fbpx
राजकारण

वाह ताज !!!

ख्रिस्तोफ जेफ्रेलॉ हे फ्रेंच प्राध्यापक भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक मानले जातात. त्यांचे निरीक्षण असे आहे कि फॅसिझम चा भारतीय अविष्कार हा त्याच्या युरोपीय भावंडापेक्षा वेगळा आहे . राष्ट्रीय सयंसेवक संघाचे धोरण दीर्घकालीन आहे. त्यांना एक जैविक परिवर्तन घडवून आणायचे आहे. परंतु प्रसंगी बलाचा व दमनशक्तीचा प्रयोग करावा लागला तर तो करण्यास त्यांची हरकत नसेल. आर्थर रोझेंबर्ग या जर्मन विचारवंताने फार महत्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो की कम्युनिस्टांनी फॅसिझम कसा अमलात येतो हे जोखण्यात एक मोठी चूक केली. ते समजत राहिले की लष्करी व पोलीस दमनशक्तीच्या बळावरच फॅसिझम टिकतो व वाढतो. अर्थात शासनाची दमनशक्ती व शासकीय पाठिंब्याने होणारा हिंसाचार फॅसिझमला दृढ करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. परंतु फॅसिझमसाठी त्याहूनही महत्वाचे पोषणमूल्य असते ते जनमतच्या पाठिंब्याला. म्हणूनच लोकशाहीत अति उजव्या शक्ती जेव्हा सक्रिय होऊन आपल्या राष्ट्रवादी भूमिकेस जनमताचा प्रचंड पाठिंबा मिळवितात तेव्हा फॅसिझमचा धोका सर्वाधिक वाढतो.

