fbpx
राजकारण विशेष

मोर्चा आणि अक्कल

सर्व भाषणे तारस्वरात केली गेली. त्यात आवेश होता. परंतु विषयाची जाण नव्हती. मोर्चा संपला. परतीच्या प्रवासात सात आठ जण अपघातात मृत्त्यू पावले. अपघाती मृत्यू झालेल्यांसाठी शासनाला जबाबदार धरण्याचा विनोदी प्रकारही झाला. त्या मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना मराठा मोर्चाकडून काही मदत देण्यात येणार आहे की नाही हे मात्र कळले नाही. की ती ही शासनानेच द्यायची?

चॅनेलवर येऊन आमचे आईवडील हाडाची काडे करतात, आम्हाला शिकवतात, त्यांना आम्ही काय देणार असा प्रश्न विचारणारी मुलगी कोणत्या प्रकारचे शिक्षण घेते,  त्यातून तिची काय प्रकारची पात्रता निर्माण होते आणि तिला कोणती नोकरी हवी याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. कारण हा तपशील त्या मुलीने चॅनेलवर तरी सांगितलेला नाही.  मराठा नसलेल्या लोकांची मुले कशी शिकतात, त्यांचे आईवडिल हाडाची काडे करत नाहीत का,  शिक्षणासाठी त्यांना फुकटात प्रवेश मिळतो का आणि किती टक्के मुलांना इतरांना मिळणाऱ्या आरक्षणामुळे फटका बसतो हे त्या मुलींना समजावून सांगण्याची गरज आहे. त्या स्वतः असा अभ्यास करतील अशी शक्यता नाही.

–धनंजय कर्णिक

 

मुंबई शहरात ऑगस्ट महिन्यात दोन मोर्चे निघाले. एक “मार्च फॉर सायन्स” या नावाने आणि दुसरा मराठा क्रांति मोर्चा. मार्च फॉर सायन्स या मोर्चाचे आयोजन देशातल्या ३० शहरांत करण्यात आले होते. देशात विज्ञान विचाराला प्राधान्य असावे, विज्ञानाच्या अभ्यासासाठीची दिली जाणारी सरकारी मदत कमी केली जाऊ नये आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद कमी करू नये याचबरोबर समाजात विज्ञाननिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न केला जावा या हेतूने जाहिराती न देता हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात घोषणा नव्हत्या. मोर्चाच्या शेवटी भाषणे केली गेली नाहीत. या मोर्चावर सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दखलही घेतली नाही. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ नव्हती. मुंबईतल्या या मोर्चात २७० जणांचा सहभाग होता. ऑगस्ट क्रांती मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा गिरगाव चौपटीवर विसर्जित करण्यात आला. तिसरा मोर्चा आदिवासींचा होता. तो तलासरीला मुंबईपासून दीडशे किलोमीटर अंतरावरच्या गावात निघाला. त्याला लाखापेक्षा जास्त आदिवासी उपस्थित होते. या मोर्चाचे कारण सरकारला अत्यंत अडचणीचे होते. त्यामुळे त्याची दखल ना सरकारने घेतली ना माध्यमांनी. तो मोर्चा तथाकथित समृध्दी महामार्गाला विरोध करण्यासाठी काढण्यात आला. त्यासाठी पालघर, डांग आणि धुळे आणि जळगावचे आदिवासी आले होते.

