा परंपरा, धर्म, रूढी इ. चे उच्चजातीवार्गाचे प्रभुत्व समाजावर ठसविण्याचाही तो एक भाग होता. हे चित्रपट तुकाराम केंद्रीही होते. संत तुकाराम यांच्या  ब्राह्मणीकरणाचा सर्वोच्च प्रयत्न त्यावेळी झाला. भोळा, वेंधळा तुकाराम, व त्यांची कजाग पत्नी असे चित्रण त्यात प्रामुख्याने केले गेल. समर्थ रामदास यांच्यावर चित्रपट न काढता संत तुकाराम, छ. शिवाजी, छ. संभाजी यांच्यावर चित्रपट बनविले गेले. यातूनच चित्रपटाकडे बघण्याची विचारसरणी ध्यानात येते. एका दिग्गज चित्रपट निर्मात्याने त्यावेळी म्हंटले होते- रामदास बघायला कोण आल असतं?

आकादामिक क्षेत्रात चित्रपटांबद्दल  गांभीर्याने संशोधन ,विश्लेषण केले जात आहे. अभ्यासकांच्या मते कोणताही चित्रपट मग तो निव्वळ
मनोरंजनासाठी निर्माण केला आहे असा दावा जरी केलेला असला तरी त्यातून एक विशिष्ठ विचारप्रणाली मांडली जात असते.

चित्रपट निर्मितीच्या सुरवाती पासून ते जागतिकीकरणच्या युगातही बदलत्या सामाजिक, आर्थिक व्यवस्थेचा परिणाम चित्रपट माधामावर असल्याचे दिसते. समाज व्यवस्थेतील जात वास्तव, स्त्रियांबद्दल असलेले समज-गैरसमज, अर्थ वास्तव आणि भ्रम चित्रपट दाखवीत आला आहे. सामान्य माणूस या माध्यमाकडे कसा बघतो? खरेतर सामान्य माणूस ही संकल्पनाच फेक आहे. भारत देशात जात ही प्रधान शासन – शोषणाची संस्था राहिली असल्यामुळे इथे माणसे जातीजातीत विभागली जातात, त्यांच्या जात अस्मिता उभ्या राहतात-केल्या जातात. चित्रपट पाहताना तुम्ही सुटी व्यक्ती  नसता तर एक स्त्री म्हणून, एका जातीची स्त्री म्हणून, एका जातीतील पुरुष म्हणून घडविले गेलेले सर्व भारतीय नागरिक असता. कधी चित्रपट निव्वळ मनोरंजनासाठी पहिला जातो आणि नंतर जाती संघटनानी घेतलेल्या आक्षेपा नंतर त्या बद्दलचे मत बदलते , किवा बदलविले जाते. चित्रपट कोणत्या विषयावर बनवायचा? त्याचे कथानक काय? संवाद कसे असतील, चित्रीकरण कुठे आणि कसे करायचे? इ दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य असते.
चित्रपट तयार झाला कि त्याची तपासणी करणारी यंत्रणा – सेन्सोर बोर्ड असते. काय आक्षेपार्ह आहे, नाही हे पाहणारी यंत्रणा भारतात आहे. (कदाचित
आता ती होती असे म्हणावे लागेल ) हे सर्व मुद्दे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहेत. परंतु सध्या त्याचीच गळचेपी
मोठ्या  प्रमाणात सुरु आहे. देशात या संदर्भात सेक्सी दुर्गा, न्यूड, दशक्रिया आणि पद्मावती हे चित्रपट गाजत आहेत. आता पर्यंत सेन्सर ,
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक – सामाजीक भावना दुखावल्या म्हणत येणारी समांतर सेन्सोरशीप आपण अनुभवली आहे. फायर, वॉटर , उडता पंजाब इ इ अनेकदा हा अनुभव आपण घेतला आहे. परंतु मोदी राज मध्ये आपण स्टेट सेन्सोरशिप या नव्या हुकुमशाहचा नमुना बघत आहोत. एस दुर्गा आणि न्यूड हे चित्रपट गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवातून वगळण्याचा निर्णय स्मुर्ती इराणी मंत्री असलेल्या माहिती आणि प्रसारण खात्याने वगळले. हीच ती स्टेट सेन्साॅरशिप ! गंभीर बाब म्हणजे चित्रपट वगळण्याचे कोणतेही  कारण देण्याची जबाबदारी या मंत्रालयाने दाखविलेली नाही. सेक्सी दुर्गा हे नाव त्याला कारण असावे असा कयास आहे. दुर्गा ही स्त्रीसत्तेची आद्य गणमता निऋतिचे रूप. निऋतिच्या आजच्या लेकी कोणकोणत्या शोषणाला सामोऱ्या जात आहेत या आशयाचा चित्रपट इराणी बाईनी वगळला आहे. त्या निऋति दुर्गेच्या खऱ्या वारसदार नाहीत?  धार्मिक – सामाजीक भावना दुखावल्या म्हणत येणारी समांतर सेन्साॅरशीप आता मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाली आहे. ब्राह्मण जातीतील मुख्यतः पुरुष या संदर्भात आक्रमक झाले आहेत.