–वागराज बादरायण

कविवर्य रविन्द्रनाथांनी ताज महालचे वर्णन इतिहासाच्या गालावर ओघळलेला आसू असे केले होते. ताज महाल हे भारतीय इतिहासात अमर प्रेमाचे एक प्रतीक म्हणून चिरस्थायी झाला आहे, भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रतिभावंतांना ताज महालची मोहिनी पडली आहे. जगातील अचंबित करणाऱ्या सात वास्तूंमध्ये ताजची गणना होते. पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडविलेली ही वास्तू स्थापत्य शास्त्रातील एक चमत्कार मानली जाते. देश विदेशातील करोडो पर्यटकांसाठी ताज महाल हे आकर्षण राहिले आहे. परंतु हाच ताज आज काही जणांच्या डोळ्यात खुपू लागला आहे.
एक अत्यंत देखणी ऐतिहासिक वास्तू या पलीकडेही ताजची एक खास ओळख आहे. या सेक्युलर देशाने आपल्या मुघल इतिहासाची ही देखणी आठवण एक अभिमान बिंदू म्हणून आजवर जपली आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनास्थळ म्हणून त्याची ओळख जगाला करून दिली आहे.
भारतातील एका वर्गाला मात्र ताज कायमच एखाद्या रुतलेल्या काट्यासारखा बोचत आला आहे. काही वर्षांपूर्वी पु. ना. ओक या हिंदुत्ववादी इतिहास ‘सांशोधकाने’, ताज महाल हे मुळात हिंदूंचे शिवमंदिर -‘तेजो महाल’ असून ते शहाजहानने बळकावून त्याचे नाव ताज महाल ठेवले असा एक सिद्धांत मांडला
होता. हिंदुत्ववादी मंडळींमध्ये या ओककृत मीमांसेची फार वाहवा झाली होती. मुस्लिम हे या देशात उपरे असून या देशाचा भूगोल व इतिहास हा फक्त आणि फक्त हिंदूंचाच असला पाहिजे. मुसलमानांची ओळख ही , आक्रमक, परकीय व अत्याचारी अशीच इतिहासात नोंदली गेली पाहिजे. मुस्लिम संस्कृतीचा एत्तद्देशीय संस्कृतीबरोबर झालेला मिलाप, मुस्लिम संस्कृतीचे या देशाच्या इतिहासातील योगदान साफ पुसून टाकले पाहिजे अशी विचारसरणी असणाऱ्या पक्षाची आज उत्तर प्रदेश व संपूर्ण देशात सत्ता आहे. इतिहास घडविता येईल असे कर्तृत्व नसले तरी इतिहास ‘नव्या’ने लिहिण्याची त्यांची क्षमताच नाही तर दुर्दम इच्छादेखील आहे. त्या दृष्टीने सत्तेत आल्यापासून त्यांनी मोहीमच काढलीय. या ‘इतिहास स्वच्छता’ मोहिमेचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या पर्यटक मार्गदर्शक पुस्तिकेतून ताज महालला वगळून टाकलेय.
एक सुटी घटना म्हणून पाहिल्यास ताजला उत्तर प्रदेश पर्यटकसूची मधून वगळणे हा एक सरकारी मूर्खपणा म्हणून हसण्यावारी नेणं शक्य आहे. उद्या कदाचित महसूल बुडतोय हे लक्ष्यात आल्यावर हेच सरकार ताजला परत सरकारी पर्यटन सूचित सन्मानाने जागा देईलही, परंतु मुळात ताजचं वगळलं जाणं हे एका व्यापक कटाचा भाग आहे. सरकार तिच्या मातृसंस्थेच्या विचारधारेशी सुसंगत अशी देशाच्या ऐकतेस सुरुंग लावणाऱ्या धोरणांची अंमलबाजवणी करण्याच्या कार्यक्रमाचे एकेक पाऊल पुढे टाकतेय. या संदर्भातच या घटने कडे पाहावे लागते. गोरक्षा आंदोलन असो की इतिहासाचे पुनर्लेखन ,
गेली तीन वर्षे हे सरकार संघाच्या फॅसिस्ट विचारसरणीस मूर्त स्वरूप द्यायचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.
संघाचा फॅसिस्ट अजेंडा राबविण्याचे काम हे वेगवेगळ्या किमान चार पातळ्यांवर सुरु आहे. अगदी पहिल्या प्राथमिक पातळीवर त्यांनी एक भक्त संप्रदाय उभा करण्याचे काम हाती घेतले. गेली तीन वर्षे संपूर्ण सरकारी प्रयत्न, नरेंद्र मोदी हा एकच नरवीर संपूर्ण सत्ता राबवित आहे अशी प्रतिमा उभी करण्याचा आहे. सरकारी जाहिराती, सरकारने पुरेपूर कब्जात ठेवलेल्या प्रसारमाध्यमांतील बातम्या, वेगवेगळ्या मंत्र्यानी वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी केलेली विधाने, सोशल मीडियावर पक्षाच्या आय टी सेल ने चालवलेला प्रचार, सर्वच पद्धतशीरपणे नरेंद्र मोदी या एका व्यक्तीच्या खऱ्या खोट्या कर्तृत्वाभोवती केंद्रित झालेला दिसतो. प्रधानमंत्र्यांचे अधिकृत वेब संकेतस्थळ उघडून पहा. तिथे एक अधिकृत पी एम ओ ‘अॅप’ आहे जे फक्त १ लक्ष लोकांनी डाउनलोड केलय दुसरे असेच अधिकृत माय
गव्हर्नमेंट अॅप पाच लाख लोकांनी डाउनलोड केलय. तेच तिसरे एक नमो अॅप आहे, ते मात्र तब्ब्ल पन्नास लाख लोकांनी डाउनलोड केलय. हे आपोआप होत नसत. अस हि नाही कि नमो अॅप या दोन अधिकृत अॅप च्या तुलनेत तांत्रिकदृष्ट्या फार सरस आहे म्हणून जास्त लोक ते डाउनलोड करतायत.
हे व्यक्ती केंद्री नमो अॅप, अधिकृत पी एम ओ अॅपच्या तुलनेत पन्नास पट अधिक डाउनलोड होण्याचे एकमेव कारण हे आहे , की बी जे पी ची आय टी सेल त्याच्या आक्रमक प्रचार करतेय. खुद्द प्रधानमंत्री संधी मिळेल तिथे या नमो अॅप चा प्रचार करतात, या अॅप बद्दल भरभरून बोलतात. पहाल त्या सरकारी
जाहिरातीत, एकच चेहरा दिसतो.कोठल्याही खात्याचे मंत्री आपण सरकार म्हणून काय योजना यशस्वी केल्या सांगण्यापेक्षा सर्व काही प्रधानमंत्रीच करीत आहेत असे सूर आळवताना दिसतात. दूरदर्शन व ऑल इंडिया रेडियो तर सरकारी प्रसारमाध्यमेच असल्यामुळे त्यांना अष्टोप्रहर नरेंद्र मोदी हे नाव झळकत ठेवण्याची जणू सक्तीचं आहे. सर्वशक्तिमान एकमेवाद्वितीय अशा नेत्याची प्रतिमा उभी करणे ही फॅसिस्ट अंमलबजावणीची प्राथमिक पायरी आहे.
फॅसिस्ट अजेंडयाचा दुसऱ्या क्रमांकाचा कार्यक्रम आहे तो विरोधकांमध्ये भयंकर दहशत आणि तसेच जनतेमध्ये आदरयुक्त भीती निर्माण करणे. विरोधकांचा आवाज दाबून टाकला की जनतेतील असंतोषास वाचा फुटत नाही. सरकार सर्वशक्तिमान आहे आणि कोठल्याही थराला जाऊन ते विरोधकांच्या मुसक्या आवळू शकते अशी जनतेची खात्री पटविली की नवीन विरोधक तयारच होत नाहीत. मग काय वाटेल ते मनमानी प्रयोग करा, नोटबंदी करा, रोकड काढायचे नियम पन्नास वेळा