तर दुसऱ्या बाजूला प्रचंड जाहिराती करून गेले वर्षभर राज्याच्या विविध जिल्ह्यात ५७ मोर्चे काढून झाल्यानंतर पूर्ण तयारीनिशी मराठा समाजाला संघटित करून मराठा क्रांति मोर्चा काढला गेला. मराठा समाजाच्या मोर्चाला २० लाख लोक येतील अशी चर्चा आधीपासूनच सुरु करण्यात आली होती. ही चर्चा करण्याची पध्दत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छुप्या प्रचारपध्दतीनुसार राबविली गेली. या मोर्चाच्या चर्चेत अट्रॉसिटी कायद्याचा मुद्दा चर्चिला गेला. हे सारे होऊन प्रत्यक्षात  या मोर्चाला दोन लाख सत्तर हजार लोक आले होते. ही संख्या निश्चितच मोठी होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून वेवेगळ्या वाहनांनी मराठा समाजाचे लोक या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले होते. हा मोर्चा ‘मूक’ असेल असे जाहीर करण्यात आले होते. परंतु या मार्चात  “जय, जय, जय, जय, जय शिवाजी,जय शिवाजी” अशी भाजपाच्या लोकांनी अलिकडेच तयार केलेली घोषणा उच्चरवाने दिली जात होती. “एक मराठा, लाख मराठा” ही देखील घोषणा होतीच. म्हणजे काय असा प्रश्न मी एका मराठा सहकाऱ्याला विचारला, तेव्हा तो म्हणाला, ही घोषणा द्यायची असे सांगितलेले आहे. म्हणजे काय असे विचारायचे नाही, असे ही सांगितलेले आहे. मोर्चाची सांगता भाषणांनी झाली. कोपर्डीतील अन्याग्रस्त मुलीला न्याय मिळाला पाहिजे, गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली. भाषणे करण्यासाठी पढवून कयार करण्यात आलेल्या मुलींचा वापर केला गेला. त्या पैकी एकाही भाषणकर्तीने आपण पुढे काय करणार याचा सुतोवाचही केला नाही. नंतर चॅनेलवर जाऊन बोलणाऱ्या मोर्चाच्या आयोजकांनी आमचा मोर्चा कोणाही विरुध्द नाही. आमच्याच समाजातील मोठ्या झालेल्या आणि आता सर्वसामान्य समाजबांधवांचा ज्यांना विसर पडलेला अशा बड्यांच्या विरोधात असल्याचे जाहीर केले. या आधी झालेल्या मोर्चांसाठी आणि या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची जमवाजमव करण्यात आली होती. त्यासाठी देणग्या देणारांमध्ये राज्याच्या विविध भागात असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची संख्या मोठी होती. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एका दिवसात लाखो रुपये गोळा झाल्याचे बोलले जाते. पूर्वी हे वर्गणी देणारे अधिकारी बदल्यांसाठी मेटेंचा आधार घेत असत. शिवसंग्रामला देणग्या देत असत. तेच अधिकारी आता मराठा मोर्चाच्या पाठीशी उभे राहिले.

सरकारने या मोर्चाची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या मोर्च्याच्या मागण्यांना उद्देशून पोकळ आश्वासनांची खैरात केली. नीटपणे नंतर वाचल्यावर लोकांच्या लक्षात आले की ही सर्व आश्वासने म्हणजे भंपकपणा आहे. शेतकरी आंदोलकांना रातोरात वर्षा बंगल्यावरवर बोलावून मुख्यमंत्र्यांनी केले तेच त्यांनी मराठा मोर्चातील लोकांना चर्चेसाठी बोलावून केले. अपरिपक्व नेतृत्व, उथळ वक्ते आणि भूमिकेबाबतचा गोंधळ अशी या मोर्चाची सांगता झाली. आतापर्यंत झोपेत असलेले आणि नुकतेच भाजपावासी झालेल्या संभाजीराजे यांनी ऐनवेळी व्यासपीठावर जाऊन आपणच या मोर्चाचे नेते असल्याचा आव आणून आपण काही कमी पोकळ नाही हे दाखवून दिले.

या मोर्चाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे भाषण करणाऱ्या एका वक्त्या मुलीने सतत हातात मशाल घेऊन भाषण केले. ती मशाल हाती का घेतलेली होती याचे काहीही स्पष्टीकरण नाही. शिवाय शपथ घेण्याचा एक अस्थायी कार्यक्रमही यात करून घेण्यात आला. यात शपथ देणाऱ्या मुलींनी आपापला उजवा हात खांद्यापर्यंत जमिनी समांतर उचलून शरीरासमोर ताठ ठेवून शपथ घेतली. परंतु अशा प्रकारे हात आपल्या समोर जमिनीशी समांतर ठेवून जर्मनीच्या नाझी संघटनेचे सदस्य त्यांच्या अतिप्रचंड मिरवणुकांमध्ये शपथ घेत असत. ती त्यांची सलामी देण्याची पध्दत होती, हे मराठा आंदोलकांना कुणीही सांगितलेले नसावे. किंवा आंदोलकांच्या म्होरक्यांनी ते माहीत असूनही जाणीवपूर्वक केले असावे. हीच नाझी सलामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांना पारदर्शी कारभाराची शपथ देताना आशिष शेलार यांनी आपल्या नगरसेवकांना द्यायला लावली होती. हा मोर्चा त्याच दिशेने तर जात नाही ना अशी भयशंका यावेळी मनात तरळून गेली. संयोजनकर्त्यांमध्ये असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक, सत्तेत असलेले संघस्वयंसेवक आणि  मोर्चेकऱ्यानी पाळलेली शिस्तबद्धता यांचा विचार केला तर हा मोर्चा ज्या पध्दतीने काढला गेला त्याबद्दल मनात अनेक शंका उपस्थित झाल्या.

आपला मुद्दा मांडण्यासाठी आक्रमक भाषा आणि सतत व्यक्त होणारी अगतिकता हे या मोर्चेकऱ्यांचे गुणवैशिष्ट्य होते.

सर्व भाषणे तारस्वरात केली गेली. त्यात आवेश होता. परंतु विषयाची जाण नव्हती. मोर्चा संपला. परतीच्या प्रवासात सात आठ जण अपघातात मृत्त्यू पावले. अपघाती मृत्यू झालेल्यांसाठी शासनाला जबाबदार धरण्याचा विनोदी प्रकारही झाला. त्या मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना मराठा मोर्चाकडून काही मदत देण्यात येणार आहे की नाही हे मात्र कळले नाही. की ती ही शासनानेच द्यायची?

