fbpx
सामाजिक

जगभरात उदारमतवादाचा पराभव का होतोय?

परवेझ हूडभॉय हे अणुशास्त्रज्ञ, गणितज्ञ असून, पाकिस्तानातील फोरमन ख्रिश्चन कॉलेज व कायदे आझम युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. कार्नेजी मेलन, एम आय टी, स्टॅनफर्ड अशा जगातील सर्वोच्च दर्जाच्या विद्यापीठानी त्यांना सन्माननिय व्याख्याता म्हणून वारंवार निमंत्रित केले आहे. फॉरेन पॉलीसि या वृत्तवाहिनीने, जगातील १०० प्रभावशाली विचारवंतांत त्यांचा सामावेश केला आहे. इस्लाम व विज्ञान हे त्यांचे पुस्तक जगभरात गाजले आहे.  पाकिस्तानातील, किंबहुना भारतीय उपखंडातील वाढता धार्मिक उन्माद, त्याचे शिक्षण क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम, याचे ते महत्वाचे भाष्यकार मानले जातात. आजूबाजूला धार्मिक कट्टरवाद्यांचा हिंसक धुमाकूळ सुरु असताना, उदारमतवादी विचारांच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहण्याचे धैर्य परवेझ हूडभॉय यांनी दाखविले आहे. द डॉन या पाकिस्तानी दैनिकात ते नियमित ब्लॉग चालवितात, पाकिस्तानी टी व्ही चॅनल्स वरील चर्चांमध्येहि त्यांना आमंत्रित केले जाते.
सदर लेख हा त्यांनी लिहिलेल्या ब्लॉग्स तसेच काही चर्चांतून, मुलाखतींतून त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे. हूडभॉय यांच्या लेखनातील संदर्भ पाकिस्तान व इस्लामी कट्टरतेचे असले तरी आजच्या भारतासहि त्यांनी मांडलेले मुद्दे किती चपखल बसतात हे वाचकांनी स्वतःच ठरवावे.


‘पुरोगामी’ हि पाकिस्तानातील एक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली जात आहे. २०११ साली पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्या झाली. तासीर यांनी पाकिस्तानातील ईश निंदेच्या कायद्याचा उघडपणे विरोध केला होता. त्यावर नाराज होऊन त्यांच्या अंगरक्षकानेच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या हत्येच्या विषयावर वर एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत मी सहभागी झालो होतो. या चर्चेत जमात ए इस्लामीचे प्रवक्ते फरीद प्राचा मला स्पष्टपणे म्हणाले कि आज, सलमान तासीर च्या हत्त्येमुळे पाकिस्तानची जनता आनंदी आहे. फक्त तुझ्या सारख्या जेमतेम तीनेकशे लोकांना या हत्येचा विषाद वाटतोय. आमचं दुर्दैव हे कि मुसलमानांनी ईश निंदा सहन करण्यास शिकावे असा आग्रह धरणाऱ्या तुझ्यासारख्या, संख्येने तीनशेच्या आसपास व्यक्ती पाकिस्तानात शिल्लक आहेत. फरीद प्राचा सरळ सरळ अतिशयोक्ती करीत होते. कारण माझा अंदाज आहे कि सहिष्णुतेचा आग्रह असणाऱ्या किमान काही लाख व्यक्ती पाकिस्तानात निश्चित आहेत. परंतु हेही खर कि हि संख्या झपाट्याने खालावत आहे. पुरोगामी विचारांची फक्त पाकिस्तनातच नाही तर जगभरात पीछेहाट होताना दिसतेय.

आपल्या शेजारी, भारतात कट्टर हिंदुत्ववादी आज सत्तेत आहेत. भारतातील पाठयपुस्तकांतून इतिहासाचे पुनर्लेखन करायचे विनोदी काम सुरु आहे. गाई ला हिंदू देवता मानतात. बीफ खाल्ल्याच्या किंवा बाळगल्याच्या नुसत्या संशयावरून उन्मादी गोरक्षकानी मारहाण करून जीव घेतलयाच्या घटना तिथे घडल्या आहेत. अमेरिकेत तर एका, मुस्लिम द्वेष्ट्या, टोकाच्या वर्ण व वंश वादी विदूषकास तेथील जनतेने सत्ता बहाल केली आहे. युरोपात तर संकुचित विचार असलेले नेतृत्व गेली काही दशके लोकप्रिय होताना दिसत आहे. फ्रांस मध्ये जॉन ले पेन, तुर्कस्तानात रेसेप एर्दोजन, हॉलंड मध्ये गर्ट विल्डर्स…जगभरात पुरोगामी विचारधारेवर संकुचित धार्मिक, वांशिक किंवा जमातवादी विचारधारा वर्चस्व मिळवताना दिसतेय.