बदला, जी एस टी घाईघाई ने अमलात आणा, प्रयोग फसलाय हे दोन महिन्यात कळल्यावर कराचे दर बदलून पहा, काय वाट्टेल ते करा, जनता हैराण होते, परंतु विरोध करावयास धजत नाही. २०१३ साली दाभोलकारांपासून जो विरोधी विचारांना हिंसेने संपवून टाकायचा सिलसिला सुरु झाला , त्यात पुढे पानसरे , कलबुर्गी , गौरी लंकेश असे बळी घेतले,एवढ्या सर्वशक्तिमान सरकारला मारेकरी सापडतच नाहीत याचे कारण स्पष्ट आहे. आताही तामिळ लेखक मुरुगन, दलित विचारवंत कांचा इलाया, “आता
आदिवासी नाचणार नाहीत ” या आता बंदी घातलेल्या पुस्तकाचे आदिवासी लेखक हंसदा सोवेन्द्र शेखर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतच आहेत.
वर उल्लेख केलेली नावे ही मोठ्या आणि प्रसिद्ध लोकांची आहेत, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांनासुद्धा या दडपशाहीचा अनुभव पदोपदी येतोय. पोलीस यंत्रणा, गृहखाते, गुप्तहेर खाते या सगळ्याच गोष्टी ताब्यात असल्यावर, विरोधकांच्या सभा उधळून लावणे, सोशल मीडिया वर घेरून धमक्या देणे, विरोधकांना सभा घेण्यासाठी पोलीस परवानगीच नाकारणे अशा गोष्टी एकदम सोप्या होऊन जातात.
एकीकडे राजकीय विरोधकांचे दमन करताना दुसरीकडे सामान्य जनतेस जरब बसविण्याचा उद्योगही सुरु आहेच. त्यासाठी वेगवेगळे दक्षता गट स्थापन झालेत. हे काही वैधानिक अधिकार असलेल्या कायदेशीर संस्था नाहीत. हे नागरी गट आहेत. गो रक्षक समिती हे त्याचे ठळक उदाहरण. सरकार व गृह खात्याच्या थेट व मूक पाठिंब्या शिवाय असे गट कार्यरत होणे अशक्य आहे, कारण आजवरची
उदाहरणे पाहता, या गोरक्षकांना सरकारी यंत्रणेने कवच पुरविलेले दिसते. पोलीस एकतर गुन्हेच नोंदवून घेत नाहीत, किंवा प्रसारमाध्यमांनी दडपण आणल्यामुळे गुन्हा नोंदवलाच तर त्या नोंदीत अशा फटी ठेवून देतात की आरोपी पुढे कोर्टात सुटलाच पाहिजे. राजस्थानातील गो रक्षकांच्या हल्ल्यात बळी
पडलेल्या पेहलू खानचे उदाहरण बोलके आहे. पेहलू खानने मरण्यापूर्वी दिलेली जबानी हा पुरेसा पुरावा असतानासुद्धा पोलिसांनी हल्लेखोरांवर आरोपपत्रच ठेवले नाही. गोरक्षकांच्या हिंसाचारावर आंतराष्ट्रीय समुदायातून प्रतिक्रिया येऊ लागल्यावर अखेर नाईलाजाने प्रधानसेवकानी हिंसक गोरक्षेवर नाराजी व्यक्त केली खरी पण त्यावर विसंबून आता ही गोरक्षकांची दहशत थांबेल या भ्रमात राहू नका. कारण ज्यांचा शब्द संघपरिवारात अखेरचा मानला जातो त्या सरसंघचालकांनी विजयादशमी मेळाव्यात गोरक्षेची भलावण केलेली आहे.
गोरक्षा समितीनंतर आता स्वच्छता अभियान राबविण्यासाठी काही नागरी संघटना स्थापन झाल्या आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांना जाहीरपणे हिणवून त्यांना स्वच्छतेचा ओनामा द्यायच्या नादात या संघटनांची मजल हत्या करण्यापर्यंत गेली आहे. राजस्थानातील प्रतापगढ येथे काही महिला उघड्यावर शौचास बसल्या असता, त्यांना धडा शिकविण्यासाठी नगरपालिकेचे एक पथक त्यांचे फोटो काढायला सरसावले. जफर खान या इसमाने त्यांना विरोध केला. या लोकांनी जफर खान ला मारहाण करून त्याचा जीवच घेतला. अलीकडेच महाराष्ट्रात एका जिल्हाधिकाऱ्याने उघड्यावर शौचास गेल्या म्हणून पकडून काही महिलांचा हारतुरे घालून ‘सत्कार’ केला. स्त्रियांना अपमानित करण्याचा हा अधिकार कुठल्या कायद्याने दिलाय ?
या दोन उपक्रमांच्या बरोबरीने, तिसऱ्या पातळीवर अजून एकउपक्रम फॅसिस्ट शक्ती राबवितातयत. तो आहे येथील बहुसंख्यांना म्हणजेच हिंदूंना एक काल्पनिक शत्रू उपलब्ध करून देणे. असा शत्रू ज्याच्यावर बहुसंख्य जनता एकवटून आपला सगळा राग, सगळी भडास काढू शकेल. संघ परिवारातील काही संस्था अगदी खुल्या पद्धतीने हा भावना भडकविण्याचा खेळ खेळत आहेत. वंदे मातरमची सक्ती करून मुसलमानांना आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध करावयास लावणे, मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करणे, खोटे आणि बनावट व्हिडियो सोशल मीडियात फैलावून जे एन युतील विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारणे या सर्व कारवाया सरकारी आशीर्वादाने संघपरिवारातील संस्था या
तिसऱ्या उपक्रमांतर्गत करीत आहेत.
भाजपाच्या राजकीय  व्यवस्थपकाना या उपक्रमातून दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक म्हणजे त्यांच्या विचारसरणीचे येथील विरोधक म्हणजे लिबरल / उदारमतवादी विचारवंताना एकटे पडता येईल. गोळवलकरपुरस्कृत हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात जाणारी सर्वसमावेशक आणि सहिष्णू विचारधाराच त्यायोगे खलास करता येईल. दुसरे उद्दिष्ट्य म्हणजे बहुसंख्य हिंदू जनतेस- पहा, नीट पहा, हे मुसलमान या देशाशी एकनिष्ठ नाहीत, प्रसंगी ते घात करतील- हे पटवून देता येईल. मुसलमान राष्ट्रविरोधी आहेत. का ? तर आम्ही, म्हणजे संघ, सांगतो त्या राष्ट्रवादाच्या व्याख्येत ते बसत नाहीत.
राष्ट्रवाद, प्रखर राष्ट्रवाद हा फॅसिझमचा कणा आहे. फॅसिझम हा राष्ट्रवादावर आरूढ होऊनच येत असतो. जगाच्या इतिहासाने हे सिद्ध केलेले आहे. साऱ्या जनतेस राष्ट्रवादाच्या उदात्त ध्येयात गुंडाळून टाकण्यात फॅसिझमचे यश सामावलेले असते. ते साध्य करण्यासाठी देशातील सर्व मतमतांतरे, सांस्कृतिक फरक , बहुविधता, बळजबरीने मिटवून एक जबरजस्तीची एकसामायिकता देशावर लादावी लागते.