आधी बाजीराव मस्तानी आणि आता दशक्रिया या चित्रपटांवर त्यांचे आक्षेप आहेत. ब्राह्मण समाजाची बदनामी केली गेली आहे असे त्यांचे मत आहे. परंतु निदर्शनांमध्ये कुठेही हि पद्धत, हे विधी चुकीचे, अंधश्रध्दामुल्क असल्याचे ते म्हणत नाहीत. आम्ही असे नाहीत असा त्यांचा दावा नाही, तर हे
खरे वास्तव दाखवू नका असे त्यांचे म्हणणे आहे. निदर्शने करताना त्यांनी जय परशुराम अशा घोषणा दिल्या. परशुराम हे स्त्री हिंसाचाराचे प्रतिक घेऊन
ते निदर्शने करतात यातच सारा (अ) विचार व्यक्त होतो. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटावर सध्या कारणी सेना भलतीच कोपली आहे.
राजपुतांचा चुकीचा, बदनामीकारक इतिहास दर्शविला आहे ही त्यांची मुख्य तक्रार आहे. चित्रिकरणा पासून त्यांनी हा विरोध दर्शविला आहे. आम्ही
सांगतो तोच खरा इतिहास, आमच्या सोयीचा तोच खरा इतिहास असा अट्टाहास त्यात दिसतो. देशभर त्यासाठी आंदोलने, जाळपोळ, निदर्शने त्यांनी केली आहेत.
काही राज्यांच्या येत्या काळातील निवडणुका, राजपुतांची लोकसंख्या आणि उपद्रव मूल्य राज्यकर्त्या वर्गाने लक्षात घेत भा ज पा सरकार असलेल्या
राज्यात – गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये चित्रपट प्रदर्शित होण्या पूर्वीच, तो न बघताच त्यावर बंदी घातली गेली आहे. हाही नवा प्रकार
भारत अनुभवत आहे.  कारणी सेनेने समस्त राजपुतांचे नेतृत्व करत असल्याचा दावा करत पद्मावतीची भूमिका करत असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे नाक कापण्याची  आणि भन्साळी यांचे शीर कापण्याच्या धमक्या दिल्या आहेत, भाजपा नेते त्यासाठी इनामाची रक्कम वाढूवून देण्याची भडकाऊ भाषणे करत आहेत. या वादा निमित्ताने चित्रपट आणि जात-पुरुषसत्ताक समाज मन व्यक्त झाले आहे.
इतिहासात शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले होते. सुंदर नखांवर सूप तोलून धरणारी स्त्री सत्तेतील जनपदाची राणी असणाऱ्या शुर्पणखेचा गुन्हा काय
होता?  लक्ष्मणाला माझ्याशी विवाह करतोस का अशी विचारणा करण्याचा. हो-नाही असे उत्तर न देता तिचे  हनन करण्यासाठी, तिला शिक्षा देण्यासाठी तिचे नाक कापले गेले. शुद्र शंबूक साधना करतो म्हणून ब्राहाणाचे मुल मेले असा आरोप करत त्याचा शिरच्छेद केला गेला. आदिवासी एकलव्य सर्वोत्तम धनुर्धारी होता कामा नये म्हणून त्याचा अंगठा कापला गेला. वर्ण समाजातील या शिक्षा वर्ण नुसार  आणि लिंगाधारित होत्या.  स्त्रियांनी गृह श्रम, पती सेवा करावी , पुरुषांनी बळाचे, संरक्षणाचे काम करावे. स्त्रियांना मन, मेंदू, मनगट यांच्या वापरावर बंदीचा हा प्रकार होता. तर शुद्रांनी
पायरी प्रमाणे वागावे- शारीरिक श्रम, उच्च जातवर्नियांची सेवा करावी हे मुल्ये रुजविली गेली. म्हणूच स्त्रियांना शिक्षा जात-वर्णाचे प्रतिक नाक
बनवून तेच कापून टाकण्याची तर पुरुषांना मेंदू असणाऱ्या शिरच्छेदाची शिक्षा फर्मावण्यात आली. राजापुतांची कारणी सेना याच मूल्यांना उजाळा देत
आहे. त्यांना पद्मावती सारख्या चित्रपटातून राजपुतांचा अपमान होतो असे वाटते आणि ते दीपिका पदुकोणचे  नाक कापण्याची भाषा करतात. राजपुतांना जोहर प्रथा, सती प्रथा, घुंगट या मुळे जातीची प्रतिष्ठा जाते असे अजिबात वाटत नाही. पद्मावतीचे नृत्य मात्र त्यांना खटकते . आम्ही स्त्रियांना
दडपून ठेवणाऱ्या प्रथा पाळूत, जात्याभिमान कायम ठवत कनिष्ठ जातींना न्यूनगंड देऊ, त्यात काहीच गैर नाही. पण आमचे जाती-स्त्रीदास्य्मुलक
वास्तव चित्रपटात दर्शिविले तर खबरदार अशीच राजपुतांची आणि ब्राह्मणांची पद्मावती आणि दशक्रिया चित्रपटाला विरोध करतानाची भूमिका दिसते. प्रश्न एखाद्या चित्रपटा पुरता मर्यादित नाही. तो जातीवार्गस्त्रीदास्याशी जोडलेला आहे, हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे.

लेखिका अब्राह्मणी स्त्रीवादाच्या पुस्कर्त्या आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असून सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान आहे.

3 Comments

Reply To Amol Bobade Cancel Reply