fbpx
राजकारण

मनुस्मृतीचा मेकओव्हरः दलित बहुजनांच्या गुलामगिरीची गीता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘संस्कारभारती’ ही संस्था ‘मनुस्मृती’चा मेकओव्हर करणार असून मनूविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या बातम्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. मुळात जो ग्रंथ या भूमीतल्या दलित-बहुजनांच्या गुलामगिरीचा उद्घोष करतो, त्याचा मेकओव्हर कशासाठी? कोणासाठी? या मेकओव्हरमधून काय दडवायचे आहे, काय झाकायचे आहे? हे प्रश्न आजच्या सामाजिक वास्तवात महत्त्वाचे आहेत. मुळात ज्या ग्रंथाच्या पानापानावर इथल्या दलित बहुजनांच्या गुलामगिरीचा उच्चार आहे त्याचा मेकओव्हर करावासा वाटणं, हाच इथल्या दलित-बहुजनांचा, समस्त स्त्रियांचा आणि देशाच्या समतावादी राज्यघटनेला मानणाऱ्या विचारी नागरिकांचा अधिक्षेप आहे.

— संध्या नरे-पवार

 

२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड इथल्या चवदार तळ्याकाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’चं दहन केलं. बाबासाहेबांचं हे कृत्य कोणत्याही गैरसमजांवर आधारित नव्हतं तर मनुस्मृतीच्या पानापानांवर जे काही विषमतावादी, विषारी उच्चार आहेत, त्यांचा निषेध म्हणून हे दहन करण्यात आलं. महाड इथल्या सार्वजनिक चवदार तळ्यावरील पाणी पिण्याचा हक्क अस्पृश्यांनाही मिळावा, या मागणीसाठी तसंच पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनांवर अस्पृश्यांचाही स्पृश्य हिंदूंइतकाच अधिकार आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आधी मार्च १९२७ मध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांसह महाड इथे गेले. पण सनातनी हिंदूंनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. चवदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांना पिऊ दिलं नाही. तेव्हा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांसह चवदार तळ्याकाठी जमले. पुन्हा एकदा सनातनी हिंदूंच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चवदार तळ्याभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला.

यावेळी महाड इथे केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘महाडचे तळे सार्वजनिक आहे. महाड येथील स्पृश्य इतके समजुतदार आहेत की, ते आपणच या तळ्याचे पाणी नेतात असे नव्हे तर कोणत्याही धर्माच्या माणसाला त्या तळ्याचे पाणी भरण्यास त्यांनी मुभा ठेवली आहे. त्याप्रमाणे मुसलमान आणि परधर्मिय लोक या तळ्याचे पाणी नेतात. मानव योनीपेक्षा कमी मानलेल्या पशुपक्ष्यांच्या योनीतील जीवजंतुसही या तळ्यावर पाणी पिण्यास ते हरकत घेत नाहीत. महाडचे स्पृश्य लोक अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिऊ देत नाहीत, याचे कारण अस्पृश्यांनी स्पर्श केला असता ते पाणी नासेल किंवा त्याची वाफ होऊन ते नाहिसे होईल अशामुळे नव्हे. अस्पृश्यांना ते पाणी पिउ देत नाहीत याचे कारण हेच की, शास्त्राने असमान ठरविलेल्या जातींना आपल्या तळ्यातील पाणी पिऊ देऊन त्या जाती आपल्या समान आहेत, असे मान्य करण्याची त्यांची इच्छा नाही.’ (कीर धनंजय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पॉप्युलर प्रकाशन, १९८९, पृष्ठः १०४)

इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पृश्यांच्या वर्तनाचं विश्लेषण करताना विषमतावादी शास्त्रांकडे लक्ष वेधतात. शास्त्रांनी जातीजातींमध्ये भेद निर्माण केला आहे, हिंदु धर्मातील विषमतेचा आधार शास्त्रं आहेत, हे ते स्पष्ट करतात. या भाषणानंतर सभेत ‘मनुस्मृती दहना’चा ठराव संमत केला जातो. या सभेत जे एकूण ठराव झाले ते या ‘मेकओव्हर’च्या पार्श्वभूमीवर अभ्यासणं आवश्यक आहे.