पाकिस्तानातील बहुसंख्यासाठी हि फार आनंदाची बातमी आहे. इम्रान खानने तर पुरोगामी हि या देशातील मैला असल्याचे घोषितच केले होते. जमाते इस्लामी मधील त्याच्या काही सहकाऱयांनी तर अहमदीं सारखेच पुरोगाम्यांना अल्पसंख्य जमात घोषित करावे अशी मागणी केली होती. एका दूरचित्रवाहिनी वरील कार्यक्रमाच्या सूत्रधाराने तर, त्याच्या चर्चेच्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना जाहीर आवाहन केलं कि विद्यार्थी प्रेक्षकांनी आपापल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठात आपले स्मार्टफोन वापरून, जे शिक्षक लिबरल विचारांचं समर्थन करतात त्यांना रंगे हाथ चित्रित करावे व ते यु ट्यूब व अन्य सोशल मीडियावर पसरवावे.  अर्थातच अशा शिक्षकांना ‘सुधरवायचे’ काम करायला खूप कट्टरपंथीय हिरीरीने पुढे येतील हे सांगायलाच नको. अशा लोकांनीच बांगलादेशात कैक ब्लॉग लेखकांची हत्या करून ‘स्वच्छ बांगलादेश’ ची मोहीम चालवलीय.

पाकिस्तानी टी व्ही वृत्तवाहिनीवर अलीकडे खूप चर्चा घडवून आणल्या जातात. अशा कार्यक्रमांच्या सूत्र संचालकांमध्ये सध्या एक विशेषण सध्या फार प्रचलित आहे. ते आहे ‘लिबरल फॅसिस्ट’. मी खूप विद्यार्थ्यांना आणि इतरजणांना या शब्दाचा अर्थ विचारला आणि एखाद्या लिबरल फॅसिस्ट माणसाचे उदाहरण विचारले. जिन्हा कैक वर्षांपूर्वीच कबरीत पोचल्यामुळे त्यांचे नाव कोणी घेतले नाही, परंतु एक जण म्हणाला कि मुशरर्फ हा लिबरल फॅसिस्ट होता. का ? तर त्याने इस्लामाबादेत स्त्री पुरुषांच्या संयुक्त मॅरेथॉन ला परवानगी दिली. असं हे स्त्री पुरुषांनी एकत्र धावणं आपल्या इस्लामी संस्कृतीत बसत नाही. ते इस्लाम विरोधी आहे. मुशर्रफने इस्लामविरोधी गोष्टीला उत्तेजन दिल, म्हणून तो फॅसिस्ट म्हणता येईल. इतर काही जण म्हणाले कि हि लिबरल फॅसिस्ट म्हणजे फार भयानक जमात आहे. त्यांना धर्मावरच बंदी आणायचीय, मशिदी बंद करायच्यायत, मौलविंना फासावर चढवायचंय. – या सगळ्या गोष्टी कराव्यात हे नेमकं कोण बोललंय ? या प्रश्नाला मात्र मात्र काही उत्तर मिळत नाही. एवढी भयानक लिबरल फॅसिस्टांची अक्खी जमात असल्याचा दावा केला जातो, परंतु या जमातीतल्या एकाही माणसाचे नाव कोणालाच ठाऊक नाही.

आता हे लिबरल किंवा उदारमतवादी नेमकी कोण मंडळी आहेत याबद्दल काहीच स्पष्टता नसल्यामुळे, उदारमतवादी म्हणजे नेमके कोण याची व्याख्या आपण इथे करू. उदारमतवादी हे लेबल लावता येईल अशा व्यक्तींचा एक विस्कळीत समुदाय आहे. अशा लोकांना स्वतःसाठी व इतरांसाठी एक मोकळी , व्यक्तिस्वातंत्र्य देणारी व्यवस्था देशात असावी असं प्रकर्षाने वाटत. या उदारमतवादी लोकांपैकी काही धार्मिक आहेत, काही धर्माबाबत उदासीन आहेत तर काही ठामपणे नास्तिक आहेत. त्यांच्या पैकी काही दारू पितात, काही दारूस बिलकुल स्पर्शही करीत नाहीत. हे व्यक्तिस्वातंत्र्याचे भोक्ते आहेत. स्त्रियांनी हिजाब घ्यावा कि नाही असे विचारले तर ते म्हणतील कि हिजाब घेण्याचे किंवा न घेण्याचे तसेच नोकरी करण्याचे किंवा न करण्याचे स्वातंत्र्य स्त्रीस असले पाहिजे. जिला हिजाब घ्यायचाय, तिने जरूर घ्यावा, पण ज्यांना नाही घ्यायचा त्यांच्यावर सक्ती करू नये.

