fbpx
राजकारण

गांधीवाद्यांनीच केली महात्माजींची वैचारिक हत्या!

मोदी गुजरात निवडणूक निर्विवादपणं जिंकतील काय? की भाजपाला जेमतेम बहुमत मिळेल? भाजपाच्या हातून काँग्रेस गुजरात हिसकावून घेऊ शकेल काय? गुजरातेत भाजपाला धक्का बसला, तर त्याचा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काय परिणाम होईल? भाजपा पुन्हा स्वबळावर केंद्रातील सत्ता हाती घेऊ शकेल काय? तसं घडलं नाही आणि भाजपा सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष बनला, तर मोदी यांना परत एकदा पंतप्रधान होण्यास पक्षातूनच विरोध होईल काय? अशा एक ना अनेक मुद्यांवर सध्या राजकीय चर्चाविश्वात खमंग वाद-विवाद रंगत आहेत.
मात्र यापैकी काहीही घडलं, तरी समाजाच्या विविध घटकांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जी स्वीकारार्हता मिळत गेली आहे, त्यात काही फरक पडणार आहे काय?
मुळीच नाही.
म्हणजे आज भाजपाकडे एक हाती सत्ता आली आहे, ती गेली किंवा पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीसारखं सरकार बनवण्याची पाळी भाजपावर आली अथवा केंद्रातही काँग्रेसचं सरकार जरी आलं, तरी ‘हिंदुत्व म्हणजेच हिंदूधर्म’ आणि ‘हिंदू म्हणून गर्व असण्यात गैर ते काय आहे?’ ही भावना समाजाच्या विविध घटकांत रूजवण्यात संघाला जे यश आलं आहे, त्याची दखल न घेता इतर कोणत्याच पक्षाला राज्यकारभार करता येणार नाही.
तसं जर नसतं, तर काश्मीरमध्ये नवं संवादपर्व सुरू करण्यासाठी गुप्तहेर खात्याच्या माजी प्रमुखाची नेमणूक झाल्यावर माजी गृहमंत्री व अर्थमंत्री असलेले काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या ‘काश्मीरच्या स्वायत्तते’संबंधीच्या वक्तव्यावर मोदी यांनी झोड उठवल्यावर काँग्रेसनं ‘ ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे’, अशी बोटचेपी भूमिका घेतलीच नसती. ‘चिदंबरम पाकची भाषा बोलत आहेत’, असा आरोप मोदी यांनी केल्यावर त्याचा परिणाम गुजरातेतील निवडणुकीवर होऊ शकतो, याची भीती वाटल्यानंच काँग्रेसनं हा बोटचेपेपणा दाखवला आहे.
असाच प्रकार या आधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी सोनिय गांधी यांच्या ‘मौत का सौदागर’ या विधानबाबत काँग्रेसनं केला होता. गुजरातेत २००२ साली जो नरसंहार मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत घडला होता, त्या संदर्भात सोनिया यांनी प्रचार सभेत मोदी यांना ‘मौत का सौदागर’ असं म्हटलं होतं. त्यावरून भाजपानं काहूर उठवल्यावर सोनिया यांनी पडतं घेतलं होतं.
कारण काय?
…तर हिंदू जनमानसावर भाजपानं उठवलेल्या काहुराचा परिणाम होऊन पक्षाला पडणारी मतं कमी होतील म्हणून.
वस्तुत: गुजरातेत २००२ साली जे काही गुजरातची सत्ता, प्रशासन मोदींच्या हातात असताना घडलं, त्याचं योग्य वर्णन ‘मौत का सौदागर’ हेच होतं असं जर सोनियांचे प्रामाणिक मत होते, तर त्यां आपल्या मतावर ठाम का नाही राहिल्या ?. ‘हिंदू मतं’ जातील, या भीतीपायी त्यांनी पडतं घेतलं.
आताही काँग्रेसनं चिदंबरम यांना वा-यावर सोडलं, याचंही कारण ‘हिंदू मतं’ जातील, हेच आहे. हे जे ‘हिंदू मता’चं प्रकरण आहे, तेच संघाचं खरं यश आहे. आज ‘हिंदू मत’ विचारात घेण्याची पाळी काँग्रेसवर आली आहे आणि म्हणूनच उद्या गुजरातेत काँग्रेस जरी सत्तेवर आली, तरी ती ‘साबरमतीच्या संता’ची काँग्रेस नसणार. ती असणार केवळ सत्ता राबवणारी काँग्रेस आणि तशी ती राबवताना राजकारण व समाजकारणात जे धर्मवादाचे मुद्दे संघ उठवत राहील, त्याला चोख व परखड असं पर्यायी राजकीय-सामाजिक चाकोरीतील उत्तर देण्यास काँग्रेस—आणि सर्व संघ विरोधरकही–असमर्थच ठरणार आहेत.