मनुस्मृती दहन दिन

पहिल्या ठरावाने हिंदुमात्रांच्या जन्मसिद्ध हक्कांचा जाहीरनामा उद्घोषित करण्यात आला. सर्व माणसे जन्मतः समान दर्जाची आहेत व मरेपर्यंत समाज दर्जाची राहातील. विषमतामूलक समाजरचनेचा पुरस्कार करणाऱ्या प्राचीन नी अर्वाचीन ग्रंथांचा तीव्र निषेध करण्यात आला. श्रुती, स्मृती, पुराण वगैरेंचे प्रामाण्य कबूल करण्यास ही परिषद तयार नाही. ज्या गोष्टीला कायद्याने मनाई केलेली नसेल ती करण्यास सर्वांना मोकळीस असावी. रस्ते, पाणवठे, देवालये वगैरे ठिकाणी कोणासही प्रतिबंध नसावा. हा पहिला ठराव सीतारामपंत शिवतरकर यांनी मांडला. दुसऱ्या ठरावाने शूद्र जातीचा उपमर्द करणारी, त्यांची प्रगती खुंटवणारी, त्यांचे आत्मबळ नष्ट करणारी, त्यांची सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी कायम ठेवणारी मनुस्मृती हिचाही परिषद दहनविधी करत आहे, असे जाहीर करण्यात आले. बाबासाहेबांचे ब्राम्हण अनुयायी सहस्त्रबुद्धे यांनी हा ठराव मांडला व त्याला राजभोज यांनी अनुमोदन दिले. तिसऱ्या ठरावान्वये असे जाहीर करण्यात आले की, सर्व हिंदु एकवर्णीय समजण्यात यावेत. चवथ्या ठरावाप्रमाणे ‘धर्माधिकारी’ ही संस्था लोकमतनुवर्ती नि पुरोहित लोकनियुक्त असावेत, अशी मागणी करण्यात आली. (उपरोक्त, पृष्ठः १०५)

या चारही ठरावांवरुन हे लक्षात येतं की, मनुस्मृती दहन ही केवळ एक निषेधाची, संतापाची कृती नव्हती, तर ती संपूर्ण समाजपरिवर्तनाची मागणी होती, समतावादी समाजाचं स्वप्न त्या ज्वाळांमधून प्रकाशमान होत होतं. ते स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणूनच १९५६ मध्ये ‘धर्मांतर’ झालं आणि २०१७ मध्येही ते होत आहे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यूचं कारण बनलेल्या जातीयवादी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या त्याच्या आईने, राधिका वेमुलाने आपल्या संघर्षाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत येऊन बाबासाहेबांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बौदध धम्माचा स्वीकार केला. हा धम्मस्वीकार केवळ आध्यात्मिक नाही, तो सामाजिक आणि राजकीयही आहे. मनुस्मृतीचा मेकओव्हर करु पाहाणाऱ्यांनी या धम्मस्वीकाराचा अन्वयार्थ जरुर लक्षात घ्यावा.