हा समुदाय कितीही विस्कळीत असला, तरी जग कस असावं या बद्दल स्थूलमानाने त्यांचे एकमत असत. उदारमतवादी विचारास समतेचे अधिष्ठान आहे. सर्व वर्ण, वंश व धर्माच्या सर्व स्त्री व पुरुषांना व्यक्त व्हायचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. राज्य तसेच न्यायसंस्थेने त्यांना भेदभाव न करणारी वागणूक द्यावी. माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीस समान प्रतिष्ठा आहे, मूलभूत अधिकार आहेत आणि कोठलीही संस्था व्यक्तीचे मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकत नाही अशी काहीशी पुरोगामी व्यक्तींची धारणा असते. या धारणेचे मूळ अर्थातच युरोपीयन आहे. फ्रेंच राज्यक्रान्तीनंतर युरोपात समतेचे मूल्य प्रतिष्ठा पावले. उदारमतवादी तत्वाचे मूळ युरोपच्या प्रबोधन युगातील असले तरी वंशपरंपरागत विशेषाधिकार व राजेशाहीस नकार देण्याची कल्पना जगभरात स्वीकारली गेली. परंतु उदारमतवाद्यांचे एकमत होईल असे प्रश्न इथेच संपतात.  या पलीकडे अर्थव्यवस्था कशी असावी, कर रचना कशी असावी, शिक्षण व आरोग्य यात सरकारची जबाबदारी किती ? अशा तपशिलात शिरल्यास उदारमतवादी समुदायात कोठल्याच प्रश्ना वर एकमत दिसणार नाही. यापैकी काही मंडळी समाजवादी विचारांची असतील, तर काही सरकारने उद्योग धंद्यात हस्तक्षेप करू नये फक्त कायदा व सुव्यवस्था राखावी अशा मताचे असतील.

आता जगभरात उदारमतवादाचा पराभव होताना का दिसतोय या मूळ मुद्द्याकडे वळू.
पाश्चात्य देशांत होणार संकुचित विचारसरणीचा उदारमतवादावरील जय व मुस्लिम देशांत होणारी तीच घटना यांत प्रमाणाचा फरक असला तरी मला जाणवणारे त्याचे मूळ कारण एकच आहे. आणि ते आहे या जगाचा बदलण्याचा वेग. चाळीस वर्षांपूर्वी एल्विन टॉफलर या अमेरिकन लेखकाने “फ्युचर शॉक” या नावाचे पुस्तक लिहिले होते. तंत्रज्ञान ज्या झपाट्याने जग बदलून टाकीत आहे त्याचा परिणाम म्हणून समाजात विलक्षण उलथापालथ घडून येणे अटळ आहे असे भाकीत टॉफलरने केले होते .जग, विशेषतः पाश्चात्य जग औद्योगिकरणाचे युग पार करून औद्योगिकरणपश्चात युगात प्रवेश करते झाले आहे. या उलथापालथीत आजवर तुलनेने समतोल राखून असलेले समाज ढवळून निघतील, नवीन रचना, नवीन व्यवस्था अस्तित्वात येतील. जग अचानक छोटं होतंय आणि चक्रावून टाकणाऱ्या वेगाने भोवऱ्यागत फिरतंय. हे होताना माणूस आपल्या समाजा पासून तुटत जाईल, या तुटलेपणातून त्यातून असंख्य मनोविकार उद्भवतील. पुढील पिढ्यानां जागतिकीकरणाच्या असह्य ताणास सामोरे जावे लागणार आहे. मानवाचे भविष्य झटके खाणार आहे. फ्युचर शॉक !