म्हणजेच राजकीय व सामाजिक स्तरांवरच्या चर्चाविश्वावर संघाचाच वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.
ही परिस्थिती कशी व कोठपर्यंत पोहचली आहे, याचं प्रत्यंतर नुकतंच ‘जमनालाल बजाज फाऊंडेशन’तर्फे ‘गांधीवादी योद्धयां’चा सन्मना करण्याचा जो समारंभ झाला, त्या निमित्तानं आला.
‘जमनालाल बजाज हे गांधीजीचे पाठीराखे होते. गांधीजींच्या चळवळीत सामील झाल्याबद्दल त्यांनी ब्रिटिशांचा रोष ओढवून घेतला होता. जसं बोलत , तसंच वागणारा हा समाजसुधारक होता’. (या समारंभानिमित्त जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या वतीनं प्रसिद्ध झालेल्या जाहितारातीतील हा मजकूर आहे) अशा या समाज सुधारकाच्या नावानं स्थापन करण्यात आलेल्या फाऊंडेशनच्या वतीनं दरवर्षी गांधीवादी कार्यात स्वत:चं आयुष्य व्यतीत केलेल्या ज्येष्ठ गांधीवाद्यांचा सन्मान केला जातो. ‘शुद्ध समर्पित वृत्तीनं सार्वजनिक हितासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आहे…शोषण विरहित अहिंसक समाज स्थापना हाच गांधीजीच्या विचारांचा खरा मूल्याधार आहे… आपापल्या क्षेत्रात या विचारधारेप्रर्माणं जे कार्यरत आहेत, त्याचा सन्मान करणे, हे या परितोषिकाचे तत्व आहे’, असं या समारंभाच्या निमित्तानं प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत मुंबई उच्च न्ययालयाचे माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं मतप्रदर्शन आहे. न्यायमूर्ती धर्माधिकारी हे या पारितोषिकासाठीच्या निवड समितीचे सदस्यही आहेत. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते दादा धर्माधिकारी यांचे सुपूत्र म्हणूनही न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची ओळख आहे.
या समारंभाच्या निमित्तानं जमनालाल फाऊंडेशनच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहितारातीतील हा मजकूर देण्याचं कारण म्हणजे असं इतकं उदात्त उद्दिष्टं असलेल्या या कार्यकमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, ते मोदी सरकारातील अर्थमंत्री अरूण जेटली.
जेटली हे कट्टर संघ प्रचारक होते व आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघ परिवारातील विद्यार्थी संघटनेचे ते पदाधिकारीही होते. ‘फाऊंडेशन’च्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणं ‘अहिंसक समाज स्थापना’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कधीच उद्दिष्टं नव्हतं व नाही. किंबहुना संघ जी ‘हिंदुत्वा’ची विचारसरणी प्रमाण मानतो, त्याचा पायाच ‘हा देश हिंदूंचा आहे’, हा आहे. सावरकरांनी मांडलेला ‘दिराष्ट्रवादाच्या सिद्धांतावर संघाची पूर्ण बांधणी झालेली आहे. संघाला हिंसा मान्य आहे.
असा हा ‘हिंदुत्वा’चा विचार मानणा-या नथुराम गोडसे यानंच महात्माजींचा खून केला; कारण ते मुस्लिम अनुनयाची भूमिका घेत होते आणि ती देश विघातक आहे, असं नथुरामला वाटत होतं म्हणून. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम, सब्को सन्मती दे भगवान’, असं गांधीजी म्हणत असत. उलट ‘हा देश हिंदूचा आहे आणि ज्यांची पुण्यभूमी देशाबाहेर आहे, त्यांनी येथे राहायचे असेल, तर हिंदूंची संस्कृती अंगिकारली पाहिजे, असं संघ मानत आला आहे. ‘हिंदुस्तान हा हिंदूंचा आहे, तसा तो इतर धर्मीयांचाही आहे’, असं अलीकडच्या काळात सरसंघचालक मोहन भागवत म्हण्त असतात खरे. पण अशी वक्तव्यं करताना ते असंही म्हणून ठेवतात की, ‘जसा जर्मनी जर्मनांचा, ब्रिटन ब्रिटिशांचा, तसा हिंदुस्तान हिंदूंचा’. पण ब्रिटन व जर्मनीत ख्रिश्चन बहुसंख्य असले, तरी तेथील कोणताही नेता ‘हा देश खिश्चनांचा आहे, पण येथे इतर धर्मीय राहू शकतात’, असं म्हणत नाही.