चॅनेलवर येऊन आमचे आईवडील हाडाची काडे करतात, आम्हाला शिकवतात, त्यांना आम्ही काय देणार असा प्रश्न विचारणारी मुलगी कोणत्या प्रकारचे शिक्षण घेते,  त्यातून तिची काय प्रकारची पात्रता निर्माण होते आणि तिला कोणती नोकरी हवी याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. कारण हा तपशील त्या मुलीने चॅनेलवर तरी सांगितलेला नाही.  मराठा नसलेल्या लोकांची मुले कशी शिकतात, त्यांचे आईवडिल हाडाची काडे करत नाहीत का,  शिक्षणासाठी त्यांना फुकटात प्रवेश मिळतो का आणि किती टक्के मुलांना इतरांना मिळणाऱ्या आरक्षणामुळे फटका बसतो हे त्या मुलींना समजावून सांगण्याची गरज आहे. त्या स्वतः असा अभ्यास करतील अशी शक्यता नाही.

मोर्चा काढला कशासाठी आणि त्यातून साध्य काय झाले असा प्रश्न आता तरी या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना पडला आणि ते विचार करू लागले तरी या मोर्चाने काही तरी साध्य केले असे होईल. अन्यथा हा मोर्चा म्हणजे ढगात गोळ्या मारण्याच्या पंक्तीला जाऊन बसेल, हे निश्चित.

या मोर्चाच्या निमित्ताने वृत्तपत्रांनी, “मुंबई शहरात भगवे वादळ”, “शहर भगवे झाले” आणि तत्सम शब्दांचा वापर करून कौतुकभरे मथळे दिले. सर्व वृत्तपत्रांनी आपापल्या  हेडलाईन्स मधून या मोर्चाचा उदोउदो केला. यावरून नागड्या राजाची गोष्ट आठवली. राजा नागडा आहे हे सांगण्याचे धाडस कुणीच केले नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना आपल्या टीआरपीची काळजी होती. शिवाय तिथे काम करणारे पत्रकार भारावून गेले होते. वृत्तपत्रांची गोष्ट वेगळी होती. तिथे संपादकांचा शब्द चालतो तिथे आपण विरोधी काही लिहिले तर आपल्यावर जातीयवादी किंवा मराठ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप होईल अशी भीती त्यांना होती. त्यामुळे जाऊ द्या, काढला मोर्चा तर काढला आपले काय जाते अशी त्यांची भूमिका होती. शिवाय मुख्यमंत्री थातूरमातूर सवलती जाहीर करून वेळ मारून नेतील अशी खात्री या माध्यमांना होती. त्यामुळे माध्यमांचा मोर्चांना असलेला प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे चलता है प्रकारचा होता.

मराठा मोर्चाची आणखी एक मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईच्या समुद्रात तात्काळ उभारावा अशी. ही मागणी मुळात शिवसंग्राम या विनायक मेट्यांच्या संघटनेची होती. ती त्यांचे दुकान चालते रहावे यासाठी केली गेली होती. सत्ताधारी पक्षाला ती सोयीची असल्यामुळे ती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने उचलून धरलेली होती. परंतु छत्रपतींच्या नावाने राजकारण करण्याचे मूळ दुकान शिवसेनेचे असल्यामुळे त्यांना ती मागणी उचलून धरणे भाग होते. भाजपाला नाईलाजाने या दुकानदारीत भागीदारी स्वीकारावी लागली. परंतु या मागणीची ताकद कळल्यावर त्यांना ती आपलीच कल्पना आहे अशी भूमिका घ्यावी लागली. ती त्यांनी नुसतीच घेतली असे नाही, त्या कल्पनेच्या उद्गात्या मेटेंच्यासह गिळंकृत केली. पुतळा हा आपल्या राज्याच्या प्राधान्य यादीत नाही, याचे भान आहे असे कुणाच्याही वर्तनातून दिसले नाही.

मोर्चेकरी परतले आहेत. भ्रमनिरास झाल्यामुळे ते हळुहळू  जागे होतील. तोवर २०१९ च्या निवडणुका आलेल्या असतील.

आपल्या पदरात नोकऱ्या पडतील, आरक्षणाचा प्रश्न सुटेल किंवा कोपर्डीच्या प्रकरणात न्याय होईल या आशेवर मराठा समाजाला भाजपाच्या पाठीशी उभे करण्यात त्यांच्या नेत्यांना यशही येईल. पण त्यातून न्याय मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

 

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून लोकसत्ता दैनिकात चीफ रिपोर्टर म्हणून त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे.

1 Comment

Write A Comment