टॉफलरने वार्तविलेल्या या भविष्य झटक्यांत गोते खाणाऱ्या पाश्चात्य समाजांचा समतोल पुरता ढासळवला तो अलीकडेच होणाऱ्या सामूहिक स्थलांतरांनी.
काल परवा पर्यंत बऱ्या पैकी एकसामायिक, एकसंध समाज असण्याऱ्या पाश्चात्य देशांवर जसे स्थलांतरितांचे जथ्थे आदळू लागले तसे त्या समाजांची या भिन्न संस्कृतींना, समूहांना सामावून घायची मर्यादा ताणली जाऊ लागली. हे बाहेरून येणारे भिन्न वांशिक, भिन्न धर्मीय लोक आपल्या आजवर स्थैर्याने चालणाऱ्या व्यवस्थेवर अतिक्रमण करताहेत, आपली सामाजिक घडी विस्कटून टाकताहेत हि भावना पाश्चात्य देशांत प्रबळ होऊ लागली. त्यातूनच हि भावना आक्रमक पणे व्यक्त करणारे, देशाची कुंपणे बळकट करून यापुढे उपऱ्याना येथे थारा देऊ नका अशी मागणी करणारे नेतृत्व पाश्चात्य देशांत लोकप्रिय होऊ लागले.
आपली पारंपरिक मूल्यव्यवस्था जपण्याचे वचन देणारी, हा देश परत एकदा थोर बनवू असा वादा करणाऱ्या नेत्यांना पाश्चात्य देशांतील जनतेने सत्ता बहाल केली. ब्रेक्झिट आणि ट्रम्प हि पाश्चात्य जनतेने केलेली निवड आहे. उदारमतवादाचा पराभव करूनच तेथील जनतेने हि निवड केली आहे.

उदारमतवादाचा मुस्लिम जगतातील पराभव अधिकच नेत्रदीपक आहे. गेल्या काही दशकांपूर्वी तुलनेने स्थिर असलेले मुस्लिम देश सुद्धा तंत्रज्ञानाने ढवळून निघाले. हरितक्रान्ति मुळे अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होऊ लागले. येरवी शक्य होती त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकसंख्या पोसणे शक्य झालेआधुनिक वैद्यकाने कैक साथीचे रोग आटोक्यात आणले, सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून लोकसंख्या बेसुमार वाढली, हि वाढीव लोकसंख्या शेतीउद्योगात सामावली जाणे शक्य नव्हते त्यामुळे आजवर गावा खेड्यांतून स्वायत्तपणे राहणारा समाज आता शहरांकडे ढकलला गेला. जमिनी पासून तुटलेलया बेरोजगार माणसांचे थवे येथील अर्धविकसित शहरांवर आदळू लागले. त्यातून व्यवस्थेवर ताण निर्माण होणे अपरिहार्य होते.
दारिद्र्य व बकालीने पिचलेले मुस्लिम समाज, आजच्या जगातील जटील समस्यांवर सोपे उपाय शोधत राहिले. जगावर एकेकाळी इस्लाम ने राज्य केले, अत्यंत वैभवाचे दिवस मुसलमानांनी भूतकाळात पहिले. नंतरच्या काळात अधर्म झाला. त्यामुळे मुसलमानांचे पतन झाले. इस्लामचे पूर्णार्थाने पालन केले तर ते सुवर्णयुग परत अवतरेल या भ्रमात असलेले मुसलमान शुद्ध इस्लामचा अंमल लागू करण्याची मागणी करतात. घड्याळाचे काटे चौदाशे वर्षे मागे नेऊन मदिनेंतील पैगंबरांचे राज्य पुन्हा साकार होईल असा त्यांना विश्वास असतो. यातूनच शुद्ध इस्लामचे ब्रीद घेतलेल्या दाईश, बोको हराम, तालिबान, इख्वान उल मुसलमीन अशा चळवळी फोफावतात.

जगभरात उदारमतवाद एका अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. अगदी क्वचितच त्याचा विजय होताना दिसतोय. संकुचित, धर्मान्ध, असहिष्णू, जातीवादी, सांप्रदायिक आणि राष्ट्रवादी असणे सोपे आहे. उदारमतवादी, समावेशक आणि मानवतावादी असणे फार कठीण आहे. फरीद प्राचा म्हणाले त्याप्रमाणे मी व माझ्यासारख्या तीनशे उदारमतवादी लोकांना खलास करून टाकणे येथील उन्मादी टोळ्यांस सहज शक्य आहे. परंतु त्याने या देशाचा कोठलाच प्रश्न सुटणार नाही.

 

राईट अँगल्स Editorial Board

Write A Comment