मात्र इथल्या बहुजनांच्या अस्तित्वाचं आणि अस्मितांचं ज्यांना भान नाही अशीच जातवर्णवर्चस्ववादी मंडळी हा असा मेकओव्हरचा घाट घालू शकतात. अशांसमोर आणखी एक वास्तव मांडणं आवश्यक आहे. २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेबांनी इथल्या पुरुषसत्तेला आणि जातिव्यवस्थेला दोन्हीला हादरा दिला होता. भारतातील जातिआधारित समाजरचनेत पुरुषप्रधानता आणि जातिव्यवस्था या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. जातिव्यवस्था पुरुषप्रधानतेच्या पायावर उभी आहे तर पुरषप्रधानतेला जातिव्यवस्थेचा भरभक्कम आधार आहे. स्त्रिया हे जातीव्यवस्थेचं द्वार आहेत, स्त्रियांवरच्या लैंगिक नियंत्रणातून जातिव्यवस्था आकाराला आली, हा सिद्धान्त बाबासाहेबांनी मांडला आहे. मनुस्मृती स्त्रिया आणि शूद्र-अतिशूद्र या दोन्ही घटकांना हीन लेखते. म्हणूनच जातिव्यवस्था आणि पुरुषप्रधानता या दोन्हीचा आधार असलेल्या मनुस्मृतीचं बाबासाहेबांनी २५ डिसेंबरला दहन केलं. म्हणूनच २५ डिसेंबर हा दिवसच ‘भारतीय स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी दलित-बहुजन स्त्रीवाद करत आहे.

वर्ध्याच्या डॉ. प्रमिला लीला संपत यांनी १९९६ मध्ये चंद्रपूर इथे झालेल्या ‘विकास वंचित दलित महिला परिषदे’त २५ डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांनी केलेल्या मनुस्मृती दहनाचं स्मरण म्हणून हा दिवस ‘भारतीय महिला मुक्ती दिवस‘ म्हणून साजरा केला जावा, अशी मागणी केली. दलित समाजातल्या कार्यकर्तीकडून प्रथमच वेगळ्या महिला मुक्तीदिनाची मागणी करण्यात आली आणि इतर दलित-बहुजन कार्यकर्त्या महिलांनीही या मागणीला पाठिंबा दिला. यानंतर १९९८ पासून डॉ. प्रमिला लीला संपत महाड इथे २५ डिसेंबरला वेगवेगळ्या महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘भारतीय महिला मुक्ती दिन’ साजरा करत आहेत. एकीकडे डॉ. प्रमिला महाड इथे हा दिवस साजरा करत असतानाच इतर दलित-बहुजनवादी महिला संघटनांनी एकत्र येऊन आपली संयोजन समिती तयार केली. सत्यशोधक महिला सभा, नारी समता मंच, सर्वहारा महिला आघाडी, दलित स्त्री अस्मिता मंच, स्त्री अभ्यास केंद्र (पुणे), समाजवादी महिला सभा, या संघटनांसोबत भारिप-बहुजन महासंघ हा राजकीय पक्षही यात सहभागी झाला. त्यामुळे या दिनाला अधिक व्यापकत्व आले आणि सामान्य कष्टकरी स्त्रीपर्यंत हा दिवस पोहोचला. २००३ मध्ये मुंबईत चैत्यभूमी इथे ‘दलित बहुजन महिला विचर मंच’ने मनुस्मृतीचं प्रतीकात्मक दहन करुन महिला मुक्तिदिन साजरा केला. यावेळी लेखिका उर्मिला पवार, हिरा बनसोडे, लता प्र.म., कुंदा प्र.नी., संध्या गोखले, अरुणा बुरटे, वंदना गांगुर्डे, आशा गांगुर्डे, वंदना शिंदे या महिला उपस्थित होत्या.