जेटली ज्या मोदी सरकारचे अर्थमंत्री आहेत, त्यानं गोवंश हत्याबंदी केली आहे. महात्माजी तर गोहत्या बंदीच्या पूर्णत: विरोधात होते. ज्यांचा धर्म व जीवनपद्धती त्यांना गोमांस खाण्याची मुभा देतं, त्यांचं मन वळवण्याचा मी प्रयत्न करीन, पण त्यांनी मानलं नाही, तर त्यांच्या गोमांस खाण्याच्या हक्काचा मी सन्मान करीन’, असं महात्माजींनी लिहून ठेवलं आहे.
महादेवभाई देसाई हे महात्माजींचे सचिव होते. भुवनेश्वर येथील काँग्रेस अधिवेशनानंतर महादेवभाई, त्यांच्या पत्नी व कस्तुरबा हे जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले. ज्या मंदिरात दलितांना प्रवेश नाही, तेथे मी जाणार नाही, असा महात्माजींचा निर्धार होता. त्यामुळं जेव्हा त्यांना कळलं की, महादेवभाई, त्यांच्या पत्नी व कस्तुरबा हे मंदिरात जाऊन आले, तेव्हा महात्माजींनी खरमरीत शब्दांत महादेवभाइंना खडसावलं की, या मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा, म्हणून उपोषण करून तू मृत्यू पावला असतास, तर त्याचा मला जास्त अभिमान वाटला असता’. पुणे करारानंतर महात्माजींनी देशभर ‘अस्पृश्यता विरोधी मोहीम’ हाती घेतली. याच कालावधीत वाराणसी येथे त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला. सनातनवाद्यांनी हा हल्ला केला होता. विेशेष म्हणजे गांधीजी स्वत:ला ‘सनातन हिंदूधर्माचे पाईक’ मानत असत. आज मोदी सरकार ‘स्वच्छ भारत’ योजना हाती घेऊन गांधीजीच्या नावे ती राबवत आहे. जणू काही गांधीजी हे हातात झाडू घेऊन भारत स्वच्छ करायलाच निघाले होते. गांधीजींची ‘स्वच्छता’ ही जातिव्यवस्थेच्या विरोधातील होती. मैला साफ करण्याचं काम दलितांनीच का करावं, हा महात्माजींचा सवाल होता. जेटली मंत्री असलेल्या मोदी सरकारनं महात्माजींच्या हाती झाडू देऊन त्यांना फक्त ‘स्वच्छते’पुरतंच मर्यादित ठेवलं आहे.
…कारण सर्वर्धमीय सद्भभाव व सहजीवन यावर असलेला गांधीजींचा भर हा संघाला परवडणारच नाही. किबहुना याच गांधीजींच्या भूमिकेमुळं नथुरामनं त्यांचा खून केला. गांधी खुनाच्या कटात सावरकरांना का अटक केली, असा सवाल करणारं पत्र शामाप्रसाद मुखर्जी यांनी सरदार पटेल यांना पाठवलं होतं. त्याला उत्तर देताना सरदारांनी म्हटलं होतं की, ‘ या प्रकरणात सावरकर यांचा हात होता की नाही, हे न्यायालयापुढं जे काही पुरावे येतील, त्यानुसार ठरेल. पण हिंदुत्ववादी विचारांच्या आधारे तुम्ही मंडळींनी जो विखारी प्रचार केला, त्याची परिणती बापूंच्या हत्येत झाली, याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही संदेह नाही.’ आज मोदी सरकारच्या काळात ‘गांधीजींच्या खुनात तिसरी गोळी झाडली गेली होती, असा दावा करणारी याचिका सर्वेाच्च न्यायालयात करण्यात आली आहे. नथुरामचे पुतळे उभारले जात आहेत. मोदी सत्तेवर आल्यावर गोवंश हत्याबंदीच्या नंतर गोरक्षकांचा जो धुमाकूळ चालला आहे, तो महात्माजींच्या ‘अहिंसक समाज स्थापना’ या भूमिकेवर पाणी ओतणारा तर आहेच, पण ‘सामाजिक सौहार्द व सर्वधर्मीय शांतातामय सहजीवन’ या महात्माजींच्या संकल्पनेलाच तिलांजली देणाराही आहे.