चौथ्या पातळीवर इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे व त्याद्वारे ‘राष्ट्रवादी’ इतिहास क्रमिक अभ्यासक्रमांतून रूढ करण्याचा उपक्रम सुरु आहे. हा तर अगदी पेटंट फॅसिस्ट उद्योग आहे. समाजात अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणण्यासाठी पाठ्यपुस्तकातून, अधिकृत अभ्यासक्रमातून शिकविल्या जाणाऱ्या इतिहासासारखे दुसरे साधन नाही. राजस्थानातील शालेय अभ्यासक्रमात या पुढे फक्त महाराणा प्रतापचा अबकरावरील विजयच शिकविला जाईल. महाराष्ट्रातील क्रमिक पुस्तकांतून मुघल इतिहास गायब झालेलाच आहे. उत्तर प्रदेश सरकार आता शाळांमधून दिनदयाळ उपाध्यायांच्या शिकवणीवर प्रश्नोत्तरांच्या स्पर्धा आयोजित करते. संघ पुरस्कृत ‘शिक्षणतज्ञ् ‘, दीनानाथ बात्रा यांनी तर
क्रमिक पुस्तकातून रवींद्रनाथ टागोरांचे धडे, कविता काढून टाकण्याचा आग्रह धरला आहे.
हा सारा प्रयत्न म्हणजे राष्ट्राचा इतिहास हा फक्त हिंदूंचा इतिहास असल्याचे मिथक किशोरवया पासूनच शालेय अभ्यासक्रमातून मुलांवर बिंबविण्याचा प्रकार आहे.उत्तरप्रदेश सरकारच्या पर्यटक सूचीतून ताज महाल वगळणे हा म्हणूनच एकूण फॅसिस्ट उपक्रमांचाच एक भाग आहे.