मनुस्मृती दहन दिन हाच भारतीय महिला मुक्ती दिन असावा, या दलित बहुजन स्त्रीवादी महिलांच्या मागणीला अधिकाधिक पाठिंबा मिळत गेला, याचं कारण समाजात आजही मनुस्मृती आणि इतर विषमतावादी धर्मशास्त्रांचे आचारविचार जिवंत आहेत. मनुस्मृतीसारख्या ब्राम्हणी धमर्शास्त्रांनी घालून दिलेले आणि आजही प्रचलित असलेले विवाहसंस्थेचे नियम हा मुद्दा अधिक स्पष्ट करतात. उच्च जातीतील पुरुष आणि कनिष्ठ जातीतील स्त्री यांच्यातील विवाह हा धर्मशास्त्रांनी ‘अनुलोम’ (वरुन खालच्या दिशेने असणारी केसांची लव) म्हणजे संमत मानला आणि त्याला मान्यता दिली. मात्र त्याचवेळी उच्च जातीतील स्त्री आणि कनिष्ठ जातीतील पुरुष यांच्यातील विवाह मात्र शास्त्रकारांनी ‘प्रतिलोम’ (घालून वरच्या दिशेने असणारी केसांची लव) म्हणजेच असंमत मानला. एवढंच नाही तर असा विवाह करणाऱ्यांना जबर शिक्षा ठोठावली. आजही कनिष्ठ जातीच्या तरुणाने उच्च जातीच्या तरुणीशी प्रेमविवाह केला तर त्या कनिष्ठ जातीच्या संपूर्ण वस्तीवर उच्च जातीयांनी हल्ला केल्याच्या घटना सर्रास घडत असतात. आजच्या या ऑनर किलींग मागे मनुस्मृतींसारख्या धर्मशास्त्रांची मान्यता उभी आहे.

उच्च जातीतल्या स्त्रियांच्या शुचितेवरच उच्च जातींचं तथाकथित पावित्र्य अवलंबून असतं. उच्च जातीय स्त्रियांनी कनिष्ठ जातीय पुरुषाशी लग्न केलं तर जातीय उतरंडीला धक्का बसेल. त्यामुळेच प्रतिलोम विवाहांवर बंदी आणून उच्चवर्णिय स्त्रियांवर बंधनं लादण्यात आली. पण स्त्रियांवर ही बंधनं लादतानाही धर्मशास्त्रांनी जातीव्यवस्थेनुसार वेगवेगळी भूमिका घेतली.

‘उच्चकुलीन पुरुषाची भोगसेवा करणं, हीन जातीच्या स्त्रीसाठी अनुचित नाही’ (मनुस्मृती ८-३६५),

‘अक्षमाला ही हीनजातीय स्त्री वसिष्ठांशी आणि शारंगी ही हीनजातीय स्त्री मंदपाल मुनींशी संयोग झाल्यामुळे पवित्र झाल्या. अनेक स्त्रियांनी हा मार्ग अनुसरलेला आहे’ (मनुस्मृती ९-२३ ते २५) (करुंदकर नरहर, मनुस्मृती, २००१, पृष्ठ. १५९) इथे धर्मशास्त्रच हीनजातीय स्त्रीला भोगसेवेचा मार्ग सांगत आहे. आणि त्याचवेळी ‘उच्चवर्णियांनी शूद्र भार्या करणे केव्हाही उचित नाही’ असेही सांगत आहे. (मनु. ३-१४)(उपरोक्त, पृष्ठ. १६०)

शास्त्रांमधलं शूद्र स्त्रीचं हे स्थान आजच्या दलित-बहुजन स्त्रीच्या आत्मसन्मानावर आघात करणारं आहे. बरं हे कुठं एखाद्या ठिकाणी आलेलं नाही की ते प्रक्षिप्त म्हणून सोडून द्यावं. पानापानांवर असे आघात आहेत. व्यभिचाराच्या शिक्षा सांगतानाही शूद्र स्त्रीपुरुषांवर असाच अन्याय केला आहे. व्यभिचार हा गुन्हा असेल तर त्याची शिक्षा सर्व जातीतील पुरुषांना सारखी हवी. पण तसे होत नाही. उच्चजातीय स्त्रीशी नीचजातीय पुरुषाने केलेल्या व्यभिचाराला लिंग छाटण्याची तसंच मृत्यूदंडाची शिक्षा आहे. ब्राम्हण स्त्रीशी ब्राम्हण पुरुषाने केलेल्या व्यभिचाराला मात्र एक हजार नाणी एवढाच दंड आहे. शूद्र स्त्री भोगदासीच मानलेली असल्याने तिच्यासोबतच्या ब्राम्हण पुरुषाच्या व्यभिचाराचा उल्लेख ना्ही. (साळुंख आ.ह., मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, २०००, पृष्ठ. १०१,१०२)