हिंदुत्वा’चा विचार गांधीजीच्या ‘विचारविश्वा’च्या नुसता विपरीत नाही, तर गांधीविचार पूर्णत: नष्ट व्हायला पाहिजे, असं मानणारा आहे. हाच हिंदुत्वाचा विचार प्रमाण मानणाऱ्या अरूण जेटली यांच्या हस्ते ‘गांधीवादी योद्ध्यां’च्या सन्मान करण्यात येत असेल, तर या इतकं दुर्दैव कोठलं असू शकतं!
म्हणजे नथुरमानं गांधीजीची शारीरिक हत्या केली. आता गांधीवाद्यांनीचं केला आहे, महात्माजींचा वैचारिक खून.
‘जमनालाल बजाज फाऊंडेशन’च्या कार्यक्रमातला अरूण जेटली यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावण्याचा हाच खरा अर्थ आहे.
देशातील सारं चर्चाविश्व कसं धार्मिक विद्वेषानं भारून जात आहे आणि अशा विद्वेषालाच कशी अधिमान्यता मिळण्याजोगी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे, याचं ताजं उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यालयात जाऊन पोचलेलं ‘लव्ह जिहाद’चं प्रकरण. हिंदू मुलींना प्रेमप्रकरणात फसवून, त्यांना धर्मातर करायला लावून, मुस्लिमांशी लग्न करायला भाग पाडलं जात आहे, असा आरोप मोदी सरकार २०१४ साली सत्तेवर आल्यापासून केला जात आहे. निव्वळ साध्या प्रेम प्रकरणातून एखाद्या भिन्न धर्माच्या तरूण-तरूणीनं विवाह केला, तर राज्यघटनेनं त्यांना दिलेला तो अधिकारच आहे. हा मुद्दा व्क्तीच्या निर्णय स्वातंत्र्याशी निगडित आहे. केरळातील अशाच एका प्रकरणात राज्याच्या उच्च न्यायालयानं याच निकषावर हा आरोप फेटाळून लावलेला असताना, आता हे प्रकरण सर्वोच्च न्ययालयात नेण्यात आले आहे. या मुलील फसवून, तिला धर्मांतर करायला लावून, मुस्लिम तरूणाशी तिचा विवाह लाहून देण्यात आला आहे, असा तिच्या पालकांचा आरोप आहे. त्यामुळं त्या मुलीला न्यायालयात हजर करण्याचा व तिच्याकडूनच वास्तव समजून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं घेतला आहे. हे प्रकरण केरळातील आहे, हेही लक्षात घेण्याची गरज आहे कारण त्या राज्यात कम्युनिस्ट व संघ यांच्यात सध्या हाणामारी सुरू आहे. त्यामुळं सारं समाजविश्व विद्वेषाच्या चक्रात अडकवून टाकण्याचे आपले नेहमीचे डावपेच संघ खेळत आहे.
अशा रीतीनं विद्वेषाचं विष समाजमनात भिनवलं जात आहे आणि त्या प्रक्रियेला अधिमान्यता मिळण्याची शक्यता कशी निर्माण होत आहे, ते हे सर्वोच्च न्यालयाचा ताजा आदेश दर्शवतो.

अशा रीतीनं हिंदुत्वाला समाजात अधिमान्यता मिळत गेली, तर दिल्लीत वा मुंबईत कोणाचं सरकार आहे, हा मुद्दाच गैरलागू बनून जाईल. तेच खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळातील विवेकवाद्यांपुढील प्रमुख आव्हान असणार आहे.

प्रकाश बाळ हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आदी नामांकित वर्तमानपत्रांमध्ये अनेक वर्षे त्यांनी ज्येष्ठ सहाय्यक संपादक, निवासी संपादक आदी पदांवर काम केले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांचे ते अभ्यासक आहेत. श्रीलंकेतील तामीळ प्रश्न आणि काश्मीर या दोन विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. श्रीलंकेतील तामीळ इलमच्या प्रश्नावर त्यांनी लिहिलेले पुस्तकही विख्यात आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करणारे बाळ हे वाचकांना परिचित आहेतच राईट अँगल्सच्या अनेक ज्येष्ठ मान्यवरांपैकी महत्त्वाचे नाव असलेले बाळ या माध्यमातून सतत आपल्या भेटीला येणार आहेत.

Write A Comment