ख्रिस्तोफ जेफ्रेलॉ हे फ्रेंच प्राध्यापक भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक मानले जातात. त्यांचे निरीक्षण असे आहे कि फॅसिझम चा भारतीय अविष्कार हा त्याच्या युरोपीय भावंडापेक्षा वेगळा आहे . राष्ट्रीय सयंसेवक संघाचे धोरण दीर्घकालीन आहे. त्यांना एक जैविक परिवर्तन घडवून आणायचे आहे. परंतु
प्रसंगी बलाचा व दमनशक्तीचा प्रयोग करावा लागला तर तो करण्यास त्यांची हरकत नसेल. आर्थर रोझेंबर्ग या जर्मन विचारवंताने फार महत्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो की कम्युनिस्टांनी फॅसिझम कसा अमलात येतो हे जोखण्यात एक मोठी चूक केली. ते समजत राहिले की लष्करी व पोलीस दमनशक्तीच्या बळावरच फॅसिझम टिकतो व वाढतो. अर्थात शासनाची दमनशक्ती व
शासकीय पाठिंब्याने होणारा हिंसाचार फॅसिझमला दृढ करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. परंतु फॅसिझमसाठी त्याहूनही महत्वाचे पोषणमूल्य असते ते जनमतच्या पाठिंब्याला. म्हणूनच लोकशाहीत अति उजव्या शक्ती जेव्हा सक्रिय होऊन आपल्या राष्ट्रवादी भूमिकेस जनमताचा प्रचंड पाठिंबा मिळवितात तेव्हा फॅसिझमचा धोका सर्वाधिक वाढतो.

ताज महालची ही घटना म्हणूनच आपणा सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.द्वेष, दहशत व हिंसा यावर आधारित राष्ट्ररचनेकडे होणारी वाटचाल रोखायची असेल तर या घटनेचा खरा अर्थ संघाच्या व्यापक रणनीतीच्या परिप्रेक्ष्यात जाणून घेतला पाहिजे. संघाचा जन्म झाल्यानंतर तब्बल नव्वद वर्षांनी त्यांच्या
राजकीय फ्रंट ने प्रत्यक्ष सत्ता २०१४ मध्ये हस्तगत केली आहे. गेल्या तीन वर्षांतील घटना पाहता या देशाची वाटचाल आता फॅसिझमच्या दिशेने संथपणे परंतु निश्चितपणे सुरु झालेली आहे. सर्वसमावेशक अशी विचारधारा हजारो वर्षे जपलेला हा देश आता द्वेषमूलक फॅसिस्ट विचारसरणीच्या कह्यात जातो की त्यावर मात करतो हे आता काळच सांगेल.

2 Comments

  1. vaishnavee menon Reply

    फारच सुंदर अजन घालणारा लेख आहे. फॅसिझम कङेच आपली वाटचाल सुरू आहे परंतु गरीब जनतेची फसवणूक होतेय हे वाईट आहे. मूठभर लोकांनाच या फॅसिझमचा अथॆ कळतोय काही लोकांना कळतय पण पटटी बांधूनच जगण गोङ वाटतय अशांना. लेख अप्रतिम.

Reply To G .vaidya Cancel Reply