बाकी शूद्राला वेदाध्ययनाचा, धन संग्रहित करण्याचा अधिकार नाही, या परिचित गोष्टी तर आहेतच. पण असं असतानाही मनुस्मृतीची समर्थक मंडळी एखाद्या श्लोकाचा आधार घेत मनुस्मृतीची उदारता दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. यात ‘यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः’ हा श्लोक प्रसिद्ध आहे. घरात सौख्य नांदायचे असेल तर स्त्रीला प्रसन्न ठेवा, याअर्थी हा श्लोक आला आहे. या श्लोकाचं स्वागत करत असतानाच पानापानावर जे स्त्रीविरोधी उद्गार आहेत, त्याचं काय करायचं? कारण त्यांची संख्या अधिक आहे. या संख्याबळाच्या आधारावर स्त्रीनिंदा करणारे श्लोक अधिकृत ठरतात तर स्त्रीपुजा सांगणारा प्रक्षिप्त ठरण्याची अधिक शक्यता आहे. मेकओव्हरचा अर्थ चांगल्या बाबी पुढे आणणे आणि नको असलेल्या मागे टाकणे, असा असेल तर मोठाच गोंधळ होईल कारण इथे नको असलेल्या गोष्टींचाच अधिक भरणा आहे. डॉ. आंबेडकरांसारख्या विद्वानाने इतर सगळ्या धर्मशास्त्रातून मनुस्मृतीच निवडली त्यामागे हेच कारण आहे की ती अधिक विषमतावादी आहे.

न स्त्री स्वातंत्र्यम्‌ अर्हति, स्त्रीला स्वातंत्र्य देणं उचित नाही एवढंच सांगून मनू थांबत नाही तर पती शीलरहित, स्वेच्छाचारी असला तरी त्याला देव मानावे (५-१५४), पती वारला तर व्रतस्थ राहावे, परपुरुषाची इच्छा करु नये,(५-१५८), स्त्रीला नव्याने पती करण्याचा अधिकार नाही (५-१६२), स्त्रिया चटकन व्यभिचारी होणाऱ्या आणि चंचल मनाच्या असतात. (९-१५), स्त्री म्हणजे असत्य (९-१८) अशी अनेक वचनं स्त्रीला हीन लेखणारी, तिचं माणूसपण नाकारणारी आहेत. (कुरुंदकर, पृष्ठ. ७७)

विषमतावादी मनुस्मृती आणि इतर शास्त्र ही इथल्या दलित-बहुजनांच्या आणि विचारी स्त्रियांच्या अस्मितेवरचा आघात आहे. एकसंध समाज हवा असेल तर या विषमतावादाला इतिहासाच्या एका कोपऱ्यात ठेवणं आवश्यक आहे. त्याला वर्तमानात आणण्याचे प्रयत्न समाजात अधिक दुफळी निर्माण करणारे ठरतील. अर्थात विषमतावादी समाजरचना हेच ज्यांचं उद्दिष्ट आहे त्यांना केवळ मनुस्मृतीचाच नाही तर संपूर्ण इतिहासाचाच मेकओव्हर करायचा आहे.

वरिष्ठ पत्रकार, लेखिकाअसून सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत.

2 Comments

  1. शुभा Reply

    परखड सत्य
    एक अत्यंत छुपा आणि पराकोटीचा जातीयवादी अजेंडा चलाखीने जनमानसात रुजवला जातोय,आणि त्याला तसाच प्रतिसाद मिळतोय।

  2. संजय सावरकर Reply

    गीता ही हिंदुंची घटना आणि मनुस्मृति ही पीनल कोड आहे.

Write A Comment